Login

जमेना तरीही करमेना.. (भाग १)

जेन्झी वर्किंग गर्ल विरुद्ध मिलेनियल कामवाली
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५ (जलदकथा)


जमेना तरीही करमेना..
(जेन्झी वर्किंग गर्ल विरुद्ध मिलेनियल कामवाली)


भाग १ - लिव्ह इन रिलेशनशिप

“ नमस्कार ताई, मी शुभदा वाघ..”

“ हॅलो.. तुम्ही आजपासून काम सुरू करू शकता. बाकी तुमचे पैसे वगैरे तर आधीच ठरले आहेत.”

“हो, ठीक आहे पण मला तुम्ही तुमचं नाव सांगितलंच नाही..”

“ ओह, मी अनघा देशपांडे. या फ्लॅटमध्ये राहते. मी मूळची भोसरी, पुणे इथली आहे. माझे बाबा नेव्हीमध्ये होते, आई गृहिणी आहे, मला ४ बॉयफ्रेंड आहेत.”

“ बस,बस.. मला फक्त तुमचं नाव माहित करून घ्यायचं होतं.”

“ नाव कशाला, अख्खी कुंडलीच मांडली ना तुमच्यापुढे..”

“ अहो ताई, एवढं चिडायला काय झालं तुम्हाला? उगाच कांगावा का करताय तुम्ही?”

“ ए हॅलो, तुला माझी मेड म्हणून काम करायचं आहे, माझी मैत्रीण किंवा रूममेट म्हणून नाही.. आणि काय गं? तुला मी कालच माझं नाव सांगितलं होतं, लगेच कशी विसरलीस?”

“ माफ करा ताई पण मला काल खूप कामं होती, त्यामुळे विसरले मी.”

“ इथून पुढे काहीही विसरू नको, समजलं?”

“ बरं..”

“ अन् काय गं, तुझं वय तर कमी वाटतं मला..”

“ते माझं लवकर लग्न झालं होतं ना, म्हणून..”

“ म्हणजे तू मिलेनियल जनरेशनची दिसतेस.”

“ हे काय असतं ताई?”

“ ओह गॉड, तू मला असंच बोअर करणार आहेस का? काम कधी करशील मग?”

“ हे काय लगेच करायला घेते.”

“ हम्म, ठीक आहे. ही घे कामांची यादी. ही कामं रोज झालीच पाहिजेत. ही यादी कधीकधी बदलू देखील शकते, त्यानुसार तुला मी सांगत जाईल. समजलं?”

“ हो ताई..”

“ आणि मघापासून काय ताई, ताई करतेस गं मला?”

“ मग काय म्हणू तुम्हाला?”

(आपले केस रुबाबदारपणे उडवत)“ मॅडम म्हण. कसं आहे ना, मी आहे जेन्झी शिवाय वर्किंग गर्ल नॉट वूमन येट.. त्यामुळे मला मॅडमच म्हण. समजलं?”

“ बरं. तुम्ही मला आरेकारे केलं तरीही चालेल.”

“ हो मी आरेकारे करणारच आहे कारण आय ओन इट.”

तेवढ्यात बेल वाजली. अनघाने दार उघडले. एक रुबाबदार, किशोरवयीन तरुण दारात उभा होता.

“ हाय बेबी..”

त्याने शुभदासमोर दारातच अनघाला घट्ट आलिंगन दिले. तो तिच्या ओठांवर त्याचे ओठ अलगद ठेवणार तेवढ्यात शुभदा मध्येच दुसरीकडे तोंड फिरवत ओरडली,
“ अरे देवा..”

अनघा तिच्यावर रागातच चवताळली. तरीही त्या
परिस्थितीत तिने स्वतःला कसेबसे आवरले आणि म्हणाली,
“ ए शुभदा, हा माझा नवीन बॉयफ्रेंड सचिन. तो माझ्यासोबत इथेच राहायचा, आता दुसरीकडे राहतो.”

“ तुमच्यासोबत? पण तुमचं तर लग्न झालेलं वाटत नाही.”

“ अरे यार, कोण आहे ही बाई? किती डोकं खाते.”

“ माफ करा अनघा ताई..”

“ म्हणालीस का ताई पुन्हा?”

“ सॉरी, अनघा मॅडम.”

“ आता परत एकदा स्पष्ट सांगते, हा आणि मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये इथेच राहत होतो.”

“ लग्नाआधीच?”

“हो, काही प्रॉब्लेम?”

“ नाही, नाही काही प्रॉब्लेम नाही. चालतंय की.. मला काय करायचं आहे?”

“ तुला फक्त लिस्टमधील कामं करायची आहेत. बाकीच्या गोष्टींत नाक खुपसायचं नाही. समजलं?”

(निमूटपणे मान खाली घालून)“ हो हो समजलं.”

शुभदाला अनघाचा प्रचंड राग आला. शुभदा तिचे संस्कार पाहून नाराज झाली. सर्वांचे भले व्हावे अशा विचारांची शुभदा होती, तरीही काम आपले पहिले प्राधान्य आहे असा विचार करून ती सर्व विसरून कामाला लागली. थोड्या वेळातच तिने फ्लॅटचा कायापालट केला. भांडी स्वच्छ धुवून, पुसून रॅकमध्ये लावली, वाळलेले कपडे कपाटात ठेवून ओले कपडे स्टॅन्डमध्ये टाकले, सर्व रूम चकाचक केले,किचनमध्ये झटपट अशी खमंग भाजी आणि फुलके केले आणि अनघाला जेवायला वाढलं. सर्व कामे आटोपून शुभदा निघाली.

“उद्या किती वाजता येऊ?” शुभदाने विचारले.

“तुला जी लिस्ट दिली आहे त्यात तुझा सर्व टाईम टेबल आहे तरीही मला का विचारतेस आता?”

“अहो मला वाटलं तुम्हाला उद्या जर लवकर जायचं असेल तर, तुम्ही जायच्या आत आणखी लवकर यायचं की काय?”

“प्लीज जास्त डोकं लावू नकोस, जेव्हा असं काही असेल तेव्हा मी तुला नक्की सांगेन. ये आता..”

क्रमशः

वाचकहो, जेन्झी म्हणजे आताची तरुणाई आणि मिलेनियल म्हणजे जेन्झीपेक्षा थोडी मोठी असणारी जनरेशन. थोडक्यात जेन्झी म्हणजे १९९७ ते २०१२ मध्ये जन्मलेली जनरेशन तर मिलेनियल म्हणजे १९८१ ते १९९६ मध्ये जन्मलेली जनरेशन. ही कहाणी आहे, मिलेनियल शुभदा आणि जेन्झी अनघाची. जनरेशन गॅपमुळे या दोघींची तत्वे, जीवनाच्या संकल्पना, स्वभाव सुसंगत नाहीत. स्वभावाची दोन टोकं असणाऱ्या मिलेनियल कामवाली आणि जेन्झी मॉडर्न वर्किंग गर्लला कुठल्या कुठल्या गोष्टी एकत्र आणतील किंवा दूर करतील? पाहुया पुढील भागात..