भाग ५
सायंकाळ झाली तशी, अनया घरी आली.
तिने आल्या आल्या, पर्समधून एक बॉक्स काढला.... " हे काय, आज काय मागवलस?" अमोलने विचारलं.
"सरप्राइज" म्हणत तिने बॉक्सच अनबॉक्सिंग करायला सुरुवात केली.
तिने त्या बॉक्समधून... मातीचे छोटे छोटे दोन बैल बाहेर काढले. सुंदर रेखीव आणि रंगवलेले...
"बैल...." अद्वैत जोरात ओरडला आणि खूप कुतुहलाने त्याने बैलांकडे बघितलं.
"अरे हे कुठून आणलेस? कुठे मिळाले?" रत्नाताईंनी उत्सुकतेने विचारलं.
"माझी मैत्रीण, कृष्ण जन्माष्टमीला नागपूरला गेलेली... तिला सांगितलं मी आणायला. इथे शक्य होत नाही, बैल पोळा साजरा करणं. ऑफिस मधली एक मैत्रीण, बेंदुर म्हणून सन साजरा केला मागच्या महिन्यात तो त्यांचा बैल पोळा. सण कोणत्या दिवशी का असेना, पण त्यामागचा भाव महत्वाचा. प्राणीमात्रांना प्रेम देणारी आपली संस्कृती... मग साजरी नको का करायला." अनया बोलत होती.
"आपल्या संस्कृतीची जपणूक म्हणून तरी, मातीच्या बैलांची पूजा आपण इकडे राहून करूच शकतो, नाही का? म्हणून मुद्दाम मागवले मी बैल." अनया बोलत होती.
"माझ्या लहानपणी, आजी मातीची सुंदर बैलांची जोडी बनवायची. चण्याच्या डाळीचे डोळे, पायाला खूर म्हणून मोहरी चिटकवायची. बैलांना पाणी पिण्यासाठी, त्यांच्या समोर पाण्याचं टाक बनवल्या जायचं... बनवलेल्या मातीच्या बैलांची आजी देवघरात ठेऊन पूजा करायची. आमचं घर दूध दुभत्याने भरलेलं असू दे म्हणत, प्रार्थना करायची."
"आम्ही बच्चे कंपनी.... बैलांसाठी काड्यांचा छोटा गोठा बनवायचो. बैलांना खेळायला घ्यायचो. पीठ दळायचं जात, उखळ आणि स्वयंपाकाला लागणारी सगळी मातीची भांडी पोळ्याच्या निमित्ताने बाजारात विकायला असायची. बाबा आवर्जून आणत आमच्यासाठी खेळायला."
"आम्ही बच्चे कंपनी.... बैलांसाठी काड्यांचा छोटा गोठा बनवायचो. बैलांना खेळायला घ्यायचो. पीठ दळायचं जात, उखळ आणि स्वयंपाकाला लागणारी सगळी मातीची भांडी पोळ्याच्या निमित्ताने बाजारात विकायला असायची. बाबा आवर्जून आणत आमच्यासाठी खेळायला."
"आई पुरणाची पोळी बनवायची. सोबत कटाची आमटी... आहाहा!! किती सुंदर आठवणी आहेत ना या...
अमोल आपण जगलेले हे अनमोल क्षण आपल्या आठवणींचा ठेवा आहे पण आपल्या अद्वैतसाठी आठवणीच नसतील. आणि ज्या आहेत त्या ही, काळानुरूप पुसट होत जातील. अनयाने संकोच बोलून दाखवला."
अमोल आपण जगलेले हे अनमोल क्षण आपल्या आठवणींचा ठेवा आहे पण आपल्या अद्वैतसाठी आठवणीच नसतील. आणि ज्या आहेत त्या ही, काळानुरूप पुसट होत जातील. अनयाने संकोच बोलून दाखवला."
"हो गं....."
"आई... आई....... !!" अमोलने आवाज दिला.
रत्नाताई देवाजवळ दिवा लावायला देवघरात गेलेल्या होत्या. त्यांनी तुळशीला दिवा लावला आणि लगेच त्या हॉलमध्ये आल्या." काय रे... काय झालं?" त्यांनी विचारलं.
"आई, मी ठरवलं होतं.. गावातल आपलं घर आणि शेती विकायची. ठेवून तरी काय करायची? पण आता मी ठरवलंय, घर आणि शेती मला विकायची नाही. . दूर राहिलो तरी घेऊ आपण आपल्या वाड्याची काळजी."
"तू, रामू काकांना सांग..... आपल्या वाड्यात त्या दोन खोल्यात हक्काने रहा म्हणावं तुमचं घर होईस्तो.. शक्य असेल तर शेती पण करा म्हणावं आपली.... नाही विकायचं आपल्याला वाडा आणि शेती." अमोलने स्पष्ट सांगितलं.
अमोलच ऐकून, रत्नाताईंच मन भरून आलं.....
"चला हातपाय धुवून, बैलांची पूजा करू आज आपण.... आणि स्वयंपाकात आज, साग्रसंगीत पुरणाचा थाट बनवते" म्हणत.... फ्रेश होऊन, अनया स्वयंपाक घरात शिरली.
रत्नाताईंनी, देवापुढे पाट ठेवून मातीच्या बैलांची पूजा केली. अद्वैतला पण आज काही तरी स्पेशल असल्यासारखं वाटतं होतं. तो ही रत्नाताईंच्या आणि अनयाच्या मागे मागे फिरत होता.
'आठवी पर्यंत गावात, नंतर पुढच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी आणि नंतर शहरात आलो. शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेर पडलो आणि गाव सुटलं. पुढे नोकरीसाठी या शहरातून त्या शहरात फिरावं लागलं. घर, संसार, आणि सारा व्याप सांभाळताना.. कुठे तरी हरवत गेलो मी.'
'पोळा सण.... मातीशी जुळवून ठेवणारा..... आज, या मोठमोठ्या फ्लॅट संस्कृतीत, किंचित सुद्धा माती पायाला लागत नाही. खरं बोलायचं तर मातीशी नातं तुटल्यासारखं वाटू लागलंय...'
'बाबा म्हणायचे... यशाचे पंख लावून, उंच भरारी घ्या पण पाय मात्र मातीत घट्ट रोवून ठेवा....' अमोलच लक्ष, भिंतीवर अडकवलेल्या वडिलांच्या फोटोकडे गेलं.
' बाबा, मी कधीच वाडा विकणार नाही... आपल्या वाडवडीलांची आठवण म्हणून तरी आपलं गावात अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.' अमोल स्वगतात रमला.
अनया स्वयंपाक करत होती. पुरणाचा दरवळ घरभर पसरला होता. रत्नाताईंनी छान पुरणाच्या पोळ्या बनवल्या. अनयाने कटाची आमटी बनवली. देवाला आणि बैलांच्या जोडीला नैवद्य दाखवला.
सर्व डायनिंग टेबल वर जेवायला बसले. पुरणाच्या पोळीवर तुपाची धार... आणि सोबत कटाची आमटी. सर्वांनी मस्त जेवणावर ताव मारला.
"मी काय म्हणतो, या दिवाळीत जावू या का गावाला?" अमोलने विचारलं.
"अरे, आम्ही दोघी स्वयंपाक घरात आता हेच बोललो." रत्ना ताई म्हणाल्या.
"हो नक्की जावू.... किती छान वाटेल न... प्रत्येक दिवाळीत आपण आपल्या गावाला जायचं." मला तर शहरापासून दूर, गावाची ओढ आहेच. आपलं गाव तर, निसर्गाच्या सानिध्यात... मुंबईपासून दूर आहे पण काही नाही... जावूया आपण दिवाळीत गावाला. अनयाला बोलताना हुरूप चढला होता.
"तस ही, आपण दरवर्षी, सुट्ट्या काढून चार आठ दिवस बाहेर फिरायला जातोच. तसं, दिवाळी किंवा इतर वेळी, वेळ मिळेल तेव्हा आपण आपल्या गावी जाऊच शकतो. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून आणि त्याच त्यापणातून तेवढाच बदल मिळेल आणि मातीशी आपलं नातं सुद्धा टिकवून ठेवता येईल." बोलताना अनयाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
"चला तर मग... जावूया या दिवाळीत गावाला.... रिझर्व्हेशन करायचं की बाय रोड कार ड्राईव्ह करत जायचं.. कार ड्राईव्ह म्हणजे पंधरा तास... अमोल आणि अनयाची जेवताना चर्चा रंगली होती. जेवताना, अद्वैतची लुडबुड सुरू होती तर रत्नाताई मात्र अमोलच्या निर्णयाने भरून पावल्या होत्या.... "मातीशी नातं" जोडून असलेली आपली संस्कृती खरच महान आहे. परंपरा, संस्कृती आणि संस्कारांची सांगड आज त्या प्रत्यक्ष अनुभवत होत्या.
समाप्त
शुभांगी मस्के...
समाप्त
शुभांगी मस्के...