"अहो तुम्ही काहीतरी बोला की हो." विनवणीच्या सुरात मीना ताई केशवरावांना म्हणाल्या.
"आपली मयू कधीच चुकीचं वागणार नाही मीना, याची खात्री आहे मला." केशवराव म्हणाले.
"मलाही खात्री आहे ओ. आपली मयू कधीच चुकीचं वागणार नाही. पण आशा ताईंबद्दल देखील कुठेतरी विश्वास वाटतो ओ. त्या तशा नाहीत. अचानक असं का वागतील मग त्या?"
"इथे कोण कधी बदलेल आणि कसं वागेल काही सांगता येत नाही मीना." केशवराव बोलले पण अजूनही काही गोष्टी मीना ताईंच्या लक्षात येत नव्हत्या.
"हो ना ओ. पण मयू, खरंच तू काही चुकीचं वागली नाहीस ना बाळा? जे काही असेल ते सांगून टाक. नेमकं काय झालंय ते आम्हाला समजायला हवं."
"आई...अगं समोरचा जर रोज उठून एकाच गोष्टीवरून वाद घालत असेल, आपल्याला सतत टोकत असेल, आपल्या माहेरच्या माणसांचा उद्धार करत असेल, जुन्या काही गोष्टी सोडून नवे विचार स्वीकारायलाच तयार नसेल तर मग सतत गप्प बसलेली मी कधी तरी माझं तोंड उघडणारच ना गं. घरात आपल्या मताला काडीचीही किंमत नसेल तर किती दिवस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी वागायचं? मलाही माझी मते आहेत आई. मलाही वाटतं, काळाप्रमाणे बदलायला हवं पण त्यांना हे पटत नाही. 'मी म्हणेल तीच पूर्वदिशा' असं आजकाल कोणी नाही सहन करत आई. उद्या तू तुझ्या सूनेसोबत असं वागलीस तर एक ना एक दिवस ती प्रतिकार करणारच तुझ्या वागण्या बोलण्याचा. त्यावेळी ती चुकीची दिसणार. पण खरंच ती तशी होते का लगेच? तरीही त्यामागची मूळ पार्श्वभूमी कोणी समजून घेतं का?
सॉरी हा आई..तू तसं काही वागणार नाही खात्री आहे मला, फक्त सहज उदाहरण दिलं मी. पण आई एक लक्षात घ्यायला हवं ना ग माझ्या घरच्यांनी, की एकमेकांना समजूत घेत विचारांची देवाणघेवाण करत पुढे चालत राहायला हवं. बदल जसे आम्ही स्विकारतो तसे तुम्हीही स्वीकारा ना. प्रत्येक गोष्टीत हेकेखोरपणा काय कामाचा?"
सॉरी हा आई..तू तसं काही वागणार नाही खात्री आहे मला, फक्त सहज उदाहरण दिलं मी. पण आई एक लक्षात घ्यायला हवं ना ग माझ्या घरच्यांनी, की एकमेकांना समजूत घेत विचारांची देवाणघेवाण करत पुढे चालत राहायला हवं. बदल जसे आम्ही स्विकारतो तसे तुम्हीही स्वीकारा ना. प्रत्येक गोष्टीत हेकेखोरपणा काय कामाचा?"
मयुरीच्या बोलण्याने मीना ताई क्षणभर विचारांत पडल्या.
'मयू बोलते ते चुकीचं नाहीये. मीही आजकाल अशीच हेकेखोरपणे वागते का?' मीना ताईंनी स्वतःलाच प्रश्न केला.
'पण आता तो विषय महत्त्वाचा नाहीये. आधी मयूचा विचार करायला हवा.'
"अहो मयूची बाजू आपल्याला समजली, आता आशा ताईंचीही समजायला हवी ना. नेमकं झालंय काय हे त्यांना प्रत्यक्ष भेटूनच जाणून घ्यायला हवं. तुम्ही जाऊन या ना त्यांच्याकडे." मीना ताई म्हणाल्या.
"हो, मी जातो, पण तूही चल माझ्या बरोबर. तुझी जास्त गरज आहे तिथे." शेवटच्या वाक्यावर जोर देत केशवराव बोलले.
"म्हणजे?"
"म्हणजे काही दिवसांनी आपल्यालाही जाब विचारायला समिधाचे आई बाबा येतील तेव्हा कामी येईल ना हा अनुभव." केशवरावांनी मूळ मुद्द्यालाच डायरेक्ट हात घातला.
"हे काय बोलताय तुम्ही? मी नाही समजले."
"खरंच, तुला काहीच समजले नाही मीना?"
"अहो, पण आता विषय काय सुरू आहे आणि तुम्ही बोलताय काय?"
"म्हणजे सगळं समजलंय तुला. पण एक गोष्ट लक्षात घे, आपण जे एका हाताने इतरांना देतो ना तेच दुसऱ्या हाताने आपल्याकडे परतून येत असतं मीना."
हळूहळू मीना ताईंना केशवरावांच्या बोलण्याचा अंदाज लागत होता. खरंतर मयुरीच्या बोलण्यानेच त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. पण त्याकडे त्यांनी मुद्दाम दुर्लक्ष केलं. आता केशव रावांना मात्र त्या टाळू शकत नव्हत्या.
"अहो, येतंय सगळं माझ्या लक्षात पण आता ही टोमणे देण्याची वेळ आहे का?"
केशवराव मीना ताईंकडेच एकटक पाहत होते. परंतु, त्यांच्या नजरेचा सामना करण्याची ताकत मीना ताईंमध्ये नव्हती.
'आता समजतंय हे मला का समजावत होते. खरंतर आजची ही पिढी खूप हुशार आहे. खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून, पण आपण त्यांच्या मतांना आधी प्राधान्य द्यायला शिकलं पाहिजे. काही गोष्टी आपणच वेळच्या वेळी सोडून द्यायला हव्यात. नव्या बदलाचाही आनंदाने स्वीकार करायला हवा. इतर कोणाचा अनुभव आपल्यालाही लागू होईल असे नाही. पण तरीही आपण एक ठराविक गोष्ट मनात ठेवून एखाद्याला जज करतो, खरंतर ते नाही केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक नात्याला समजून घ्यायला थोडा वेळ द्यायला पाहिजे.'
राहून राहून मीना ताईंना सकाळ पासूनच्या त्यांच्याच वागण्याची आता चीड येत होती.
"आई, अगं काय झालं? कुठे हरवलीस?"
"काही नाही मयू, तू काळजी करू नकोस; मी बोलते तुझ्या सासूबाईंशी. त्या नक्की समजून घेतील तुला. पण तूही त्याबदल्यात त्यांना समजून घेशील हे प्रॉमिस कर मला."
"आई...विश्वास ठेव माझ्यावर. तू म्हणतेस तसंच होईल."
"अहो, खरंच मनापासून सॉरी. तुम्ही खूपदा मला सांगितलं पण मी नाही ऐकलं. आज मयुच्या बाबतीत सेम तेच झालं जे मी समिधा सोबत वागत होते. आज खरंच माझे डोळे उघडले. का कोण जाणे पण सुनेचे कौतुक केल्याने पुढे जाऊन त्याचा आपल्यालाच त्रास होणार हा समज मनात खोलवर घर करून बसला होता. त्यात सुमन ताईंच्या सुनेचा अनुभव आपल्याही वाट्याला येतो की काय याची सतत भीती वाटत होती."
"अगं मीना, सगळेच सारखे नसतात गं बाई. जशी माणसं वेगवेगळी असतात अगदी तसंच प्रत्येकाचा अनुभव देखील आणि नेमकी चूक कोणाची हे आपण आपल्या घरात बसून नाही खात्रीने सांगू शकत. त्यात सुमन ताईंना जो अनुभव त्यांच्या सूनेच्या बाबतीत आला तोच तुलाही येईल असे नाही ना गं."
"हो..तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. खरंच मला माफ करा."
"बरं बाबा, झालं का आता तुमचं काम? अहो मला पार्थच्या स्कूलमध्ये जायचंय अजून आणि आईंची औषधं पण घ्यायची आहेत."
"म्हणजे? आता तर सासूला नाही नाही ते बोलत होतीस आणि लगेच त्यांची काळजी तुला वाटायला लागली. असं कसं मयू?" मीना ताईंनी आश्चर्यकारकरित्या प्रश्न केला.
"बाबा... आता काय ते तुम्हीच सांगा." मयुरी बोलली.
"सॉरी मीना. तुझे समिधा बाबतीत गैरसमज जरा जास्तच वाढतच चालले होते. या गोष्टी हाताबाहेर जाण्याआधीच त्यांना थोपवणं गरजेचं होतं. म्हणून मला मयुची मदत घ्यावी लागली."
"मयु..म्हणजे तुझ्या घरी तसं काहीच घडलं नाही?"
"अजिबात नाही आई. उलट मी माझ्या घरच्यांना खूप काही बोलून गेले, याचे वाईट वाटतंय मला. पण ठीक आहे. तो आमच्या प्लॅनचा एक भाग होता."
"प्लॅन ..कुठला प्लॅन."
"सॉरी आई, पण तू रागावू नकोस. अगं मला बाबांचा सकाळी कॉल आला होता. खूप अस्वस्थ होते ते. मीच खोदून खोदून विचारले तेव्हा त्यांनी मला सगळं सांगितलं. मला नाही आवडलं आई तुझं वागणं. म्हणून मग मी बाबांशी बोलून तडक निघून आले इकडे."
मीना ताईंना आता स्वतःच्याच वागण्याचा राग येत होता.
"आई, समिधा खूप चांगली मुलगी आहे गं. तिच्या बाबतीत कोणतेही गैरसमज मनात ठेवू नकोस. तुमचं नातं अजून नवीन आहे त्यामुळे नात्याला थोडा वेळ द्या. एकमेकींना समजूत घेत संसार पुढे नेत राहा. तू तिला प्रेम दे बघ त्याबदल्यात तीही तुला प्रेमच देईल. याची खात्री आहे मला. त्याबाबतीत माझे उदाहरण काय कमी आहे का."
"मयु..आज तुझ्यामुळे आणि बाबांमुळे माझे डोळे उघडले. मला माझ्या चुकीची आज खऱ्या अर्थाने जाणीव झाली. पण तुझ्याप्रती तुझ्या घरच्यांचे वागणे ऐकून खूप त्रास झाला मला. तुझ्या घरच्यांचा क्षणभर खूप रागही आला पण त्याच वेळी मीही तीच चूक करत आहे याचीही जाणीव झाली."
"आई, हे बघ माझ्या बरोबर माझ्या घरचे चुकीचे वागले हे ऐकून तुला किती त्रास झाला, कारण मी तुझी मुलगी आहे म्हणूनच ना. मग समिधाही कोणाची तरी मुलगी आहे ना? तिच्या आई बाबांना पण असाच त्रास होणार ना गं जेव्हा त्यांना काही गोष्टी समजतील. आता समिधामध्येच तू तुझ्या मयुला बघ म्हणजे सगळं कसं सोप्पं होईल बघ."
लेकीचे हे समजूतदारपणाचे बोलणे ऐकून मीना ताई क्षणभर भारावून गेल्या. न राहवून मयुरीला त्यांनी घट्ट मिठी मारली. दोघींच्याही डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
"अहो...आता तुम्ही सांगाल तसंच मी करेल." डोळ्यांतील आसवे पदराने टिपत मीना ताई बोलल्या.
"गुड.. तू खूप समजूतदार आहेस मीना, म्हणूनच तुझ्याकडून असं चुका होणं नाही पटलं. त्यामुळेच तर हा सगळा खटाटोप, बाकी काही नाही."
त्या दिवसांनंतर मीना ताईंच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. अर्थातच पुढे काही दिवसांतच समिधा आणि मीना ताईंचे सूत उत्तम जुळले. एकमेकांच्या मतांचा आदर करत हसत खेळत घरात आनंदाचे वारे वाहू लागले. एकमेकींना समजून घेत, वेळप्रसंगी चुका दाखवत गुण्या गोविंदाने सारं सुरू होतं.
अर्थातच, या जाणिवेतूनच बरेचसे गैरसमजदेखील दूर झाले. त्यामुळे नात्यांची विण अधिकच घट्ट होत गेली.
समाप्त
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा