Login

इतिहासाचे पान ४

A family who is not bogged down by struggles and adversities of life

भाग - ४

त्यांनी त्याला सर्व प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो इतका व्यसनांच्या आहारी गेला होता. की, एकदा चक्क आबांना मारायसाठी कुर्‍हाड उचलली त्याने...!

''अब्बा येवढा खराब होता का दिन्याऽ बापा बापा असा कसा वो दिन्या. सुषमाबाई कावून हा असा वागे? सुंदरा आज्जी तू नवती का त्याले कायी समजावत? आमाले तं मोठ्ठी गोठी सांगतं. त्याले कावुन त्या सांगतलं नायी?'' मध्येच बाब्या दिनूचा राग येऊन म्हणाला.
''म्या कायले तिथ होती रं तवाऽ
तुया आबाजीनं त्या आंधीच आनल होत मले इकड...
म्या असतो तं सांगतल्या असत्या त्याच्या कानामांग दोन चार गोठी!'' आज्जी हसतच म्हणाली.
''आता आयकताऽ का सवालच इचारता?'' द्वारका.
''आन मंगापासून मी आयकत हावो.
गंगुबाईची तं गोष्टच नायी हाये.
दिन्याचच पुरान चालू हाये.!'' सुनिता मध्येच म्हणाली.

''अरे मुलांनो, येते नां मी बाईकडे. तुम्हाला एकदाचे दिनूमामाचे सांगून झाले की बाईकडे वळते, कान देऊन ऐका. पण मला सांगा इथवर कशी वाटली बाईची कथा?'' सुषमाने विचारले.
''मले तं दोन चार लाथा बुक्क्या मारा वाटल्या दिन्याले. कोनी असे करते का आपल्या मायबापा संग?''
बाब्या रागाने म्हणाला.
''आँ हाँ माया लक्तेजिगर, म्हनून तं बाब्या माया जिगरी हाये. जरा द्वांड हाये पण येक नंबर पोट्टा हाये. बाबू चांगल वागाचं. थ्या हातभट्टीच्या जोळ जाचं नायी. शाळा शिकाची आन लय मोठ्ठ व्हाचं! काय म्हन्तो म्या?'' सुंदरा आज्जी प्रेमाने बाब्याच्या डोक्यावरुन हात फेरते. ''अवं आजी कावुन माये केसं खराब करत वंऽ आताच तं तेल चोपडून बसवले होते म्या त्यायले!''
मान डोलावत बाब्याने पुन्हा केसं नीट केले.

''बोल वं सुषमा मावशी!''
उत्सुकतेने मंगला म्हणाली.
सुषमा पुन्हा गोष्ट सांगण्यात गुंग झाली.

दिनकर मोठा होत असताना कुठे तरी आपण त्याला संस्कार द्यायला कमी पडलोय की काय? असे सुद्धा कधी कधी आबांना वाटायचे. त्यातच ह्या प्रसंगाने, अपमानाने आबा स्तंभीत झाले होते. विचार करुन करुन त्यांच्या मनाने कच खाल्ला होता. जुन्या लोकांना आपली ' अब्रू ' म्हणजे जीव की प्राण. त्यातच ' दिन्याची ' किर्ती नातलगांना कळली तर मुलींचे लग्नं कसे व्हायचे. माझ्या सोन्या सारख्या मुलींचे काय होईल पुढे. हीच चिंता त्यांना सतावायची.   
    
अशातच त्यांच्या बहिणीने एक सोयरीक आणली बाई साठी. बाई तेरा वर्षांची असेल तेव्हा. आक्का म्हणाली, ''भाऊ, लोकं भले हायेत. मोठ्ठा वाडा हाये. जमीन जुमला हाये बाप्पा. दोन मोठाले भाऊ हायेत. पोरगा सार्‍यात ल्हान हाये. मायबाप हायेत. उरकुन टाकू पटदिश्या. तुया मोठ्याचं दिन्याच म्हन्तो म्या. कायी खर नायी बाप्पा. बेज्या वाया गेला पोट्टा. ह्या लोकायले म्या सगड सांगीतल हाये. थे तं भल हो थ्या बुवाचं. त्यायन म्हटल, पोट्ट वांढ{नालायक}निंघाल त्यात थ्या भल्या मानसायची काय गल्ती हाये? पाह्य भाऊ, अश्या इचाराचे लोकं हायेत थे...काय म्हन्तं?''

''होवं माय राधे. त्या सोयरीक आन्ली म्हंजे चांगलीच असन. अन्  तू  तिकड हायेच नजर ठेवाले. मंग काय पाहा लागते बाप्पा...थांब जो, माया गंगाबाईले इचारु दे!''
''बाप्पाऽऽबाई न नायी म्हन्ल त काय, सोयरीक होनार नायी का काय ?'' आक्का पदर तोंडाला लावून हसतच म्हणाली.
''तस नायी राधे, सांगतो पोरीले...
तिचा बी कायी इचार घिऊ का नायी?''
''का मंग गंगा बाई, आक्कानं सोयरीक आनली बा.
करा चं का मंग लगनं!''
आता पर्यंतचं संभाषण बाईने स्वयंपाक खोलीतून ऐकले होते.
ती लाजून माय च्या मागे जात म्हणाली.
''माय सांग न व आबाले, कायीss पुसतात मले.''
भाकरी थापता थापता माय हसून म्हणाली, ''आवो गंगीचे आबाऽ तुमच्या पुढ जाईन का वं मायी बाई?
तुमी म्हणान तसं का वं बाई?''
तशी बाई लाजून तिथून उठून दुसर्‍या खोलीत गेली.

झाले एकदाचे, गंगाबाईचे लग्नं ठरले...
मायला तर आभाळ ठेंगणे झाले.
एकतर दिनकरने पार त्यांचा नक्षा उतरवला होता.
मनात कुठे तर खुप धाकधूक होती.
आपल्या घरी सोयरीक येणार की नाही!
इतक्या सुंदर मुलींचे लग्न होईल की नाही.
राहून राहून डोळ्यातं तिच्या पाणी येऊ लागले.
बोट धरुन चालायला शिकणारी गंगा आता सासरी जाणार होती नवर्‍याचा हात पकडून.

आबांच्याही मनात कालवा कालव झाली होती.
जन्मल्यानंतर पहिल्यांदा हातात घेतलेली गंगा त्यांना आठवू लागली.
घरभर फिरणारी माझी गंगा आता दुसर्‍या घरी जाणार...
कल्पनेनेच त्यांचे डोळे भरुन येत होते.

एकदाचा तो दिवस उगवला.
खुप थाटामाटाने बाईचे लग्न केले आबांनी.
जावई पण खुप छान मिळाला त्यांना. देखणा आणि चांगलाच उंचपूरा राजबिंडा गडी बाईला साजेसा, विठ्ठल त्यांचे नाव.

निरोपाच्या वेळेस बाई. माय पेक्षाही जास्त, आबांना बिलगून रडली. गदी धायमोकलून...शेवटी आबांनीच अश्रू आवरलेत. आणि आपले हात जोडून जावयांना म्हणाले. ''मायी सोन्यासारखी पोर हाय जी, सांभाळजा तिले. कायी चुकलं माकलं तं माफ करजा.'' जावयांनी त्यांच्याकडे बघितले. हात जोडून बोलत असलेल्या आबांचे हात त्यांनी हातात घेतले. ते काही बोलणार. तेव्हढ्यात, त्यांच्या आधीच. त्यांचे वडील म्हणाले. ''तुमची पोरगी आता आमची हाये इवायीबुवा. पोटची पोरगी नोती आमाले. आता आमाले एक पोरगी भेटली. कायजी नका करु.'' आणि त्यांनी आबांना आलिंगन दिले. आबा तर धन्य जाहले. व्याह्यांनीच एवढी मोठी गोष्ट बोलली. मग आता चिंता करायचे काही कारण नाही. 

