Login

इरकल अंतिम भाग

एक सुंदर स्वप्न पुरे व्हायची तितकीच सुंदर गोष्ट



इरकल अंतिम भाग

मागील भागात आपण पाहिले की आजीच्या डोळ्यातले स्वप्न पूर्ण करायचे सरिकाने ठरवले. तिने दुकानात भिशी लावली. साड्या पाहून ठेवल्या. आता पाहूया पुढे.


घरी आल्यावर तिने प्रियाला हे सांगितले. तशी तिसरी मैत्रीण म्हणाली,"सारिका, अग एवढे पैसे कशाला खर्च करते? आधीच तुझे खर्च कसेबसे भागतात. त्यापेक्षा स्वतः ला चार बरे ड्रेस घे. नवी पुस्तके घे."


सारिका म्हणाली,"पुस्तक जुने असेल तरी मजकूर तोच की. मला माझ्या आजीच्या डोळ्यात आनंद पाहायचा आहे."


प्रिया म्हणाली,"सारिका,तू कर तुला बरे वाटेल ते."


सारिकाने शेठजीना तिला दोन इरकल साड्या हव्या हे सांगून ठेवले. दोन दिवसांनी ती निघणार होती. गौरीच्या आदल्या दिवशी तिला पोहोचायचे होते.


इकडे घरी यशोदा आजी आणि सरिकाची आई कुसुम सणाची तयारी करत होत्या. कुसुम म्हणाली,"आत्या,यंदा तरी नव्या साड्या घिऊ ना गवर बसवायला. हलक्या असल्या तरी चाललं."


यशोदाबाई म्हणाल्या,"सुमे,अग पोरांच्या फिया,शेतीचा खर्च मला दिसत न्हाय का?"


चल जुन्या साड्या काढ बघू. सुमनने ट्रंक उघडली. यशोदा आणि तिच्या लग्नात मिळालेले शालू दरवर्षी गौरीला घालत.


यशोदा सगळ्यांना आमच्याकडे अशी रीत आहे. असे सांगत असे. खरे कारण वेगळेच होते.


साडी काढत असताना एक शालू काठावर थोडा विरलेला दिसला.


यशोदा आजी रडत म्हणाली,"गवराई,माफी कर बाय. पण पैक्याच साँग नाय आणता येत."


सारिका दुसऱ्या दिवशी साड्या घ्यायला दुकानात गेली. शेठ म्हणाले,"सारिका,एक मुलगी आजारी आहे. मला माहित आहे तुला गावी जायचे आहे. पण तू उद्या सकाळी जाशील का?"


सारिका विचारात पडली.


तेवढ्यात शेठ म्हणाले,"आपल्या दुकानातून तिकडे माल घेऊन जाणाऱ्या गाडीत तू जाऊ शकतेस."


सरिकाने होकार दिला. संध्याकाळी जाताना तिच्या साड्या पॅक करून तिला मिळाल्या.


दुसऱ्या दिवशी यशोदाबाई आणि सुमन तयारीला लागल्या.

यशोदा म्हणाली,"सुमे,गवराईला आशी इरलेली साडी नग. म्या जाते दुकानात. उदारीवर आणते दोन साड्या."


सुमन म्हणाली,"व्हय,आदी निवद करू मग जावा."

सगळी तयारी करून यशोदा निघाली तेवढ्यात,"आजी,आई मी आले."


सारिका धावतच घरात गेली. सारिकाची भावंडे सुद्धा पळत आली.


तेवढ्यात यशोदा म्हणाली,"म्या जाऊन येते. लगीच आले."

सारिका म्हणाली,"आजी, आधी मी काय आणले ते बघ."


सरिकाने पिशवी काढली. त्यात दोन साड्या आणि आणखी एक बॉक्स होता.

साड्या पाहून आजीच्या डोळ्याला पाण्याची धार लागली,"गवराई,तुझी हाऊस तूच पुरी केलीस."


सारिका आनंदाने म्हणाली,"आई,आजी गौरीनंतर ह्या साड्या तुम्ही नेसा."


तेवढ्यात छोट्या आशुने बॉक्स फोडला,"ताई,हे बघ."


सारिका पळत आली.बॉक्स फोडलेला पाहून ती रागावली. बॉक्समध्ये आणखी दोन इरकल होत्या.

सारिका त्या परत ठेवणार. एवढ्यात आत एक चिठ्ठी दिसली.



शेठजींनी लिहिले होते,"प्रिय सारिका,तू भिशी लावलीस आणि कुतूहल जागे झाले. कॉलेजात शिकणारी पोरगी आणि साडी भिशी लावते? मग मी दुकानातल्या पोरींना कामाला लावले. त्यांनी चालता बोलता तुझे स्वप्न माझ्यापर्यंत पोहचवले. बाळा,घरच्या गौरींना साड्या घेऊन गेलीस. पण त्याच साड्या आई आणि आजीला नको नेसवू. माझ्याकडून ह्या दोन साड्या तुझ्या आई आणि आजीसाठी. नाही म्हणू नकोस. तुझी आजी साडी नेसेल तेव्हा माझ्या आईने कांजीवरम घातल्याचे सुख मला मिळेल."




चिठ्ठी संपवून सारिका रडत आजीला मिठी मारत म्हणाली,"आजे,तुझी गवर पावली."


दुसऱ्या दिवशी गौरी सजल्या होत्याच. पण त्याहीपेक्षा वांगी रंगाची आणि केशरी काठाची इरकल नेसलेली आजी आणि गर्द हिरव्या रंगाच्या साडीत आईला पाहून सारिका रडत म्हणाली,"आजी आता इथून पुढे गौरीला साडी नेसवत असताना तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही."


हे सगळे पाहून गौराई हसून आशीर्वाद देत होत्या.



टीप:अनेकांना सारिका शिक्षण घेताना साडीसाठी पैसे जमवते हे पटणार नाही. परंतु भावनांना व्यवहारात तोलता येत नाही.