रत्नाताईं भिंतीवरच्या कॅलेंडरकडे एकटक भाग होत्या. कॅलेंडर काढून ते त्यांनी हातात घेतलं. "आज बैल पोळा." हळूच पुटपुटल्या.
बऱ्याच वेळापासून कॅलेंडर चाचपडताना, छोटा अद्वैत आजीकडे बघत होता.
"पोळा म्हणजे काय गं आजी?"
पोळा म्हणजे पोळीSS... पोळीSS? तो उगाच थट्टा करत बडबडला.
"पोळा म्हणजे. आता ह्याला काय सांगावं?" त्या प्रश्नात पडल्या.
चार वर्षाच्या अद्वैतला समजेल अशा भाषेत सांगणं अपेक्षित होतं.
"बाळा, पोळा म्हणजे बैलांची पूजा करण्याचा दिवस. शेतात दररोज काम करून करून बैल थकतात. तर आज बैलांना थॅन्क यू म्हणण्याचा दिवस. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस." रत्नाताईंनी समजावलं.
"बैलांना थॅन्क यू?" खीSS खीSS अद्वैतने ओठांवर हाताचा पंजा ठेवत हसून घेतलं.
"हसायचं नाही असं!" त्यांनी प्रेमळ शब्दात दटावलं.
"त्यात तुझा तरी काय दोष".... रत्नाताईंनी मनात म्हटलं.
"आदू बाळा, वर्षभर बैल आपल्याला मदत करतात. शेतात आपल्या बरोबरीने कष्ट करतात. तर आजचा दिवस त्याचा... त्यांचा आभार व्यक्त करण्याचा दिवस. म्हणून थँक्यू म्हणायचं त्यांना." रत्नाताई पटवून देत बोलल्या.
"चल आज मी तुला एक गोष्ट सांगते...." रत्नाताईंनी हातातलं कॅलेंडर बाजूला ठेवलं.
"गोष्ट......" उत्सुकतेने अद्वैतने सुद्धा, हातातला मोबाईल बाजूला ठेवला.
रत्नाताई सांगू लागल्या...
"एक गाव होतं... सर्वदूर हिरवाईने नटलेलं.. हिरवंच हिरवं रान..... सभोवताली टेकड्या, पहाड आणि मध्यभागी वसलेलं... एक सुंदर छोटस गावं....."
"गावात चार सहा खोल्यांचा, मोठा वाडा होता. वाडा म्हणजे मोठ्ठ घर. मोठा माळा... समोर मोठं अंगण, अंगण चहूबाजूंनी मोठमोठ्या भिंतींनी वेढलेलं. समोर मोठ्ठा दरवाजा... मागे परसबाग, वाड्याला लागून गुरांचा गोठा. गोठा म्हणजे गुरांसाठी घर.. बरं का!" आजी सांगत होती आणि एक एक शब्द अद्वैत कान देऊन ऐकत होता.
वाड्यासमोर, मारुतीच मंदिर होतं.
"मारुतीच्या मंदिरासमोर म्हणजेच आपल्या घरासमोर दरवर्षी बैलांचा पोळा भरायचा."
"पोळा भरायचा म्हणजे?" अद्वैतने विचारलं.
"बर्थ डे च्या दिवशी कसं!! तुझा बर्थडे असला की तू उत्सवमूर्ती म्हणून मिरवतो त्याप्रमाणे पोळ्याचा दिवस बैलांना मिरवण्याचा दिवस.... कळलं?" रत्नाताईंनी सांगितलं.
"हो....." म्हणत अद्वैतने मान डोलावली
"घरोघरी गाई, बैल गोठ्यात बांधलेली असायची. गोठा म्हणजे गाई बैलांच घर. "आपल्या घरी, गाई ढोरांची काळजी घेण्यासाठी, गडी माणूस होता. "गडी माणूस म्हणजे?" अद्वैतने विचारण्यापूर्वीच... "गडी माणूस म्हणजे केअर टेकर..." आजीने सांगितलं.
"हSS हSS... " अद्वैत लक्ष देऊन ऐकत होता.
"आपल्याकडे शेती होती. वडिलोपार्जित शेती.... तुझ्या आजोबाला तुझ्या पणजोबाकडून मिळालेली. हॉलमध्ये भिंतीवर टांगलेल्या प्रतापरावांच्या फोटोकडे रत्नाताईंनी हळूच बघितलं.
"अद्वैत, तुझे आबा शाळेत शिकवायचे. ते टीचर होते. पण आवडायचं त्यांना शेती करायला. म्हणून आम्ही गावालाच राहायचो."
