Login

जडले मातीशी नाते भाग ३

परंपरा, संस्कृती आणि संस्कारांची सांगड
भाग ३

रत्ना ताई विचारात मग्न होत्या. भानावर आल्या तशा,  दारात समोर अमोल उभा. "तू कधी  आलास," रत्नाताईंच लक्ष गेल तसं त्यांनी त्याला विचारलं."


"अद्वैतला, बैल आणि पोळा सणाची गोष्ट ऐकवत होतीस तू , तेव्हा आलो." अमोलने सांगितलं.. 


"पोळा आहे का गं आई आज? पायातला बूट काढत, अमोलने विचारलं.

"हो....!"  रत्नाताईंनी म्हटलं आणि पाणी आणण्यासाठी त्या स्वयंपाक घरात गेल्या. त्यांनी त्याला पाणी दिलं प्यायला. 


"आई, किती मज्जा यायची ना गं आपल्या गावी... दिवाळी सारखा उत्साह असायचा बघ या सणाचा." आणि इकडे, काहीच नाही.


"तू तर चिवडा, लाडू, चकल्या शंकरपाळ्या सुद्धा बनवायची. जेवणात पुरणाची पोळी आणि काय ती कटाची आमटी. अहाहा!! तोंडाला पाणी सुटलं बघ माझ्या." 


"आपल्या घरी रामूकाका होते. त्यांच्यासोबत मी शेतात जायचो. रखमा काकी..  मला चहा सोबत पारलेची बिस्कीट खायला द्यायची."


"रखमा काकी, तुला कामात मदत करायची. एकदा आठवतेय, काकी तुझी साडी नेसलेल्या... मी आई म्हणत त्यांना बिलगलो. त्यांचा चेहरा बघितला तेव्हा ओशाळलो होतो खूप." अमोल हसत हसत सांगत होता.


"पोळ्याला तू त्यांची ओटी भरायची. नवीन साडी घ्यायची. रामुकाकाला नवीन कपडे घ्यायची. फराळ द्यायची. दोन मुलं होती त्यांना, पिंट्या आणि राणी...... मी खेळायचो त्यांच्यासोबत. पिंट्या मला कधीकधी मारायचा सुद्धा. मग रामू काका पिंट्याला बदडून काढतं. राणी छान होती, रिबीन बांधलेल्या दोन चूट्या घालायची." पोळ्याच्या दिवशी, रामू काका आपली बैलाची जोडी घेऊन पोळ्यात जातं. मी आणि पिंट्या त्यांच्यासोबत गावभर बैल घेऊन फिरायचो. काकांना, पैसे मिळायचे.... मज्जा यायची खूप.


"आठवी पर्यंत गावात, नंतर पुढच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी आणि नंतर शहरात आलो. शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेर पडलो आणि गाव सुटलं."

"पिंट्या आणि राणीला कित्येक वर्ष झाली, भेटलोच नाही. आता समोर आले तरी ओळखेल का माहिती नाही." अमोल बोलत होता.


"पिंट्या आणि राणीचं लग्न झालं. पिंट्या, मध्यप्रदेशमध्ये एका कंपनीत गार्डच काम करतो म्हणे. राणी तिच्या सासरी. ती शिकली थोडं. प्रायव्हेट कंपनीत नोकरी करते ती आता. पिंट्याच काही अभ्यासात मन लागत नव्हतं. त्याला तूझ्या बाबांनी एका मेकॅनिककडे लावून दिलं होतं. शिकेल आणि नंतर गॅरेज टाकून देऊ या उद्देशाने, पण तो पठ्ठा तिथून पळून आला होता. शेतीत ही कष्ट करायची तयारी नव्हती त्याची." रत्नाताई सांगा होत्या.


"रामू आणि रखमाकडून आजकाल फार कष्ट होत नाही. आपल्या वाड्याची साफसफाई ठेवतात म्हणून बरंय... वाडा जागेवर आहे. नाहीतर कुणास ठाऊक काय झालं असतं? मागच्या परसबागेत भाजी लावतात. मोठमोठी पपईची झाडं लावलीत, पपया लागतात म्हणे छान. मध्यंतरी.... मी फोन केलेला,  टपाटप लिंब लागलेत म्हणाली झाडाला. भरणी भरून लोणच बनवून ठेवलयं म्हणाली.... तुझी पण आठवण काढत होती रखमा." रत्नाताई आठवणीने सगळ सांगत होत्या.


"आई आपल्या, घराची एक चाबी अजूनही आहे, त्यांच्या जवळ."  अमोलने विचारल्यावर, रत्नाताईंनी होकारार्थी मान डोलावली. 


"हो, म्हणूनच तर त्या वाड्यात जीव उरलाय नाहीतर केव्हाच वाळविणे खाल्ला असता वाडा. बाबा होते तेव्हा, अधूनमधून जायचो आम्ही गावाला. "आम्ही येतोय" एवढं जरी सांगितलं तरी घराचा कानाकोपरा साफ करून ठेवायचे दोघे. घरी नसलो तरी, अंगणातली तुळस नेहमी डवरलेली असायची." रत्नाताईना भरून आलं होतं. त्यांच्या डोळ्यात पाणी साठलं.


"जावं वाटतं.. घर आहे राहावं वाटतं..... पण...?" त्या बोलताना गप्प झाल्या. 

  

"आई अगं, जात जा बिनधास्त......  तू सांग फक्त, रिझर्व्हेशन करू का सांग? घर आहे तोवर जात येत जा... विकल्यानंतर सुटणार गावं आपलं. एकदा का चांगला गिऱ्हाईक मिळाला की विकून मोकळं व्हायचं." अमोल निर्विकारपणे बोलला.


"तुझे बाबा गेले...... अचानक मला सुद्धा काही झालं तर तुला उगाच धावपळ कशाला? तुझे बाबा एवढे हट्टेकट्टे, तरी अचानक क्षणात होत्याच नव्हतं झालं.... माझी तब्बेत अशी तोळामासा. मला गुडघ्यांचा त्रास, मध्ये डोळ्यांच ऑपरेशन झालं. एकटीने प्रवास नाही होतं आता. भीती वाटते रे एकटेपणाची." रत्नाताईंनी भीती बोलून दाखवली.  त्यांच्या डोळ्यात पुन्हा दाटून आलं.


"आई अगं, केवढी हळवी होतेस..... परिवर्तन हा निसर्गाचा नियम. गावाकडून शहराकडे, म्हणजे प्रगतीकडे वाटचाल.. दुःख नाही करत बसायचं. सोडून द्यायला शिकायचं आणि आनंदाने राहायचं." अमोलने रत्नाताईंना जवळ घेतलं, खांद्यावर थोड थोपटलं. 


"मग काय खास आज... बैल पोळा आहे तर?" अमोलने विचारलं.


"आई अगं... आपण पोळ्याला ते मेढे दरवाजात ठेवायचो..... त्यांची पूजा केली जायची. दुसऱ्या दिवशी सकाळी मेढे चौकात जाळण्याची पद्धत होती, आठवतंय तुला."


"मेढे म्हणजे, पळसाच्या फांद्या असायच्या. आपल्या घरातली नकारात्मक शक्ती.. दुष्टपण, रोगराई.. नाहीशी होते..
त्यामागचा उद्देश असायचा.. घरातली मोठी माणसं सकाळी सकाळी नेवून जाळत चौकाचौकात." एवढे वर्ष सगळ नेटाने करत आले विसरेन कशी?  रत्नाताई बोलल्या. 


"नागपूरला तर हिरवी पिवळी, लाल मारबत आणि बडगे असायचे. म्हणजे स्त्री पुरुष रूपात मोठमोठे पुतळे... पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मिरवणूक निघायची. कुप्रथा, वाईट चालीरीती, संकट, रोगराई, समाजातील भ्रष्टाचार, वगैरे...  घेऊन जा गे मारबत म्हणत साकडे घातले जायचे. मिरवणुकीनंतर मारबत दहन केली जायची. संपूर्ण जगात, एकमेव नागपूरला ती पद्धत होती. इंजिनियरिंग च्या वेळी नागपूरला शिकायला होतो तेव्हा, जायचो मी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत बघायला. किती ती गर्दी." अमोल आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेत होता.  


"पप्पा.... पप्पा!! हा बघा पोळा..

 बैल बघा किती सुंदर सजवलाय." अद्वैत मोबाईलवरचे फोटो आणि व्हिडिओ एकामागून एक अमोलसमोर स्क्रोल करत होता.... 


"आजीने गोष्ट पण सांगितली मला, तुमच्या गावाची आणि बैलांची" अद्वैत कौतुकाने सांगत होता.


"पप्पा, आपण कधी जायचं आजीच्या गावाला... मला बैल पोळा बघायचायं.... आजी आपण कधी जावू तुझ्या गावाला?" अद्वैतने विचारलं. 


"माझं एकटीच नाही रे गाव... आपल्या सर्वांच आहे ते गावं अगदी तुझं सुद्धा.. आणि कधी जायचं ते, विचार तुझ्या पप्पाला?"  रत्नाताई शांतपणे बोलल्या.
शुभांगी मस्के...