Login

ईराच्या वाचक सौ. शालन पडवळे यांच्याशी ग्रेट भेट

कांही भेटी मनाच्या गाभाऱ्यात चिरंतन राहतात.

आदरणीय संजना इंगळे यांनी ईरा व्यासपीठाची निर्मिती करून लेखक व वाचक यांना सकारात्मक विचारप्रणालीचा प्रेरणास्तोत्र उपलब्ध केला आहे. ईरावर लेखकांचे दर्जेदार लेखन वाचकांना नेहमीच आकर्षित करते. लेखकांनी समाजातील बदल अत्यंत सुक्ष्मयतेने टिपताना वाचकांच्या आवडीचाही विचार केला आहे. त्यानुसार वाचकांनी लेखकांच्या लिखाणाला तितकीच समर्पक दाद दिली आहे.आपले लेखन वाचकांनी वाचावे आणि त्याला छानसा अभिप्राय द्यावा ही सगळ्याच लेखकांची अपेक्षा असते. अभिप्रायामुळे लेखकाला निश्चितच बळ मिळते त्यामुळे लेखनाची गती आणखी वाढते.अशाच ईरावर सक्रिय असणाऱ्या नियमित वाचक सौ. शालन पडवळे यांची गावी झालेली भेट खूपच आल्हादायक वाटली.

सौ. शालन पडवळे यांच्या भेटीचा योग विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल. ईरावर मी लिहीत असलेल्या ' गावाकडच्या गोष्टी ' हे सदर त्यांना फार आवडले यावर त्यांनी सुंदर अभिप्राय दिला; पण या अभिप्रायामध्ये त्यांचा मोबाईल नंबर दिसला. यावर मी त्यांना कॉल केला. त्यावेळी त्यांनी कोल्हापूरकडील महागाव व गडहिंग्लज या गावाशी असलेले नाते सांगीतले.आपल्या भागातील सर्व माहिती समजल्यामुळे त्यांच्याशी चांगली ओळख झाली. दीपावलीनिमित्त त्या गावी आल्या असलेमुळे गडहिंग्लज येथे मी त्यांना भेटण्यास गेलो. त्यांच्याशी छान संवाद झाला. गावाकडील अनेक गोष्टींची त्यांनी आवड सांगीतली. आपल्या शैक्षणिक व कौटुंबिक जीवनातील चढउतार यांचे अनुभव व आपल्या वाचन आवड कशी जपली यावर दिलखुलास गप्पा झाल्या. कवितेची त्यांना विशेष आवड आहे. २०२० साली त्यांनी ' शब्दफुले ' हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. महाराष्ट्र टाईम्समध्ये त्यांचे सात ते आठ लेख छापून आले आहेत. पुस्तके वाचण्याचा छंदाबरोबर त्या जेष्ठ नागरीक संघ व विरंगुळा महिला मंडळाशी वाचनाने जोडल्या आहेत. सर्वांच्या वाढदिवासाला शुभेच्छा देणे व भेटवस्तू देण्याची त्यांची आवड खरोखरच अनुकरणप्रिय आहे.या सगळ्या गोष्टीत त्यांच्या मुलांचे त्यांना सहकार्य आहे त्यामुळे त्यांची लेखनकला व वाचन बहरले आहे.

तास-दिड तास मनसोक्त गप्पा मारल्या.ईरातील कथा नेहमी वाचत असलेमुळे लेखकांच्या लिखाणाविषयी त्यांनी गौरवउदगार काढले.यानंतर अशा हरहुन्नरी प्रेरक वाचकाचा सत्कार करण्यात आला. त्यांनीही मला शिवाजी महाराजांचे चित्र व आपला कवितासंग्रह भेट दिला.

कोल्हापुरी माणसे आदर , सन्मानाने भारलेली असतात याचा प्रत्यय त्यांच्या आदरातिथ्य व पाहुणचार यामध्ये दिसला.
लेखकांचे तर सन्मान झालेच पाहिजेत ;पण लेखकांची सारी भिस्त ज्या वाचकांच्यावर अवलंबून असते अशा वाचकांचा सन्मान तितक्याच आनंदाने व आवेशाने झाला पाहिजे याउद्देशाने त्यांची आजची भेट अविस्मरणीय ठरली. त्यांना ईराच्या गेटटुगेदरची संकल्पना सांगीतली आणि मुंबईत होणाऱ्या या सोहळ्याचे आमंत्रण दिले. याबाबत त्यांनी निश्चितच येऊ असे आश्वासन दिले. त्यांचे आशीर्वाद घेतले आणि मी गावी प्रस्थान केले.