Login

इतिहासाचे पान ८

A family who is not bogged down by struggles and adversities of life

भाग - ८

पुढे दीडेक महिन्या नंतर भल्या पहाटेच बाईकडचा गडीमाणूस अंगणात अवतरला. माय सडा टाकत होती अंगणात. आबा शेतातील कामं बघायसाठी उजाडताच गेले होते.
चहा प्यायला येतो थोड्यावेळात सांगून.
गडीमाणूस बैलबंडी घेवूनच आला होता. माय ने त्याला बघताच विचारले, ''बाप्पा येवढ्या पायटीच कस काय येन केलं?'' तिची छाती धडधड करायला लागली.

बाईकडचा माणूस एवढ्यात वाईटच बातमी घेऊन येत होता.
''काय कराच काकी, आपलं नशीबच खराब हाये." गडी.
"काय झाल बा..?बाई कशी हाये मायवाली? माला जीव घाबरुन राह्यला बापाऽऽ सांग पटदिशी." मायने पटकन दरडीवर बसत म्हंटले.
''काकीऽवैनी च लायनं लेकरु रातीच देवाघरी गेलं!'' गडी माणसाने जणू बाॅम्बगोळाच टाकला.

"आता माय ऽऽकायी बोलत का रेऽऽ''
''हाव नां काकी...निळू गेलाऽऽकाकी वंऽऽ
तीन दिसा पासून पोराच आंंग तापानं बेज्ज्या फनफनलं होतं.
वैदूनं दवा देल्ली. पन फायदाच झाला नायी बाप्पाऽऽ
आन लेकरु गेल वं काकीऽऽ'' सांगता सांगता गडी रडू लागला.

ऐकून माय पण धायमोकलून रडायला लागली.
''माया बाईले कोनाची तं नजर लागली वाट्टे बायी. कोनी तरी करनाटकी केली माया बायीच्या घरावर बाप्पा. थ्याचं कंदी भलं नायी होनार. मुर्दा पडू दे करनी करनारीचा..बाई वंऽऽ
का करु बाप्पा आता? मायी सोन्यासारखी पोरगी उघडी पडली!" मायचा विलाप सुरुच होता.
तेव्हढ्यात आबा आले.

''कावून रडत हाये गंगीची माय?''
गड्यानी झालेला प्रकार सांगीतल्यावर त्यांचीही अवस्था माय सारखीच झाली. मग निरोप घेऊन आलेल्या बंडीतच ते निघाले बाईकडे. याही वेळेस अंत्यविधी त्यांनी पहाटेच उरकवून घेतला होता.
आबांना खुप राग आला. पण वेळच अशी होती की ते काहीच बोलू शकले नाही. दुःखचं जीवघेण होतं हे...सहन करण्या पलिकडचे. कुणाचं नशीब असं असू शकतं...?
अविश्वसनीय होतं सारं....
माय, आबांना दोन्हीं लेकरांचे अंतीम दर्शन झालेच नाही....!

बाई तर निश्चल पडून होती अंथरुणावर...
डोळेही बंद होते तिचे...
आबा, माय तिची अवस्था पाहून रडायला लागले.
पण तिने प्रतिसाद नाही दिला त्यांना.
फक्त डोळे उघडून पाहीले त्यांच्याकडे.
''बाई...कायी तं बोल माय...?''
त्यांच्याकडे पाहून ती थोडसं हसली. आणि पुन्हा डोळे बंद करुन घेतले तिने....''बाई कावुन अशी करत हाये वं इनबाई....?''
माय ने तिच्या सासूला विचारले.
''धक्का बसला आसन वं बाईऽ पोरगा गेला तवा पासूनच बोलनं कमी झाल हिच, रातपासून बोलतच नायी हाय. आता तुमी आले नां आता बोलीन थे.'' विहीणबाई म्हणाल्या. पोराचा दिवसं करुन झाला.

''आता कसं कराच बाईच? नेवू बाईले घरी...!''
आबांनी मायला विचारले. 
''नायी ते बर नायी दिसनार. नवरा, पोरं गेले पोरीचे,
आता नेल घरी, तं हे लोकं परत घेतीन का बाईले...?
आपल्या आजून दोन पोरी उजवायच्या राह्रल्या म्हटलं!''
रुक्मीनी बाई म्हणाल्या.
''कशी गोठ करत रुक्मेऽ.पोटजन हाये थे आपल्यावाली...
टाकुन देनार का काय तिले? थे कायी नायी...तिले नेवू आता. आनी आठपंधरा रोजानं मंग आनून सोडू!''
आबा ठामपणे म्हणाले.
''तुमच्या मनानं करजा बाप्पा जे कराच असन थे!"
मायने जास्त बोलणे उचित समजले नाही.

मग आबांनी घरच्यांना म्हंटले,
''गंगाबाईले कायी रोज नेतो मायेराले.''
सगळे हो न्या म्हणाले. बाईला चल म्हंटल्यावर तिने,
''मले इतच राहाचं...'' म्हणून पुन्हा गुपचुप डोळे बंद करुन बसली. तिला तसे बघितल्यावर माय ने लगेच म्हंटले, ''बरं बाप्पा राय तुया घरी, कायी दिवसान येवू तुले घ्याले. मंग येशीन नां बाई?"
बाईने मान डोलावली.

भारी मनाने रडतच ते दोघेही तिथून निघाले.
बाईच्याच बैलबंडीने घरी पोहचवून देण्यात आले त्यांना.
कुणीही कुणाशी बोलेनासे झाले होते. अन्न पोटात जात नव्हते. बाईचे दुःख तर होतेच. मायला दोन्ही मुलींची काळजी सतावत होती. म्हणूनच तिने बाईला सासरी ठेवणे पसंत केले.

दहा बारा दिवसाने परत एकदा गडीमाणूस आला बाईकडचा. ''तुम्हाले घ्याले धाडल मालकानं. चाला बिगीबिगी बंडीनं!''
'बापाऽकाऊन गां येवढी तातडी' आबा स्वताःशीच पुटपुटले. मनात पुन्हा एकदा भितीने घर केले. आता अजून काय वाईट होणार.... मनाचा हिय्या करुन ते माय ला म्हणाले.''मी जावुन येतो जरा बायीकडं. पाह्यतो काय झालं तं."

आबा बाईकडे आले. तर सगळे चिंताग्रस्त बसले होते समोरच्या खोलीत. ''का झालं बाॅ, असं कावुन तातडीन बलावल..?
बाई बरी हाये नां?'' आबा.
''थेच तं नां राजे हो इवायीऽऽतुमच्या पोरीचं डोस्क घुमल्या वानी करत हाये दोन तीन रोजा पासून. जिथ पोरायले मूठमाती देल्ली. तिथ जावुन जमीन खंदत हाये. थ्या, शेल्यावर{टोकावर}आपल्यावाला गडीमानूस रायते. त्याले दिसली तं तिले धरुन आन्लं त्यानं थ्या खोलीत बंद हाये सुनेबाई....वैद्याकडून दवादारु आनली. पन थे घेत नायी. घासही खात नायी. मोठा घोर लावला ह्या पोट्टीनं जीवाले.
काय कराच या पोट्टीच आता ? तुमीच पा राजे होऽऽ आपन तं हात टेकले बुवा, माय पोरगं, नातू खाल्ले या पोरीनं आन आता आमाले माराच्या माग लागली!'' सासर्‍यांनी उद्विग्नं होऊन मनातली भडास काढली.

तसे तिचे भासरे मध्येच बोलले...
''आबा अस कावुन म्हन्ता? तिची कायी चुक हाये का त्यात?"'
''तुय तोंड घालू नोको मधात." तिच्या सासर्‍यांनी वासुदेवला गप्प राहायला सांगितले.

आबा तर चमकलेच त्यांच्या वाक्याने आणि तळपायातली आग मस्तकात गेली त्यांच्या, ''अवो इवायी अस कावून बोल्ता राजे हो. कालपातुर तिले डोक्यावर बसवून मिरवत होते. अन् आज अस बोल्ता? शोभते का तुमाले? काय बीतली माया बाईवर, तिच तिले मायीत. जितं माया पोरीची कदर नायी. तिथ म्या तिले ठुनार नायी!"
व्याह्यांचे बोलणे ऐकून खुप दुःखी झाले आबा.

पण वेळच अशी आली होती. नियती पुढे थकले होते आबा.
शेवटी आबा म्हणाले, ''ठिक हाये इवायी. म्या मायी पोरगी नेतो घरी. तिचा आबा जित्ता हाये अजून."
द्यावा किती हो नशीबास दोष
शब्दांनीही सोडली आज साथ
एका क्षणातं सारे बदलले आज
ओळखीचा नाही राहीला पाथ !

त्यांनी बाईला बंडीत बसवले. आणि घेवून आले घरी.
जेमतेम साडे पाच वर्षांतच बाईचा संसार आटोपला होता.
अडीच, दीड वर्षांचे लेकर आणि नवरा...
तीन साडेतीन महिण्यातच लागोपाठ देवाघरी गेलेत.
काय अवस्था झाली असेल बाईच्या मनाची?
ती वेडी नाही होणार तर काय...!

आबा बाईला घरी घेवून आले. मायतर बाईकडे बघतच राहीली.
कळकट खराब झालेली नऊवारी घातली होती तिने. केसांचा पेंडा झालेला. अश्या अवतारातली बाई बघून तिला रडूच आवरेना.
सासरचे तर दुरचे आहेत. पण मी माझ्या मुलीला नाकारत होते. ह्याचे तिला अतीव दुःख झाले. कसेबसे मन आवरुन मग तिने बाईला आंघोळ घालून दिली. केस विंचरुन दिले. आता कुठे बाई बरी दिसायला लागली. जबरदस्तीने तिला खाऊ घातले.
आबांनी तर घरात सगळ्यांना सांगूनच टाकले,
''आजपास्न बाई आपल्या संगच रायणार....
सासरला जाणार नायी...
कोनीयी कायी सवाल कराचा नायी..!''
माय परिस्थिती बघून चुप बसली.

आबांची काळजी मिटलेली नव्हतीच. दिनकरने केलेले कर्ज वसूली साठी लोकं घरी यायला लागले. आबा थकून गेले लोकांना तोंड देता देता. एक दिवस दिनकरचा मित्र धावत घरी आला.''दिन्या वावराच्या धुर्‍यावर पडला हाये, त्याले कोनीतरी बेज्या मारल हाये.'' मग काय आबा बैलबंडी घेवून गेले. सोबत मित्र होता. दिन्याला बंडीत टाकून वैद्याकडे गेले. त्यांनी शरीरावर लावण्यासाठी लेप दिला.
अर्धवट बेशुद्ध असलेल्या दिन्याला काढा प्यायला दिला. थोड्यावेळाने येईल शुद्धिवर, न्या घरी म्हणाले.
त्याला घेवून दोघेही घरी आले.

माय ने त्याला बघितल्यावर हंबरडाच फोडला. तसे आबा तिला रागावलेच,''ज्यानं जमीन जुमला खाल्ला. भिकारी केलं आपल्याले. त्याच्यासाटी रडाच नायी."
''मंग तुमी कावुन आनल त्याले घरी?" माय ने प्रश्नं केला.
''पोरग हाये नां आपल. त्याले आग कोन देईन? आपुनच देवू नां! पाप जलमाले घातलं तं निस्तरात लागनच नां मर म्हना येकदाचा." आबा वैतागून म्हणाले. माय तोंडाला पदर लावून रडत बसली.

दिन्याला जबरदस्त मुका मार लागला होता. शुद्धित आल्यावर त्याला उठता बसता येईना. दारु पिऊन आधीच खंगला होता तो, वैदूची औषधी काही काम करत नव्हती. इकडे बाई घरात पडून राहायची.
लहान मुलांसारख तिचं सगळच करुन द्याव लागायचं.

लोकांचा तगादा आता अजून वाढला. संकंट कमी होतच नव्हतं. कारण दिन्या पंगू झाला हे सगळ्यांना कळले. म्हणून ते सरळ घरी येऊ लागले. पंचवीस एकर जमीन मधली आठ एकरच जमीन राहीली आबांकडे.

एक दिवस आबांचे तालुक्याला राहणारे आते भाऊ आले त्यांच्याकडे. खरेतर त्यांना दिन्या आणि बाई बद्दल माहिती मिळाली होती. म्हणूनच ते आले भेटायला.

दिन्यालाही पाहीलं त्यांनी आणि बाईलाही बघितले.
''काय हालत झाली जीवाजी पोरायची. लयच खराब झालं गां तुया संग." आबाच्या खांद्यावर हात ठेवत भाऊ म्हणाला.
''पन आता यातून निंगा लागन न बाॅ का गां?
तरन्या ताठ्या पोरी हात तुया. हित ठेवन बर नायी.
अस कर, चालतं का तालुक्याले राहाले? म्या हावोच तिथ!"

''तिथ येवुन का करु भावू? वावर तं आपल इथच हाये. खाच काय मंग तिथ येवुन?'' आबा म्हणाले.
''अगाऽयेक सांगू का? राग तं नायी येनार तुले?''
भाऊ आबांना म्हणाला.
''बोल न बाप्पा काय राग येईन मले? माह्या हिताचच सांगशीन नां?'' आबा. "हे पाऽ वावर इक उधारी चुकवं थोडे पैसे रायतीन तं तालुक्यात घर बांधजो. माह्या घरा बाजूचे दोन घर सोडून कोन्ट्यात खाली जागा हाये. त्याच्या मालकाकडूनं इकत घेवु जमीन. सध्याच तिथ कुडाच बांधजो मंग बांधजो चांगल घर, पैसा अदला आला का!काय म्हणत?''
''तुय बराबर हाये भाऊ, पण मंग पोटापान्याच काय?
तिथ काय पिकवून खावु बाप्पा हे बिमार पोट्ट, बाईकड पाय कशी झाली. कस करु बापा?'' आबा डोक्याला हात लावुन बसले.

''अगा भल्या मानसा, डोक्याले कावून हात लावून बसला.
तुले तालुक्याची साथ{आपल्या शेतातील भाजीपाला शेतकरी तिथे आणतात आणि बोली लावून विकतात ती जागा}
ठावुक हाये नां?'' भाऊ.
''हाव माया वावरातला गडी घेवुन जाये नां बाप्पा भाजीपाला."
''हे पाऽ गड्या येळ आली नां आपल्यावर मंग मांग सराचं नायी. कोनच्याही कामाले नाव ठेवाच नायी!" होता बापा तू धनी मानूस... सरपंच राह्यला बापा तू गावचा. पन काय करतं आता.
लेकरायसाटी तुले करा लागन हे, तं मी म्हन्तो, साथीतून भाजी घ्याची आन रस्त्यात दुकान लावुन विकाची. यसटी स्टॅन्डजोळ बसाच पथारी आथरुन. येनारा जानारा घेते भाजी. आन बजाराच्या दिशी दुकान लावाच. आन तुले सांगतो. तिथ इलाजयी करु पोराचा आन
बाईचा. ते काय म्हनत्यात हां, डागतर हाये सिस्टरबाई हाये.
चाल मंग कवा चालतं?''
''अगा हो नं बाप्पा त्या म्हटल ते बराबर हाये. इत राह्यन्यात कायी पडलं नायी. तिथ शाळा हाय नां भावू जवळपास?'' आबांनी विचारले.
''होनां बाप्पा हाये नां शाळाऽ घरा पाशीच हाये मायवाल्या."
क्रमशः

🎭 Series Post

View all