Login

जडले मातीशी नाते भाग ४

परंपरा, संस्कृती आणि संस्कारांची सांगड
भाग ४


"आजीने गोष्ट पण सांगितली मला, तुमच्या गावाची आणि बैलांची" अद्वैत कौतुकाने सांगत होता.


"पप्पा, आपण कधी जायचं आजीच्या गावाला... मला बैल पोळा बघायचायं.... आजी आपण कधी जावू तुझ्या गावाला?" अद्वैतने विचारलं. 

"माझं एकटीच नाही रे गाव... आपल्या सर्वांच आहे ते गावं अगदी तुझं सुद्धा.. आणि कधी जायचं ते, विचार तुझ्या पप्पाला..." रत्नाताई शांतपणे बोलल्या.

माझं गावं... अद्वैत ला छान वाटलं ऐकून... गावातल्या पुसटशा आठवणी, मारुतीच मंदिर त्याला आठवत होतं. मध्ये एकदा गेलेला असताना, लाकडी जिन्यावरून तो माडीवर चढला आणि पडला होता ते सुद्धा त्याला आठवलं. रामू काकाने दुकानात नेऊन संत्र्याच्या गोळ्या घेऊन दिलेल्या त्याला आठवलं. अद्वैत एक एक आठवण गिरवत होता.

"आई... किती लवकर आपण गावापासून आपलं नातं तोडून टाकलं गं. बाबा गेले आणि सुटलं सगळं."

"आता तर..... गावातलं घर आणि आपली शेती सुद्धा विकायला काढलीय आपण. बरेच लोक आलेत बघायला. पण किंमत चांगली यावी म्हणून विषय लांबणीवर गेला. म्हणून काय ती शेती आणि वाडा आहे अजूनही..." नाहीतर, अमोल बोलता बोलता थांबला.

"आई, खूप स्वार्थी विचार करतोय ना मी. बाबा गेले आणि लगेच घर आणि शेती विकायला काढली. तू काही म्हटलं नाही, तक्रार केली नाही पण तुझ्या मनाची घालमेल होतच असणार ना गं."

"तू, मध्यंतरी म्हणाली होतीस.... रामुकाकाचं घर मोडकळीला आलेलं आहे म्हणून. पावसाळ्यात त्रास होतो, डागडुजी करावी लागते. आपण त्याला राहू देऊ या का आपल्या वाड्यात.  मी स्पष्ट नाही म्हणालो."

"त्यांना रहायला द्यायचं की नाही...  तो निर्णय घेण्याचा अधिकार तुझा होता,  हे सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही."

"बाबा गेले आणि अचानक, त्या संपत्तीवर मी वर्चस्व गाजवायला लागतो. परस्पर घर विकण्याचा निर्णय घेतला. आपलं घर, शेती तुला विकायची आहे का?  तुझं मत विचारत घेण्याची तसदी सुद्धा  घेतली नाही मी." अमोल शांतपणे बोलत होता.

"एवढ्या वर्षाचा संसार, ज्या घरी केला..... अगणित आठवणी असतील तूझ्या... त्या घराशी अचानक नातं संपवायला निघालो मी."

"हा पाच वर्षाचा अद्वैत.. एक एक आठवण गिरवतोय केव्हाचा... आणि मी तुझ्या आठवणी मिटवायला निघालोय. चुकलं ग," अमोल ने कबुल केलं.


"आई, सांग रामुकाकाला... आपल्या वाड्यातल्या दोन खोल्यात रहा म्हणावं." अमोल शांतपणे बोलला.

"अरे पण विकायचं बोलतोयस न तू घर... गिऱ्हाईक आलं की ऐनवेळी रिकाम कसं करणार तो, ऐनवेळी त्याची फजिती नाही का होणार?" रत्नाताईंनी काळजी व्यक्त केली.

"आई ते नंतरच नंतर बघू... येऊ दे त्यांना रहायला." अमोल म्हणाला.

"किती दिवसापासून तुला म्हणावं वाटतं होतं पण.... धाडस होईना." रत्नाताई मनातल बोलल्या.

"आई अगं.... स्पष्ट बोलायचं ना गं." चूक झाली तर लक्षात तरी आणून द्यायची. एका मुलाचा बाप झालो असलो तरी, मोठमोठे निर्णय घेईल, एवढा मोठा नाही झालो ग अजून मी." अमोल म्हणाला.

"अरे तू वाडा विकायला काढला, निर्णय अगदीच चुकीचा नव्हता.  म्हणून... गप्प बसले. मागच्या पावसाळ्यात, मी रामूला  सांगितलं... घराची चांगली डागडुजी करून घे. खूप वर्षापासून कामाला होता आपल्याकडे. प्रामाणिक होता. बाबांचा खूप जीव होता त्याच्यावर. त्याच्या भरवशावर एवढी वर्ष नोकरी सांभाळून शेती शक्य झालं होतं. असं वाऱ्यावर तरी कसं सोडून देणार त्याला?" रत्ना ताई समाधानाने बोलून गेल्या.


अद्वैत.. बाळा! आज मोठ्या बैलांचा पोळा तसाच पोळ्याचा दुसरा दिवस तान्हा पोळा म्हणून साजरा करण्याची पद्धत होती आपल्या गावात..

छोट्या मुलांसाठी छोटे छोटे, लाकडी बैल बनवून घेतल्या जायचे. तान्ह्या पोळ्याच्या दिवशी छोट्या लाकडी बैलांना, रंगवायचं छान सजवायचं आणि बैलांना घेऊन तान्हया पोळ्यात जायचं.

तान्ह्या पोळ्यात, मोठमोठे लाकडी बैल असायचे. छान धोतर कुर्ता घालून, ओठांवर मिशीची रेख पाडून, डोक्यावर टोपी घालून, शेतकरी बनून जायचो मी,  सजवलेला बैल घेऊन बैलपोळ्यात."

"बैल पोळा फुटायचा? आणि मग घरोघरी आम्ही आमचा लाकडी बैल घेऊन फिरायचो. आमच्या बैलांची पूजा आणि आम्हाला ओवाळून, प्रसाद आणि बक्षीस स्वरूपात बोजारा मिळायचा...."

"बोजारा... ???" तोंड वेडवाकड करत, अद्वैतने विचारलं..

"आम्हाला जे पैसे मिळायचे त्याला आम्ही बोजारा म्हणत असू. अमोल ने सांगितलं.

"मिळालेले ते सुट्टे एक दोन रुपयांचे कॉइन्स, ते पैसे आमचे हक्काचे असायचे." त्याला आठवलं.

कधीतरी, गावी गेल्यावर मोबाईलमध्ये काढून ठेवलेल्या त्याच्या छोट्या लाकडी नंदीचा फोटो त्याने अद्वैतला दाखवला.

खूप सुंदर, सुबक लाकडात कोरलेला नंदी.. "आबांनी खूप आवडीने बनवून घेतला होता माझ्यासाठी... गळ्यात, घुंगराची माळ होती.. अनेक वर्ष पहिलं बक्षीस सुद्धा मिळालं होत माझ्या नंदीला." मोबाईलमधला फोटो दाखवत, अद्वैतला अमोल सांगत होता.

अद्वैत सुद्धा नंदीचा फोटो, झूम करून आवडीने बघत होता.

"पप्पा, आपण गावाला गेलो की.... मला द्याल खेळायला हा तुमचा नंदी." आपण घेऊन येऊ इकडे आणि आपल्या शोकेस मध्ये ठेवू किंवा... आपल्या बाल्कनीत गार्डन मध्ये ठेवू. अद्वैतने विचारलं.  अमोलला अद्वैतची कल्पना आवडली.

"हो" घेऊन येऊ... तसा ही माडीवर पडलाच असेल तो." अमोल ने ही त्याच्या कल्पनेत  होकार भरला.
शुभांगी मस्के...


0

🎭 Series Post

View all