Login

बिन जबाबदारीचा वारसाहक्क

पालकांची संपत्ती जर हवी असेल तर त्यांची उतरत्या काळातील जबाबदारी पण मुलांनी आनंदाने घ्यावी.
टीव्हीचा रिमोट शोधता शोधता सुधाताईंच्या हातून काचेची फुलदाणी फुटली. सुधाताईंना आत्ताशी डोळ्याला कमी दिसत होते . वयोमानानुसार बऱ्याच गोष्टी त्यांच्या हातून तुटत फुटत होत्या. फुलदाणी पडल्याचा आवाज ऐकून किचन मधून त्यांची सून रेशमा धावत पळत आली.
" आई तुम्हाला किती वेळा सांगितले आहे, काही हवे असल्यास मला सांगत जा ,आता केलत ना नुकसान". " अग बाई मी काय मुद्दामून करते का, माझ्या डोळ्याला अंधुक अंधुक दिसते त्यामुळे समोरची वस्तू लवकर दिसत नाही ,एक दोन वेळा हाका मारल्या मी तुला पण तू कामात व्यस्त असशील म्हणून स्वतःच शोधायला गेले. तेवढा मला टीव्ही लावून देतेस का?" रेशमा या प्रकाराने धुसमुस करू लागली तिने कसातरी त्यांना टीव्ही लावून दिला आणि ती ताडताड पावले आपटत आत निघून गेली. सुधाताईंचे टीव्ही मध्ये लक्ष लागेना. त्यांनी कसेतरी जाऊन आतून केरसुणी आणली आणि फुटलेल्या काचा गोळा करायला सुरुवात केली. त्यातली एक काच त्यांच्या हाताला हलकी लागली सुद्धा.
पुण्यातल्या बैठ्या प्रशस्त घरामध्ये सुधाताई आपला मुलगा विश्वास आणि सून रेश्मा आणि नातू विराज यांच्यासोबत राहत होत्या .सुधाताईंचे यजमान संजय राव काही महिन्यांपूर्वीच निवर्तले होते. आठ वर्षांपूर्वीच विश्वास आणि रेशमा यांचे लव्ह मॅरेज झालेले होते. आपल्या मुलाच्या सुखातच आपलं सुख असे मानून सुधाताई आणि संजय राव यांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली होती. रेशमाचा स्वभाव काहीसा हट्टी होता. पण सुधाताई समंजस असल्याने त्यांनी तिला बरच सांभाळून घेतलं होतं. तिच्या बऱ्याच छोट्या-मोठ्या चुकांकडे ते दोघे दुर्लक्ष करत असत. रेश्मा सुद्धा नोकरी करत असे पण घरामध्ये हातभार कमीच लावत असे. विश्वास सुद्धा तिच्या अशा वागण्याकडे लक्ष देत नसे. उलट तो आई-बाबांना समजावून सांगायचा, की दुर्लक्ष करा. घरात कोण काही पाहुणे आले की सुधाताई राबायच्या. संजय राव सगळे डोळ्यांनी बघत असत पण काही बोलत नसत. विराज च्या जन्माच्या वेळेस सुद्धा रेशमाचं सगळं सुधाताईंनीच केलं. तिला काय हव नको ते सगळं दोघांनी बघितलं. विराज जसा मोठा होऊ लागला तस तस रेश्मा अजूनच हट्टी होऊ लागली. विराजला फारसं आजी-आजोबांकडे जाऊ देत नसे. 'तुम्ही विराजला बिघडवाल ,मी माझं बघून घेईल त्याला कसं सांभाळायचं ,'असं म्हणून त्यांना डावलत असे.
विराज च्या जन्मानंतर तिने नोकरी सोडली होती. तिला फक्त घरामध्ये स्वयंपाकाचे काम होते बाकी सगळ्या कामांसाठी बाई लावून घेतली होती. आणि वरच्या कामांसाठी सुधाताई होत्या पण विश्वास घरी नसताना ती सासू-सासर्‍यांच्या जेवणाची आबाळ करू लागली. ते बिचारे दोघे विश्वासला काहीही बोलत नसत. विश्वास ला सगळे समोर दिसत असून सुद्धा तो रेश्माला काही बोलत नसायचा याच गोष्टीचा रेश्मा फायदा घ्यायची.
कालांतराने संजय रावांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. त्यांच्यासाठी सुधाताई काही काही पथ्याचे जेवण बनवायला किचनमध्ये येऊ लागल्या तर तेही रेश्माला खटकू लागले. "काय बाई यांचे नखरे आता नवऱ्या आणि मुलाचे जेवण बनवायचे सोडून यांचे पथ्य पाणी सांभाळावे लागत आहे". टोचून बोलायची एक संधी रेश्मा सोडत नसे. संजय रावांना ही गोष्ट जिव्हारी लागायची पण सुधाताई एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत असत.
एके दिवशी पहाटे संजय रावांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच ते गेले. सुधाताईंसाठी हा मोठा धक्का होता त्यातून सावरणे त्यांना जड जात होते. संजय रावांच्या मृत्यूनंतर पंधरा दिवसांनी त्यांचे खासगी वकील घरी आले. त्यांनी घरातल्या सर्व सदस्यांना एकत्र बसायची विनंती केली. त्यांना संजय रावांचे मृत्युपत्र वाचायचे होते.
संजय रावांची स्वतःची अशी मालकी असलेली एकमेव प्रॉपर्टी होती ती म्हणजे त्यांचे राहते घर.
विश्वास ला वाटले की वारसा हक्काने ही प्रॉपर्टी आता माझ्या नावावर असेल. त्यांची वडीलोपार्जित एक एकर जमीन होती, पण तिची सध्या कोर्टात केस चालू असल्याने त्याबाबतीत निर्णय घेण्याचा संजय रावांना हक्क नव्हता पण घर आपल्याच नावावर होईल यावर विश्वासला पूर्ण विश्वास होता कारण त्याला कोणतेही भावंड नव्हते.
वकिलांनी मृत्युपत्र वाचण्यास सुरुवात केली. 'जेव्हा हे पत्र सर्वांच्या हातात पडेल त्यावेळेस मी या जगात नसेल, मी होतो तोपर्यंत माझी काळजी घेण्यास सुधा होती, पण माझ्यानंतर तिचे कसे होणार याची काळजी मला लागून होती. मी हयात असेपर्यंत माझा मुलगा विश्वास आणि त्याची पत्नी रेशमा यांनी आम्हाला दुय्यम वागणूक दिली. आमच्या खाण्यापिण्याची किंवा आमच्या मानसिक आरोग्याची अजिबात काळजी घेतली नाही. मी मनाने खंबीर होतो तरीही त्यांच्या अशा वागण्याने खचत चाललो होतो. माझी पत्नी सुधा अतिशय हळव्या मनाची आहे. मला माझ्या पश्चात तिला हतबल करायचे नाही. त्यामुळे स्वमिळकतीतून घेतलेले हे घर मी माझी पत्नी सुधा हिच्या नावे करत आहे. आणि जर हे घर तिच्यानंतर माझ्या मुलाला हवे असल्यास त्याने माझ्या पत्नीची म्हातारपणात योग्य ती काळजी घ्यावी.अन्यथा तिच्या पश्चात हे घर वृद्धाश्रमाला देण्यात यावे. आणि हा निर्णय सर्वस्वी माझ्या पत्नीचा राहील. हे घर वडिलोपार्जित नसल्याने आणि मी माझ्या स्वतःच्या मिळकतीतून घेतल्याने या घराचे पूर्ण निर्णय घेण्याचा मला हक्क आहे. बाकी वडिलोपार्जित जमिनीचे निर्णय कोर्टात लागल्यानंतर विश्वास त्यावर हक्क सांगू शकतो.
संपूर्ण मृत्युपत्र वाचून पूर्ण होईपर्यंत विश्वासला घाम फुटलेला असतो. रेशमाचे तर तोंडच पडते. 'आता या म्हातारीला नाईलाजाने सांभाळावेच लागेल, या विचाराने तिचे सगळ्या कामांवरून लक्ष उडते'. पण काही झाले तरी सुधाताई मृदू स्वभावाच्या असल्याने आपण त्यांच्याकडून सगळी कामे करून घेऊ शकतो आणि त्यांच्या पश्चात हे घरही मिळवू शकतो असा विश्वास तिला होता. सुधाताई पती जाण्याच्या धक्क्यातून हळूहळू सावरत होत्या. आणि घर कामात बरीच मदत करत होत्या. पण रेशमाचे त्यांना घालून पाडून बोलणे चालूच होते .आणि हे सगळे डोळ्यांना दिसत असून विश्वास गप्प रहायचा. इतकेच काय, सुधाताईंच्या औषधांची सुद्धा तो चौकशी करायचा नाही. सुधाताई आपल्या जमवलेल्या पैशातून औषधे घेत असत.
आत्ताशी सुधाताईंना अंधुक दिसायला सुरू झाले होते.त्यांच्या हातून बऱ्याच गोष्टी पडायच्या. अंधारात सुद्धा त्या धडपड करत चालायच्या. पण या परिस्थितीत त्यांना सावरायच्या ऐवजी रेश्मा अजूनच टोचून बोलायची. सुधा ताईंना अगदी नको नको व्हायचे.
एके दिवशी विश्वास काही कागदपत्रे घेऊन आला .आणि सुधा ताईंना त्यावर सही करायला सांगितले .सुधा ताईंची दृष्टी कमजोर झाली असल्याने त्यांनी विचारले,' हे कसली कागदपत्रे आहेत', सुरुवातीला त्याने इकडचे तिकडचे टोलवाटोलवीचे उत्तर दिले, पण सुधाताईंनी त्याला खंबीरपणे विचारले तेव्हा तो म्हणाला ,"अग आई ही आपल्या घराची कागदपत्रे आहेत. तुला तर माहीतच आहे ,बाबांनी मृत्युपत्रांमध्ये काय लिहिले आहे .तुला अचानक काही झाले तर हे घर वृद्धाश्रमाला दिले जाईल. त्यापेक्षा तू आत्ताच हे घर माझ्या नावे कर. तसाही तुझ्या नंतर माझाच वारसा हक्क लागतो".
सुधाताईंना क्षणभर सुचायचे बंद झाले. पण लगेच सावरून त्या त्याला म्हणतात," मी हे घर अजिबात तुझ्या नावावर करणार नाही. हे जिवंत असेपर्यंत तुम्ही कसे वागलात हे बघून त्यांनी हे घर माझ्या नावे केले. आणि तुम्हाला शेवटची संधी दिली, माझी काळजी घ्यायची. पण माझ्याशी तुमचे काहीही घेणे देणे नसल्यासारखे तुम्ही वागता. माझ्याच घरात मला परक्यासारखी वागणूक मिळते . सुनबाई तर माझे खायचे प्यायचे हाल करते. आज पर्यंत आई म्हणून तू एकदा सुद्धा माझ्या तब्येतीची चौकशी केली नाहीस. आणि आज तुला तुझ्या वारसा हक्काची जाणीव होते ? जिथे जबाबदारी घेणे नाही, तिथे कसलाही हक्क मिळणार नाही हे लक्षात ठेव. उलट मीच तुम्हाला महिन्याभराची मुदत देते ,स्वतःची राहण्याची सोय दुसरीकडे करा .आणि पुन्हा इकडे कधीही फिरकू नका.
आपल्या मृदू स्वभावाच्या सासूचे असे बोलणे ऐकून रेश्मा जागच्या जागी स्तब्ध होते. विश्वासचे तर तोंडच पडते. त्यांना त्यांची चूक कळालेली असते. कमीत कमी ते तसे दाखवायचा प्रयत्न करतात. पण आता वेळ निघून गेलेली असते.
महिन्याभराने सुधाताई खरंच त्या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवतात .काही क्षणांसाठी त्यांना वाईट वाटते. लहान विराज साठी त्यांचे मन तुटत होते. पण त्यांनी स्वतःला सावरले. आता त्यांच्या हक्काच्या घरात त्यांना मुक्तपणे राहता येणार होते. जमवलेल्या पैशांमध्ये एक मदतनीस ठेवायचा त्यांनी विचार केला होता. मनोमन त्यांनी संजय रावांचे आभार मानले आणि आता मागे वळून न बघण्याचे ठरवले.

ही कथा खासकरून पालकांसाठी आहे, मुलांवर प्रेम करणे आणि हयात असताना स्वतः चा बसायचा पाट अर्थात स्वतःची हक्काची जागा मुलांच्या नावे करणे यात फरक आहे.