Login

ती एक व्हीलचेअर

ती एक व्हीलचेअर चालत नसली तरी जग दाखवणारी
ती एक व्हीलचेअर चालत नसली तरी जग दाखवणारी

कधी एकांतात असलो आणि बोलायला कोणी नसलं, की मी आपल्या आजूबाजूच्या वस्तूंशी बोलतो. त्या वस्तू ज्या कायम माझ्यासोबत असतात, ज्यांनी माझा प्रवास जवळून पाहिलेला असतो. अशाच एका एकांताच्या क्षणी मी तिच्याकडे वळलो. हात हलकेच तिच्या हातपकडावर ठेवत म्हणालो,
“तुझ्याशिवाय मी आज इथपर्यंत पोहोचलो नसतो… सांग ना, तुझा अनुभव काय आहे?”

ती माझी व्हीलचेअर आहे.
हो, बोलत नाही असं लोकांना वाटतं… पण पाहिलं, अनुभवलं, सोसलं आणि समजून घेतलेलं तिच्या आत साठलेलं असतं. त्या दिवशी पहिल्यांदाच कुणीतरी तिला विचारलं तिचा अनुभव.

आणि ती माझ्याशी बोलू लागली…

तिचा जन्म कुठल्या कारखान्यात झाला, कोणत्या मशीनने तिला आकार दिला, हे फारसं महत्त्वाचं नाही. तिचं खरं अस्तित्व सुरू झालं तेव्हा, जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात चालण्याऐवजी चालवण्याची गरज निर्माण झाली. ती अनेक हातांनी ढकलली गेली, अनेक अंग टेकले गेले, अनेक डोळ्यांतून पाहिली गेली. पण प्रत्येक वेळी तिने वेगळीच कथा अनुभवली.

तिच्यावर बसणारा प्रत्येक माणूस वेगळा असतो. कुणाच्या चेहऱ्यावर असहायतेची सावली असते, कुणाच्या डोळ्यांत राग, कुणाच्या मनात प्रश्न, तर कुणाच्या ओठांवर नकळत हसू. सुरुवातीला सगळेच थोडे घाबरलेले असतात. कारण तिच्यावर बसणं म्हणजे स्वतःच्या मर्यादा स्वीकारणं. आणि स्वीकारणं ही सगळ्यात कठीण गोष्ट असते.

तिच्यावर बसलेला पहिला क्षण मला आजही आठवतो. शरीर थरथरत होतं, हात घट्ट पकडले गेले होते, आणि डोळ्यांत “आता पुढे काय?” हा प्रश्न होता. ती तेव्हा काही करू शकत नव्हती, फक्त शांतपणे माझं वजन पेलत होती. पण हळूहळू मला जाणवलं ती अडथळा नाही, ती साधन आहे.

तिने रस्ते पाहिले आहेत. गुळगुळीत रस्त्यांवर ती सहज फिरवते, तर खडबडीत रस्त्यांवर तिने धक्के सहन केले. काही ठिकाणी मला लोकांनी मदतीचा हात दिला, तर काही ठिकाणी नजर वळवली. समाजाचा खरा चेहरा मी जवळून पाहिला आहे. कुठे करुणा, कुठे दया, कुठे सहानुभूती तर कुठे असह्य दुर्लक्ष.

तिने जिने पाहिले आहेत… उंच, कठीण, निर्दयी. प्रत्येक जिना म्हणजे एक आव्हान. तेव्हा तिच्यावर बसलेला माणूस तिच्याशी पुटपुटतो “चल ना, काहीतरी मार्ग काढू.” आणि तिला कळतं, आपण दोघं एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत. तो चालू शकत नाही, पण ती चालवते. ती हलू शकत नाही, पण तो मला दिशा देतो.

रुग्णालयांचे पांढरे कॉरिडॉर तिला पाठ झालेत. वेदनांचा वास, आशेची धडपड, आणि कधी कधी निराशेचं ओझं… सगळं तिने अनुभवलं आहे. तिच्यावर बसलेले हात कधी थरथरले, कधी थकले, तर कधी मला घट्ट धरून रडले. त्या अश्रूंचा आवाज तिला ऐकू येतो, जरी लोकांना वाटतं की ती निर्जीव आहे.

पण तिने फक्त दुःखच पाहिलं असं नाही.
तिने हसणंही पाहिलं आहे.

पहिल्यांदा बाहेर फिरायला नेल्यावर डोळ्यांत आलेलं ते बालसदृश कुतूहल,
पहिल्यांदा स्वावलंबीपणे तिला स्वतः ढकलल्यावर चेहऱ्यावर उमटलेला आत्मविश्वास,
आणि लोकांच्या नजरा झुगारून “मी आहे तसाच पुरेसा आहे” हे उमजल्यावरचं ते शांत हसू…

तिने शिकवलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे थांबणं म्हणजे संपणं नाही. अनेकांनी तिच्यावर बसून नव्याने जगायला सुरुवात केली. चालता येत नाही म्हणून आयुष्य थांबत नाही, हे मी तिच्यामुळेच अनुभवलं.

तिने अनेक घरं पाहिली. काही घरांत तिला कोपऱ्यात उभं केलं जातं, जणू ती आठवण आहे एका अपघाताची. तर काही घरांत तिला सन्मानाने जागा दिली जाते, कारण ती त्या घरच्या माणसाचं स्वातंत्र्य आहे. फरक घराचा नसतो, फरक दृष्टिकोनाचा असतो.

तिच्यासारख्या असंख्य व्हीलचेअर्स जगात असतील. पण प्रत्येकाची कथा वेगळी आहे. काही युद्धातून परतलेल्या शूरवीरांची साथ देतात, काही अपघातातून वाचलेल्यांची, तर काही जन्मतः वेगळ्या शरीरात अडकलेल्या आत्म्यांची. त्या सगळं एकच करतात आयुष्य पुढे नेतात.

त्या दिवशी मी तिला विचारलं “तुला कंटाळा येत नाही का?”
ती मनात हसली.

कारण तिला कंटाळा कसा येईल?
ती रोज नव्या नजरेतून जग पाहते.
ती चालत नसलेली पावलं पाहते, पण धावणारी स्वप्नं पाहते.
ती थांबलेली शरीरं पाहते, पण न थांबलेली इच्छाशक्ती पाहते.

तिने मला सांगितलं
“तू माझ्यावर बसलास, हे तुझं अपयश नाही. तू मला चालवतोस, ही तुझी ताकद आहे. लोक मला पाहून तुला कमी लेखतील, पण तू मला सोबत घेऊन उभा राहिलास, हेच तुझं खरे उंचीचं मोजमाप आहे.”

मी शांत झालो . हाताने तिच्या चाकावर हलकेच थाप दिली.
त्या स्पर्शात कृतज्ञता होती.

ती व्हीलचेअर आहे.
ती पाय नाही, पण मार्ग आहे.
ती मर्यादा नाही, पण पर्याय आहे.
ती थांबवणारी नाही, तर पुढे नेणारी आहे.

आणि जोपर्यंत कुणी तिच्यावर बसून जगाकडे नव्या नजरेने पाहतो,
तोपर्यंत तिचं आत्मचरित्र लिहिलं जात राहील…
रस्त्यांवर, अश्रूंमध्ये, हसण्यात आणि न संपणाऱ्या प्रवासात.

©® सचिन कमल गणपतराव मुळे...
परभणी, ९७६७३२३३१५
0