Login

इतिहासाचे पान १

A family who is not bogged down by struggles and adversities of life

भाग - १

आज उठल्या पासून वेटाळात कुजबुज सुरुच होती.
ज्याला माहीत नव्हते. त्याला दिसताक्षणी रात्रीची बाब सांगण्यात येत होती. जो तो हरीची विचारपूस करत होता.
''म्या काय भावल{बाहूली}हो का? मले पाहासाटी येत हाये जो थो ईच्याबीनऽऽ पया इथून कायी गरज नायी पाहाले याची...वरतून

इचारता. आन आतून हासता. मले काय मायीत नायी का...?'' त्याची विचारपूस करायला आलेल्या भावकीतल्या लोकांना हरीने हाकलूनच दिले. त्याचा स्वभाव माहीत असल्यामुळे कुणाला काही वाटले नाही. दुरुनच बघणे पसंत केले काही जणांनी.

दुपारच्या शेतातल्या कामाला सगळे गेल्यावर घरी म्हातार्‍या आणि एखाद दुसरी तरुण बाई ज्या खात्यापित्या घरातील होत्या त्याच बाया, मुली, मुले घरी होते. लहान मुले शाळेत गेलेली.

तेव्हढ्यात सामान भरणारी पाट्याची सायकल रिक्षा येताना दिसली सुंदर आज्जीला. ''माय बाई द्वारका, पाय बाई रिक्षात कोन येत हाये वं....'' द्वारका आज्जीपण डोळ्यांवर हात ठेवत रिक्षाला निरखू लागली. "अवो तुमचा पोरगा सून आले असतीनं." द्वारकाबाई म्हणाली. "बापा त्याचा बाप पैश्याची तिजोरीच सोडून गेला नां इथ. रिक्षान या साटी..." सुंदरआज्जी म्हणाली.

''मायबाईऽ येवढ्या दिसान येन केलं वं गंगाबाईऽऽ अवो शामरावभाऊ कसे हात बाप्पाऽऽ'' द्वारकाआज्जी आनंदाने ओरडली. रिक्षातून हसतच एक तरुण मुलगी आणि शामरावभाऊ उतरले. सोबत त्यांची मोठी बहिण गंगाबाई पण उतरली. ''माय द्वारकाबाई, सुंदराबाई कशी हास वो बाईऽलय दिसान भेटलो बाई वंऽऽ''

मोठी बाई त्यांच्या पाया पडली. मोठी बाई पंचावनच्या वर पोहोचली होती. ह्या दोघी तिच्यापेक्षा मोठ्या होत्या. नात्याने मामेबहिणी होत्या. म्हणून एकेरी बोलायच्या. ''श्यामूले जरा ग्रामपंचायतीत काम होतं तं म्हटल चल म्या येतो. सार्‍यायले भेटता येईन मंग म्हनून आल्तो बाप्पा. काय हालचाल इकड?'' द्वारकाआज्जीने बाहेरच्या खाटेवर त्यांना बसवले.

''हे माया सुनिताची पोरगी होय सुषमा, वळकलं कां?'' बाई, सोबत आलेल्या गोर्‍या गोमट्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. ''अवं माय सुन्तीची पोर हो काय वंऽ मायबायी केवढी मोठ्ठी झाली मायऽ कशी हाये बाई मायी सुन्ती?'' सुंदराआज्जी तिच्या चेहर्‍यावरुन हात फिरवत म्हणाली. ''आज्जी ती...'' तिला मध्येच थांबवत, गंगाबाई म्हणाली. ''अरे, ही पण तुयी मोठीमाय हो. आमी भयनीच{बहीणी} होत. आतोमाम भयनी मोठीमाय म्हण वं पोरी!''  सुषमाने हळूच मान डोलावली.

''हो मोठीमाय माझी आई ठिक आहे.''
''अवं माय सायबीनी सारकी बोलते वं बाईऽ आमी गावातले हावो बाईऽ अशीच भाषा हाये आमची. गमीन{करमेल} का तुले इथ?''
''अरे त्यात काय झाले नाही करमायला. मी शेतकी  विषय {अॅग्रीकल्चर} घेतला आहे. ते आम्हाला शेतात जावून पाहणी करावी लागते. शेतात काम करावं लागतं म्हणून मामांना म्हंटले. कुठ जाता येईल. तर ते म्हणाले. शहरापासून जवळच गाव म्हणजे 'पाळा...' हेच गाव आहे. मला बाबांच्या गावी जायचे होते. फक्त इकडची जमीन वेगळी आहे. तर ती पण बघायची होती. काम कसे चालते ते आणि तुम्ही कशी पिकवता शेती, विचारायचे होते.'' तेव्हढ्यात द्वारका आज्जीने हातपाय धुवायला पाट पाणी ठेवले अंगणात. पिण्यासाठी पाणी दिले. चुलीवर चहा मांडला आणि मग रात्रीचा हरी सोबत घडलेला किस्सा त्यांना सांगितला.

''अरे बाप्पाऽ अस झाल का वं बाईऽ मंग आता कसा हाये हर्‍या?' चहा पीता पीता मोठीबाईने विचारले.
''मले वाटल होतं तुले पायल्यावर,
लय लौकर खबर लागली वाघ्यानं मारल्यावर
जानं जात का त्याले पायाले?
तुया जीवाची तुच पायजो बाईऽऽ
हर्‍यानं जोडा फेकून मारल्यावरऽऽहाहाहा !''
सुंदरआज्जीच्या बोलण्याने सगळ्यांना हसवले.
''येतो बाई बात्तच"
सुषमा आणि मोठीबाईला तिथेच सोडून शामरावभाऊ रिक्षात बसून ग्रामपंचायतीकडे गेलेत. त्यांनी रिक्षा थांबवून ठेवला होता. कारण मग परत जायला दुसरी व्यवस्था नव्हती.
तसे रेल्वे स्टेशनवरुनच त्यांनी रिक्षा केली होती.
''म्या भाजी भाकरी बनवतो. येजो लौकर भाऊ.'' द्वारकाआज्जीने म्हंटले.

थोड्या वेळातच श्यामभाऊ काम आटोपून घरी आलेत. तो पर्यंत स्वयंपाक बनला होता. भाऊ, सुषमा आणि मोठीबाईला जेवायला बसवले द्वारकाआजीने.

''आठोडी बाजार बस्तरवारी {गुरुवार} हाये. मंग भाजीले कायी नोतं. मुंगाच्या वड्याचीच केली बाप्पा भाजी. रातच्याले पुरणाची पोयी करतो मंग, आताचं खावून घ्या हे.'' द्वारकाबाई म्हणाली. ''आमी का पावने हाये का काय मायबाईऽ घरचेच हावोत नां. जे आसन थे खावू. काय होते? करुन खावू घातले. थेच लय झाल वं मायऽ.''  मोठीबाई म्हणाली.

शामभाऊ तेव्हढ्यात म्हणाले, ''जेवलो का हर्‍याले भेटू आपन. आलो हावो तं तसच जानं बेस दिसत नायी द्वारकाबाई. काय म्हंत सुंदराबाई?'' त्यांनी तिघींकडेही बघितले.
''अगा भाऊ भेटजो तुमाले वाटत असनं तं. तसा थो तिरसट डोक्याचा हाये. कायी बायी बोलत राह्यते. तुमाले तं मायीत हाये.'' सुंदराआज्जीने म्हंटले.''गंगाबाई, आली हास तं जातं का तुया सासरवाड्यात? नायी म्हटल, भले लोक हायेत. सदा इचारत असतात तुले. का रं भाऊ जाता का भेटाले?''

द्वारकाआज्जी दोघांकडे बघत म्हणाली. ''नायी वं बाई. येवड्या संकटातून मायी मोठीबाई निंगाली. देवाची कुरपा. वाड्यात गेली का तिले आठोन येईन नं मां कायले बाई जाचं तिकडे? चाल माह्य दुकानातल काम अडते नां बाप्पा, पटापट निंगतो आमी जेवन उरकून. माह्यवाला पोरगा पायतो बराबर दुकान. पन आपन रायलो तं बरं राह्यतं. थे जरा काम होतं. म्हनून आल्तो आमी. सुनिताबाईच्या पोरीले, सुषमाले वावर पाहाचं होतं. आता कसं कराच? मले लौकर गेलं पायजे घराकडं लायन्या पोराची तब्येत कायी बरी नायी. ताप भरला होता आंगात. त्यात घरवाली मायराले गेल्ली तिच्यावाल्या. तिच्या भावाच्या पोराची सोयरीक जुडली. मंग घरी करनार कोनी न्हायी. बाईले तुमाले भेटाच होतं. मंग थेही आली सोबत... सुषमाबाईले दोन दिस थांबाच हाये. थे आपल्या वावरात पाटवजो तिले. जमल तं तू सोबत जाजो सुंदराबाई चालन नां? मंग कोनी शहरात आलं तं बाईले धाडजो. न्हायीतं मंग मी येतो दोन दिसानं घ्याले. सुनिताबाईचे मालक दौर्‍यावर हायेत. जीप त्यायच्या जोळ हाये. मंग म्या म्हन्ल चाल गड्या आपलयी काम होते. का वं बाई. धाडशीन नां मंग ?'' आज्जी सोबत बोलल्यावर, त्यांनी प्रश्नार्थक नजरेने सुषमा कडे बघितले. ''हो मामा चालेल. तुम्हीच या दोन दिवसांनी.'' सुषमा म्हणाली.
''चाल आटप बाई. हर्‍याले पावून जावू.'' सुषमा तिथेच बसली.

जेवण आटोपून दोघेही हरीच्या घरी गेले. लोकांच्या विचार पुसने कावलेला हरी. ह्या दोघांना बघताच चिडला.
''या तुमचीच कमी राह्यली होती बाप्पाऽ थ्या वास्याच्या वाघ्यान तं माया जीवच घेतला होता. आन तुमी कायले मले पाह्याले आले. वास्यान पाठोल वाट्टे तुमाले...अवो माह्या भगवान माह्या पाठीशी हाये. येवढ्यात नायी जात म्या. सांगून ठेवतो. थ्या वास्याले म्हना, मले चांगलं होवू दे मंग दाखवतो तुले. थ्या वाघ्याले शिकवून ठेवलं त्यानं. मले माराले पाठोल....''

''अवो तुमी कायले मामाजीले बोल्ता. थ्यायच काय हाय त्यात? थे तं इथ नस्तात. कायी बोलाच कां? आन त्या जनावराले कोन शिकवन तुमाले माराच? तुमीच त्याच्या वायी{खोडी करणे} लागले. डुख धरुन बसला होता थो. जनावराले सब्बन समजते...मी म्हन्तो, थ्या वासुदेव बुवाच कसं आयकतो थो वाघ्या...त्यायले नायी मारत तंऽ'' ध्रुपदा हरीला म्हणाली. आलेल्या पाहूण्यांना हरी बोलल्याचे तिला सहन झाले नाही.

''म्या तेच तं म्हनत हाये वो हेंबाड थुतरी...येक रयपटच मारीन. त्या वास्यानच बाज्याले सांगतलं...''
पुन्हा तिच्यावर ओरडत हरी म्हणाला.
''माय ह्या मानसाच कायी खर नायी. वाघ्यानं घोयसून काढलं तरी जिरला नायी बाईऽऽ मामाजी तुमी जा बाप्पा. याच डोक ठिकाणावर नायी!'' त्यांना हात जोडत ध्रुपदा म्हणाली.

दुपारी शाळेतून मुलं घरी जेवायला आली होती. त्यांच्या कानावर हा संवाद पडला. त्याच बरोबर तीन नवीन व्यक्ती वेटाळात आले. त्याचेही अप्रुप वाटत होते त्यांना.
गंगाबाईने पिशवीतून खाऊ काढला.
आणि सुंदराआज्जीला म्हणाली.
''बाई हा खाऊ सार्‍याले देजो वाटून.''
''अवं गंगूबाई रातच्याले देतो मी खाले. पोट्टे बसतात लायटाखाली. तवा देतो...''

मुलांनी त्यांच्या भोवती गर्दी केली.
कोणाची मुलं आहेत ते सुंदरआज्जीने दोघांनाही सांगितले.
बर्‍याच वर्षानंतर हे दोघेही गावात आले होते.
त्यातल्या त्यात सुषमाच्या बोलण्याने मुलं खुश झालीत.
मुलांमधील बाब्याची उत्सुकता तर ताणल्या गेली होती.
त्याने सुंदरआज्जीला इशार्‍यानेच,
'हे कोन..?' म्हणून विचारले.
''चाला पोट्टे हो, जेवन करुन शाळेत जा आंधी. रातच्याले या चावडीवर तवा खाऊ, खाऊ आन मंग बोलू...आँऽ पया आता!'' आज्जी म्हणाली.

''बाई, हर्‍याच्या बोलन्यावर नको जावू. त्याले सवयच हाये अस बोलाची. कोनाच कोनाले जोडते माय थो.'' द्वारका म्हणाली.
बाई आणि श्यामभाऊनी मान डोलावली. बाई जरा उदास झाली होती. भाऊच्या ते लक्षात आले. सुषमाला समजावून
त्यांनी लगेच तिथून काढता पाय घेतला.
क्रमशः

🎭 Series Post

View all