Login

इतिहासाचे पान ९

A family who is not bogged down by struggles and adversities of life

भाग - ९

आबांना आता हूरुप आला होता.
भाऊ तर देवदूत वाटू लागला त्यांना.
त्याचे बोलणेही त्यांना पटले होते.
मुलांसाठी कष्टाची त्यांची तयारी होती.

''मंग थांब तू ईतच आपन वावर इकाच पावू अन्  सोबतच जावू मंग!" आबा म्हणाले. तसे भाऊनेही ठिक आहे म्हंटले.
त्याला जीवाजीरावांची चिंता वाटत होती.
ते मनापासून त्यांच्या मदतीला तयार होते.

मग रात्री माय सोबत बोलले आबा.
ती आधी घर सोडायला तयारच नव्हती.
पण आबांनी सर्व समजावून सांगीतल्यावर ती पण तयार झाली
तालुक्याला जायला. मग दुसर्‍या दिवशी आबा आणि भाऊ एका सावकाराकडे गेले. जमीन विकण्या बद्दल बोलण केलं. आणि ठरल त्यांच, सावकाराने लगेच त्यांची जमीन आणि गुरे ढोरे विकत घेतलेत.

आबांना आता तिथून लगेच बाहेर पडायचे होते.
ज्यांचे ही देणे होते. ते सगळे फेडले आणि उरलेली रक्कम घेऊन आबा नवीन खेळी खेळायला सज्ज जाहले.
आठ दिवसात सगळं विकून आबा वाड्याला कुलूप लावून. दोन बैलगाडीत आपले लेकर आणि थोड जुजबी सामान घेवून निघाले, भाऊ सोबत तालुक्याला जायला.

''बापा बापा मावशी ह्या गंगाबाईसंग अस कावुन झालं वं? मले तं रडुच येत हाये. आन तो दिन्याऽबरा झाला फेंगडा झाला तं!" बाब्या रागाने  म्हणाला. ''अय बाब्याऽमधातच रोडा नको टाकू नांऽ सांगू दे नां मावशीले गोठ!" वंदू त्याला दटावत बोलली. ''अरे हो, बोलू दे गं त्याला. बाईसोबत खुपच वाईट झाले. पण ते दिवसही निभावलेत. पुढे सांगू का तुमाले गोठ?" हसतच सुषमा म्हणाली.
''हावं ना मावशी सांग, आता नायी मधात बोलत." बाब्या लाजून म्हणाला.

आबा परिवारा सहित तालुक्याला पोहोचले. तसे ते तालुक्याला अधून मधून माल विकायला घेवून यायचे. त्यामुळे त्यांना तालुका नवीन नव्हताच मुळी. लेकरं आणि माय पण कपडेलत्ते खरेदीसाठी वर्षातून एक दोनदा तालुक्यात येतच होती. पण आता आपले घरदार सोडून कायमचेच ते आले होते इथे... त्यामुळे दुःखी होते सगळे.
०००
मग सगळे भाऊंच्या घरी गेले. वहिनी, मुलांनी चांगलं स्वागत केलं त्यांच. एव्हाना संध्याकाळ झाली होती. सगळी आपबीती वहिनीला सांगून झाली. तिलाही खुप वाईट वाटले. मग
वहिनीने जेवण वाढल सगळ्यांना. जेवण झालीत. सगळे दिवसभराच्या कामाने, प्रवासाने थकलेले असल्यामुळे लगेच झोपलेत.

दुसर्‍या दिवशी उठल्यावर चहापाणी झाले.
मग आबा म्हणाले, ''भाऊ चाल नं आपन थे जागा पावू!''
''अगा येवढी काय घाई हाये. कर आराम येक दोन रोज.'' भाऊ.
''नायी भाऊ माह्य घर बांधल्या बिगर मले चेन पडनार नायी.
चाल दाकवं मले जागा!"
''बरं बाप्पा चाल." म्हणून दोघेही पायी तिकडे निघाले.
जागा मालकाला भेटले. जागेचा भाव थोडा कमी करुन आबांनी लगेच जागा घेतली. ''कागुद आताच करुन घ्यानं." आबा म्हणाले.
तसे मालक हसून म्हणाले. ''लईच घाई हाये आबाले.''
''होनां बाप्पाऽऽयेळ कायले लावाचा मंग.'' आबा.
''ठिक हाये, लिवून घेऊ दुपारच्याले या ग्रामपंचायतीत मंग तुमच्या नावानं जागा लिवुन देतो!'' जागामालक.
''बरं हाय" म्हणून आबा आणि भाऊ परत आले घरी.

सगळ्यांना सांगितले त्यांनी जागा घेतली म्हणून.
मग दुपारी ते ग्रामपंचायत मध्ये गेले. पैसे दिलेत मालकाला आणि जागा आपल्या नावाने करुन आलेत.
रात्री घरी आल्यावर आबांच्या मनाने अजून उभारी घेतली.
आता कुठे तरी आपण नव्याने सुरुवात करणार आणि सगळ ठिक करणार...स्वतःवर विश्वास बसू लागला त्यांचा.

''आता, मायवालं घर लवकर उभ झालं पायजे भाऊ!"
उद्याच्याले आपन ताट्या आन जे लागन थे सामान घेऊन घर उभं करु." आबा.
''हो बाप्पा झोप आता."
''उद्या ऊटल्या ऊटल्या हेच काम करू पयले.'' भाऊ म्हणाला. मग आबा घराचे स्वप्नं रंगवत झोपले.

आलीत कित्येक वादळे
वाटे, आता कोलमडेल सारे
कुटूंबाच्या सुखासाठी झटे
बापाच्या ह्रदयातील प्रेमाचे वारे
सकाळी उठल्यावर चहापाणी झाले तसे भाऊ म्हणाला.
''चाल ना मंग आंघोय करुन घे आन जावू बजारात. घरासाटी लागते ते सामान आनू. आन टालात{लाकूड मिळण्याची जागा}जा लागन.''
''बर हाये, चाल तयार होतो मंग." आबा आंघोळीला गेले.
भाऊ पण आंघोळ करुन तयार झाला.
वहिनीने त्यांना भाजी भाकरी खायला दिली.
आणि ते दोघेही सामान आणायला बाजारात गेले.

दुपारी तयार असलेले कुडं{लाकडी चपट्या काड्यांच्या जाळीसारख्या भिंती}बल्ल्या, कवेलू, सोबत तीन गडीमाणस घेवून आबा त्या रिकाम्या जागेवर आले. सर्व सामान बंडीतून उतरवले. गडी माणसांमधे एक गवंडी होता. त्याने जागा बघितली आणि कुठून कसे घर बांधायचे ते आबांना सांगितले.

''बर मंग करा चालू काम पन थांबजो गा घटकाभर...माया घरवालीच्या हातून पूजा करु इथ. मंग करजा काम सुरु."
आबा लगेच घरी आले. वहिनीला आरतीच ताट करायला सांगितले. मग वहिनी आणि मायला घेऊन आले प्लाॅटवर.
मायने पूजा केली. गुळाच्या खड्याचा प्रसाद दिला सगळ्यांना आणि झाले त्यांच्या घराचे काम सुरु.

चार पाच दिवसातच घर बांधून तयार झाले. कुडामधे माती भरुन भिंती चांगल्या तयार झाल्या. खालची जमीनही दगड मातीची भर टाकून शेणाने सारवून घेतली होती. अंगण थोडं खडबडीत होतं. बाजूलाच न्हाणीघर तयार केलं. दगडावर दगड रचून त्यावर माती लिंपून. पाच फुटाची...वर छत नसलेली. कुडाच दार लावलेली...आत, खाली एक मोठा दगड मधोमध आंघोळ करताना बसायसाठी आणि कपडे धुण्यासाठी कामी येईल असा चौकोनी दगड ठेवला. झाले न्हाणीघर तयार...!

पाणी भरुन ठेवण्यासाठी मोठ मोठ्या तीन 'नांद'{मोठे मडके} आणून ठेवल्या आबांनी. आणि कुडाचेच कंपाऊंड तयार केलं. चार खोल्यांचं कुडाचं घर तयार झालं होतं आबांच..!

आबा आणि मायने डोळे भरुन एकदा आपल्या घराला बघितले...''रुक्मिणी, तुले वाड्यात आन्ल होतं लगन करुनशान. आन आता पाय तुले कुट आन्लं!"
''अवो गंगीचे आबा, अस कावून बोल्ता बाॅ? तुमच्या संग म्या कुटयी सुखानं रायीनं." माय आबांकडे बघत म्हणाली.
आबांनी उसासा टाकत डोळे पुसले.

काही दिवसांनी आबा बैलगाडी घेवून गावी गेले आणि राहीलेले भांडेकुंडे घेवून आले तालुक्याला. नवीन घरात ओल असल्यामुळे अजून चारपाच दिवस भाऊं कडेच थांबलेत ते. नंतर घराची विधीवत पूजा करुन भाऊकडे ठेवलेले सामान आणले नवीन घरी आणि नवीन जीवनाची सुरुवात झाली आबांची.

दुसर्‍या दिवशी सकाळीच आबा भाऊ कडे गेले.
आबांना बघून भाऊ म्हणाले,''अगा ये जीवाजी काय म्हंन्त?''
''म्या म्हनत होतो आता ते दुकानाच काय तं पायतो नां?
चाल मले दाकवं जागा.'' आबा.
''बर बर चाल जावू तुयाच्यानं उगमुग बसन होनार नायी गड्या..चाल." भाऊ.
''भाऊ बसून काय करु बापा. माये दोन लेकर बीमार हाये.
बिस्तर्‍यावर हायेत गाऽऽ त्यायच्या पोटापान्याची तं येवस्था कराच लागन ना बाॅ."आबा.
''हाव बापा चाल जावू."

मग दोघेही एस टी स्टॅन्डकडे आले. तिथे दोन भाजीवाले आधीच बसलेले होते. त्यांना बघून आबा भाऊला म्हणाले.
''भाऊ ईत तं हे लोक पयलेपासून बसले हायेत. त्यायच्या पोटावर कायले पाय द्याचा. म्या कसा बसू ईतं?''
''अगाऽ लय लोकं इतून जानयेन करते.
त्यायचायी धंदा होईन. आन तुया ही होईन. कायजी करुनोको.''

मग भाऊंनी त्या दोन भाजीवाल्यांशी आबाची ओळख करुन दिली. त्यांनीही म्हंटल, ''आमची कायी हरकत नायी, जो थो आपल्या नशीबानं खातो बा. तुमीयी लावा दुकान इत. बसवा बस्तान.'' जागा ठरली. भाजी कुठून आणायची ते पण ठरलं. सकाळीच साथीत जाऊन भाजी आणायची. आणि दिवसभर एस टी स्टॅन्ड समोर बसून विकायची.

मग दुसर्‍याच दिवशी आबा सकाळीच साथीत गेले. भाजी विकत घेतली आणि एसटी स्टॅन्ड च्या समोर ठरलेल्या जागेवर बसलेत. पहिल्या दिवशी संकोचले ते...हे आपण काय करतोय...क्षणातं त्यांच्या नजरे समोर आपली मुलं तरळून गेलीत,''नायी कमीपना कायचा या धंद्यात...मायवाल्या पोटजनी साटी कायीई करन म्या!" मग हळू हळू सवय झाली त्यांना भाजी विकायची.

आठ दिवसातच आबा सराईत भाजी विक्रेता झाले.
विशेष म्हणजे त्यांच्या बोलण्यानेही ते लोकांना आकृष्ट करायचे. दिसायला रुबाबदार देखणे तर होतेच. त्यांचा धंदाही जोरात सूरु झाला आता.

इकडे मायने पण, घर छान सांभाळलं.
सुनी, वनी आणि श्यामूच्या मदतीने ती बाई आणि दिनकरचही हवं नको ते बघत होती. पण दिनकरच जेवण कमी झालं होतं. आणि त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली नव्हती.
उलट तो खंगत चालला होता.

एक दिवस घरासमोर अचानक एक सिस्टर येऊन थांबली.
भास्कर बाहेर खेळत होता. तिने त्याला आवाज दिला आणि विचारले,''तुझी माय कुठे आहे...? मला बोलायचे आहे  त्यांच्याशी.'' त्याने तिथूनच मायला आवाज दिला.
''माय वं पाह्यन कोन आलं. थे बाई बलावते तुले...
अवं शिश्टर हायेऽ ये न भायेर." श्यामू ओरडून म्हणाला.
माय लगेच बाहेर आली. डोक्यावरुन पदर घेऊन त्याच टोक तोंडासमोर धरुन कुतूहलाने सिस्टर कडे बघितले आणि सिस्टरला आत बोलावले, ''बसायला पाट दिला सुनिताला पाणी आणायला सांगीतले. मग सिस्टरला विचारले मायने,
''काय काम काडल शिश्टर?'' त्याआधी भाऊच्या घरा समोरुन सिस्टर जाताना. वहिनीने ह्या सगळ्यांना, 'ह्यांना शिश्टर' म्हणतात हे सांगितले होते म्हणून त्यांना माहित होते.
क्रमशः

🎭 Series Post

View all