जाणीव..(भाग ३)

जाणीव..कथा नव्या बदलाची
मीना ताईंनी एक जळजळीत कटाक्ष टाकला केशव रावांवर.

केशव रावांच्या मदतीने समिधाने पुढाकार घेऊन घरातील नवीन नियमांची बांधणी जी केली होती. जे की गरजेचेच होते. आजकाल बहुतांशी घरांत दोन ते तीन भाज्या करण्याची प्रथाच जणू रुढ झालीये. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या आवडी निवडी जपत घरातील गृहिणी सर्वांच्या वेळा सांभाळत, जीवाचा आटापिटा करून अशी मोठीमोठी आव्हाने अगदी सहजपणे पेलते. तेही अगदी न थकता. पण हळूहळू मग सर्वांच्याच डिमांड आणि अपेक्षा वाढत जातात आणि पुढे जाऊन मग तिला गृहीत धरायला सुरुवात होते. पण घरातील इतर व्यक्तींनी देखील तिला समजून घेणे तितकेच गरजेचे असते.

ज्या चुका इतर घरांत अगदी सर्रास होतात त्याच चुका समिधाला करायच्या नव्हत्या. कोणी चांगलं म्हणावं म्हणून पुढं पुढं करत बसणाऱ्यातली ती नव्हती. उलट कोणी चुकत असेल तर त्याच्या कृतीतून त्याची चूक दाखवून देणे तिला गरजेचे वाटायचे. एव्हढेच नाही तर स्वतःची चूक मान्य करून वेळीच ती सुधारण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू व्हायचे. काही गोष्टींचा अतिरेक होण्याआधीच वेळीच त्यांना आवर घालणे तिला गरजेचे वाटायचे.

समिधाने घेतलेला निर्णय जरी बरोबर असला तरी मीना ताईंना तो अजिबात पटला नव्हता. जे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

"आई फक्त एकदा मला सांगा की तुम्ही मसाला कारलं कसं बनवता?"

"का? तुला येत नाही? एवढं सगळं नियोजन केलंस मग मसाला कारलं तुझ्यासाठी काय अवघड आहे?" रागातच मीना ताई बोलल्या.

"मला येतं हो आई, पण तरी तुमची पद्घत ऐकायला नक्कीच आवडेल मला."

"माझ्या सगळ्याच पद्धतींचा तुला प्रॉब्लेम आहे मग ही पद्धत तरी तुला पटेल?" मीना ताई रागातच बोलल्या.

"समिधा, अगं तिच्या पद्धतीचं नेहमीच खातो गं आम्ही. आज तू तुझ्या पद्धतीने कर. तेवढाच चेंज." केशवराव म्हणाले.

केशवरावांनी सुनेला प्रोत्साहन दिले.

"बरं बाबा चालेल, करते मी." म्हणत मीना ताईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत समिधाने तिच्या पद्धतीने झणझणीत अशी कारल्याची भाजी बनवली.

तिने गॅसवर एकीकडे भाजी शिजायला टाकली आणि दुसरीकडे वरण भाताचा कुकर लावला. तोपर्यंत किचन मधूनच तिने एक दोन ऑफिस कॉल देखील अटेंड केले. केशव रावांना सुनेचे खूप कौतुक वाटत होते. याउलट मात्र मीना ताईंचे विचार होते.

'एका वेळी दहा दगडांवर पाय ठेवण्यात काही अर्थ का?
मुळात नवरा उत्तम कमावता असेल तर बायकोने नोकरी करण्याची गरजच काय? सगळ्या गरजा भागत असताना जीवाचा आटापिटा करून घराबाहेर पडायचंच कशाला? स्त्री कितीही शिकली जरी तरी तिला चूल आणि मूल ह्या दोन गोष्टी काही चुकत नाही. अगदीच गरज असेल तरच करावी नोकरी. अन्यथा स्वाभामिनाने घर सांभाळावं. जे की मी केलंच ना. त्यामुळे घरातील कोणाचीही गैरसोय होत नाही आणि पुढची पिढी उत्तमरीत्या घडते. जसे मी सुमितला योग्य संस्कार देवून घडवले.'

ह्या सर्व गोष्टींचा मीना ताईंना आज खूप अभिमान वाटत होता.
हे असे होते मीना ताईंचे विचार. त्यामुळे इतक्यात तरी समिधाशी त्यांचे सुत जुळेल अशी अपेक्षा करणेच मुळी चुकीचे होते.

पटापट समिधाने तिची कामे आवरली. दोघांचेही डबे, पाणी बॉटल्स भरुन रेडी ठेवले.

"आई बाबा हे घ्या पोहे, गरमगरम आहेत तर खाऊन घ्या."

"आई, तुम्हा दोघांसाठी कारल्याची भाजी ठेवलीये. फक्त दुपारी जेवताना वरणाला तेवढी फोडणी द्या आणि दोन तीन गरमगरम पोळ्या लाटून घ्या. आता उशीर होतोय ऑफिससाठी. नाहीतर मीच करून ठेवलं असतं.

काहीही न बोलता फक्त होकारार्थी मान डोलावत मीना ताई उत्तरल्या.

"अगं तूही खाऊन घे."

"नाही बाबा. मी आणि सुमित सोबतच खाऊ. आलेच मी."

"अशी अर्धी कामं माझ्यासाठी ठेवून मॅडम निघून जाणार. एव्हढेच नाही तर जाताना सासूला सल्ले देखील देणार. ह्या आजकालच्या सूना. नोकरी करतात म्हणजे उपकारच करतात जणू सासू सासऱ्यांवर. मी जर माझ्या सासूला हे असं काम सांगितलं असतं तर नक्कीच माझ्या कानशिलात लगावली असती त्यांनी आणि माझा नवरा मात्र ढीम्म बघत बसला असता."

"मीना, अगं आठ वाजले तरी आपले चिरंजीव अजूनही काही उठलेले दिसत नाहीत." विषय बदलत केशवराव खोचकपणे बोलले.

"आले का पुन्हा त्याच्यावर. नक्की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्याचा? हेच मला कळत नाहीये."

"अगं मला काही प्रॉब्लेम नाहीये त्याचा. फक्त आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं वागतेस ना तू, म्हणून मग बोलावं लागतं मला. आता समिधाने एवढं सगळं केलं पण तरीही तू तिलाच बोलत आहेस.
जसे तुला सुमितच्या छोट छोट्या गोष्टींचे कौतुक वाटते, त्याच्या चुकाही पोटात घालण्याची आई म्हणून तुची नेहमी तयारी असते. मग समिधा एक हुशार, मनमिळावू, समंजस मुलगी आहे. पण तरी तुला तीच्यातील गुण दिसतच नाहीत, याचं थोडं नवल वाटतं. एवढं सगळं काम तिने कोणतीही तक्रार न करता केलं. मग तिचं कौतुक केलं असतं थोडं तर कुठे बिघडलं असतं. याउलट सुमित येवू दे बाहेर मग बघ त्याचा कौतुक सोहळा थांबता थांबायचा नाही. अगदी तो आठला उठू देत किंवा मग नऊला."

"माझ्या लेकाचे कौतुक मी नाही मग कोण करणार?"

"त्या तुझ्या लाडक्या लेकाचीच समिधा बायको आहे हे विसरु नकोस एवढंच म्हणणं आहे माझं."

"काही विसरत नाही मी. पण तिचं अति कौतुक करून तिला डोक्यावर घेऊ नका हे सांगून थकले आता मी. पण तुम्ही तरी कुठे माझं ऐकता. मग मी तरी तुमचं का ऐकावं?"

"जाऊ दे, तुला आता नाही समजणार मीना. पण एक सांगतो, तू स्वतःच स्वतःचं नुकसान करुन घेतियेस. सध्या तुला ते कळत नाहीये. खरंतर तू अशी नाहीयेस पण आता तू अशी का वागत आहेस ते नाही माहित मला. तुला वाटतं मी तुला सारखं बोलतो, सुनेचे जास्त कौतुक करतो पण खरं सांगू का...तुलाही तुझ्या चुकीची जाणीव व्हावी असं वाटतं सारखं. त्यासाठीच मी बोलत असतो. होप सो, ती वेळ लवकरच येवू दे." म्हणत नाश्ता संपवून केशवराव बाहेर निघून गेले.