Login

इतिहासाचे पान २

A family who is not bogged down by stryggles and adversities of life

भाग - २

ते गेल्यावर द्वारका आणि सुंदरा दोघीही बाईसाठी हळहळल्या.
''हर्‍याले अक्कलच नायी. पावन्यासंग अस कायले बोलाचं. तिचा आता काय संबध हाये त्यायच्याशी? सोता करनी कराची आन मंग भरनायी सोताच करा लागन नां'' द्वारकाबाई.
''मानसाले सोताचे करम नायी वं दिसत
आन दुसर्‍याच्या आंगाले थो पानं पुसते.'' सुंदराबाई.
''चाल वं सुंदराबाई, परतेक येळेस तुये बोलन जुडते अस कायी नायी वं! मले लय कामं हायेत. येजा मंग बस्याले.''
तिने जवळ जवळ सुंदराला घालवत म्हंटले.
''अवं माय मंग मी गेलो का, सुसमाले गमन का?''
''थांबाना मोठीमाय तुम्ही, बसू द्या नां मोठी माय.'' सुषमाने द्वारकाबाईला म्हंटले.
''अवं बाई चाल माय, माह्य घर पाय बाई. तित करजो आराम. उद्याच्याले आपुन वावरात जावू रातच्याले बसू गोठी सांगत लायटाखाली.'' सुंदरा आज्जी म्हणाली.

सुंदरा, द्वारका, मोठीबाई आते मामेबहिणी.
पुर्वी नात्यातच लग्नं संबंध व्हायचे किंवा कुणीनां कुणी कुठून तरी दूरचा नातलग चालायचा. मोठीबाईचे लग्नं वासुदेवच्या मोठ्या भावाशी झाले होते. लहान वयातच लग्नं होऊन ती पाळा गावात आली होती. तसेही वासुदेवचा परिवार श्रीमंत होता. आपल्या दुसर्‍या नातेवाईकांपेक्षा. हिच बहुधा नात्यांमध्ये तेढ असण्याचे कारण होते. वरवर सगळेच गोड बोलायचे. मागाहून नावे ठेवायचे.

द्वारका, सुंदरा ह्यांच्याच चुलत नात्यातला तो परिवार होता. वासुदेवच्या पणजोबांच्या वेळेसचा वाडा होता. मेहनतीने जमीनजुमला जमवला होता. गावातील किराणा मालाचे सर्वात पहिले दुकान त्यांच्याच कडे होते.
एकदा वासुदेव आणि त्याचे वडील शेतात गेले होते. गडी माणसं कामे करत होती. जंगलाच्या बाजूच्या शेतात ज्वारीच्या पीकातून अचानक एक मादी अस्वल आपल्या दोन पिलांसहित शेतात शिरली. झाडाखाली बेसावध, वासुदेव आणि वडील बसले होते. बैलगाडी बाजूलाच होती. बैलगाडीच्या जोत्याला बैलांच्या कासरा सैलसर बांधलेल्या होत्या.

अस्वलाला अचानक माणसे दिसलीत. आणि आपल्या पिलांच्या सुरक्षे साठी ती ह्या दोघांवर धावून आली. आवाज येताच दोघेही घाबरले आणि पळू लागले. तेव्हढ्यात त्यांना बैलाचा हंबरण्याचा आवाज आला. मागे बघितले असता. बैलजोडीतला एक बैल अस्वलाला शिंगाने मारत होता. तिची दोन्ही पिलं बाजूला उभी राहून ओरडत होती.

शेवटी हार पत्करुन ती ज्वारीच्या पिकात घुसली. तिच्यामागे तिचे पिलं पण पळाले. बैलानेही तिचा पाठलाग करुन तिला पिटाळून लावले. त्याने आज आपल्या धन्याची रक्षा केली होती. त्याची शूरवीरता बघूनच त्याचे नाव, 'वाघेश्वर..' ठेवण्यात आले. घरचे त्याचा लाडही करु लागले.

तो लाडच वाघ्याच्या अंगात आला होता. वाढत्या वयाबरोबर वाघ्या जरा मारकुट्या झाला होता.

घरा समोर, शेतात. असे कुणी दिसल्यास तो चिडून त्यांना शिंगावर घेवू लागला. आधी प्राणी आणि काल रात्री तर त्याने कहर केला. हरीला शिंगावर घेतले.

संध्याकाळ पर्यंत खबर आली होती गावात.
वासुदेवने फाॅरेस्टखात्यात मदत मागितली. आणि ते दुसर्‍या दिवशी त्याला शोधून, वाघ्याचा बंदोबस्त करणार होते.
नाखुशीनेच वासुदेवला हे करावे लागले.
आज हरीला मारले. उद्या दुसर्‍या कुणालाही तो इजा करु शकतो, म्हणून !

उन्हं कललेली, सुर्य सुद्धा घराच्या ओढीने लाल तांबडा झालेला जणू...ती कातरवेळ खरेच मनाला भावणारी. थकून भागून घराच्या ओढीने गुरेसुद्धा धुरळा उडवत एकमेकांना ढुशी मारतं मस्ती करतं लगबगीने चालत होते. आपल्या अंगणात हंबरुन घरमालकीणीला जणू, 'आम्ही आलोत...' ची वर्दी देत. आणि पाणी पिऊन तृप्त होवून आपल्या गोठ्यात सुस्तावून बसलीत.

इकडे दुरुनच गावातील प्रत्येक घराच्या छपरातून बाहेर पडणारा चुलीतील धुरऽऽ या...तुमची क्षुधा शांत करायला गरमा गरम अन्न तयार होतय. हेच सांगते जणू...!
नेहमी सारखे जे कामाला गेले ते परतीला निघाले.
कुठे मंदिरातून भजनाचे सूर ऐकू येताहेत.
तर दुरुन, कुठल्याश्या दालमील मधला भोंगा वाजतोय.
तर कानावर अजानचे सुर ऐकू येताहेत.
थोड्याच वेळात हा कलरव थांबला.
काळोखाने आपले साम्राज्य पसरायला सुरुवात केली.
मोजकेच स्र्टीटलाईट उघडझाप करु लागले. डोळ्यातं कचरा गेल्या सारखे. मध्येच टणटणाटणऽऽटणऽऽआवाज. सोबतच,
''अबे लागनं बेऽऽकवापासून मिचमिच करुन रायला बेऽ" टणऽऽटणटणाटणऽऽ "हा सायाचा लागत कावून नायी..?''
''अरे ओय पोट्ट्या, काय करतं बे कवापासून खंबा वाजवत हायेस. कान किट्ट करुन टाकलेत सारे. अन् होय तिकडे. जाय तुया घरी. माह्या आंगनात वाजू नको.'' द्वारकाआज्जीचा मुलगा महादेव घरातून बाहेर येत म्हणाला.
''अरेऽ म्हादू, कायले हाकलत रेऽऽ बाब्या, लागन नां थोड्या येळानं लाईट. बस घडीभर, काय अभ्यास कराचा का लायटाखाली तुले?'' द्वारकाआज्जी.
''अवं आज्जी अभ्यास तं आपुन शाळेतच करुन येतो. हां लाईट मले रोज डोये मारते. म्हनून त्याले जरा रट्टे देतो. हे सवय चांगली नोय नां...का वं आज्जी?'' दात काढत हसत बाब्या म्हणाला. ''येक नंबरचा डँबिस पोरगा हास तू हाकलरे याले, बाई म्या म्हणतो याले अभ्यास कराचा आसीनं!''
द्वारका आज्जी त्याच्या बोलण्यावर हसून म्हणाली.

''अवं तस नायी वं आज्जी, सुंदरा बुढीची वाट पाहून राह्यलो. मेरी जिगर का तुकडा आयी नयी नां. कथा सुननी है अभी तो!'' बाब्या ह्रदयावर हात ठेवत म्हणाला.
''काय म्हनतं रेऽ काय सुन्नी हाय?'' द्वारका आज्जी कानाला हात लावत म्हणाली.
''अवं तेरेकू नयी समजती. वो मेरी बुढ्ढीकु मालूम है!" बाब्या नाटकीपणाने म्हणाला.
''तुह्या तं ढुंगणावर एकच रयपट दिन ठेवून. लाल झाल्यावर बोलजो सिद्धा.'' महादेव हात उगारत म्हणाला.

तेव्हढ्यात सुंदर आज्जी घराबाहेर आली.
तिच्या मागोमाग सुषमाही घराबाहेर आली.
''अयं, मेरे छोकरेकू छेडना मत
बाब्या हाये तं आयकतो गोठी
मले ही लागते कोनीतरी बोलासाठी
आजच्या पावण्याच्या त्याले आयकाच्या गोठी
हाव नां रे बाब्या?''
''होवं आज्जी बराबर हाये तुय. सांगन वं आजी कथा. पन थे कोन्ती आजी आली होती? लयच मस्त होती वं थे आंधी सांग!'' उत्सुकतेने तिच्याकडे बघत बाब्या म्हणाला.
आणि तिच्या मागे असलेल्या सुषमाला पाहून लाजलाच.
''आ हाँ बाब्या शरमला मायबाईऽ मावशी होनं लेकाऽ तिले
कायले शरमा लागते.' सुंदरा आज्जी म्हणाली.
''अभ्यास केल्ता त्या?'
''हाव आन थे पाय ह्या पोट्ट्यायी आल्या.''

बाब्याने मीरा, वंदना, मंगला, सुनिता कडे बोट दाखवत म्हंटले.
धावत आलेल्या पोरींच्या पायांना, सुषमाला बघितल्या बरोबर ब्रेक लागला. तोंड झाकत एकमेकींच्या मागे त्या लपू लागल्या.
''पाय वं माय. सार्‍याले शरम वाटून राह्यली. अवं पोट्ट्याहो तुमच्यावानीच तं हाये वंऽ पन लय खबसुरत हाये माय सुसमा. तुमाले मायीत हाये कां पोट्टे होऽ हिची माय सुन्ती थे ही लयच भूरी क्काकड हायेऽ चाला पोट्टे हो आज तुमाले त्यायचीच गोठ सांगतो.'' खाटेवर बसत सुंदराआज्जी म्हणाली.

खाली अंगणात तडव टाकलेला होता. त्यावर मुले बसलीत. आज्जीने सुषमाला खाटेवर बसवले.
तिची ओळख करुन दिली. मग सुषमाने सगळ्यांची नावे विचारलीत. शाळे बद्दल माहिती घेतली. ती स्वतः कोणत्या काॅलेजमध्ये आहे ते सांगितले. पुढे ती सुंदराआज्जीला म्हणाली. ''मोठीमाय तुम्ही कोणती गोष्ट सांगणार होत्या?''
''अवं बाई रोच्च नाटक हाये ह्या पोट्ट्यायचं. रोज कोनाची तरी गोठ सांगा लागते पोरायले. मंगाशी हा बाब्या मले इशारे करु करु इचारत हुता. चाल, आजच्याले आपल्या गंगूबाईची गोठ सांगतो तुमाले...''

''गोष्ट आवडते का मुलांनो तुम्हाला? तुम्हाला चंपक पुस्तक माहित आहे का? आणि विक्रम वेताळ, चांदोबा.''
''अवं सुसमाबाई कोन्त्या गोठी इचारतं बाई. त्यायले ते पुस्तकातल नायी पाह्यजे माय. खर्‍या खुर्‍या गोठी आयकाले लय मज्या येते त्यायले.'' आज्जी हसतच म्हणाली.
''तुमी सांगानां मावशी गोष्ट सांगाची आसन तं तुमचीच सांगा नां...'' वंदू म्हणाली. आणि मग सगळ्यांनी सुषमाला बोलायला भाग पाडले. ती बोलणार तेव्हढ्यात....

''ओय सायब्या ओयऽऽओय सायब्याऽऽओयऽऽ'' आपला मुलगा साहेबरावला आवाज देत नर्मदाबाई आली.
''कारे पोट्ट्या बाब्या, सायब्याले पायलं काय? कुट गेला काय मायीत. जेवाचा राह्यला नां!'' नर्मदाबाई इकडे तिकडे बघत म्हणाली. ''अवं माय पावनीन कोन हो बाई?''
सुषमाकडे बघत तिने विचारले.
''अवं थे गंगाबाई नायीकाऽ तिच्या भयनीची पोर हो. शाळतलं काम हाये. परवाच्याले जाईन थे. आन् जाय सायब्याले शोध.'' द्वारकाआज्जी तिला म्हणाली.
''अव आज्जी तो सडकीवर फिर्‍याले गेला आसनं. मंगा म्या त्या धन्या सोबत त्याले शाळे जोळ पायलं होतं. तू घेनं खावून, येईन थोऽ.'' बाब्या म्हणाला.
''अरे बापा, येकदाच मानुस जेवला का, भांडेकुडे घासाले बरं पडते. हा पोट्टा ऐन जेवाच्या टायमाले गायब होते. का कराव काय म्हायीत. मी तं कावली याले. रोजचं नाटक झाल माय.'' तिने डोळे पुसत म्हंटले.

''अवं नर्मदेऽ मायबाई येवढ्याले कायले आसवं गाळून राह्यली वं? बोहार्‍या सारक रडू नये माय रातच्या टायमाले?'' द्वारकाआज्जी म्हणाली.
''अवं बाईऽ म्या कावून आसवं गाळन? म्या तं तोंड पुसून राह्यली मायऽऽ आहाहाहाऽऽ'' नर्मदाबाई आणि सोबत सगळेच हसलेत.

तेव्हढ्यात दुरुन सायब्या येताना दिसला. ''थो पाय आला. कुट गेल्ता बे सायब्याऽऽ?'' बाब्या त्याला बघून म्हणाला.
''तुले का करा लागते बे बाब्याऽऽ अन मले बे म्हंत का? आँऽ'' त्याच्याकडे रागाने पहात सायब्या म्हणाला.
काही कळायच्या आत, सट्ट...आवाज झाला. ''अव माय वंऽऽ'' सायब्याच्या तोंडून आवाज आला.
नर्मदाबाईने पायातली टायरची चप्पल काढून सायब्याच्या पाठीत हाणली होती आणि सायब्या कळवळला. ''कावुन वं माय मारतं?''
''थांब तुले सांगतो...आँ तुले म्हटल होतं बाबू लय तलप आली रेऽ थ्या भाकर्‍याच्या दुकानातून पान आन्जो बाबूऽऽआँ कवापासून वाट पाहुन राह्यली तुयावाली, आता अवतरला आँऽऽकुट गेल्ता मसनात.'' तिने पुन्हा चप्पल उगारली होती. तेव्हढ्यात सायब्या घराकडे पळाला. ''माय उद्या आन्तो वंऽऽ
भुललोच{विसरलो}.''
''जावू दे वं नर्मदेऽऽ येवढ्या मोठ्ठ्या पोराले मारन बरं दिसत नायी. थांब तुले पानाचा तुकडा देतो. घेवून जाय. जेवल्यावर खाजो!'' द्वारकाआज्जीने तिला घरातून पान आणून दिले.
क्रमशः

🎭 Series Post

View all