Login

जगा वेगळं सासर भाग - 8

एक अशी कथा जी प्रत्येकाला विचार करायला भाग पाडेल


जगा वेगळं सासर भाग - 8
लक्ष्मीच्या जन्मानंतर आज पहिल्यांदा घरात इतकं उदास वातावरण होतं. सासूबाई आज नेहमी सारख्या लवकर उठल्या नव्हत्या. गेली कित्येक वर्षांपासून त्या नित्य नियमाने पहाटे आंघोळ करून पूजा करायच्या पण आज असं झालं नव्हतं. पूर्णा चोर पावलांनी त्यांच्या खोलीजवळ गेली. बाबा वृत्तपत्र वाचतं होते आणि आई अजूनही पांघरूनातच होत्या. बघून तिला आश्चर्य वाटलं. आईंची तब्येत तर खराब नाही ना? असं तर कधी नाही होतं? काय झालं असावं? बाबांना विचारू काय? नको नको उठतील कदाचित थोड्या वेळात. पूर्णा बाहेरूनच परत गेली.
लक्ष्मी उठून तयार होती. शहाण्या बाळाप्रमाणे आज तिने पटपट सगळं केलं होतं. दूध पिऊन ती आजीला भेटायला तिच्या खोलीत गेली.
" ए आजी, ए आजी तू आज किती झोपून आहेस. उठ ना...उठ ना... "
"काय ग लाडो, मी ना फार थकली आहे. रोजचं तेच .... आंघोळ करा, पूजा करा मग आवर सावर करा. कंटाळा आला म्हणून म्हटलं आज जरा पडून राहावं ."

"आजी पण हे तू बरं केलं. काय रोज रोज तेच करावं. तू झोप आराम कर. मी ना तुझे पाय दाबून देते."

"अगं बाई किती ग गोड माझं पिल्लू" त्यांना एकदम भरून आल. त्यांनी तिला आपल्या कुशीत घेतलं. ती ही त्यांना बिलगून गेली.

"आज्जी एक विचारू काय?"

"हम्म्म्म विचार "

" मी आता स्पर्धेतून बाद होणार आहे ना? मला ते काढून टाकतील ना? "

" अरे कशाला ते लोकं तुला बाद करतील? "

"आई माझ्यासोबत डान्स नाही करणार ना म्हणून."

त्या क्षणभर शांत झाल्या....
" हे बघ मी पटकण आवरून येते मग बोलूया आपण"

"बरं पण तू पटकन ये हा आज्जी."

तेवढ्या पुरतं त्यांनी लक्ष्मीला शांत केलं होतं. पण त्यांच्या मनात माजलेला काहूर कोण शांत करणारं होतं. त्यांचच मन त्यांना खात होतं.
सगळा प्रसंग आपण उभा केला म्हणून त्याला सावरण्याची जवाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल.
पूर्णा तिकडे जाम घाबरलेली होती. लक्ष्मीने तिला सांगितलं होतं आज्जी येते आहे म्हणून. तिला खूप धडधडत होतं. तिने लक्ष्मीला आधीच ताकीद देऊन ठेवली होती. आज्जी जवळ अजिबात डान्सबद्दल बोलायचं नाही. ती बिचारी मन मारून आज्जीची वाट बघतं बसली होती.

" काय ग काय झालं? असा चेहरा का पाडलास ? "
आज्जीला सगळं माहिती असूनही त्यांनी मुद्दाम तिला विचारलं.
" ही आहे पूर्णा, जेव्हा तेव्हा नुसतीच रागावते मला".
" ये वेडू, आई आहे ती तुझी तिला असं नाही बोलू".
"मग ती का रागावते मला".

" घरातील सगळे लक्ष्मीच्या पुढे हजर हवे आहेत मिनटात अगदी", आज्जीने जरा मोठ्या आवाजात सगळ्यांना आवाज दिला.

सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. आई काही तरी बॉम्ब फोडेल हे त्यांना माहितीच होतं. पण पुढे काय होईल या भीतीनेच सगळे घाबरले. दोघी आजी - नात आराम खुर्चीवर बसल्या होत्या. सगळे जमले .
" बघा जास्ती काय बोलायचं तसं बनत नाही पण नेहमी नेहमी तुम्ही सगळे मला वाईट ठरवता म्हणून मला बोलावं लागतं."
पूर्णाची धडधड जाम वाढलेली होती जणू हृदय बाहेर येऊन धडधडते की काय असं झालं होतं तिला. मंदारला तर विचारू नका. आता कुठे सगळं नॉर्मल व्हायला लागलं होतं त्याच्या आयुष्यात. आता वादळ नको. आई काय म्हणेल याची काही शाश्वती नाही म्हणून तो ही आवाजाकडे तग लावून ऐकत होता.

"काय बोलावं नेहमी नेहमी, मी काय गब्बर सिंग आहे काय मला बघून सगळे असे घाबरताय. "

सगळे आणखीन तावर तीवर झाले.
" हे बघा लक्ष्मी स्पर्धा जिंकली पाहिजे सध्या आपल्या सगळ्यांच हेच ध्येय असायला हवं. बाकी सगळं विसरा. "
सगळे एकमेकांना बघू लागले.
" आता सगळं सविस्तर सांगावं लागेल काय?", एक नजर सगळ्यांकडे फिरवून त्या म्हणाल्यात.
" ती जिंकली ना पहिली फेरी आता द्वितीय पण जिंकणार. "
" आई सकाळी सकाळी कशाला आम्हाला फिरवतेस सरळ बोल ना. "

"अजून किती सरळ बोलायचं रे... म्हणजे माय - लेकी दोघीही स्पर्धेत सहभागी होणार. असं स्पष्ट सांगू काय? हिंट दिलेली कळतं नाही काय तुला? असा तर खूप हुशार बनतोस ", त्या मंदारची मस्करी करत म्हणाल्या.
"काssssss य!" , मंदार चक्क आनंदाने पूर्णाला मिठी मारतो.

"आपलं सेलिब्रेशन नंतर खोलीत जाऊन करा. पटपट तयारीला लागा."
देशमुखांच्या घरी आनंद भरभरून आला होता. उत्सव साजरा करावा समजेनास झालं होतं मंदार-पूर्णाला. कोणत्या जन्माची पुण्याई म्हणून तिच्या पोटी लक्ष्मीने जन्म घेतला आणि वाटेला आलेली सगळी दुःख दुर होऊ लागली.
रडावं - हसावं, की जोरजोरात आरडा ओरड करत आनंद व्यक्त करावा तिला कळत नव्हतं. या त्याचं सासूबाई होत्या ज्यांना पूर्णाला सोबत मिरवायलाही लाज वाटायची. चार चौघात त्या तिची ओळख सुद्धा नाही दाखवायच्या. तिच्या धर्माचा, तिच्या संस्कृतीचा, तिच्या प्रत्येक गोष्टीचा त्या तिरस्कार करायच्या. तिची सावलीही नकोशी वाटायची त्यांना. पण पूर्णाचे ते ही वाईट दिवस पालटले. लक्ष्मीच्या रूपात देवाने तिची झोळी आनंदाने भरली होती.

"हे बघ पूर्णा आजवर जे झालं ते झालं पण पुन्हा या घरात असं होणार नाही. प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या आवडीने जगायची मुभा आहे. ती मी एवढ्या दिवसांपासून तुझ्याकडून हिरावून घेतली होती पण अशी चूक या पुढे माझ्या हातून घडणार नाही. माझा स्वभावचं तसा होता ग.. प्लीज तू मला माफ कर", अगदीच पश्चाताप व्यक्त करत भरलेल्या डोळ्यांनी त्या म्हणाल्या.

"आई जे झालं ते झालं. मला आता काही नको" ती ही डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाली.

बाबा आणि मंदार मात्र आनंदाने त्यांना एकजीव होतांनी बघतं होते.
सासूबाई लक्ष्मीसाठी काहीही करायला तयार होत्या. पूर्णा परत कधी घरच्यांच्या समोर डान्स करेल असं कुणालाच वाटलं नाही शिवाय त्या या स्पर्धेत तिला भाग घेऊ देतील याची कुणालाच शाश्वती नव्हती. पण सगळं उलट झालं. त्यांनी दोघांना स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी दिली होती.
सकाळ पासून गाल फुगवून बसलेली लक्ष्मी घरभर उड्या मारत फिरत होती. तिला ही माहिती होतं आपल्या प्रत्येक समस्येचं निवारण फक्त्त आज्जीच करू शकते. तिने आजीच्या मटामटा पप्प्या घेतल्या. आजीनेही तिला घट्ट कुशीत घेतलं. मंदार चे बाबा आपल्या बायकोला एका लहानश्या मुलींसाठी इतकं प्रेम बघून आवक होते आणि आंनदीही. आजतोवर ते सुद्धा आपल्या बायकोला बदलू शकले नव्हते. त्या जे म्हणतील घरात तेच व्हायचं आणि त्यांचा निर्णय मुकाट्याने सगळे ऐकायचे. पण लक्ष्मीने असाध्य गोष्ट सहज साध्य केली होती...
पूर्णा आणि लक्ष्मी जय्यत तयारीला लागल्या होत्या. रोजचे कामं, क्लिनिक आणि मग डान्सची प्रॅक्टिस.
स्पर्धेची तारीख जवळ आली होती. आदल्या दिवशी पूर्णा आणि सासूबाईंनी सगळी तयारी केली. दोघींचे कपडे , दागिने, प्रॉब्स सगळं काढून ठेवलं.
स्पर्धेचा दिवस उगवला. या आधी कित्येक स्पर्धा तिने चुटकी सरशी जिंकल्या होत्या. पण ही स्पर्धा खूप वेगळी होती. पहिल्यांदा ती आपल्या मुली बरोबर स्टेजवर उतरणार होती. जीव धडधड करीत होता. सगळं ठीक होईल की नाही पहिल्यांदा स्टेजवर जायच्या आधी ती घाबरत होती. लक्ष्मी आपली बिनधास्त होती. तिला आता घाबरायच काहीच कारण नव्हतं कारण ते डिपार्टमेंट तिने आपल्या आईला दिलं होतं.
या सगळ्या प्रसंगात सगळ्यात आनंदी व्यक्ती जर कुणी असेल तर ती पूर्णाची आई होती. त्याचे पाचही बोट तुपाने लबलबले होते. मुलीला आपली हौस आणि आवड पूर्ण करायची संधी मिळाली होती आणि नातीला मुलीचा वसा जपायची परवानगी. अजून काय हवं एका मुलीच्या आईला आपली मुलगी सासरी खुश राहावी बस इतकंच..!

--------------------------------------------------------------------------------

क्रमशः

एक तरी क्षण आपल्या आयुष्यात असा नक्की येतोच जेव्हा आपली सगळी दुःख दुर सारल्या जातात. पूर्णाच्या आयुष्यातही तो क्षण आला होता.
पण आता पुढे काय?..... कुछ तो गबडब हैं दया... ही वादळाच्या आधीची शांती तर नव्हे ना..

©️®️ सौ. अश्विनी रोशन दुरगकर.
0

🎭 Series Post

View all