आबांनी समाधानाने सुस्कारा सोडला.
गंगा आणि विठ्ठल सोबत पाठराखीन देऊन दम्मन मध्ये बसवून. वर्‍हाड वेगवेगळ्या बैलगाडीत बसून.
तिच्या सासरी आलेत.

इकडे घर अगदी सुने सुने झाले होते आबांचे.
कसाबसा लग्नापुरता तग धरुन असलेला दिनकर.
पुन्हा बाहेर गेला होता. आबा पण पाहूण्यांमुळे त्याला काही बोलले नाहीत. पण लग्नातं त्याच्यामुळे काहीही अडचण आली नाही. पाहूणे समजदार होते. किंबहूना, गंगाबाई सारखी रुपवती सून मिळाली म्हणून सगळेच आनंदी होते.

आणि लग्नं सुद्धा शांततेने पार पडले. म्हणून तर आबा आणि माय आनंदात न्हाले होते. जोड्याला जोडा मिळाला होता.
आता त्यांची गंगाबाई राणी सारखी त्या घरात राज्य करेल.
मनोमनी आबा आणि माय कल्पना करत होते.
दोन महिन्यानंतर मग आबा, बाईला पहिल्या सणासाठी घ्यायला गेले. बाईतर अगदी आनंदी झाली त्यांना बघून. तिला तर कधी एकदाची माहेरी जाते असे झाले होते. कारण इथला सगळा आनंद तिला मायच्या कानावर घालायचा होता. मग तिच्या सासर्‍यांशी बोलून तिला लगेच तयारी करायला सांगून आबा निघाले बैलगाडीने घरी जायला.

इकडे जावयांनी निघताना त्यांना सांगीतले,
''म्या दोन दिसानं तिले घ्याले येतो.''
आबा म्हणाले, ''नायी बाप्पा येवढ्या लौकर? इवायांन तं म्हटलं आठ पंधरा रोज रावू द्या म्हनून?''
''नायीऽनायीऽ दोन रोजानं तयारी करुन ठेवजा. म्या येतो घ्याले.'' घाईने विठ्ठल म्हणाला.
नाईलाज झाला आबांचा. ''बरं बाप्पा येजा मंग.''
आबा, बाईला सोबत घेऊन निघाले.

खूप दिवसानंतर बाई घरी आल्यामुळे घरात आनंदी आनंद झाला. भाकर तुकडा ओवाळून टाकला. मायने तिच्या चेहर्‍यावरुन हात फिरवला. लग्ना नंतरचे तेज तिच्या चेहर्‍यावरुन ओसंडून वहात होते. आणि गंगा अधिक देखणी दिसत होती. आपल्याच मुलीचे तिला भारी कौतुक वाटले. प्रेमाने जवळ घेतले मायने तिला. आज तिच्या आवडीचे पदार्थ मायने बनवले. माय तिला काहीच काम करु देत नव्हती.

''तू बस बाई. आराम कर. आता ह्या घरच्या कामाले हात नायी लावाचा. सुनी आन् वनी करतीन कामं.'' तिकडून सुनी म्हणाली, ''हवं ना मायऽ करतो ना कामं. बाई तू बस वं मायऽ आन आंधी सांग भावजी कसे हायेत? बुढा बुढी तुयी जावू, भासरे कशे हायेत ? तरास तर नायी देत ? लय काम करा लागत असनं नायी का बाई? जेवाले देतात का बराबर तुले?'' एकादमात गमतीने तिने विचारले .

''हाव ना बाप्पा, ऊग्या मुग्या बसा बरं सांगतो सब्बन. माय वंऽ लयऽ चांगले हात माया घरवाले, आमी सब्बन बायां मिडून काम करतो. खरच वं माय.' मायकडे वळून बघत उत्साहाने बाई पुढे म्हणाली. ''मामाजी लय कायजी करतात मायवाली. भले माणूस हायेत.'' लगेच आबा आणि माय ने हात जोडून आनंदाने परमेश्वराचे आभार मानले. ''चला, देवाची नजर हाय मनावं आपल्यावर,'' तिचं सासरच कोडकौतुक ऐकून आबा धन्य झाले.
क्रमशः

🎭 Series Post

View all