केशवराव बाहेर झोपाळ्यावर झोके घेत विचार करत बसले होते.
'कसं समजावू मीनाला. हिच्या अशा वागण्याने सासू सुनेचे नाते सुधरणार नाही तर अजूनच बिघडेल.'
इतक्यात समिधा आणि सुमित ऑफिसला जायला निघाले.
"बाबा चला येतो आम्ही. जेवण करा वेळेत आणि औषधंही घ्या." म्हणत समिधा गाडीत बसली.
केशव रावांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. एकदम त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या लेकीचा, मयुरीचा चेहरा आला.
'समिधा आणि मयुरी दोघींचेही वागणे बोलणे अगदी सारखेच. न राहवून मग केशवरावांनी लेकीला फोन केला. पोटभर गप्पा मारून ते पुन्हा घरात जायला निघाले. तोच मीना ताई बडबडत बाहेर आल्या.
"वाटलं होतं सून आल्यावर तरी आराम मिळेल. पण नाही, ही कामं काही आयुष्यभर चुकणार नाहीत असंच दिसतंय." हातातील कपड्यांची बादली जोरातच खाली ठेवत मीना ताई बोलल्या.
काहीही न बोलता केशवराव आत निघून गेले.
'काही बोलायची सोयच नाही. सून काम करते हे दिसतं ह्या माणसाला पण सून ऑफिसला गेल्यावर बायको काय काय करते हे मात्र सोयीस्करपणे हा माणूस विसरतो. सून म्हणेल ती पूर्वदिशा असं झालंय ह्या माणसाचं आजकाल. दिड महिन्यातच इतका कसा काय बदलू शकतो हा माणूस?' मीना ताईंची बडबड सुरुच होती.
"काय गं मीना, एकटीच काय बडबडतियेस?" शेजारच्या सूमन ताई दुरूनच बोलल्या."
"काय सांगायचं आता जाऊ दे. शेवटी तुझी गत तीच आता माझी गत होते की काय, असं वाटतंय बघ आता."
"म्हणजे?" सुमन ताईंनी प्रश्न केला.
"आता तिथूनच बोलणार आहेस का? इकडे ये मग बोलू." मीना ताईंनी सुमन ताईंना बोलावून घेतले. हातातील काम घाईतच उरकून दोघींचे मग सून या विषयावर चर्चासत्र रंगले. पुढचा अर्धा ते पाऊण तास मग दोघींनाही कसलेच भान उरले नाही.
"तरी मी तुला आधीच बजावलं होतं, आधीपासूनच सावध हो. मी जी चूक केली ती तू करू नकोस."
"अगं मी सावधच होते गं, पण आमच्या माणसावर काय जादू केलीये तिने देवच जाणे. सुनेला काही बोललं की सासऱ्याने तिची बाजू उचलून धरलीच पाहिजे. तिची चुकच ह्यांना दिसत नाही." मीना ताई बोलत होत्या.
"आमच्याकडे तसं नाहीये बाई. निदान माझा नवरा तरी माझ्या बाजूने आहे हे एक चांगलंच झालं बघ. नाहीतर माझंही काही खरं नव्हतं. आता तुझंच कसं व्हायचं याची काळजीच वाटते बाई. बाकी जग कसंही वागू दे पण आपला माणूस आपल्यासोबत असला की मग जास्त टेंशन नसतं बघ."
सुमन ताईंच्या बोलण्याने मीना ताईंचे टेन्शन कैक पटीने वाढले. अचानक त्यांना अस्वस्थ वाटायला लागले.
"सुमन जाऊ दे बाई. चल जाते मी आता. अजून वरणाला फोडणी द्यायची आहे. दोन चार चपात्या करते पटकन्. ह्यांना भूक लागली असेल. सूना आल्या तरी आपल्याला कामं काही सुटणार नाहीत बघ."
"सुनांच्या बाबतीत आपल्या दोघींचेही नशीब फुटके निघाले बघ मीना. आता त्या जसं ठेवतील तसं आपण राहायचं. तसंही आजकाल सूनांचंच राज्य आहे बाई. पहिल्या सारखं काहीच राहिलं नाही आता.
जा बाई आवर तुझी कामं, नाहीतर सुमनच काहीतरी शिकवते हिला असं वाटायचं तुझ्या घरच्यांना."
जा बाई आवर तुझी कामं, नाहीतर सुमनच काहीतरी शिकवते हिला असं वाटायचं तुझ्या घरच्यांना."
"कोणी काही म्हणत नाही गं. उलट तुझ्याशी बोललं की बरं वाटतं. तुझा खूप आधार वाटतो बघ. माझी मन मोकळं करायची हक्काची जागा आहेस तू."
"आणि माझीही हक्काची जागा तू आहेस
." सुमन ताई बोलल्या.
." सुमन ताई बोलल्या.
गप्पा उरकून दोघी आत जायला निघणार तोच गेट मधून मयुरी आत आली. हातात बॅग होती. एकटीच होती ती."
"अगं मीना, मयूरी अशी अचानक कशी काय आली? आणि एकटीच आलीये. पार्थला ठेवून आली वाटतं." सुमन ताई बोलल्या.
"काही कळेना बाई. थांब येवू तर दे तिला."
दोघीही मयुरी जवळ येण्याची वाट पाहू लागल्या.
"मयू..काय गं मध्येच कशी काय आलीस तू?"
"आई, प्लीज आता काहीही विचारू नकोस. माझी बोलायची अजिबात इच्छा नाहीये."
मीना ताई काही बोलणार तोच मयुरी उत्तरली आणि रागातच आत निघून गेली.
"अरे, अशी काय ही मुलगी? बरं सुमन आपण बोलुयात उद्या. मला आत जायला हवं." म्हणत मीना ताई घाईतच आत निघून गेल्या.
"नेमकं काय झालंय मयुरी? सांगशील का आता?" मीना ताईंनी विचारले. केशवराव देखील तिथे बाजूलाच बसले होते.
"आई कंटाळले गं मी. कितीही केलं सासरच्यांचं तरी मीच चुकीची ठरते. सगळं करून देखील कोणी मला माझ्या माहेरच्यांना नावं ठेवली की माझं डोकं सटकतं बघ. त्यात सासुला तर माझ्या माहेरच्यांचा उद्धार केल्याशिवाय दिवस सरत नाही."
"अगं पण असं अचानक कसं काय सुरू झालं हे? आजपर्यंत कधी बोलली नाहीस तू. उलट सासरच्या माणसांचं किती कौतुक सांगायचीस तू नेहमी."
"तुम्हाला नव्हता गं मला त्रास द्यायचा आई. पण पाणी आता डोक्यावरून गेलंय. मी नाही जाणार तिकडे पुन्हा."
"असं बोलून कसं चालेल मयु. अगं कोणाचा नाही निदान पार्थचा तरी विचार कर बाळा."
"जाऊ दे आई, माझे पेशंस आता संपलेत. तू नको काही बोलू आता."
क्रमशः
©®कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा