Login

इरकल भाग 2

आजीचे स्वप्न सारिका पूर्ण करेल का?



इरकल भाग 2

मागील भागात आपण पाहिले की इरकल साडी आणि सारिका यांचे एक वेगळे नाते होते. आता सारिका साडीच्या दुकानात काम करत असताना ते नाते कोणत्या वळणावर जाईल?

सारिका आता मन लावून अभ्यास करत होती. त्याबरोबर ती दुकानात काम करून आपले खर्च भागवत असे. वडिलांनी पाठवलेले पैसे फक्त जेवणाला पुरत. तरी सारिका त्यांना काही सांगत नसे.


एकदा दुकानात काम करत असताना एक महिला कार्ड घेऊन आली.

तिचे कार्ड घेऊन शेठजी म्हणाले,"सारिका,ह्यांना शालू दाखव."


सारिका शालू दाखवत असताना म्हणाली,"मावशी,ते कार्ड कसले होते?"


तशा मावशी हसून म्हणाल्या,"पोरी,म्या चार घरी धुणीभांडी करते.माझ्या पोरीच लगीन हाय. त्यासाठी हित भिशी लावली व्हती. शेठ लई भला माणूस हाय."


बोलता बोलता खरेदी करून त्या बाई निघून गेल्या. सारिका काम संपवून निघाली.


तेवढ्यात तिला घुटमळत असलेले पाहून शेठजी म्हणाले,"सारिका,काही हवे आहे का?"


सारिका म्हणाली,"सर,साडी भिशी कशी काय सुरू केली तुम्ही?"


शेठ हसले,"सारिका,मी स्वतः एका गरीब कुटुंबातून आलो आहे. स्त्री गरीब, श्रीमंत कशीही असू दे,तिला साडी आवडते. माझ्या आईला कांजीवरम साडी खूप आवडत असे. पण त्यावेळी ऐपत नव्हती आणि जेव्हा ऐपत आली तेव्हा आई नव्हती. तेव्हाच ठरवले की आपण अशा स्त्रियांची स्वप्ने पुरी करायची."


सारिका दुकानातून निघाली. तिच्या डोक्यात मात्र शेठजींचे शब्द घुमत होते. त्याबरोबर तिथे इरकल पाहताना चमकलेला आजीचा चेहराही तिला आठवत होता.


जसजसा आजीचा चेहरा समोर येई तसा सारिकाचा विचार पक्का होत होता.


सारिका दुसऱ्या दिवशी दुकानात गेली. तिने भिशीत आपले नाव नोंदवले. सारिका कॉलेजात सत्र परीक्षेत पहिली आली.


मोघे मॅडम तिला म्हणाल्या,"सारिका,दुसरीकडे एका ऑफिसात काम मिळते आहे."


तसे सारिका म्हणाली,"नको,मला इथले काम आवडले आहे."


सारिका आता दुकानात छान रुळली होती. तिचा गोड स्वभाव पाहून तिला सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ आल्यास त्याचे वाढवून पैसे मिळतील असे सांगण्यात आले.


पाहता पाहता वर्ष संपले. सारिका सुट्टीला गावी गेली. आजी आणि आईला खूप आनंद झाला.


रात्री गप्पा मारताना सारिका आजीला म्हणाली,"आजी,ह्या वर्षी गौरीला मी सुट्टी घेऊन येईल."


आजी हसली,"तू पायजेच. नायतर सण वाटलं का मला."


सरिकाने हळूच विषय काढला,"आजी,तुला कोणता रंग आवडतो साडीचा."


तशी आजी खुलली,"मला व्हय,मला वांगी रंग आन त्याला केशरी काठ आवडतो. एकदा ह्यांना सांगीतल. नेमकं सासून आईकल आन मला म्हणाली,"यशोदे, असं लाड नाय ग जमायचं पोरी."


एवढे सांगून आजी गप्प बसली. आईला गर्द हिरवा रंग आवडतो हे सारिकाला माहीत होतेच.


चारच दिवस थांबून सारिका अभ्यासाचे कारण सांगून निघाली. तिला दुकानात सुट्ट्या घ्यायच्या नव्हत्या.


आता कॉलेजात बऱ्याच मुलींना सारिका कुठे काम करते हे समजले होते. अनेकजणी त्यावरून तिला खिजवत असत.


प्रिया मात्र म्हणायची,"सारिका,काम कोणतेही छोटे किंवा मोठे नसते. तू नाराज होऊ नकोस."


हा,हा म्हणता गणपती जवळ आले. दुकानात इरकल साड्यांचा नवा माल आला.


त्यातून तिने आई आणि आजीला एकेक साडी हेरून ठेवली. सरिकाने भिशी लावून वर्ष झाले होते. तिने हिशोब केला. तिच्याकडे दोन साड्या येतील इतके पैसे जमले होते.

पुढे काय होईल? सारिका साडी घेऊन जाईल का? तिचे स्वप्न पूर्ण होईल का?

वाचत रहा.
इरकल.
©®प्रशांत कुंजीर
0

🎭 Series Post

View all