जाणीव..(भाग २)

जाणीव..कथा नव्या बदलाची
केशवरावांनी सुनेची बाजू घेऊन बायकोलाच धारेवर धरले होते. याचा मीना ताईंना प्रचंड राग आला होता.

'कसं कळत नाही ह्या माणसाला! आतापासूनच सुनेचे असे फाजील लाड केले तर हमखास ती याचा गैरफायदा घेणार. ह्या आजकालच्या मुली कशा असतात ते चांगलंच ठाऊक आहे मला. मीही जर असंच वागले तर लवकरच शेजारच्या सुमनसारखी माझी गत होणार. तिनेही आधी सुनेला वेसण घातली नाही आणि आता घ्या...सून गेली हाताबाहेर. शब्द खाली पडू देत नाही सुमनचा. ती म्हणेल ती पूर्वदिशा. तिला ना बोलण्याचं भान ना वागण्याचं. तशी माझी गत होऊ नये म्हणूनच तर मला थोडं कठोर वागावं लागतंय. पण ते ह्यांच्या लक्षातच येत नाहीये. देवा आता तूच सांग रे बाबा मी काय करू?'

मीना ताई एकट्याच बडबडत होत्या.

तेवढ्यात आंघोळ आटोपून समिधा किचनमध्ये आली.

"आई...चहा झाला तुमचा?"

"का..??"

"काही नाही तुमचं झालं असेल तर मी डब्याची तयारी करते ना."

"हो थांब दोन मिनिट...झालंच आहे आणि तुलाही घे चहा."

"हो घेते, थँक्यू हा आई."

"आता थँक्यू कशासाठी?"

"अहो आज तुम्ही चहा बनवला आणि सकाळी सकाळी सासूच्या हातचा असा फक्कड चहा मिळायला भाग्यच लागतं ना. मी खरंच खूप भाग्यवान समजते स्वतःला."

"तू आहेच गं भाग्यवान, कारण आजच नाही तर रोजच माझ्या हातचा चहा मिळतो ना तुला." खोचकपणे मीना ताई बोलल्या.

"हो आई, माहितीये मला. त्यासाठीच तर थँक्यू बोलले मी. खरंतर हे याआधीच बोलायचं होतं. पण उशिरा किचनमध्ये येऊन सासूच्या हातचा चहा पिणं कुठेतरी मनाला पटत नव्हतं. मला वाटलं होतं की, तुम्ही एकदा तरी मला ओरडाल. टिपिकल सासू सारखं म्हणाल की, तुझ्या आईने तुला हेच शिकवलं का? पण मला वाटलं तसं अजिबात काहीही घडलं नाही. तो माझा खूप मोठा गैरसमज होता. उलट ज्या मुली सासूची नेहमी तक्रार करत असतात त्यांना मी तुमचं उदाहरण नक्की देईल आणि एक मनातली गोष्ट बोलायची आहे, माहेरी आईला असंच सगळ्यात आधी उठून किचनमध्ये पाहायची सवय होती. रोज तुम्हाला असं किचनमध्ये पाहून सकाळ सकाळ आईच समोर आहे असं वाटतं. नवीन बदलांचा स्वीकार करायला थोडा वेळ लागतोच, हे तितकंच खरं."

बोलता बोलता समिधाचे डोळे पाणावले.

समिधाच्या या बोलण्यावर आता काय बोलावे ते मीना ताईंना समजेना. कारण त्यांची दिवसाची सुरुवातच समिधाच्या आई वडिलांच्या उद्धाराने झाली होती. त्यात समिधाचे हे असे आपलेपणाचे बोलणे, क्षणभर त्यांना वेगळेच फील झाले.

"पण समिधा, मीही स्वतःला तुझ्यासारखं कधी भाग्यवान समजेल, देवच जाणे? लवकरात लवकर ते दिवस येवोत अशी देवाकडे प्रार्थना करते बाई मी. हो आणि आणखी एक आता माहेर सोडून तू सासरी आलीस. नवीन बदल स्वीकारण्यासाठी मनाची तयारी तर तुला करावीच लागणार. सुरुवातीला सवय नसते पण हळूहळू होईल सवय." न राहवून मीना ताई बोलल्या.

यावर आता काय बोलावे ते समिधाला देखील समजेना.

"डोन्ट वरी आई. मी नक्की प्रयत्न करील."

सासूचा टोमणा न समजण्या इतपत समिधा नक्कीच मूर्ख  नव्हती. पुढे जास्त काही न बोलता तिने विषय बदलला.

"ऐका ना आई, मी माझ्यासाठी आणि श्रीधरसाठी मसाला कारले बनवणार आहे तुमच्यासाठी काय बनवू मग?" फ्रिज मधून कारले काढत समिधा बोलली.

"अगं पण श्रीधरला कारले नाही आवडत हे मी आधीच सांगितलंय तुला."

"माहिती आहे आई, पण कधीतरी खाल्लं तर काय हरकत आहे आणि तुम्हीच म्हणता ना सुरुवातीला एखाद्या गोष्टीची सवय नसते पण हळूहळू होवून जाते. फक्त आपण वेळ द्यायला हवा आणि पेशंस तेवढे ठेवायला हवेत आणि मला खात्री आहे मी केलेली भाजी नक्की आवडेल त्याला. कारलं हे शरीरासाठी उत्तम असतं."

समिधाच्या या उत्तराने मीना ताईंना तिचा आणखीच राग आला. समिधाने सासूचेच वाक्य सासूवर उलटवले होते. पेपर वाचत असलेल्या केशवरावांना तर आता हसूच कंट्रोल होईना.

"जाऊ दे समिधा, त्याच्या आईने त्याला कारल्याच्या भाजीचे महत्त्व वेळीच पटवून दिले असते तर त्यालाही कारल्याची भाजी नक्कीच आवडली असती. आता तू तुझ्या सासूची चूक सुधारते आहे हे पाहून छान वाटलं. नवीन बदलाची होईल हळूहळू सवय." असे बोलून केशवराव पेपरमधे तोंड घालून पुन्हा हसू लागले. मीना ताईंना त्यांची चूक त्यांच्याच भाषेत समजावून सांगितल्यामुळे केशवरावांना स्वतःचा खूप अभिमान वाटत होता.

"तसं नाही ओ बाबा, आईंची चूक नाही दाखवत मी, पण प्रत्येकासाठी रोज वेगवेगळी भाजी कशासाठी ना? रोज एक भाजी ठीक आहे. डब्यावर पण तीच नेली तर काय हरकत आहे. त्यामुळे अन्न वाया जाणार नाही आणि करण्याऱ्या व्यक्तीचे कष्टही. एव्हढेच नाही तर कोणा एकावर कामाचा भारही पडणार नाही."

"हो मी पण तेच म्हणत असतो तिला. सर्वांसाठी एक भाजी पुरेशी आहे आणि दुपारच्या जेवणात सोबतीला साधं वरण भात असलं तरी चालेल. मग दोन भाज्यांचा प्रश्न उरतोच कुठे? तसंही सकाळी नाश्ता तर असतोच ना. मग कशाला हव्यात आणखी दोन भाज्या? पण तुझी सासू ऐकेल तर शपथ." 

पुन्हा एकदा केशवराव मध्ये बोलले. त्यामुळे मीना ताईंना राग अनावर होत होता.

"आणखी एक बाबा, केलेली भाजी जर एखाद्याला आवडत नसेल तर त्याच्यासाठी नवीन भाजी बनवली जाणार नाही. हा नियम आजपासून लागू करुयात. त्यामुळे काय होईल भूक लागली की जे समोर आहे ते खाण्याची आपसूकच सवय लागेल सर्वांना."

"मस्त आयडिया." म्हणत मीना ताईंच्या रागाची परवा न करता केशवरावांनी सुनेला पाठिंबा दर्शवला.

'आता कुठे महिना झाला हिला घरात येऊन पण ही तर सगळे नियमच बदलू पाहतेय. आजवर मी केलंच ना सगळं मग हिने केलं तर काय चुकीचं आहे. घर सांभाळून नोकरी झेपत नसेल तर खुशाल घरी बसावं. कोणी सांगितलंय एव्हढा जीवाचा आटापिटा करायला. पण सासऱ्याची लाडक्या सुनेला साथ. काय बोलावं काहीच कळत नाही. असं करत करत एक दिवस संपूर्ण घर आणि घरातल्या माणसांना वश करेल ही बया. पण मी बरं असं होऊ देईल.' मीना ताई चरफडतच मनात बोलू लागल्या.