Login

इरकल भाग 1

आजी आणि नातीची सुंदर गोष्ट

इरकल भाग 1


"सारिका,अग ये सारिका चल लवकर. खरेदीला जायचे आहे. उशीर नको करुस." मैत्रिणीने हाक मारली.

तसे सारिका म्हणाली,"आलेच आवरून."

सारिका आपल्याकडे असलेला बऱ्यापैकी ड्रेस घालून तयार झाली.

सारिका जाधव,नुकतीच पुण्यात अभियांत्रिकीला प्रवेश घेतलेली हुशार मुलगी. घरची बेताची परिस्थिती असताना जिद्दीने शिकणारी आणि जग बदलू पाहणारी.

सारिका म्हणाली,"प्रिया,अग कुठे जायचे आहे?"

प्रिया म्हणाली,"अग थोडी खरेदी करू. पुण्याची माहिती होईल."

दोघी बाहेर पडल्या. जेमतेम महिना झाला होता. सारिका आणि प्रिया वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने एका ठिकाणी राहत होत्या.

सारिका म्हणाली,"प्रिया,मला काही काम मिळाले तर बरं होईल. निदान राहायचा खर्च भागेल."

प्रिया म्हणाली,"सारिका,अग करू आपण काहीतरी."

दोघी तुळशीबागेत आल्या. थोडी खरेदी झाली. एका दुकानाबाहेर लावलेली इरकल साडी पाहून सारिका थोडी थबकली.


प्रिया म्हणाली,"सारिका,अग काय पाहतेस?"

तशी भानावर येऊन सारिका म्हणाली,"काही नाही. किती मोठी दुकाने आहेत इथे."


वरकरणी असे म्हणत असली तरी सरिकाचे मन केव्हाच भूतकाळात पोहोचले होते. पुण्यापासून तीन चार तासांच्या अंतरावर असणाऱ्या एका खेडेगावात राहणारी सारिका. तिचे छोटेसे घर. गौरी गणपती येणार म्हणून आई आणि आजीने छान घर सारवले, सजवले.


गौरीना आजीच्या ठेवणीतल्या साड्या नेसवल्या. सारिका किती खुश होती. गौरी म्हणजे माहेरवाशिणी. आजी किती मायेने करते सगळ. दुसऱ्या दिवशी गौरीपुजन होते.


सारिका आजीसोबत गावातील एका तालेवार घरी गेली होती. तिथल्या गौरीना नेसवलेल्या सुंदर साड्या पाहून सारिका म्हणाली,"आजी,किती छान दिसत हाये गौरी. आपून घिऊ ना आपल्या गौरीला अशा साड्या."


आजी कसनुसे हसून म्हणाली,"घिऊ,चल लवकर."

तेवढ्यात तिथली एकजण फिसकन हसली,"यशोदा काकू आव एकेक साडी चार हजाराची हाय ती. परवडलं का?"

सगळ्या जणी हसायला लागल्या. आजी सारिकाला घेऊन बाहेर पडली. डोळ्यातले पाणी थोपवून आजी चालत होती.

पुढे प्रत्येक वर्षी गौरीला साडी नेसवत असताना आजीचे नकळत पाणावत असलेले डोळे पाहून सारिकाला वाईट वाटत असे.

अगदी आठ दिवसांपूर्वी ती गणपती सुट्टी संपवून परत येताना तिच्या मनात हाच विचार घोळत होता.


आज अगदी तशीच साडी दुकानाबाहेर पाहून एक खपली निघाली आणि जुनी जखम परत ठसठसू लागली.


सारिका उदास झालेली पाहून.प्रिया म्हणाली,"सारिका काय झाले ग? अचानक गप्प झालीस."


सारिका हसून म्हणाली,"घराची आठवण आली ग. तुझी खरेदी झाली का?"


प्रियाने होकारार्थी मान हलवली. दोघी परत आल्या आणि तेवढ्यात सारिकाला त्यांच्या तिसऱ्या मैत्रिणीने सांगितले की "तुला स्कॉलरशिप मिळाली आहे. शिवाय कमवा आणि शिका योजनेत तुझा अर्ज मंजूर झालाय."


हे ऐकताच सारिकाला प्रचंड आनंद झाला. शेतीतून मिळणारे उतपन्न किती आहे आणि बाबा आपल्याला कसे शिकवतात तिला चांगलेच ठाऊक होते.

आता फिचा प्रश्न सुटला होता. दुसऱ्या दिवशी कॉलेजात सारिकाला कमवा आणि शिका योजनेच्या प्रमुख असलेल्या मोघे मॅडमनी बोलावले.


सारिका कार्यालयात गेली. मॅडमनी तिला आत बोलावले आणि म्हणाल्या,"सारिका,तुझा अर्ज उशिरा आला. सध्या एका दुकानात संध्याकाळी तीन तासाचे काम आहे. करशील?"


सारिका हसून म्हणाली,"मॅडम,कष्टाला लाजायचे नाही. असे माझी आई आणि आजी सांगते. मी करेल हे काम."


सारिका दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. काल साडी पाहिली तेच दुकान होते. सारिका आत गेली. तिने आपण कॉलेजातून आल्याचे सांगितले. जुजबी माहिती दिल्यावर तिला पाच हजार महिना पगारावर काम मिळाले.


सारिका आनंदाने बाहेर पडली. जवळच असलेल्या दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेताना जणू बाप्पा आपल्याकडे पाहून हसतोय असेच तिला वाटले.
0

🎭 Series Post

View all