भाग - ५
दोन दिवस लगेच सरले. तिसर्या दिवशी सकाळीच जावई दारात दम्मन घेऊन हजर,"या या बुवाऽऽकाही तरास तं नायी झाला नं"
''नायी, आलो बराबर मंग जेवल्यावर निगंतो घराकड!''
''अब्बा कायी गोठ करता बुवा तुमी तं
आले तशे थांबजा दोन रोज राजेहोऽ.'' आबा म्हणाले.
''नायी मामाजी आबानं लागलीच याच म्हटल वापस.
जा लागन आमाले.''
चार कोसावर बाईचं गाव होतं.
इकडे बाईला विठ्ठलची चाहूल लागली होती.
नवरा आल्या आल्या बाईची लगबग सुरु झाली होती.
ती दाराआडून नवर्याला बघत होती. आपला आनंद ती जाहीर करु शकत नव्हती. का कोण जाणे, त्याचे लवकर येणे. मनातून गंगाला सुखावून गेले. तेव्हढ्यात सुनिताने तिला पाहिले आणि मोठ्यांने गंमतीने म्हणाली, ''दाराआडून काय पाह्यतं वं बाई ? जां नं भेटनं भावजीले!'
आणि खट्याळपणे सुनी पुढे म्हणाली.
''ओ भाऊजी, तुमची बायको पाहा कशी चोरुचोरु पाह्यते तुमाले!''
''माय वंऽऽ काय बायी पोट्टी हायेऽ इतलुशी तं हाय.
बोलते पाय कशी चरचर.'' आणि ती लाजून आत पळाली.
जेवण आटोपल्यावर बाईने तयारी केली. नेमके तेव्हाच, गंगाबाईच्या दोन मैत्रिणी तिथे आल्या.''माय बाई गंगेऽऽचाल्ली का वंऽ आमाले इसरली का काय? लयच कमाल झाली वं तुयावाली.'' तिघीही एकमेकींना पाहून धावतच जवळ आल्या.''
"अय गंगाबाईऽ जरा दमान घेत जां. लगीन झाल म्हटल तुयावालं.'' वनिता मोठ्ठ्या बायांसारखी बोलली. आणि तिघीही खळखळून हसल्या.
''माय लयच साजरी दिसतं गंगे. बिल्लोर तं मस्तच हाये. तुया गोर्याभराड मनगटात हिरवेकंच बिल्लोर लयच चांगले दिसत हाये. आता कवा भेटशीन वं?''
''आता मायऽ तुमच्या दोघीयच्या लगनाले येईन नां बाप्पाऽ कवा बोलावता मंग मले?'' बाई खट्याळपणे म्हणाली.
निघताना बाईला रडू आवरले नाही. आबांनी एवढा वेळ सांभाळलेले अश्रू शेवटी ओघळू लागले. निरोपाच्या वेळेस सगळ्यांचेच डोळे भरुन आले. कसेबसे स्वतःला सांभाळत बाई घरच्यांचा निरोप घेत होती. पण तिची नजर इकडे तिकडे काहीतरी शोधत होती. ''गंगा दिन्या नायी येनार बाईऽ तुया आबानं त्याले याले मनाई केली हाये. चोरून लपून येतो माय घरीऽआबा त्याले दाठ्ठ्यातयी उब करत नाही.'' शेजारची काकी तिच्या कानात कुजबुजत म्हणाली.
ती दम्मन मध्ये बसताना आजूबाजूचे नातलग तिला भेटायला आले. सगळ्यांचा निरोप घेवून बाई आणि तिचा नवरा दम्मन मध्ये बसलेत. सगळ्यांना टाटा करत बाई डोळे पुसत सासरी निघाली.
''कावो कारभारीन...''
''कोनाशी बोल्ता...?''
''आवो तुमच्याशी बोल्तो म्हटल...''
''आता मायऽहे काय आनी नव...?
कावुन मले आवो जावो बोल्ता?
कायचा राग आला का तुमाले...?''
गंगाने प्रश्नार्थक नजरेने विठ्ठल कडे बघितले.
''न्हायी म्हन्ल आमची आठवन आल्ती का तुमाले? का, हा मानुस एकलाच आठोन काढून परेशान होता?'' विठ्ठल.
''जा बापा कायी बोल्ता. मले कावुन न्हायी येनार तुमची आठोन? अन् तसयी दोनच तं रोज झाल्ते मले इकडं येवून. कायी गोठ करता!'' बाई चेहरा पदराने लपवत हळूच म्हणाली आणि तिने दम्मन चालवणार्या गडीमाणसाकडे इशारा केला.
एकंदरीत बाईला प्रेमळ घरदार भेटलं होतं सगळे तिला समजून घेत होते. तसेच गंगा पण सासरी समरसून गेली होती. आनंदाचे दिवस लवकर सरतात. मग दुसर्यांदा दिवाळ सणाला गंगा आली. तेच मोठ्ठ पोट घेऊन.
''अब्बा, काय झाल्त वं सुषमा मावशी तिले? कावुन तिच पोट फुगलं होतं? बिमार झाल्ती का?'' वंदूने पटापट प्रश्नं केले.
''अगं मला श्वास घेऊ दे. पाणी प्यायचं मला.'' पाणी पिल्यावर ती पुन्हा सांगू लागली.
गंगाचे सगळ्यांनी खुप कौतुक केले. ती तर आता अधिकच सुंदर दिसायला लागली होती. दोन दिवसांनी भाऊजी बैलगाडी घेऊन हजर तिला न्यायला. मग आबा म्हणाले,''सातवा लागला का तिले घ्याले येतो. बायतपन इथच करु आमी.''
''नायी मामाजी, माय अन आबानं सांगीतल हाये. बायतपन थेच करतीन घरी.'' विठ्ठल.
''अरे बाप्पा काऊन असं करता बुवा? तिचा आबा मेला नायी अजून. पयल बायतपन 'मायरातच' करत असते पोरीचं!''
''नायी मामाजी बायतपन तिकडच होईन, तुमाले बोलावन धाडीन. पाह्याले येजा तुमी सारेजन.'' ठामपणे जावई म्हणाले.
शेवटी आबा म्हणाले,''ठिक आहे बा, करा तुमच्या मनान,'' पण मनातून नाराज झालेत ते. मग बाईची आवराआवरी झाली. मायची गळाभेट घेऊन अश्रूंना वाट मोकळी करुन दिली बाईने. सर्वांचा निरोप घेऊन बाई सासरी गेली.
काही महिण्याने बाईकडून निरोप आला. मुलगा झाला होता बाईला. आबा आणि मायला तर खुपच आनंद झाला होता. सुनी, वनी, भास्कर तर नाचायलाच लागलेत. आणि आबांच्या मागेच लागलेतं.''आबा चला नां बाईकडं जावू .''
"अरे पोट्ट्यांनो थांबा जरा सवा मयना होवू दे गड्या मंग जाऊ बाईकडं. आंगडटोपड त न्या लागीन!'' आबा.
''बाप्पा येवढचं? कपडालत्ता घ्या लागन सार्यासाटी. अन् लेकरासाठी तोडे, गोफ न्या लागन.'' माय उल्हसित होत म्हणाली. ''हो बाप्पा सार घेऊन जाऊ.'' आबा दोन्ही हात कोपरा पासून जोडत म्हणाले. तसे सगळेजण हसायला लागले.
इतलूसी मायी गंगाबायी
मायेराची हाये थे लाडाची
करु कितीक कवतिक तिचं
झाली बायी मायी आई बाळाची ....!
अश्यातर्हेने बाईकडे जायचा दिवस आला. सगळे हरखून गेले होते. भाच्याला पण बघायची ओढ लागली होती मुलांना.
सकाळीच तयारी करुन बाईकडे पोहोचले सगळे. गंगाबाईतर धावतच आबां जवळ आली,''अर्रर्रर्र बायी दमान घेन जरा. येका पोराची माय झाली ना वंऽ ओली बायंतीन असं धावू नये!'' आबा कौतुकाने तिच्याकडे बघत म्हणाले.
बायी लाजलीच. लगेच ती आबांच्या पाया पडली. सगळ्यांना भेटली,''पोट्ट्येहो हातपाय धुजा आंधी. नायीतं जानं तसेच अंदर.'' मुलांना बाळाकडे जाताना बघितल्यामुळे तिने आधीच फर्मान सोडले.
मुले थबकलीत तिच्या आवाजाने,''कावून वं बायी, लयचं हास वं तू. लयच पोराची कायजी इले.'' तोंड वाकड करत सुनी म्हणाली. मग न्हाणीत जावून हातपाय धुतलेत सगळ्यांनी, ''अरे बा नातू कवा दाखवत बाई?" आबांनी म्हटलं. ''हो आबा आणतो.' म्हणत असतानाच तिच्या सासुबाई नातवाला घेवून आल्या.''बाप्पा ! हा तं आपल्या बाई वानीच दिसत हाये.' म्हणत माय नं पटकन त्याला हातात घेतले. सगळ्यांनी कौतुकाने त्याचे पापे घेतलेत. थोड्यावेळाने बाईने दिनकर बद्दल विचारलं, ''गडी मानसायवर नजर ठेवा लागते मां अन् मंग घरी पायजे नां कोनीतरी, आमी गेलो का धाडतो त्याले मांगून.'' असे म्हणून त्यांनी त्याचा विषय बंद केला.
जेवल्यावर आबा म्हणाले,''आमी घडीभर आराम करुन निंगतो मंग.'
''हे वं काय आबा? आता तं आले बाप्पा आन आताच निंगता? नायी आबा दोनचार रोज थांबा इतच.'' नाही हो करता करता रात्रभर थांबायचे ठरले. मग दुसर्या दिवशी जेवण करुन सगळ्यांचा निरोप घेत आबा परिवारा सहित आपल्या गावाकडे निघाले.
रस्त्याने माय आबांना म्हणाली.
''दिन्याचं गंगाबाईले सांगा लागत होतं.''
''अब्बा, काय नाक वर करुन सांगाची गोठ होती का? पोट्टी सासरवाडीत सुखी हाये. तान्हं लेकरु पदरात हाये. दिन्याच आयकुन मन खराब व्हाच तिच...बरं झाल नायी सांगितल तं."
इकडे बाईचे लग्न आटोपल्यावर. आबांच्या घराला घरघर लागली होती. दिनकरला शोधत आता बाहेरचे लोकं घरी यायला लागले होते. त्याचे मित्र बघितले की आबांचा संताप व्हायचा. पण दिनकर तर आता आबांना अजिबात जुमानत नसे. त्याचे व्यसन ही वाढल होते.
दारु प्यायला लागला होता. आणि आता तर तो, फडातही जायला लागला होता. घरातील भांडीकुंडी चोरी जाऊ लागली. मजल एवढी वाढली की, माय चे दागीनेही चोरी होत होते. आबा तर पार हबकून गेले होते. 'कस होईन बापा ह्या पोराचं?' एवढाच विचार त्यांच्या मनात येत होता. माय ला काही बोलायला गेले की माय रडायलाच लागायची. ती पण खचली होती दिनकर च्या वागण्याने. आबांना जास्त काळजी सुनीता आणि वनीताची वाटायला लागली होती. 'येवढ्या खबसुरत माह्या पोरी. भलतेसलते लोकं दिन्याच्या मांग येतात आपल्या दारी. कोनाची वाकडी नजर माह्या लेकींवर पडली तं मंग मी काय करु.' ते आतल्या आत पोखरत चालले होते.
असेच दिवसा मागून दिवस चाललेत. त्यांची काही शेती परस्पर दिन्याने विकली होती. घरातील भांडीकुंडीही तो विकायला लागला होता. आबांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती दिनकर मुळे. त्याच्या भानगडी निस्तरता निस्तरता नाकी नऊ आलेत आबांच्या. आबांच्या दरार्या मुळे लोकं हिम्मत करत नव्हती उघडपणे बोलायची. पण कुठं पर्यंत चालणार होतं हे सगळं?
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा