भाग - ७
जाणकारानेही नाडी पाहीली. कधी, कसे, कुठे गेले होते. आणि काय होतय सगळं विचारलं. घरभर फिरलेत. आणि मग म्हणाले.''यायच्या मांगे कोनीतरी हाये. हे पाऽ ह्या काजळाच्या डबीत मले त्याची सावली दिस्ते.'' त्यांनी डबी सगळ्यांना दाखवली. "यायले भाहेरचं वारं लागलं हाये.'' त्यांनी मारुतीला खडा लावायचा सांगितला. आता तर जास्तच काळजीत पडले घरवाले. वाटत होते पण आता 'करणी' वर शिक्का मोर्तब झाले होते.
मग सगळ्यांची भिस्त, माहेरवरुन आलेल्या वैद्यबुवांवर होती. आता ते काय म्हणतात. ''हे पाहा बुवा, मी दवा देतो. बाकी देवाची मर्जी.'' त्यांनी हात वर केलेत. मग त्यांनी खलबत्यामध्ये काही जडीबुटी टाकून कुटली आणि त्याचा काढा करुन दिवसातून दोन वेळा प्यायला सांगितला. सोबत कोणती तरी बुटी होती. ती उगाळून चाटण द्यायला सांगितले दोन वेळा. मग सर्वांचा निरोप घेत आबा वैद्यांना घेवून निघाले आपल्या गावी. रस्त्यांत आबांनी वैद्यांना जावयांच्या तब्येती विषयी विचारले.
तर वैदू म्हणाले, ''कायी सांगू शकत नायी जीवाजीराव. कायी ही होवू शकतं बुवा!'' आबा तर आणखीनच चिंताग्रस्त झालेत.
घरी आल्यावर लगेच माय त्यांना म्हणाली, ''आवो गंगीचे आबा, कशे हायेत बुवा? बाई आन लेकरं कशे हायेत?''
''अबा, पानी त पाज पयले बापाऽ''
"सुने पानी आन, आबा आले.' माय ने आवाज दिला.
''आन्तो माँ," म्हणत सुनी पाणी घेऊन आली. पाठोपाठ शामू आणि वनिता ही आले आबा काय सांगतात ते ऐकायला. पाणी पिऊन झाल्यावर आबा म्हणाले,
''बाई...लेकरं, बाकी घरवाले सब्बन चांगले हाये. पन विठ्ठलबुवाचं कायी खरं नायी."
''अवो असं कावुन म्हनता बां गंगीचे आबाऽऽहोतीन नां बरे, कायी बोल्ता तुमी तं''
मायच्या डोळ्यातं पाणी आलेले बघून आबा म्हणाले,
''अवं तसं नायी, इलाज चांगला सुरु हाये, वैदू बुवा नं पन दिली दवा. तवा, पावू काय करते देवाजी.''
''देवा, माया गंगाबाईचं कुकू सलामत ठेवजो बाप्पा.'' आबांनी डोळे मिटत हात जोडलेत.
''बरं बरं सब्बन ठिक होईन पाऽ उठजा हातपाय धुजा, थाली वाढतो.'' म्हणत..माय, सुनी, वनीला आत घेवून गेली.
पंधरा दिवसांनी बाई कडून सुन्न करणारा निरोप आला, ''विठ्ठल बुवा गेला.'' माय, सुनी, वनी धायमोकलून रडायला लागल्या. ''कसं झाल वं माय. असं कसं केलं देवा? माया पोरीले उघडं पाडलं, काय कमी केल म्या तुया पुजेत. सार तं बराबर करत होतो. कुटं चुकलो बाप्पा!'' आबा बातमी ऐकल्यावर निश्चल बसून राहीले.
एक टिपूस ही पाणी आले नाही त्यांच्या डोळ्यातं.
रडता रडता मायचे लक्ष त्यांच्याकडे गेले. तशी माय म्हणाली,
''आवो काय दगड झाला का काय? आपल्या पोरीच कुकू
पुसल ना वं. काय अशे बसले, कायी त बोला.''
तसे भानावर येत आबा म्हणाले,''चाला गेलं पायजे बाईकडं.'' त्यांनी गुपचुप गड्याला बैलगाडी काढायला सांगीतली.
''पाण्याची चरवी, दोन कापडं घेजो संग.'' म्हणत आबा तयार व्हायला आत गेले.
''झाली का तयारी?चला बसा खाचरात.''
भावकीत ही एव्हाना खबर पोहोचली होती. त्यांनी पण आबांना म्हंटले, आम्ही पण येतो. अजून दोन तीन बैलगाडीत. नातेवाईक बसून निघाले आबांसोबत.
चारही बैलगाड्या बाईच्या वाड्या समोर पोहोचल्या. गावकर्यांची, नातेवाईकांची आधीच गर्दी झालेली होती.
समोरच तिरडी बांधणे सुरु होते. काही जण गंभीरपणे बसलेले होते. काही रडत होते. असे अचानक कसे झाले म्हणून काही लोकांच्या चर्चा सूरु होत्या. आबा दिसले तसेच कुणीतरी ओरडून आत सांगितले. कारंज्याचे पावणे आलेऽऽआबा च्या मागे माय डोक्यावर पदर घेवून. तिच्या मागे मागे सुनी, वनी आणि शामू.
आतल्या खोलीत आल्या आल्या बाई त्यांना बघून.
आबाsss म्हणून रडायला लागली. दृश्य ह्रदयद्रावक होते. खाली एका पथारीवर विठ्ठलबुवांना ठेवलेले. हात पोटावर. नाकात बोळे. त्यांच्या भोवती, त्यांची माय, भाऊ, आबा, वहिनी बसलेल्या. डोक्याजवळंच बाई रडत बसलेली.
रडून रडून डोळे सूजले होते तिचे...तिला तसे बघून आबांनी एकच टाहो फोडला. एवढा वेळ थांबलेले अश्रू झरझर वाहायला लागले. ''गंगूबाई कसं झाल मां कावुन बाप्पा माया बाई सोबत अस केल त्या. पोरायकडे तं पाहाचं होतं आता तं सुरु झाल्ता माया बाईचा सौसार. कावून बाप्पा देवा असं केलं." आबा बाईला पकडून रडायला लागले. माय पण बाईला पकडून रडायला लागली. सुनी, वनी आणि भास्कर बाजूला उभे राहून रडायला लागले.
माय ने रडता रडताच कुणाला तरी विचारले.
''लेकरं कुठं हायेत?''
तसे एका कोपर्याकडे बोट दाखवले एका बाईने. तिची दोन ही लेकरं एका नातेवाईकांसोबत बसले होते. कमालीचे शांत ते फक्त सगळ्यांकडे बघत होते. तसे मायला जास्तच रडायला यायला लागले. ती त्यांच्या जवळ गेली. लहान्याला जवळ घेत हमसून हमसून रडायला लागली.
''कस झाल बाप्पा, सोन्यावानी लेकरं उघडे टाकून कुटं गेले बाप्पा बुवा.'' तेवढ्यात काही जणांनी म्हंटले,''आता अंधार पडनं तवा लौकर चाला"' ''काल पास्न हाये मय्यत, वास सुटनं''
''तवा चाला, लवकर उरका!''
समोर अंत्यविधीची सगळी तयारी झालीच होती.
मग तिरडीवर कलेवर ठेवण्यात आले. बाईला डोक्याजवळ बसवले. बाईचे कुंकू पुसण्यात आले. बाईच्या बांगड्या फोडण्यात आल्या. बाई आणि मायने हंबरडा फोडला. रडायच्या आवाजाने वातावरण शोकाकुल झाले.
बाई रडून रडून गलितगात्र झाली होती. प्रेत उचलायला लागले तशी बाई पुन्हा धाय मोकलून रडायला लागली!
माय आणि बाकीच्या बायांनी तिला पकडून तिथेच बसवले.
काही दिवसातच सुखी संसार बाईचा दुःखात परावर्तीत झाला.
संसारात नाही काही उणे
सुख भरभरुन आले
फासे उफराटे पडले
दुःखाने काळीज भरले
काय करणार...औदासीन्य मनात दाटले
गणगोत कामाला लागले.
घरातील इतर बायांनी साफसफाई करायला सुरवात केली.
चुलीवर पाणी ठेवले गरम करायला. बाईची आणि घरातल्या बाकी बायांची आंघोळ करुन देण्यात आली.
तोपर्यंत अंत्यविधी उरकवून माणसं वाड्यावर परतली.
एक एक करुन सगळ्यांना आंघोळीला गरम पाणी देण्यात आले. आंघोळी झाल्यावर सगळे दुःखी अंतःकरणाने बाहेर बसलेले होते. तेवढ्यात भावकीतील लोकांनी आपल्या घरुन चहा बनवून आणला. कारण किमान आजतरी घरची चुल पेटणार नव्हती. कुणी बेसन भाकरी बनवून आणल्या.
पंगत बसली, पत्रावळी वर वाढण्यात आले. पण घरच्या कोणाचीच इच्छा नव्हती जेवायची. भावकीतलेच एका वयस्कर गृहस्थांनी त्यांना समजावले, 'हे पाऽऽगड्यांनो, जानार्यासोबत आपन जात नायी. खुशीनं नायी पन पोटासाठी थोडं तं खा लागनं उटा जेवा बरं. दोन दोन घास खाऊ गड्यांनो, चाला.'
मग सगळ्यांनी थोडं थोडं जेऊन घेतले.
इकडे बाया पण, नाही...हो...करत शेवटी दोन दोन घास जेवल्या.
बाई एकदम शांत झाली होती. माय तिला कवेत घेत म्हणाली...''बाई आपल्या हाती नवत माय हे, लेकरायकडं पावून जगा लागन माय तुले. त्याच त्यायची माय आन बाप बना लागन तुले आता! अशी आढ्याकडं{छताकडे}नोको पावू वं माय बोल नां मां.''
तशी बाई पुन्हा माय च्या कुशीत शिरत रडायला लागली...
''कुटं शोधू व माय यायले? माये पोरं बापाले विचारतीन तं काय सांगू व माय? आता कशी जगू वं माँ?'' दोघीही बराच वेळ रडल्या आणि उशीरा कधीतरी त्यांना झोप लागली.
अहंऽऽअहंऽऽच्या आवाजाने सगळे चमकलेच. बाब्या रडत होता. ''अरे बाब्या खुप वर्ष झालीत रे ह्या गोष्टीला. तू आता कशाला रडतो?अरे पोर होऽतुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी दिसतय.'' सुषमा आपले डोळे पुसत म्हणाली. ''मंग मावशी तुया डोळ्यायले तं पाणी आलं'' वंदू म्हणाली.
''असं कावून झालं बाईसंग मंग?नायी, म्हन्जे ते त्या बाईनं करणी केल्ती तं मंग तिले म्हनाच असतं नां तिलेच बरं कराले सांगाच असतं!'' भाबडेपणाने बाब्याने म्हंटले.
''होवं रेऽमोठ्ठा आला. तिले म्हनाच असतं. कोन जाईन म्हणाले. का आफत बोलवाची हाये का गयात सोताहून?' 'त्याची खिल्ली उडवत वंदू म्हणाली.
''अरे मुलांनो, करणी वगैरे काही नसतं. भ्रम आहे हां. त्यावेळेस आजच्या सारखी वैद्यकीय यंत्रणा प्रगत नव्हती. गावात रस्ते, लाईट्स, शाळा, दवाखाने नव्हते. डाॅक्टर्स मोठ्यां शहरांमध्ये होते. आणि म्हणूनच बिमारीचे निदान होत नव्हते. तुम्हाला सांगते. ती करणी करणारी बाई होती नां म्हणजे लोकांचा समज होता. ती बाई, तिला मुल होत नव्हते. मग तिला कोणी जी पुजा सांगेल ती करत सुटली. सतत जप वगैरे करायची. थोडी स्वतःमध्ये ती गुंग असायची. लहान मुले दिसलीत किंवा गरोदर स्त्रिया दिसल्या की, ती त्यांच्याकडे बघत रहायची. हळूहळू सगळे गावातील लोक तिला वेगळ्याच नजरेने बघू लागले. आणि तिच्या विषयी वावड्या उठू लागल्या. तिचा, तिला फायदा असाही झाला, तिच्या नवर्याने दुसरे लग्नं केले नाही. नाहीतर गावात, मुलं झाले नाही. तर, सर्रास दुसरी बायको करायचे.'' हसतच सुषमा म्हणाली.
''तुमाले कोनी सांगितलं मावशी.'' बाब्याने विचारले.
''लाॅजीक...''
''म्हन्जे...'' वंदू.
''अरे अंदाजाने, बरे जावू द्या, झोपायचं का तुम्हाला आता?''
''नायी नां मावशीऽ बाईची गोठ आयकल्या बिगर मले झोप नायी येनार. जावू दे उद्याच्याले आमी शाळेला बुट्टी मारुऽहाहाहा'' बाब्या म्हणाला. ''नाही हां, शाळेला बुट्टी मारने चांगले नाही. बाईचा गोष्ट मोठी आहे. थोडी सांगते. मग झोपू आपण. उद्या राहीलेली सांगेन, चालेल नां?''
''हो हाव, उलिशी{थोडी}सांग मंग येईन झोप मले.'' बाब्या हाताने इशारा करत म्हणाला.
तिसरा दिवस झाल्यावर. आबा बाईच्या सासर्यांना म्हणाले, ''निगंतो मंग आमी दसव्याले येतो.''
''थांबून जा न पाव्हने. सुनेबाईला बरं वाटन.''
''नायी येवढे दिस नायी थांबू शकत.
अस करतो, गंगूबाईच्या आईले ईतच ठूतो.
आन म्या निंगतो.'
मग त्यांनी शामूला सांगून रुक्मिनी बाईंना बाहेर बोलावले आणि म्हणाले, ''म्या काय म्हन्तो म्या जातो घराकड तुमी दसव्या पावतर थांबजा इतच बाई जोळ.''
''पन घरी मंग तुमच्या जेवना खान्याच काय करान?
आस करा, सुनी वनीले घिवुन जा. पोट्ट्या घर सांभायतील.'
''बेस हाये मंग गंगाबाईले बोलावनऽभेटून जातोऽ"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा