Login

इतिहासाचे पान ३

A family who is not bogged down by struggles and adversities of life

भाग - ३

''ओय द्वारकाआज्जी बस नंऽ वं, सुंदर आज्जी सांगन वं गोठ, अब्बा नायी वं नायीऽऽ आजी आज सुषमामावशी सांगन गोष्ट. नायी का बाई? थे मंगाशी आल्ती गंगूबाई...तिच्यावाली.'' लाजत बाब्या म्हणाला.
''बाप्पा हा पोरगा कायी पिच्छा सोडत नायी गोठ आयकल्या बिगर. सांग माय पोट्ट्यायले गोठ. तुमाले सांगतो, गंगूबाई आमच्या परिस जराशी लायनी{लहान} हाये. अरे मायवाल्या मामाची पोरगी हो नां ते....अगा, काय देखनी होती बापा. पाह्यतच राहे कोनीही. आतायी देखनीच हाये म्हना. पन तवा, लय मांगन{सोयरीक}येत जाये तिले. आमचा मामा कायी आयके नायी. मंग जरा मोठी झाल्यावर...''
''अवं सुंदरा आज्जी, पयले पासून सांग नं वंऽऽम्हन्जे तू नसत का सांगत आट्यापाट्याच नगर...तस्स !''
वंदना मध्येच म्हणाली.

''बरं बापा मी चुप होतो. आन सांग वं माय सुसमा तुले मायीत हाये नां सब्बन?'' तिच्या कडे बघत सुंदरा आज्जी म्हणाली. ''हो मोठीमाय मला आईने, मोठीबाईने आणि माझ्या आज्जीनेही दिनकर मामा पासून सगळच सांगितले आहे. सांगते मी, मुलांनो तुम्हाला ऐकायची का गोष्ट. पण ही गोष्ट तुम्हाला गंभीर करु शकते.''
''कावून बा गंभीर करन?'' बाब्या
''अरे बाब्या, खुप दुःख बघितले आहे आमच्या बाईने. तुम्हाला बहूतेक मजा येणार नाही. मी असे करते. तुम्हाला पुस्तकातली गोष्ट सांगते. "विक्रम आणि वेताळची" चालेल नां?''
''नायी वो मावशी, आमाले गंगुबाईचीच गो‌ष्ट सांगानां बाॅऽ आयकू द्या. तुमीपन असान नां त्या गोष्टीत?'' वंदूने उत्सुकतेने विचारले.
''हो हो आहे मी पण. बर मग सांगते ऐका पण अट एकच, बोर झालात तर मला सांगा?'' सुषमा.
''अव बाई पोट्टे बोर कावून होतीन वं माय?'' काहीच नं समजून द्वारका आजी म्हणाली.

सगळी हसायला लागली.''अवं आज्जी ते झाडावरच बोर नायी वंऽ इंग्रजी शब्द हाये वं थो. बोरऽ'' बाब्या म्हणाला.
''मंग काय होते, बोर म्हन्जे?'' आजीने विचारताच मुलं एकदुसर्‍याचे तोंड पाहू लागलीत.
''मोठीमाय 'बोर'' म्हणजे कंटाळा येणे. बोर झालातं तर, सांगाल मुलांनो." म्हणत. सुषमा त्यांना जणू सिनेमा घडताना दाखवत होती. तल्लीन होऊन सगळी मुले 'तिची कथा' ऐकू लागली.
०००

बर्‍याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. साधारणतः आजपासून साठ वर्षांपुर्वीचा काळ. अगदीच छोट्याश्या गावात राहणारे गावातील सुखी कुटुंब. शेती, गुरे ढोरे, कामाला गडी माणूसं मोठ्ठ घर, घरासमोरच एका बाजूला छोटी विहीर. प्रशस्त अंगण. उंच भिंतींचे आवार. आवारा बाहेर बैलगाडी उभी. बाजूलाच गुरांचा गोठा. गोठ्याच्या बाजूला शेतीत वापरायचे औजार ठेवलेले. वखर, डवर, नांगराचे मोठा फाळ. घराला मोठ्ठा लाकडी दरवाजा.

घर अंगणी हसती खेळती लेकरे
सुख समृद्धी झाली आरुढ समजावी...!
पंचवीस एक्कर जमीन होती जिवाजीरावांकडे.
दूध दुभत्याने समृद्ध घर.
जिवाजीराव पत्नी रुक्मिणी. ह्यांना तीन मुली आणि दोन मुले होती. सर्वात मोठा मुलगा दिनकर. मग, बाई म्हणजेच गंगा. घरातील मोठी मुलगी म्हणून कौतुकाने मोठी बाई म्हणायचे. नंतर सुनिता झाली. त्यानंतर वनिता झाली. पाळणा लांबतच चालला होता. पण थांबवण्याचे तेव्हा काही साधन नव्हते. असतील तर प्रचलित नव्हते. शिवाय अजून मुलगा झाला तर, 'सोने पे सुहागा' आणि मग जणू इच्छापुर्ती झालीच त्यांची. लहान मुलगा शामरावच्या रुपाने प्रसाद मिळालाच.

जीवाजीराव - रुक्मिणी देखणे जोडपे. चांगलेच उंचपुरे. गोरेपान दोघेही. जीवाजीरावांचे डोळे तर घारे. अजूनच सौंदर्यात भर टाकणारे, देखणे दिसायचे ते. आणि त्यांची मुले पण तेवढेच देखणे. घरात सगळ्यात सुंदर गंगा बाई. लहान मोठे लाडाने तिला बाईच म्हणायचे. गोरीपान, चाफेकळी नाक, काळेभोर लांबसडक केसं, मोठे डोळे, पांढरी दंतपंक्ती, सडपातळ, उंच गंगाबाई...कुणालाही बघितल्याबरोबर आवडायची. शिवाय बोलायलाही मृदू भाषी. चालण्या बोलण्यात नजाकत होती तिच्या. लहान वयातच घरकामात तरबेज होती गंगा. भावंडांमध्ये मोठी असल्याची भावना ती जाणत होती. आणि लहान भावंडांना फारच जीव लावायची. जीवाजीरावांची गंगाबाई म्हणजे जीव की प्राण. तिला काही कामे सांगितलीत आणि तिने केले नाही. असे व्हायचे नाही. म्हणूनही जीवाजीराव तिचा फारच लाड करायचे.

प्रत्येक आईवडीलांना कितीही मुले असलीत तरी ते सारखेच प्रेम करतात त्यांच्यावर. थोडंफार इकडे तिकडे होत असतं. तसेच जीवाजीराव आपल्या तीनही लेकींना खूप जपायचे. खुप लाड करायचे. त्यांना हवे नको ते सर्व पुरवायचे. गंगाबाईने कधीच शाळेचे तोंड पाहिले नाही आणि दिनकरला दूरच्या गावी शाळेत पाठवायचा जीवाजीरावांचा प्रयत्न निष्फळ गेला. म्हणून दोघेही अंगठे बहाद्दर{अशिक्षित}.

त्याच दरम्यान गावात शाळा सुरु झाली. पण का कोण जाणे नंतर जीवाजीरावांनी गंगाबाई आणि दिनकरला शाळेत घातलेच नाही. पण नंतर एकमेकांचे बघून. गावात मुलींच्या शिक्षणा विषयी बोलले जावू लागले. आणि मग जीवाजीरावांनी रुक्मिणीबाईंच्या सहमतीने सुनिता, वनिताला शाळेत घातले.

दोघींची जेव्हा शाळा सुरु झाली. सगळ्यात जास्त उत्सुक गंगा असायची. ती आपल्या मायच्या बरोबरीत पहाटेच उठायची. मायने नेमून दिलेली कामे करायची. दोघीं साठी, भाकरी आणि भाजी बनवायला, मायला मदत करत असे. सुनिता वनिताला शाळेत जायला आवडायचे. मज्जा वाटायची दोघींना. वनिताला घरकामापासून सुट्टी मिळायची म्हणूनही तिला शाळेत जाणे आवडायचे.

दोघी शाळेत गेल्या की, गंगाबाई घरी कामातं मदत करायची मायला. शाळेतून आल्यावर घरी काही खायला पाहीजे म्हणून, त्यांच्या आवडती तीळ गुळाची किंवा शेंगदाण्याची पट्टी{चिक्की} बनवून ठेवायची.

जिवाजीरावांचा मोठा मुलगा दिनकर. ह्याचे व्यक्तिमत्व
भन्नाट होते. लहान असताना म्हणजे बाळ असताना. आबा मायचे सारे लक्ष त्याच्यावरच असायचे. घरात वडीलधारे कुणी नाही. कारण आजी आजोबा साथीच्या रोगाने वारली होती आणि जिवाजीरावांना चुलत काकांच्या आश्रयाने राहावे लागले होते. म्हणून मग दिनकरला जीवापाड जपत होते. लाड करत होते दोघेही. त्यातच पाच वर्षाने गंगाबाईचा जन्म झाला. घरात ती सोनपावलांनी दुडूदुडू धावू लागली. म्हणून आबा तर भरुन पावले. कुठे ठेऊ लेकीला आणि कुठे नाही असे त्यांना झाले.

हे बघून दिनकर बेचैन व्हायचा...
आणि इथेच कुठे तरी बाळ दिनू दुखावला जात होता. त्याच्या प्रेमात वाटेकरी आला होता. आबा आणि मायचे लक्ष आता जास्तीत जास्त गंगा कडे असायचे. ती दिनू पेक्षा लहान म्हणून ते जास्तच जपायचे तिला. त्यानंतर सुनी मग वनी आणि मग शामरावचा जन्म झाला. आता तर दिनू स्वतःला अलिप्त ठेवू लागला. एखाद्या कोपर्‍यात बसून तो सगळ्यांकडे बघायचा. काही विचारल्यास सरळ न बोलता तुटक बोलत होता. घरच्यांपासून दुरावत चालला होता दिनू. एक अढी निर्माण झाली होती त्याच्या मनात. घरातल्यांनी काहीही म्हंटलेले त्याला त्याच्या विरुद्ध वाटायचे. हळूहळू दिनकर द्वांड होत गेला. माय आबांचे ऐकेनासा झाला. मनमानी करु लागला घरात. आणि हळूहळू त्याची हिंमत वाढत गेली. आणि मग तो गावातही मनमानी करु लागला.

गावात पुर्वी लहान वयातच मुलांना कामाला जुंपायचे. अभ्यासात ज्यांना रुची ते शेतातील कामा सोबतच शाळेतही जायचे. दिनकरला शिक्षणातही रस नव्हता. शेतातील कामाची त्याला अजिबात आवड नव्हती. आणि म्हणूनच तो आबांना कामात मदत करत नसे. आबांनी, मायने काही काम सांगितल्यास तो बाहेर पळून जायचा खेळायला. आता तर वयाने मोठ्या मुलांसोबत, माणसांसोबत त्याची मैत्री व्हायला लागली. आबांनी हे बघितल्यावर त्याला त्याच्या बरोबरीच्या मुलांसोबत रहायला सांगायचे. त्याला गोड बोलून समजवायचा प्रयत्न करत होते.

पण ऐकेल तो दिनकर कसला. हळू हळू टवाळ मुलांसोबत त्याची मैत्री झाली. मग काय गावातील लोकांची टिंगळ टवाळी करणे. कुणी त्याबाबत समजवायचा प्रयत्न केला की, ह्याच्या रागाचा पारा चढायचा. मग समोरच्यांची काही खैर नसायची. दगड उचलून नेम धरुन मारायचा. कधी पैलवाना सारखा, उचलून फेकायचा. शिव्यातर एकशे एक त्याच्या तोंडी आल्या.

आबा हैरान परेशान झाले. दिनकर म्हणजे आबांची डोके दुखी बनत होता. कोणत्याच कामात रस नाही म्हंटल्यावर आबा तर काळजीतच पडले. जेमतेम पंधरा वर्षांचा दिनकर. आता तर टारगट मुलांसोबत राहून जुगार खेळणे आणि भांडण करणे. बस्स एवढाच उद्योग त्याचा. आबांनी त्याचे लग्नं करुन द्यायचा प्रयत्न केला होता दोन वर्षांपुर्वी. पण दिनकरने जुमानले नाही. नातेवाईकांमध्ये त्याची बदनामी आधीच पोहोचली होती. त्यामुळे कुणी सोयरासुद्धा त्याच्या साठी येत नव्हता. म्हणून आबांनी त्याला घराबाहेर काढले होते. 

दिनकरला काही फरक पडत नव्हता. जेव्हा आबा घरी नसतील. तेव्हा तो घरी यायचा. माय त्याला खूप समजावून सांगायची. पण तो तिचे काहीच ऐकायचा नाही. जुगारात पैसा मिळाला तर बरे. नाहीतर तो घरी येऊन मायला पैसे मागायचा. आणि तिने दिले तर बरे. नाहीतर घरातील कोणत्याही वस्तू चोरुन नेऊन विकायचा. त्याच पैशातून मग जुगार खेळायचा. घरातील वस्तू गायब झाल्या की, माय समजून जायची. ती आबांपासून लपवण्याचा प्रयत्नं करायची. पण आता त्याची ही सवय आबांना माहित झाली होती. आबांना त्याच्या वागण्याचे खूप वाईट वाटायचे.
क्रमशः

🎭 Series Post

View all