Login

जगा वेगळं सासर भाग - अंतिम

आगळी वेगळी कथा जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल


घरात पूर्णा - लक्ष्मीच्या ऐवजी कुणालाही नाचता येतं नव्हतं. मंदारचा आणि डान्सचा छत्तीसचा आकडा होता. त्याने साधे हात-पाय जरी हलवले तरी सगळे हसायचे. त्याचा डान्स कम नाही कॉमेडी जास्ती वाटायची. सासु-सासऱ्यांकडून असली अपेक्षाही करणे शक्य नव्हतं. पूर्णाचे आई - बाबा पण अर्ध्या वयाचे होते. मग त्यांच्याकडूनही अपेक्षा करू शकतं नव्हते.

मग करायचं तरी काय ? इतकी मेहनत! प्रॅक्टिस ! बघितलेले सगळे स्वप्न असेच पाण्यात जाणार काय?

"आई आपण किती हार्डवर्क केलं. दोन राउंडही जिकंले पण आता आपण बाहेर होणार! मला खूप वाईट वाटते आहे."

"लाडो असं मनं छोटं नाही करायचं. काय झालं आपण आपलं परफॉर्मन्स छान दिलं ना आतापर्यंत मग पुढे ही बघू काय होतं आणि नाही तर नाही एवढ्या दुर येणं काही सोपं नव्हतं. बघ किती कंटेस्टंट आले होते ऑडिशनला. तरीही तू सिलेक्ट झालीस ना? मग तू खूप स्पेशल आहेस. एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून मन नाराज करायचं नाही. येईल परत असे खूप चान्स तेव्हा परत जिंकशील तू".

"पण या वेळेला तर आपण हरणार आहोत ना!"

"नको तू काळजी करुस. करूया काही तरी आपण ", पूर्णाने पुरतं तिला शांत केलं होत.
पण तिलाही काळजी वाटतं होती करावं तरी काय तिसरा सदस्य कोण असणार? काही ऑप्शनचं नव्हते
तिच्याजवळ. दुपारची कडक उन्हाची वेळ होती. विचाराविचारात दोघींचा डोळा लागला. घरात सगळेच गुमसुम होते. रोज सारखी चहल पहल घरात नव्हती. सगळं घर सामसून पडलं होतं. सगळे जण आपआपल्या खोलीत विश्रांत करीत होती...
अचानक मोठयाने गाणं वाजलं . मोठ्याने म्हणजे खूप मोठ्याने. भोंगा लावल्या सारखं. पूर्णाने लगेच लक्ष्मीचे कान हातांनी झाकलेत. तरीही ती दचकून उठली. बाकीचेही दचकले. देशमुखांच्या घरात आजतोवर एवढ्या मोठ्याने गाणं वाजलं नव्हतं. आपल्या संस्कृतीचा अपमान मानायचे सगळे. कोण मूर्ख असेल भर दुपारी एवढ्या मोठ्याने गाणे वाजवायला. सगळ्यांनाच प्रश्न पडला होता.
अजूनही आवाज येतच होता. काय ते बाहेरच जाऊन बघावं म्हणून सगळे धावत पळत बाहेर पडले. बघते तर काय! एक वेगळंच स्वप्न! उघड्या डोळ्यानीं बघितलेलं. स्वप्नातही विचार न केललं. जगानिराळं ! डोळे कितीही फाडलेत. कितीही मोठे करून बघितले तरीही विश्वास न होण्यासारख.
मोठ्ठा आश्चर्याचा धक्का घरातीला प्रत्येकाला बसला होता.
मंदारची आई... हो त्याच.... पूर्णाच्या सासुबाई... भरतनाट्यमचा ड्रेस घालुन नाचत होत्या...

काय..?

"होsssss" अगदी बरोबर वाचलंय तुम्ही...

त्याच सासुबाई ज्यांनी सुन चार चौघात नाचली म्हणुन लग्नातून हाकलुन लावलं होत... हो त्याच त्या... ज्यांना नाच गाण्याची आवड म्हणजे नुसता माज. वाह्यात संस्काराची मुलं असले शौक ठेवतात असा त्यांचा विचार होता.
त्यांच त्या सुलभाताई देशमुख. प्रॉपर भरतनाट्यमचा ड्रेस बीस घालून ... सेम जश्या च्या तश्या मुद्रा करीत नाचीत होत्या... अगदी अशक्य ज्याची कल्पना कोणी स्वप्नातही करू शकतं नव्हतं ते आज घडल होत...

सासरे बुवा, मंदार, लक्ष्मी, पूर्णा, घरी कामावर असणारी मंडळी. सगळे डोळे फाडुन एक तार बघतं होते. जस की वाघ दिसला की काय त्यांना .डोळयांवर विश्वास होण्यासारखी ही गोष्ट नव्हतीच.

वयाच्या ५८ व्या वर्षी एका पूर्ण केस पांढरे झालेल्या स्त्रीला भरतनाट्यम करतांना तिने पहिल्यांदाच बघीतले होते. ते ही एवढ सुरेख. उत्स्फूर्त होवुन.एक एक मुद्रा बिलकुल परफेक्ट. जस की फुल्ली ट्रेन नृत्यांगना नृत्य करते अगदी तशी . पूर्णा स्वतः भरतनाट्यम नृत्यांगना होती. ती सगळ्या मुद्रा जाणून होती. त्यांना बघून तिचाही कंठ सुकला होता. हसावं, रडावं की आरडा ओरडा करत त्या दृश्याची साक्ष द्यावी तिलाच कळतं नव्हतं.
सगळे धरे चे धरे रहिले... त्या विस्मयकारक घडलेल्या घटनेचे वर्णन शब्दशः करताच येणार नाही अस दृश्य होतं .

गाणं संपल आणि लक्ष्मीने आजीला धावत जावून घट्ट मिठी मारली... त्या लहान मुलीप्रमाणे सैरवैरा रडू लागल्या. मंदार आणि पूर्णा ही गेले आणि त्यांना मिठीत घेतल. त्यांचही मनं आलं. आपण आपल्या आईला कधीच समजू शकलो नाही. तिने किती त्याग केलेत आपल्यासाठी ते ही आपल्याला कोणतीही झळ न लागता. सगळ्यांचा विचार केला. सगळ्यासाठी राबराब राबली पण स्वतःचा विचार करायला मात्र विसरून गेली. याची त्याला खूप खंत वाटतं होती .

“मला माफ़ कर ग पूर्णा... माझ्यावर पडलेल्या बंधनाच्या बेड्या मी तुझ्या पायी टाकल्या. मी कित्येकदा तुझ्यात आपलं तरुणपण बघायची. अगदी तुझ्याच सारखं मला फिरायला, वेगवेगळे खायला - बनवायला खूप आवडायचं. पण असं सासर मिळालं की त्यात नुसतं पिंजऱ्यात कोंडून ठेवल्या जायचं. तिथे सुनांना बाहेर जायचं तर लांबचच पण घरातही मोकळेपणाने वावरण्याची मुभा नव्हती", सासुबाई ओक्साबोक्शी रडतं तिला म्हणाल्या.

“आई तुम्हीच मला माफ करा . मीच तुम्हाला समजू शकले नाही. तुम्ही किती केलं या घरासाठी. ”, सासुबाईंचे अश्रू पुसत पूर्णा म्हणाली...

“ त्या दिवशी तुला लग्नात नाचताना बघून माझं मन खूप भरुन आलं होत. तुझ्यात मला मीच दिसली. अस वाटलं त्याच क्षणी येवून तुला मिठीत घ्यावं पण दुसऱ्याच क्षणी घरच्या रुढी परंपरांनी मला दुर सारलं .. मी माझ्या काळातील एक चांगली नृत्यांगना होती. पण अगदी वयाच्या 16 व्या वर्षी कोवळ्या वयात माझं तुझ्या सासऱ्यांशी लग्न झालं . ना पुढे शिकू शकली ना कोणती हौस पुर्ण करू शकली. मी माझ्या आई - बाबांची एकुलती एक लेक. स्वतंत्र विचारसरणीत वाढलेली. स्वच्छंद विचारांची . तेव्हाची दहाव्या वर्गात मेरिटमध्ये आली होती. फुलपाखरा सारख उडणारं माझ मन. इथे येवुन क़ैद झालं . माझे सासु सासरे अतिशय शिष्तप्रिय आणि तत्ववादी होते. त्यांच्याशी जुळवून घेता घेता मी ही त्या प्रवाहात गुरफटत गेले आणि तु ही तसच करावं अशी अपेक्षा केली. मला खरच माफ कर ग! मी खुप चुकले. खर तर मी तुला मुक्त वातावरणात वावरू द्यायला हव होत. पण मी माझ्याच ऐटीत राहीले. तुझ्या नाज़ुक मनाला समजु शकले नाही. जे माझ्यासोबत घडल मी त्याचीच पुनरवृत्ती तुझ्यावर केली. हे पाप करतांनी मी क्षणभरही विचार केला नाही".

"आई तुम्ही रडू नका."

आज मनं मोकळं करू दे ग माझ! मनसोक्त रडू दे. 40 वर्षांच ओझं आहे मनावर आज वाहू दे सगळं. या इवलाश्या निरागस ईश्वरीय आत्म्याने माझ्यातील बाईमाणूस जागी केली ”

“आई आता जे झालं ते झालं."

“अग पण आई तु हे आम्हला सांगितलं का नाहीस”, मंदार म्हणाला.

“अरे राजा , हे गुपीत माझ्या सोबतच या घरात आलं आणि माझ्या सोबतच दहन झालं असतं. पण ही माझी राणी आहे ना तिने मला नवं जीवन दिलं", लक्ष्मीचा लाड करत त्या म्हणाल्या.


“अग... सुलभा मला तर सांगायच होत ना..? तुझा खरा गुन्हेगार तर मी आहे”, सासरे बुवा म्हणालेत..


“अहो.... जे नाही झाल त्याची खंत मला अजिबात नाही.. अर्ध आयुष्य तर कैदेतल्या मैनेप्रमाणे गेलं पण आता मात्र मी पुरेपुर आनंद लुटून पुढले दिवस घालवणार आहे”....

सगळे खुप आनंदीत होते... गगनात मावेना एवढ सुख त्यांच्या झोळीत पडल होत... एखाद झाड कस एकदम बहरत आणि तुडुंब फुलांनी गजबजत तसेच सगळयांचे मन झाले होते. घराला नवचैतन्य लाभलं होतं.

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्ष्मीच्या समस्येचाही आता अंत झाला होता... तिला तर इकडे उडी मारु की तिकडे अस वाटत होत... घरात तीन तीन नृत्यांगना हजर होत्या... त्या ही एकदम एक्सपर्ट! प्रोफेशनल!

"लक्ष्मी आता बघूया कोण तुम्हाला हरवतं. ही स्पर्धा तर तूच जिंकशील", सासरबुवा मोठ्याने गर्वाने म्हणाले.

घरात पुन्हा चहल पहल सुरु झाली. एरवी मोजकं बोलणाऱ्या सासूबाई सतत सगळ्यांशी गप्पा करीत होत्या. सगळीकडे खेळी मेळीचं वातावरण होतं. घराचा जणू पुनर्जन्म झाला होता.
आता तयारी होती अंतिम महा फेरीची. पूर्णा आणि सासुबाई दोघीही आपल्या आपल्या अनुभवाच्या मेळाने नृत्याचा अभ्यास करु लागल्या..शेवटच्या तारखे पर्यन्त जोमात सराव झाला...

स्पर्धेचा दिवस उजाडला..तब्बल ४० वर्षानंतर स्टेजवर
परफॉर्मन्स देणं काही सोप नव्हत. सासुबाई खुप नर्व्हस होत्या. पण पूर्णा आणि लक्ष्मी त्यांना वेळोवळी धीर देत होत्या..तिघीही तयारी करून आल्या होत्या .त्यांना बघताच लोकं त्याची फोटो काढायचे. अगदी नजर वेधावी एवढ्या सुंदर त्या दिसत होत्या. ५८ वर्षाची आजी भरतनाट्यम पेहरावात कशी दिसत असेल याची आपण केवळ एक कल्पना करू शकतो. त्यांच्या चेहऱ्यावर एवढं तेज होतं की बघणारा भारावून जाईल.
परफॉर्मन्स सुरु झाले. दुसऱ्या क्रमांकावर त्यांचा नंबर होता. तिन्ही स्पर्धेकांमध्ये फक्त्त लक्ष्मीच्या टिममध्ये आजी - आई आणि नात असं कॉम्बिनेशन होतं म्हणून उपस्थित दर्शक मंडळीं आणि जजेस सुद्धा त्यांच नृत्य बघण्यास आतुर होते.मंदार आणि सासरेबुवा त्यांना मोलाचा पाठींबा देत होते...
त्यांच्या टिमचं नाव अनाउन्स झालं. तिघींनी एकमेकांचे हात धरलेत आणि स्टेजवर गेल्या.
स्टेजवर देशमुख कुटुंबाच्या तीन पिढ़्या खंबीरपणे आणि आत्मविश्वासाने उभ्या होत्या.

एक ज्यांनी चार भिंतींना सजवुन घराचा पाया मजबुत केला. दुसरी जीने चार भिंतींच्या घराला घरपण दिलं आणि तिसरी ती जिने घराला आत्मा दिला.मंचावर जाताच सगळी मंडळी आश्चर्याने बघत होती. त्यांचा डान्स सुरु झाला.

त्यांच गाणं संपत पर्यन्त लोकांनी भरभरुन टाळयांचा गजर केला. सगळे खूप उत्साहाने त्यांचा डान्स बघतं होते. तिघींनी स्टेज हादरवणारा परफॉर्मन्स दिलं . जजेसनी आणि प्रेक्षकांनी उभे राहुन त्यांना मानाचा मुजरा दिला. पूर्णा आणि डोळे डबडबले होते .. सासरेबुवा तर चक्क रडत होते. खाली उतरून तिघीही लहानमुलांन सारख्या उड्या मारीत होत्या . आयुष्यात आपले छंद शेवट पर्यन्त जोपासल्या नंतर स्वर्गाचा आनंद मिळतो... तोच त्या तिघी अनुभवत होत्या...

सगळे परफॉर्मन्स आटोपले. आज महा अंतिम फेरी होती. आजच निकाल जाहीर होणार होता.
" आर यु एक्साईटेड"
"येस"
"सगळ्यांनी अप्रतिम परफॉर्मन्स दिले. पण शेवटी स्पर्धा आहे विजेता एकच ठरणार. आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप आतुरतेने निकालाची वाट बघत आहात. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार."

जाणते-अजाणते सगळे लोकं लक्ष्मी लक्ष्मीच्या नावाने ओरडू लागलेत.

देशमुख कुटुंबात सगळ्यांचे हृदय वेगाने धडधडत होते. सगळे एकमेकांचा हात पकडून उभे होते.

"ओह्ह्ह्ह येस, अँड द विनर ईज लक्ष्मी अँड फॅमिली"

प्रथम क्रमांक पत्कारून लक्ष्मी विजयी ठरली. तिघीही टणाटण उड्या मारू लागल्या. बक्षीस घेण्यासाठी त्यांना स्टेजवर बोलावण्यात आलं. तिघीही बक्षीस घेण्यास स्टेजवर गेल्या. सगळ्यांनी स्टॅंडिंग ओव्हे शन देऊन टाळ्यांचा वर्षाव केला.

तिघींनी हातात बक्षीस घेतलं आणि नाचु लागल्या...

एका छोट्याश्या स्पर्धेने तिघींचही आयुष्य कायमच बदलुन टाकलं होतं .

जजेस नी लक्ष्मीच्या आजीला त्यांचं मनोगत व्यक्त करण्यास आग्रह केला.
"काय बोलावं? एरवी मी खूप बोलते पण आज माझ्या ओठांवरील शब्द गोठलेत. सांगायचं म्हटलं तर आज मी जे काही आहे ते फक्त्त आणि फक्त्त या चिमुकली मुळे. मला नवजीवन देणारी माझी नात आणि मला प्रोत्साहित करणारी माझी सून. दोघीही माझ्या माझ्या आयुष्यात परी बनून आल्या आणि मला जगण्याचा नवा हेतू मिळाला. खरं तर लग्न आधी मी डान्स करायचे पण लग्नानंतर सासरी हा सगळा प्रकार नाही चालायचा. माझे सासु - सासरे खूप रूढीवादी होते. मीही रूढीवादी झाले होते अगदी त्यांच्यासारखेचं पण माझ्या लक्ष्मीनी मला बदलायला भाग पाडलं आणि मी तुमच्या समोर उभी आहे. मला माझ्या सुनेचे आणि लक्ष्मीचे खूप खूप आभार मानायचे त्यांच्यामुळे मला एवढ्या मोठ्याने प्लॅटफॉर्मवर तर फार्म करायची संधी मिळाली." सगळे शांत चित्ताने त्यांच बोलणं ऐकत होते.
घरी जाऊन सगळ्यांनी पार्टी केली आणि आनंद साजरा केला....

सासुबाई आता डान्स क्लास घेतात... पूर्णा क्लिनिक आटपुन सासुबाईं सोबत क्लास सांभाळते आणि सगळयांचा जीव की प्राण असणारी लक्ष्मी. आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आहे.

अशी होती एका दक्षिण संस्कृतीमधून मराठा संस्कृतीमध्ये विरघळून गेलेल्या पूर्णाची कथा...

—————————

मैत्रिणींनो छंद कोणता ही असो त्याला शेवट पर्यन्त जोपासणे खुप गरजेच असत.. ज्यातून आपल्याला आनंद मिळतो... ज्या झोन मध्ये आपण कम्फर्टेबल असतो ते आपण नक्कीच करायला हव.. बरेचदा बरेचदा लग्न, नवरा, नौकरी, मुलं - बाळ, सासु - सासरे या सगळयांमुळे आपण स्वतः कडे दुर्लक्ष करतो. स्वतःच्या हौशी नवशी विसरून जातो आणि अर्ध आयुष्य असंच निघून जातं. पण वेळेतन वेळ काढुन आपण स्वतःला द्यायला हवा. आपण कितीही म्हातारे झालो तरी आपलं हृदय नेहमीच तरुण असतं . तेव्हा प्रत्येक क्षण भरभरून जगा.
चला आज सगळ्यांनी एक प्रण करूया. आपले छंद आयुष्यभर जपूया...

धन्यवाद!
---------------------------------------------------------------------------------
लेखिका - सौ. अश्विनी रोशन दुरगकर.
0

🎭 Series Post

View all