Login

जग दोघांचं (भाग ३)

एक छोटीशी प्रेमकथा
जग दोघांचं (भाग ३)

“आरती काका काकूंना मुलबाळच नाहीये. बाबा सांगत होते, भास्करकाका आणि बाबा लहानपणापासून एकाच वर्गात होते. काकांच्या घरचं वातावरण अगदी जुनाट आणि कर्मठ विचारांचं होतं. काकांचं आणि काकुंचं लग्न झालं. काकूही एकत्र कुटुंबात वाढलेल्या होत्या. त्यामुळं काकांच्या घरी त्यांना जुळवून घेण्यात काही अडचणी नाही आल्या. त्यांच्या लग्नाला एक वर्ष झाल्यावर मात्र काकांच्या आई काकूंच्या मागं नातवंड हवं म्हणून तगादा लावू लागल्या. त्यासाठी देवधर्म, उपासतापास, मांत्रिक वगैरे सगळे सोपस्कार पार पडले. पण काकूंना दिवस राहिले नाहीत. मग काकांच्या आईने त्यांच्या मागे दुसरं लग्न कर म्हणून तगादा लावला. काकांना मात्र दुसरं लग्न करायचं नव्हतं. काकांच्या आईने मग काकूंना खूप त्रास द्यायला सुरुवात केली. शेवटी नाईलाजाने काका काकूंना घेऊन इकडं आले.

बाबांच्या ओळखीने त्यांना कॉलेजमध्ये नोकरी लागली. इकडं आल्यावर त्यांनी डॉक्टरांना दाखवलं, दोष कुणातच नव्हता. एकत्र कुटुंबात वाढलेल्या काकू, इकडं आल्यावर अजूनच एकट्या पडल्या. राहून राहून मुल नाही याचा विचार करू लागल्या. काही दिवसांतच त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. काकांनीपण मग त्यांच्यावर योग्य औषधोपचार करून घेतले. काकाच त्यांचं विश्व बनले. हळूहळू काकू ह्या सगळ्यांतून बाहेर पडल्या. काका प्रत्येक सुट्टीत त्यांना बाहेर फिरायला घेऊन जात. तुला सांगू, त्यांचा पूर्ण भारत फिरून झालाय. तू कधी त्यांच्या घरी गेलीस ना तर बघशील एका खोलीत त्यांच्या सगळ्या टूरचे फोटो फ्रेम करून लावले आहेत.” प्रसाद


“ए वॉव! खरंच!” आरती


“हो आणि हे तर काहीच नाही. काका काकू सगळ्या सामाजिक कार्यातही पुढं असतात बरं. आपल्या सारख्या तरुण लोकांनाही लाजवेल अशी कामं करतात दोघे. आता बघशील ना, श्रावण सुरू होईल आणि सनांची रेलचेल सुरू होईल तेव्हा काका काकूंची धमाल तर बघशील आणि गणपतीतला तर त्यांचा माहोल विचारूच नकोस.” प्रसाद बोलत होता.


“किती छान ना; पण प्रसाद काका काकूंनी दत्तक मुल का नाही घेतलं?” आरती


“कारण एक दत्तक मुल घेऊन फक्त त्याच्याच आयुष्याचं भलं होतं, असं काकूंचं म्हणणं पडतं. काका काकूंनी मुल दत्तक घेतलं नाही पण आपल्या इथल्या अनाथाश्रमातल्या बऱ्याच मुलांच्या शिक्षणाचा खर्च ते करतात.” प्रसाद


“भारीच रे! वरकरणी ह्या दोघांकडं पाहिलं की असं वाटतं ह्यांच जग फक्त दोघांचं आहे; पण आत डोकावल्यावर कळतं… ह्यांच जग किती मोठं आहे.” आरती प्रसादला म्हणाली आणि सुमनताई आणि भास्करावांच्या नकळत त्यांच्या मागं जाऊन उभी राहिली.

“अहो ऐकलंत का, मघाशी त्या मंगलावहिनी रडत होत्या. त्यांचा मुलगा आणि सून विदेशात जाणार आहेत म्हणे. ह्या दोघांना म्हणाले की आता तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते. आमच्याकडून काही अपेक्षा ठेऊ नका.” सुमनताई भास्करावांना सांगत होत्या.


“हे असं ऐकलं की खरं सांगू बरं वाटतं आपल्याला मुलबाळ नाहीये त्याचं… आपलं जग आपल्या दोघांचं… अगदी कायमच.” भास्करराव


“तुमचं आपलं काहीतरीच!” सुमनताई नेहमीप्रमाणे लाजल्या.