"आजसारखी तेव्हा, ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती होत नव्हती. बैलांच्या मदतीने नांगरणी करत. नांगरणी म्हणजे, शेतीत पिक लावण्यापूर्वी त्याची मशागत करतात जमिनीला छान सुपीक बनवतात.. पिक लावण्यासाठी तयार करतात." अद्वैत काळजीपूर्वक ऐकत होता सगळं.
"आजच्या सारख्या कार, गाड्या पण नव्हत्या तेव्हा रस्त्यावर. ट्रान्सपोर्टसाठी बैलबंडीचा वापर केल्या जायचा." रत्नाताई सांगत होत्या.
"आजी बैलबंडी म्हणजे?" अद्वैतने विचारलं.
"बैल बंडी म्हणजे??? बैलगाडी. डोक्याला जरासा ताण देऊन त्या म्हणाल्या... बैलगाडी म्हणजे, bulluck cart."
"Bulluck cart! अद्वैतने कुतुहलाने विचारलं.
"हो तर, bulluck cart होती आपल्या घरी. तुझ्या पप्पांना फार आवडायची बैलगाडी हाकायला." रत्नाताई खूश होत बोलल्या.
"हो....! पप्पा बैलगाडी चालवायचे. अद्वैतने आश्चर्याने विचारलं.
"हो तर सुट्टीच्या दिवशी तुझे पप्पा हट्टाने bulluck cart वर बसून शेतावर जायचे. शेतातून येताना, गाई, बैल आणि बकऱ्यांसाठी चारा भरलेल्या बैलगाडीवर बसून यायचे.. मज्जा यायची त्याला खूप." रत्नाताई त्या निमित्ताने आठवणी जगत होत्या.
"आजी, बैलांची शिंग एवढी मोठी... मला तर भीतीच वाटते. मारलं म्हणजे?" अद्वैत जरासा घाबरला होता.
"नाही बाळा, आता आपल्या घरची ही स्टेफी .... आपल्याला चावते का? पण, आपण रस्त्यावरच्या कुत्र्यांना घाबरतोच की नाही. तसंच, आपल्या घरचे बैल उगाच नाही शिंग मारत... आपल्या ओळखीचे असतात. पण दुसऱ्यांच्या घरच्या बैलापासून मात्र सावध राहावं लागतं."
"हा, तर मी काय म्हणत होते? अद्वैतच्या बालमनाला पडलेल्या प्रश्नाच निरसन करत, रत्नाताई बोलायला लागल्या.
"बैलपोळ्याच्या दिवशी... गावभर आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जायचे. शेतातली काम थोडी आटोपली असायची, कष्ट करून थकलेल्या बैलांना तेलाची मॉलिश करून दिली जायची. त्यांची पाठ शेकून दिल्या जात होती. त्यांना न्हाऊमाखू घातल्या जायचं. बैलांच्या गळ्यात, फूल, कवड्या, घुंगराच्या माळा बांधल्या जायच्या. अंगावर रेशमी झुल पांघरली जायची, पायात घुंघुरमाळा, गळ्यात घंट्या. शिंग रंगवले जायचे, बैलांना बाशिंग बांधून सजवले जायचे. खूप सुंदर दिसायचे बैल तेव्हा."
"बैलांची पूजा करायची आणि खास आजच्या दिवशी, बैलांना खायला पुरण पोळीचा नैवेद्य असायचा. वडे भजे आणि अळूची वडी स्वयंपाकाचा घमघमाट असायचा नुसता.
"थांब थांब आजी!!!" अद्वैतने रत्ना ताईंना बोलता बोलता थांबवलं.
"आज शेअर चॅट मध्ये, एक फोटो बघितला मी. थांब दाखवतो तुला." म्हणत अद्वैतने मोबाईलवर पटापटा बटण दाबल्या.
"आजी बघ..." म्हणत लगेच मोबाईलची स्क्रीन आजीच्या समोर धरली.
"हो रे बघ... पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्यात सर्वांना." आजीने खाली लिहिलेला छानसा मेसेज ही हळूच वाचून काढला...
"आजी आपल्या घरी का बरं नाही पोळा." अद्वैतने विचारलं.
"बाळा, शहरात आलो आणि गावं आठवणीत गेलं....
"इथे कसला पोळा?" बोलताना, रत्नाताईंना दाटून आलं.....
शुभांगी मस्के...
शुभांगी मस्के...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा