Login

जग दोघांचं (भाग १)

एक छोटीशी प्रेमकथा
जग दोघांचं (भाग १)


“सुमे, आवर पटकन. उशीर झाला ना तर तो पक्या जीव घेईल माझा.”


“हो हो, आलेच. जरा म्हणून धीर नाही ह्या माणसाला. जेव्हा बघावं तेव्हा सगळ्या गोष्टींची लगीनघाई असते.”


“अगं, चल गं पटकन. तुम्हा बायकांचं ना कळतच नाही मला. आपल्याला तयार व्हायला किती वेळ लागतो मग त्यानुसार आपण किती वेळ आधीपासून तयारी केली पाहिजे हे साधं त्रैराशिक येत नाही तुम्हाला.”


“अहो प्राध्यापक, झालं गणित मांडून? निवृत्त होऊन पाच वर्षं झालीत; पण अजून काही गणित सुटलं नाही.” सुमनताई रूमच्या बाहेर येत बोलल्या. गर्द जांभळ्या रंगाची पैठणी त्यावर सोनेरी बुट्टे, पदरावर नाचरा मोर, केसांचा अंबाडा, नाकात नथ, कपाळावर छानशी चंद्रकोर, गळ्यात ठुशी आणि हातात हिरव्याकंच बांगड्या, बांगड्यांच्या मागे सोन्याचे तोडे. भास्करराव त्यांच्याकडं बघतच राहिले.


“आता बघताय काय? आता उशीर होत नाही का?” सुमनताईंनी त्यांच्यासमोर एक चुटकी वाजवली.


“सुमे, काय दिसतेस गं! अजूनही तशीच दिसतेस… तुला बघायला आलो होतो तेव्हा जशी दिसायची तशीच.” भास्करराव


“तुमचं आपलं काहीतरीच.” सुमनताई लाजतच म्हणाल्या.


“एक गोष्ट मात्र कमी आहे.” भास्करराव म्हणाले.


“काय बरं? अजून बांगड्या घालून येऊ का? की एखादी मोत्याची सर घालू गळ्यात?” सुमनताई बोलत होत्या. तितक्यात भास्कररावांनी पानाच्या पुडीतला कुंदाचा गजरा काढला आणि सुमनताईंच्या अंबाड्यात माळला.


“आता कशी एकदम सुंदर दिसतेय.” भास्करराव


“तुमचं आपलं काहीतरीच…” सुमनताई परत लाजल्या.


“ह्या ‘तुमचं आपलं काहीतरीच’नं वेड लावलंय मला. तुझ्या तोंडून हे वाक्य ऐकण्यासाठी मी काहीही करू शकतो.” भास्करराव


“हो का? चला मग लवकर… आता उशीर होत नाही का? तुमचा मित्र तिथं खोळंबला असेल.” सुमनताई


“हा पक्या पण ना, कबाबमें हड्डी बनलाय. चला.” भास्करराव


“काय हो, काय पक्या म्हणता, एवढं चांगलं नाव आहे त्यांचं प्रकाश… आता तर भाऊजींना सूनही आलीये. कसं वाटेल तिच्यासमोर असं पक्या म्हटलेलं.” बोलता बोलता सुमनताईंनी दरवाज्याला कुलूप लावलं आणि दोघे घराबाहेर पडले.

“का नाही म्हणणार… अगं बालक मंदिरापासून आम्ही एकाच वर्गात शिकलो. आता एवढ्या वर्षांपासून लागलेली सवय आता त्याला सून आली म्हणून जाणार आहे का? काहीतरीच बोलते.” भास्कररावांनी अंगणात उभी असलेली त्यांची आवडती पद्मिनी गाडी काढली. सुमनताई त्यांच्या बाजूच्या सीटवर बसल्या.

“बरोबर आहे तुमचं, काही सवयी आणि काही व्यक्ती ह्या कधी बदलत नसतातच.” सुमनताई म्हणाल्या. दोघे आपल्याच धुंदीत प्रकाशरावांकडे जायला निघाले.

क्रमशः