भाग २
मुंबईत एका मोठ्या सोसायटीत, मोठा आलिशान फ्लॅट होता अमोल आणि अनयाचा. अमोल आणि अनया रत्नाताईंचा मुलगा आणि सून... दोघे ही चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला होते. चांगल्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या होत्या दोघांना. "हम दो हमारा एक" च्या थाटात... संसार वेलीवर उमललेल्या पाच वर्षाच्या अद्वैतसोबत आयुष्य कसं आनंदात जगत होते दोघे.
रत्नाताई आणि प्रतापराव येऊन जाऊन असायचे. कधी शहरात तर कधी गावी. पण दोघांना त्यांच्या आयुष्यभराच्या सांगाती असलेल्या त्यांच्या गावाची ओढ काही शहरात पाय रोवू देत नव्हती. शेतीची ओढ होती.
अद्वैत लहान असताना, अमोल आणि अनयाचा आग्रह असायचा राहण्याचा. त्यावेळी, जास्तीत जास्त वेळा दोघांना मुंबईत येऊन राहावं लागत होतं. अद्वैत दोन अडीच वर्षाचा झाला. आता तो शाळेत जायला लागला होता. सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आणि इतर मुलांसोबत चांगल्या प्रकारे बॉण्डिंग तयार व्हावी त्या हेतूने अद्वैत आता डे केअर सेंटर मध्ये रहायला लागला होता.
रत्नाताईं आणि प्रतापराव आता बऱ्यापैकी निश्चिंत झाले होते. जिथे मन लागेल तिथे आनंदाने रहायचे. शेती ठेक्यावर दिल्याने काळजी पण नव्हती. दिवस छान चालू होते. एक दिवस प्रतापरावांच्या, छातीत अचानक दुखायला लागलं. तडकाफडकी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. पण देवाच्या मनात काही वेगळंच होत. ना डॉक्टरांच्या प्रयत्नांना गुण आला ना औषधाला. अचानक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
"आई, आता बाबा नाहीयेत या जगात. तू एकटी! तू गावी एकटी राहशील तर आमचं लक्ष लागणार नाही. तुझी काळजी लागून राहील. उद्या तुला काही कमी जास्ती झालं तर... वेळ प्रसंगी धावपळ करायला आम्हाला जमणार नाही?" आम्ही आमच्या नोकऱ्या सोडून तर इथे येऊ शकत नाही." आजवर, तुम्ही दोघे गावात येऊन जाऊन असायचे, पण आता तुला जमणार आहे का एकट वाड्यात राहायला. तेव्हा तू आता मुंबईला चल आमच्याबरोबर.. नेहमीसाठी." अमोलने रत्नाताईंना समजावलं.
प्रतापरावांचे कार्य दिवस संपले. रत्नाताईंना वाडा सोडताना खूप दुःख झालं होतं. "वाड्याकडे लक्ष ठेव" त्यांनी त्यांच्या गड्याला वाड्याची चाबी सोपवली होती. रत्नाताई, अमोल आणि अनया सोबत शहरात आल्या. त्यांना खूप इच्छा असायची गावाला जायची. चार दोन दिवस गावी जाऊन राहायची. पण त्यांना एकटीला प्रवास झेपत नव्हता. 'उगाच एखाद वेळी काही अचानक प्रसंग उद्भवला तर, एकुलता एक आपला लेक कुठे कुठे धावेल?' म्हणून मग त्या गप्प बसतं.
दिवस पुढे पुढे सरकत होते. रत्ना ताईंच शरीर शहरात पण मन मात्र गावच्या घरात घुटमळत रहायचं. त्यांना वाड्याची नेहमीच काळजी वाटायची.
"आई आपण आपली गावची शेती आणि घर विकून टाकायचं का? आपण इकडे, आणि आता शेती करायला गावी जाणार का आपण, शेती ठेवून तरी काय उपयोग? वाड्यात जाणार आहोत का आपण राहायला. चांगली किंमत मिळाली की विकून टाकू या?" अमोलने रत्ना ताईंना पटवून सागितलं.
रत्ना ताईंना खूप दुःख झालं होतं ऐकून. पण गावातला वाडा मोठा होता. सतत बंद असल्याने, दुरावस्था होत होती. शेती सुद्धा बिनभरवशाचीच होती. अमोल आणि अनयाला सुट्ट्या नसायच्या त्यामुळे गावी जाण सुद्धा होत नव्हतं. गेल्या दोन तीन वर्षात मोजून दोनेक वेळा जाणं झालं होतं. प्रत्येकवेळी छोट्या मोठ्या काही तरी कुरबुरी असायच्या त्या सोडवायला अमोलला वेळ नसायचा. मग त्याची चिडचिड व्हायची.
"वडिलोपार्जित प्रॉपर्टी, ती आज ही तुमची आणि उद्या पण तुमचीच. काय करायचं ते करा? काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या. ठेवा नाहीतर विका." मी काय आज आहे, उद्या नाही. रत्ना ताईंनी स्पष्टच सांगितलं. असं असलं तरी, त्यांचा जीव मात्र वाड्यात आणि काडी काडीने जमवलेल्या एका एका सामानात अडकलेला होता.
संपत्ती विकण्याच्या विषयावर मात्र त्या बोलायचं टाळायच्या. "एक दोन वेळा म्हणाल्या होत्या... सध्या नको विकायला म्हणून." पण अमोल त्यांना पटवून सांगायचा आणि त्या गप्प बसायच्या.
"त्यांना गावाची त्यांच्या घराची, खूप आठवण येत होती. आपण आहोत तोपर्यंत तरी ते गाव, घर आपल्यासाठी असावं. तिथे जात येतं राहावं".. त्यांना मनापासून वाटतं होतं. पण पर्याय नव्हता.
घर आणि शेती, विक्रीच्या नावाने सुद्धा त्यांना कसनुस व्हायचं. एकुलता एक मुलगा, उगाच आपल्यानंतर, सतराशे साठ भानगडी नकोत त्याच्यामागे. आजकाल त्यांना कशाचा मोहच उरलेला नव्हता.
आपल्या मुलाला आपण एवढं सक्षम बनवलयं की तो योग्य तो निर्णय घेईल. अमोलवर रत्नाताईंना पूर्ण विश्वास होता. पण त्याने शेती विकू नये असं ही त्यांना मनापासून वाटतं होतं.
अद्वैत....... शेअर चॅट वर, एक एक फोटो, स्क्रोल करण्यात मग्न झाला होता...." सर्जा राजाची जोडी खिल्लारी" वगैरे गाणं ऐकताना अद्वैतला मजा येत होती....
"अरे तू कधी आलास?" समोर दारात, अमोल उभा. रत्नाताईंच लक्ष गेल तसं त्यांनी त्याला विचारलं."
"बैल आणि पोळा सणाची गोष्ट ऐकवत होतीस तू अद्वैतला, तेव्हा आलो." अमोलने सांगितलं..
"पोळा आहे का गं आई आज? पायातला बूट काढत, अमोलने विचारलं.
शुभांगी मस्के...
शुभांगी मस्के...