Login

इतिहासाचे पान १० अंतिम

A family who is not bogged down by struggles and adversitise of life

भाग - १०

''माझं नाव मोना आहे. मला भाऊने तुमच्या सोबत जे झाले ते सगळ सांगितले आहे. खुप वाईट वाटले ऐकून. गंगाबाई चे तर फारच वाईट झाले आहे. येशूख्रिस्त सर्वांची रक्षा करेल. प्रभूला तुमची काळजी आहे. म्हणूनच मी आली आहे इथे! तूम्ही प्रभूवर विश्वास ठेवा. आपल्या इथे दवाखाना आहे. डाॅक्टर राॅबर्ट आहेत तिथे. ते एकदम चांगले डाॅक्टर आहेत. तुमच्या दिनकरला दवाखाण्यात आणा आम्ही त्याचा इलाज करतो. काळजी करु नका. तुमच्या कडून पैसे नाही घेणार आम्ही. आमच्या हातून ही प्रभूचीच सेवा होईल.'' सिस्टर ने मायला आश्वस्त केले.

''तुमचे लय ऊपकार होतीन बापा. मायं पोरगं कायीच खात नायी बाई शिश्टर...बरा होईन का मां हां?''  सिस्टरच्या चेहर्‍याकडे उत्सुकतेने बघत माय म्हणाली.
''हो हो का नाही. आपण प्रयत्न करु. पुढे प्रभू ची इच्छा...''
''बरं बाई शिश्टर, गंगाबाईचे आबा आले का मी सांगतो त्यायले. काय हाय का, मानसापुढं जाता येत नायी बाई शिश्टर!'' डोक्यावरचा पदर नीट करत माय म्हणाली.
''बरं मग उद्या पाठवा त्यांना दिनकर सोबत आमच्याकडे."
''हाव ! ठिक हाये पाठोतो."
"शिश्टर च्या मांडतो तुमच्या साटी."
''नाही नको, मी येईन नंतर चहाप्यायला.''
सिस्टर परत गेल्या.

''देवच पावला मायबायी...!
माया दिन्या बरा झाला का. कायी फिकर नायी राह्यन मंग बाप्पा." आभाळाकडे बघून हात जोडत माय म्हणाली.
त्याने किती त्रास दिला होता त्यांना...माय सगळं विसरली होती.
आबा रात्री परत आल्यावर, मायने त्यांना सिस्टर बद्दल सांगीतले. तसे ते ही म्हणाले,'ठिक हाये..पायटीच जातो मंग दिनकरले घेवून त्यायच्याकड...त्याच्या पायानं चालाले लागला तरी लय होईन बाप्पा...कोन्त्या जलमाचं पाप भोगत हाये काय मालूम बाप्पा पोट्टा."

सकाळीच तयारी करुन आबांनी मायच्या मदतीने दिनकरला बैलगाडीत झोपवले आणि दवाखाण्यात गेले.
तिथे सिस्टर होत्याच. त्यांनी मग दिनकरला कंपाऊंडरच्या साहाय्याने दवाखाण्याच्या आत नेले.
डाॅक्टर राॅबर्टने त्याला तपासले. काही औषधी दिल्या.
आणि पुन्हा काही दिवसाने परत आणा म्हणून सांगीतले.
दिनकरला परत बंडीत बसवल्यावर आबा डाॅक्टरकडे गेले आणि त्यांना विचारले,
''का म्हन्ता डागतर? माह्य पोरगं बरा तं होयीन ना जी!"
''हो आमी तसा प्रयत्न करतो. पण त्याच्या तब्येतीचा काही भरोसा नाही. काही सांगू शकत नाही."' राॅबर्ट.
''आरं देवा. आस नका म्हणू बाप्पा." आबांनी डोक्यालाच हात लावला. डोळ्यात पाणी आलं त्यांच्या.
डाॅक्टरने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटले.
''येशू ख्रिस्त रक्षा करेल त्याची. त्याच्यावर भरोसा ठेवा.''
आबांनी हात जोडून त्यांचे आभार मानलेत.

आबा होते जुन्या घडणावळीतील
पण त्यांची विचारसरणी होती प्रगत
जाती, लिंगभेद मानणार्‍या काळात
नशीबातील बदल लीलया स्विकारत...!
मग आबा दिन्याला घरी घेऊन आलेत. मायला सांगितले सर्व. औषधं कशी द्यायची वगैरे आणि भाजी विकायला गेलेत स्टॅन्डवर.

भाजी विकण्यामध्ये आबा तरबेज झाले होते. लोकं मुद्दामहून आबां जवळून भाजी न्यायला लागले.
सिस्टरही एकदा भाजी घ्यायला आल्या. भाजी घेता घेता त्या म्हणाल्या, ''तुमच्या मुलांना शाळेत नाही टाकत का?''
''होव नां बाप्पा माये लेकरं गावात शिकत होते नां पन या लागल इथ. सुटली शिश्टर शाया माया लेकरायची. पाह्यतो पुढच्या खेपेले."
''अरे हो, पण इथे आहे नां शाळा. तुम्ही असे करा,
उद्या मुलांना घेऊन या माझ्या कडे. आपण शाळेत जाऊ.
त्यांची अॅडमिशन घेऊ."
''हाव का शिश्टर, घेतीन का शायेत माया लेकरायले?''आबा.
''का नाही घेणार? मी बोलते तिथे. उशीर झाला पण म्हणून मुलांचे शिक्षण थांबायला नको."
''लयच उपकार होतीन शिश्टर पन पयसे किती लागतीन?''
''त्याची तुम्ही काळजी करु नका. पैसे नाही लागणार.
आम्ही बघून घेऊ ते. या मग उद्या. बरं, तुमचा मुलगा कसा आहे?''
''तसाच हाये...खानपेन सब्बन बंद हायजी आतातं त्याच्यावर
डागतरची दवा कायी काम करत नायी हाये."
हताश होत आबा म्हणाले.
''प्रभू त्याची रक्षा करतील.
त्याला आठ दिवसाने पुन्हा आणा डाॅक्टरांकडे, या मग."
''हाव येतो नां शिश्टर...''

दुसर्‍या दिवशी आबा सिस्टरकडे गेलेत. तिनही मुलांना घेऊन
मग सिस्टर त्यांच्याच बैलगाडीत बसून सगळ्यांना शाळेत घेऊन गेल्यात. शाळा पाहून सूनी, वनी अगदी आनंदी झाल्यात .

''बाप्पा बाप्पा आबा...शाया पायना कश्शी मस्त हाये."
''होव सुने मस्तच हाय वं माय शाया.'' सुनी वनी शाळा पाहून आनंदल्या होत्या. कुठे तर झाडाखाली. गोठ्यात बसायच्या आणि इथे तालुक्याला दगडाची मोठी इमारत बघून त्या खुश झाल्यात.''चला चला उतरा, चला आबा कार्यालयात. चला मुलांनो.'' सिस्टर त्यांना आत घेऊन गेल्यात.

''बरं मंग तिघाले ह्याच शायेत घालाचं का शिश्टर?''
आबांनी प्रश्नार्थक मुद्रेने बघत विचारले.
''अहो आबा, मुलांची शाळा ह्या शाळेच्या बाजूला आहे बघा. तिथे श्यामला पाठवू!" सिस्टर.
''नायी बाॅ शिश्टर मले तं माया बयनी संगच जाचं शायेतं!''
पाय आपटत श्यामू कसनुस तोंड करत म्हणाला.
''आरं पोरा जरा दमान घेनं पोरायची शाया दुसरी आसते बाबूऽऽमोठ्ठा झाला ना बाॅ तू आता!'' त्याला समजावत आबा म्हणाले. मग सगळे शाळेत आले. एका लाकडी खुर्चीवर
बाबू बसले होते. त्यांच्याशी बोलल्यावर सगळ्यांना आतल्या आॅफीसमधे नेण्यात आले. आत अजून एक सिस्टर बसलेल्या होत्या. त्याच हेडमिस्र्टेस होत्या.

मग मोना सिस्टरने आबांची ओळख करुन दिली. त्यांची पुर्ण आपबिती हेडमिस्र्टेसना सांगितली.
सर्व ऐकल्यावर हेडमिस्र्टेस दुःखी होत म्हणाल्या.
'' ओह गाॅड ह्या तर फारच दुःखद घटना तुमच्या सोबत घडल्या आहेत. तुमच्या मुलींना घेतो आम्ही शाळेत. आणि तुमच्या मोठ्या मुलीसाठी ही काही मार्ग काढावा लागेल!"
विचार करत आबांकडे बघत त्या म्हणाल्या.

''हाव बाप्पा..लय उपकार होतीन मायावर.
मंग कवा पासून धाडू पोरीले शायेत?''
आनंदाने आबा म्हणाले.
''टुमारोऽ उद्यापासूनच पाठवा तिघांना शाळेत." हेडमिस्र्टेस.
''मंग थे शाळेचे कापड लागन नां?"
अडखळत कधी सिस्टर तर कधी हेडमिस्र्टेस कडे बघतं आबा म्हणाले. ''हो हो, आमच्या बाबूं सोबत बोला ते सांगतील तुम्हाला.
सध्या जे असतील घरी त्याच कपड्यांवर पाठवा त्यांना." हेडमिस्र्टेस. ''ठिक आहे..." म्हणून, सिस्टर आणि आबा बाहेर आलेत.

बाबूंना भेटल्यावर बाबूंनी तिथल्याच टेलर ला बोलावून तिघांचेही मापे घेतलीत. 'कापड आना लागन न बाॅ?'' आबा.
''ते आमच्याकडे आहे. तुम्हाला आणायची गरज नाही.'' बाबू.
''अन थे पुस्तकं लागन नां ते कुठून आनाचे?"
''बस्स आबा तुम्ही लेकरांना शाळेत पाठवा. कपडेलत्ते, पुस्तकं इथूनच मिळतील!"
''हाव का बाप्पा हे तं देवच पावल म्हनायच. कायी सेवा लागन त सांगजा बाप्पा मले. मायं, भाजीचं दुकान हाये." आबा खुश होऊन म्हणाले.

''चला तर मग आता. झालं तुमच काम.'' हसतच सिस्टर म्हणाल्या. ''हाव शिश्टर, पन माया पोराच कस?"
''अहो तुम्ही काळजी करु नका. त्यालाही शाळेत घालू. काय मग, सुनिता वनिता, आवडली का शाळा?"
''होव नां शिश्टर!" हसतच सुनी, वनी म्हणाल्या.
''हे शिश्टर नाही मुलींनो, 'सिस्टर' म्हणायचे मला.
बोला!''
''हाव सिस्टर...'' दोघीही लाजत म्हणाल्या.

मग मोना सिस्टरला घरी सोडून,
सगळे तिथून आनंदातच आपल्या घरी परतले.
आल्या आल्या मायला सांगीतले अॅडमिशन झाली म्हणून आणि शिक्षणाचा पण काहीच खर्च येणार नाही म्हंटल्यावर माय तर भलतीच खुश झाली.

सुनिता वनिता तर खुपच आनंदात होते.
पण श्यामू गुपचुप बसलेला होता. माय ने त्याला म्हंटले.
''बाप्पा येक पोरगा तं उद्या शायेत जानार हाये.
मज्जा हाय बुवा याचीतं."
''माय वं मले नायी जा च शायेत."
''बापा काऊन बा पोट्ट्या असा बोल्तं?"
''मले नायी आवडत शाया. आन मायवाली शाया दुसरी हाये. मले सुनी वनी संग जाचं शायेत." खाली बघत भास्कर म्हणाला.
''मंग काय करतं घरी बसून? भाकरी भाजत का चुलीपाशी? पोट्ट्यायची शाया दुसरी अस्ते. जा लागनं तुले." माय चिडून म्हणाली.

''मी आबा संग जातो भाजी विक्याले मंग."
''आता बाॅ काय पागल झाला का काय पोट्ट्या. आ हाऽऽशायेत नायी जाईनऽ जा लागन तुले. तुया बयनी पाय बाबू, कश्या खुश झाल्या. आन तू पाय नायी म्हन्तं.'' माय म्हणाली.
''नायी ना माय मले नायी जा चं सांगून ठुतो तुले."
''तुयाच मनाच नायी चालन बाबूऽ शिकला का मोठ्ठा होशीन नां बाप्पा. बाबू बनशीन नां? त्याला समजावत माय म्हणाली.
''मले नायी बनाच बाबू." पाय जमीनीवर घासत भास्कर म्हणाला.
''मुका बस भह्याड्या. लय येल्लावून राह्यला का बेऽ येक होपकाडीत मारीन. शायेत नायी गेला तं मंगा पास्न आयकूनच रायलो तुयं." एवढा वेळ त्यांच ऐकत असलेले आबा एकदम ओरडले!
तसा श्यामू घाबरुन चुप बसला.
''मी जातो भाजी घेऊन.'' म्हणत आबा रागाने बाहेर गेलेत.
दुसर्‍या दिवशी पासून श्यामू चुपचाप बहिणीं सोबत शाळेत जाऊ लागला...!
०००

"मुलांनो, माझे आजोबा जीवाजीराव आणि आज्जी रुक्मिनीबाई अनेक सुख दुःख पचवून आबा, माय गावातून तालुक्यात आले. आपलं प्रशस्त घरदार जमीन जुमला विकून साध्या कुडाच्या घरात आले. गंगाबाईला आलेलं वैधव्य त्यातून तिला बसलेला मानसिक धक्का. तरुण दिनूमामा अंथरुणावर खिळलेला पण आबांनी हार मानली नाही. मायनेही त्यांना योग्य साथ दिली. जुन्याकाळातील असूनही त्यांनी लेकींना शाळेत पाठवले. जातपात सगळ बाजूला ठेऊन ते आपल्या मुलांसाठी, घरासाठी मेहनत करत होते." सुषमा बोलता बोलता थांबली. आज्जी आजोबांचे चेहरे तिच्या नजरे समोर आले. क्षणभर ती दुःखी झाली. तेवढ्यात सुंदरआज्जी म्हणाली. "सुसमाबाई  आमचे मामा मामी लय देवमाणसं त्यायनं पोट्ट्या पायी लय भोगलं. लय कष्ट केले. त्यायच्या कष्टाचं चीज झाल वं मायऽ."

"हो नां मोठी माय, त्यांनी बाईचा इलाज मिशनरीच्या दवाखाण्यात केला. म्हणून बाई लवकरच दुःखातून बाहेर आली. "
"मंग बाई नायी का शिकली सुषमा मावशी?" बाब्या मध्येच म्हणाला.
"हो रे शिकली नां बाई, तिथल्या अनाथालयातल्या मुलांना बाई, आई सारखं जपत आली. म्हणून तर बाईला आज तेथे खुप मान आहे. पौढ शिक्षणही तिने घेतले."
"ते काय असतं मावशी?" वंदूने विचारले. "अगं निरक्षर लोकांना साक्षर बनवण्यासाठी रात्रीच्या शाळा असतात. मिशनरी मध्ये बाई ते क्लास करायची. म्हणून तर तिला आता वाचता येते. लिहीता येते. अनाथालयातल्या मुलांना बाई शिकवते पण! " सुषमा अभिमानाने म्हणाली.

"मुलांनो खुप शिका, शाळेला बुट्टी मारायची नाही. शिाकाल तरच घडाल. समजले का?" मोठ्यांने हसत सुषमा म्हणाली. होवऽऽ मुले एकासूरात ओरडली.

"अस्स सुंदर आज्जी तुयी बयीन गंगाबाई तं लय शिकली म्हंन्जे, पण तू कावून नायी शिकली वं? जवा पायलं तवा मले पेपरातल कायी बायी इचारत राह्यतं." लटक्या रागाने बाब्या म्हणाला. "अयऽ बाब्या मेरी जान इसकोईच तो मोहब्बत बोलते ना जीऽ चाला पोट्टो हो जा आता झोपालेऽ सुसमाले झोपू द्या." सुंदरआज्जीने  जवळ जवळ लेकरांना हाकलून लावले.

मग सुषमाला म्हणाली. "चाल बाई टाक आंग आता. उद्या तुया घरी रायशीन या वख्ती!" सुषमाने खाटेवर अंग टाकत सुंदराआज्जीला म्हंटले. "मोठी माय या ना तुम्ही आमच्या घरी. द्वारका माय तुम्ही पण याऽ आपण गंगाबाई सोबत बसून खुप मज्जा करुऽ वनिता मावशीला पण बोलावू." 
"होव येऊ आमी दिवाळसनाले. चाल झोप आता!"
सुषमाला पुन्हा एकदा आज्जी आजोबांचा अभिमान वाटला. बाईवर प्रेम उफाळून आले तिचे. कारण बाई ठिक झाल्यावर तिने आपल्या लहान भावंडांवर प्रेमाचा वर्षाव केला. त्यांच्या दुःखा सुखात ती सतत सोबत असायची. सुनिता वनिता आणि श्यामूच्या लग्नात तिने हिरीरीने सहभाग घेतला. त्यांची बाळंतपण तिनेच केले. त्यांच्या मुलांना अंगाखांद्यावर खेळवले. तसेच अनाथालयातल्या मुलांनाही बाई प्रेम देत होती आपले मानत होती. आठवून सुषमाला स्वतःवरही गर्व वाटू लागला. मी अश्या परिवारातील आहे. जे कितीही संकट आले तरी न डगमगता परिस्थितीशी दोन हात करायला तयार असतात.
समाप्त:

🎭 Series Post

View all