भाग - ६
आबा मनातून अजून घाबरले होते. दिन्याचा प्रताप वाढत चालला होता. छोटी मोठी भांडणे तर येतच होती घरापर्यंत. पण आता कळस गाठला होता, फडातल्या बाईवरुन एका सावकाराच्या मुलासोबत, हमरी तुमरी झाली दिनकरची. पुढे ह्या भांडणाचे पर्यावसान मारहाणीत झाले. सावकाराच्या मुलाचे नाक फोडले दिनकरने.
मग काय सावकार चवताळला.
'माह्या पोराले मारतं का बे ? थांब तुले पायतोच आता
माया पासून तुले कोन वाचवते तं.'
मग त्याने दिनकरला मारायला गडीमाणसे पाठवलीत.
त्याला शोधत पाच सहा हट्टेकट्टे गडी घरी आले.
आबा घरातच होते, त्यांनी बाहेरुनच आवाज दिला.
''दिन्या ओ दिन्या...दिन्याऽऽ हाये का वो आबा ?''
''नायी थो घरी नायी. तुमी कोन ?''
''आमी शेवगावच्या सावकाराचे गडी हावोत.
दिन्यान सावकाराच्या पोराले बेज्या हानलं.
नाक फोडलं त्याचं. सावकारान त्याले दिसन तिथं पकडून माराले पाठवलं आमाले.'' बाह्या सावरत मिशीला पिळ देत गडी म्हणाला.
''बाप्पा काय रस्त्यावर पडला हाये का माया पोरगा!
त्याचा बाप जित्ता हाये अजून. असं कसं मारसान त्याले?
खबरदार माह्या पोराले हात लावान तं म्या सावकाराले भेटतो. चाल रे गड्या बारक्या, जावू त्या सावकाराकडं.'
म्हणत आबा त्या गडी माणसांसोबत सावकारा कडे गेलेत. आणि आपले ही दोन माणसं सोबत नेले.
इकडे माय. सुनी, वनी आणि भास्करला एका खोलीत घेऊन बसली. पार घाबरुन गेली होती ती. आबा सावकाराकडे गेले..
''या या जीवाजीराव आनलं का थ्या दिन्याले ?''
''अवो सावकार अस काय करता. पोट्या पोट्यायचे भांडनं झालं नां ?
आपन त समजदार हावो...समजदारीन घ्याचं आपन.
थो का येका ठिकानी टिकते का?
त्याच्या पायाले तं भिंगरी लागली हाये बाप्पाऽऽ''
आबा हात जोडून सावकाराला म्हणाले.
''माह्या पोराचं त्यान नाक फोडलं येवढी त्याची मिजास.''
''अवो सावकार, तुमच्या पोरानही तं त्याले मारलं ना ?
दिनकर न तं मले सांगतल नायी. अजून आलाच नायी थो घरी. कोन काय केलंऽ मले तं मायीतच नायी. गल्ती कोनही करु दे...हाणामारी कायी बरी नायी बापा.''
''हे पाऽऽ तुमी भलेमानुस हाये म्हनुन तुमाले काही बोल्लो नायी. पोरीबाळी तुमच्याही घरात तं हायेतच नां जीवाजीराव?"
''असं कावुन बोलता सावकार?
तुमालेही पोरी हायेतच नां ?
आपल्या पोरी का वाटल्या गेल्या का काय ?
अशानं सोयरा उतरन का बां आपल्या दारी ?
समजूतीन घ्या सावकार माह्यं आयका, मी दिनकर ले समजावतो.
थो पुना अस नायी करन...येकाच गावात रायतो
आपन!''
०००
''बरं हाये जीवाजीराव, तुमच्यामुळ सोडतो त्याले राजेहोऽ'
''जरा टेका, घोटभर च्यापानी घ्या जीवाजीराव.'
''नायी जातो म्या. लय ऊपकार झाले बघा सावकार.''
आबा तिथून घरी आलेत.
दार वाजवले तरी कोणीच दार उघडत नव्हते.
आबा तर घाबरलेच. कायी झाल तं नायी देवा...
मग आबांनी जोरजोर्याने दार वाजवत आवाजही दिलेत.
तसे धावतच येऊन शामरावने दार उघडले.
आबाऽऽ म्हणत रडत बिलगला त्यांना.
आबा त्याला घेऊन आत आले आणि म्हणाले.
''अगा, गडीमानुस हायेस नां? गडी मानुस आसु गाळत नायी.''
तशी माय पण बाहेर येवून रडायला लागली.
तिला रडताना बघून मग, सुनी आणि वनी पण रडायला लागल्यात. आबा कसनुस हसत त्यांना म्हणाले,
''कायी झाल नायी पोट्यांनों, तुमी कावुन रडता बा? समजावल म्या सावकाराले. कायी करनार नायी तो आता. डोये पुसा आन च्यापानी द्या मले.'' माय ने लगेच डोळे पुसत, ''बातच करतो...'' म्हणत स्वयंपाक खोलीत गेली. सुनी, वनी आणि शामूला जवळ घेवून आबा समोरच्या खोलीत बसले. पण आबा चिंताक्रांत झाले होते. भेदरलेल्या{घाबरलेले} बायको मुलींची त्यांना फार काळजी वाटायला लागली.
''मायबाई सुषमा मावशी, अस झाल्त कां वं? थे तं पिच्चरवानीच वाटत हाये. म्या येका पिच्चरमधे पायल व्हतं.'' खुश होत वंदना म्हणाली. ''ओय वंदेऽ पयले 'पिक्चर' म्हणाले शिक!'' बाब्या तिला चिडवत म्हणाला.
''ओ बाब्या माया दिमागात काडी नको लावू...
मले वज्जेर झोप येत हायेऽऽ सुसमा म्या झोपतो. सांगत का यायले गोठ? नायी तं झोपानारे पोट्टेहोऽऽसकाडी शाळत नायी जाचं का?'' आजी जांभया देत म्हणाली.
''नायी वं आजी आमाले आयकाचं हाये. झोपनं इथच बाजीवर{खाट}, गोधडी आनुन देतो.'' बाब्या पळतच सुंदरा आज्जीच्या घरात गेला आणि गोधडी घेऊन आला. आज्जीने मस्त पाय लांब केले. सांग व सुसमा म्या हावोच इथ.
सासरी, बाई तर अगदी आनंदात होती. बाळामुळे तर तिला उसंतच मिळत नव्हती. आनंदाचे वारे वाहत होते तिच्या आजूबाजूला. असेच दिवस जात होते. बाळ एक वर्षाचे झाले आणि अचानक एक दिवस बाई चक्कर येवून पडली.
सगळे घाबरले काय झाल हिला. तिच्या नवर्याने तिला उचलून तख्तपोशावर झोपवले. लगेच एक माणूस पाठवून वैद्यांना बोलावण्यात आले. नाडी तपासल्यावर हसतच त्यांनी सांगीतले,''सूनबाई पोटुशी हाये. तोंड गोड करा.'' एव्हाना गंगाबाई पण शुद्धिवर आली होती. घरातले सगळेच आनंदी झाले.
पुन्हा एकदा कसे उठायचे बसायचे. काय खायचे, सूचना देऊन झाल्या. ''विठ्ठलराव धंदा वाढवा लागते आता. खानारं वाढल म्हनाच आताऽऽहाहाहा'' विठ्ठलचे आबा म्हणाले.
बाईने माहेरी निरोप पाठवला. आबा, माय, लहाने तिघेही आनंदीत झाले. आपल्या बाईला पुन्हा बाळ होणार म्हंटल्यावर....आबांकडे मात्र चिंतेचे सावट पसरले होते. तेवढीच ही आनंदाची बातमी मिळाली म्हणून समाधानी होते.
आबा कडे काय परिस्थिती सूरु आहे, हे बाईला कोणीही कळवले नाही. यथावकाश बाईला बाळ झालं दुसर्यांदा मुलगाच झाला. सासर माहेरचे सगळे खुश होते. पण ह्यावेळेस आबांनी तिला माहेरी न्यायची गोष्ट केलीच नाही. दिन्याबद्दल ऐकून पोरगी दुःखी होईल. हिच भावना होती त्यांची. तसेही सासरचे तिला प्रेमाने वागवतात. ही खात्री होती त्यांना.
दोन महिन्यानंतर आबा सगळ्यांना बाईच्या भेटीला घेवून गेले. बाई तर हरखूनच गेली होती सगळ्यांना बघून. बाळ खुपच सुंदर होतं. त्याला बघताच सुनी म्हणाली,''हे तं भाऊजी वानी दिसते बाई!'' क्षणभर बाळाला बघून सगळे दुःख विसरलेत.
जेवणखाणे झाल्यावर सगळे निघायला लागले. तसे बाई
म्हणाली, ''आबा, सदा नं कदा तुमच तेच पायटी आले का झाकटीच्या{संध्याकाळच्या}आतच चाल्ले घराकडं कवा आरामात थांबनार तुमी?'' तिचा लटका रागात विचारलेला प्रश्नं ऐकून आबा हसून म्हणाले,''बाई घरी लय काम हात मां गेल पायजे वंऽ हा गेल्लो का येतो लौकर नातवाच्या भेटीले!''
मग बाईची समजूत काढून सगळे परतले घरी.
बाईची पहाट कधी व्हायची आणि दिवस कधी सरायचा तिचं तिलाच कळायचं नाही. एवढी ती सासरी व्यस्त होती. जीवापाड दोन्ही मुलांना जपायची. त्याचबरोबर सासरच्या लहान मोठ्यांच्याही गळ्यातील ताईत बनली होती गंगा. विठ्ठलतर भारीच तिच्यावर फिदा होता. कामाच्या व्यतिरिक्त तो बाहेर जास्त रहात नसे.
दिवसा मागून दिवस जात होते. दिनकर मुळे आबा कर्जबाजारी होत आले. घरचे वातावरण चिंतायुक्त झालेले. हसणे जवळ जवळ सगळेच विसरत चालले होते. सुनिता, वनिता चौथीत आणि शामराव आता दुसरीत पोहोचला होता.
इकडे अचानक विठ्ठल आजारी पडला. वैद्य हकीम सगळा औषोधोपचार सुरु होता. पण आजार कळतंच नव्हता. आराम पडतंच नव्हता. ताप उतरत नव्हता. उलट दिवसें दिवस आजार वाढत चालला होता. घरातील सगळे हबकून गेले होते. कुणाला काहीही कळत नव्हते काय करावं ते. गावातल्या लोकां सहित, घरातही खुसर फुसर सुरु होती. विठ्ठलला बाहेरचं काही तरी लागले. कुणी तरी जादूटोणा केला.
''तरी म्या म्हनत होतो. त्या पडक्या वाड्यातल्या बाईले दिसू नको वं बाईऽ कावं गंगे तुले म्हटल होत का नायीऽऽ?'' गंगाची सासू तिला म्हणाली. ''हाव नां आत्याबाई. पन म्या कायले तिच्या सामोर गेल्तो? तिकडं गोदरीत{मलविसर्जनाची जागा} दोनेक येळा तिन मले पाह्यलं. हासली मां संग पन म्या कायीच बोल्ली नायी. पयतच घरी आल्तो. आता मले का तिची येळ म्हायीत हाये का काय गोदरीत याची? मंग कायले गेल्तो असतो म्या.'' गंगाने पदर डोळ्याला लावला. मनात शंका कुशंकेने घर केले. 'खरेच त्या बाईने तर करणी केली नाही ह्यांच्यावर?'
''पन आता काय कराचं? करणी कशी उतराची बापाऽ?'' विठ्ठलची आई रडू लागली. त्याच्या आबाने म्हंटले,''आस करतो. इवायाले म्हन्तो त्यायच्याकडं कोनी जानकार आसनं तं थे घिवून येतीन.''
त्यांनी आबांना निरोप पाठवला. आबा मग त्यांच्या ओळखीचे जाणकार आणि गावातील वैद्यांना सोबत घेवून गंगाकडे गेले. बाई त्यांना बघून रडायला लागली. तिला कसेबसे समजावून आबा जावयांना बघायला आत गेले. त्यांना वेगळ्या खोलीत ठेवले होते. वैद्यांनी त्यांची नाडी परीक्षण केली. मान हलवत स्वतःशी काहीतरी बोलत ते बाहेरच्या खोलीत आले, ''का म्हन्ता वैदू बुवा कावुन उठून आले बाॅ?'' आबांनी चिंतेने विचारले.
''जानकाराले पावू द्या. मंग बोल्तो...''
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा