Login

जगावेगळे श्री. आणि सौ.

A different couple's different love story...

श्रीचे व्हॉट्सॲप स्टेटस पाहून निनाद तिला फोन करतो.


काय यार श्री.
कोण आहे ही तुझी सौ?
काही कल्पना नाही. काही नाही आणि अचानक हे असे व्हॉट्सॲप स्टेटस पाहून मला धक्का बसला यार.
तू तर गेले काही महिने एकांतवास घेतला होता. मला वाटलं तुझी बत्ती गुल झाली का? माझी तुझ्या आत्म्याला शांती द्यायची इच्छा मला मारावी लागणार असे वाटलं.
तुझा कॉल लागतं नव्हता. व्हॉट्सॲप नाही त्यातच तुझ्या घरी सुद्धा टाळ लागलेलं. तू घरी सुद्धा नाही म्हंटल्यावर मनात विचार आला की देहांत झाला असेल आणि लावारिस म्हणून महानगरपालिका वाल्यांनी तुला जाळून टाकलं असेल.
तू काही बोलणार आहेस का? मी एकटाच बोलतोय कधी पासून.

तू काही बोलू दिलं तर बोलेन ना निनाद.
तुझी बडबडच एवढी चालू आहे की मला काही बोलताच येत नाहीय.
तुला सगळे सांगेन पण मला काही वेळ हवा आहे. आपण लवकरच भेटू मग तुला सगळे सविस्तर सांगेन. आता सध्या एवढच सांगेन. मी खूप आनंदी आहे.


बरं ठीक आहे. तू  आनंदी आहेस हेच खूप झालं माझ्यासाठी, त्यामुळे आपण बाकी सगळे लवकरच भेटून बोलू.
चल काळजी घे.
ठेवतो कॉल. बाय.


निनादने कॉल ठेवल्यानंतर श्रीच्या डोक्यामध्ये विचारांचं चक्र सुरू होत. कसे सांगू मी सगळ्यांना सत्य परिस्थिती आणि सांगितल्यानंतर समजून घेतील की मला गृहीत धरतील? काहीच कळत नाहीय. ह्या सगळ्यात बिचाऱ्या सौ ची काहीच चूक नाहीय. तिला उगाच कोणी काही बोलायला नको असे झाले तर मला नाही सहन होणार. तिच्या भूतकाळात तिने खूप काही सहन केलं आहे.
डोक्यात विचारांचं काहूर माजले असतानाच. श्रीला अचानक त्या दिवसाची आठवण होते. जेव्हा सौ आणि श्रीची पहिल्यांदा भेट झाली होती. भेट कसली ती! तो एक खूप मोठा अविस्मरणीय दुःखद प्रसंग होता.

१२ जानेवारी २०२१

श्रीला उशिरापर्यंतच्या मीटिंगची आणि त्या नंतर उशिरा एकट घरी जायची आता जणू सवयच झाली होती. किती ही लवकर निघायचा विचार केला तरी उशीर हा होतंच असे. आजही रात्रीचे ११ वाजून गेले होते. श्रीने नेहमीप्रमाणे आपल्या सखीला घेतलं त्यात आपली ती नेहमीची मराठी गाण्यांची प्लेलिस्ट लावली आणि निघाली.
सखी म्हणजे श्रीची चार चाकी बरं का! ती तिला सखी म्हणायची. अर्थात होतीच ती तिची सखी कोणी सोबत असो किंवा नसो, ती तिच्या नेहमी सोबत असायची. खूप जवळची होती तिला ती निर्जीव असली तरी काही वेळेस श्री तिच्या सोबतच गप्पा मारायची. असो..!

श्री सखीसोबत निघाली. हळुवार मंद आवाजातली शांत गाणी ऐकत आपल्या नेहमीच्या वेगाने ती गाडी चालवत होती. तिचं सगळ्यात आवडत गाणं चालू होत.

जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू
पैलतीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू
सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू...
जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू
चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल

सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू
खुळं आभाळ ढगाळ, त्याला रुढींचा इटाळ...


श्री गाणं गुणगुणत गाडी चालवत होती. तोच तिला रस्त्याच्या मध्यभागी गाडी समोर चालत येताना एक स्त्री दिसते. श्री गाडी आणि त्या स्त्रीमध्ये काही अंतर उरलेलं असताना गाडी थांबवते. तोच ती स्त्री धाडकन जमिनीवर आदळते. श्री गाडीतून उतरून धावतच तिच्या दिशेने जाते. ती तिला उठवण्याचा प्रयत्न करते पण तिची थोडी सुद्धा हालचाल होत नाहीय हे जाणवल्यावर मदतीसाठी आजूबाजूला बघते. ती अश्या रस्त्यावर असते तिथे माणसांचीच काय, ह्या वेळेला वाहनांचीही जास्त वर्दळ नसते. अश्या परिस्थितीत आपण कोणाच्या मदतीची वाट पाहत बसलो तर उशीर होईल ह्या विचाराने तिचं त्या स्त्रीला उचलून तिच्या गाडीत ठेवते आणि गाडी हॉस्पिटलच्या दिशेने घेते. श्रीला तो रस्ता, तो भाग ओळखीचा असतो त्यामुळे हॉस्पिटल पर्यंत पोहचायला जास्त वेळ लागत नाही. अवघ्या काही मिनिटातच ती हॉस्पिटल जवळ पोहचते.


श्री तिला गाडीमधून बाहेर काढते व उचलून जवळ असलेल्या स्ट्रेचरवर तिला झोपवून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. हॉस्पिटलच्या आवारात गेल्यावर तेथील डॉक्टरांना ती घडलेली परिस्थिती सांगते आणि तिला ॲडमिट करून लवकरात लवकर तिच्यावर उपचार सुरू करावे ह्या साठी विनंती करते. डॉक्टर पेशंटला बघायला स्ट्रेचर जवळ येतात. पेशंटला बघितल्यावर तिची अवस्था बघून ते तिच्यावर उपचार करण्यास व हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेण्यास नकार देतात.


श्रीला डॉक्टर सांगतात की आम्ही हिला इथे नाही ॲडमिट  करू शकत. ह्यांच्यावर इथे उपचार नाही करता येणार तुम्ही ह्यांना दुसरीकडे घेऊन जा.

श्रीच्या लक्षात नाही येत डॉक्टर असे का म्हणत आहेत ते, ती त्यांना त्याच कारण विचारते त्यावर ते सांगतात की तुमच्या लक्षात येतंय का ती व्यक्ती एक ट्रान्सजेंडर आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तिच्यावर बलात्कार झाला आहे. तिचं खूप रक्त गेलंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तिची वाचण्याची शक्यता खूप कमी दिसतेय. त्यात ती एक मॉडेल आणि ॲक्टर आहे. सौम्या नाव आहे तिचं. उद्या तिला काही झालं तर त्यांची लोक येऊन आमचा गळा धरतील आणि मिडियावाले हॉस्पिटलची इज्जत काढतील ती वेगळीच, असे ही लोकांना काही ना काही चमचमीत हवंच असत. तुम्ही ह्यांना दुसरीकडे घेऊन जा आम्ही इथे नाही  ॲडमिट करू शकत.

हे सगळे ऐकून श्रीच डोकं सुन्न पडलेलं असतं. तिला ह्याची जराही कल्पना नसते की आपण ज्या व्यक्तीला स्वतःच्या हाताने उचलून हॉस्पिलमध्ये आणलं तिच्यावर बलात्कार झाला आहे. तिला ह्या सगळ्याचा खूप राग आलेला असतो. पण आता राग व्यक्त करण्यापेक्षा शांत राहून सौम्यावर लवकरात लवकर उपचार सुरू करणं गरजेचं असतं. तेवढ्यात तिला तिच्या ऑफिस मधल्या मित्राचा भाऊ दिसतो. तिला अचानक लक्षात येत, अरे हा तर नचिकेत आहे. मी असे कसे विसरले की हा इथे डॉक्टर आहे. श्री नचिकेतला आवाज देते. नचिकेत सुद्धा तिला बघून धावतच तिथे येतो.


हाय श्रीमुग्धा.कशी आहेस? सगळे ठीक आहे ना? तू इथे कशी?

अरे नचिकेत, मी एका पेशंटला घेऊन आले आहे रे इथे पण तुमच्या हॉस्पिटल मध्ये हिला ॲडमिट करून घेत नाहीय.

( श्री बाजूला स्ट्रेचरवर असलेल्या सौम्याकडे बोट दाखवत म्हणते. )

अग ही तर सौम्या आहे ना! काय झालं हिला आणि का नाही ॲडमिट करून घेत. मला बघू देत. अग श्री हिच्यावर बलात्कार झाला आहे आणि हिला खूप मारहाण पण झालेली दिसतेय. हिला लवकरात लवकर उपचारांची गरज आहे. नाही तर. ( नचिकेत बोलता बोलता थांबतो )
तू हिला आत घेऊन चल मी बघतो हिच्यावर कसे उपचार  होत नाही ते. ऐक काही झालं तरी हिच्यावर ह्याच हॉस्पिटलमध्ये उपचार होतील आणि मी करेन ते. तू काळजी नको करुस. तू तिच्या जवळ थांब मी तयारी करतो सगळी.

श्री नचिकेतने सांगितल्याप्रमाणे सौम्याला आत घेऊन जाते. तेवढ्यात नचिकेत आपल्या सहकाऱ्यांसह आत येतो.  सौम्यावर उपचार सुरू होतात. श्री बाहेर एकटीच येरझाऱ्या मारत असते. तिचं डोकं सुन्न पडलेलं असत. तिच्या डोळ्यांसमोर सतत सौम्याचा निरागस चेहरा येत असतो. अश्याही क्रूर वृत्तीची लोक ह्या जगात आहेत ह्यावर तिचा विश्वास बसत नाही. कोण असतील ते लोक जे सौम्या सोबत असे वागले. इतकं घृणास्पद कृत्य केलं आहे तिच्यासोबत आणि तिला असच मरण यातनेत सोडून दिलं. मी जर वेळेत तिथे नसते तर...!


श्रीच्या डोक्यात सतत विचार चालू असतात. दोन तास उलटून जातात तरी सौम्यावर अजून उपचार चालू असतात. इथे श्री सुद्धा काळजीत असते. जवळ जवळ ३-३:१५ तासांनी नचिकेत बाहेर येतो. " श्री " नचिकेच्या हाकेने श्री भानावर येते. तिच्या डोक्यातले विचार चक्र थांबते. ती नचिकेतच्या पुढील बोलण्याची वाट पाहत असते.

श्री तुझे प्रयत्न सार्थकी आले. सौम्या आता ठीक आहे. तिला काही दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवायला लागेल. तिला इथेच राहूदे मी वैयक्तिकरीत्या तिच्यावर लक्ष देईन. तू सुद्धा जमेल तसे येत जा. मी पोलिसांना कळवल आहे. माझी एक मैत्रीण ऑफिसर आहे. ती येऊन सौम्याच्या प्रकृतीची चौकशी करेल आणि तिला काही साधे प्रश्न विचारेल. सौम्याला त्रास होईल असे काही ती विचारणार नाही. तुलाही तिला भेटाव लागेल काही माहिती मिळावी म्हणून तुला सुद्धा ती काही प्रश्न विचारेल. बाकी सौम्या इथे आहे. तिच्या सोबत हे जे काही घडलं ती माहिती बाहेर कुठे जाणार नाही आणि सौम्याला त्रास होणार नाही ह्याची काळजी आपण घेऊ.

हो नक्कीच. थँक्यू सो मच..तुझे आभार मानू तेवढे कमी आहेत. आज तू खरचं एक डॉक्टर म्हणून आणि एक माणूस म्हणून खूप महत्वाची भूमिका पार पाडली. तू नसता तर मी सौम्याला कुठे नेलं असत आणि मुळात तिचं काय झालं असत, ह्याचा विचारही करू शकत नाही. ती माझ्या गाडीसमोर आली नसती तर कोणाला समजलं सुद्धा नसत की त्या रस्त्यावर तिच्यावर असा काही प्रसंग ओढवला आहे ते.

श्री तू म्हणतेस ते सगळे ठीक आहे पण त्या रस्त्यावर सौम्या एकटी का गेली असेल? तू आजूबाजूला कोणाला पाहिलंस का? कोणाची गाडी वैगरे...म्हणजे तिथे जर माणसांची वर्दळ जास्त नसते तर सौम्या एवढ्या रात्री एकटी तिथे का गेली असेल.

नचिकेत मी पहिलं तेवढं मला आठवतंय की तिथे कोणीच नव्हत. गाडी तर लांबची गोष्ट आहे पण माणसं पण नव्हती रे. हा पण तिथे जवळपास एक बस स्टॉप आहे. पण तिथे रात्री कोणीही नसत एवढ्या रात्री तर नाहीच. बाकी आता नेमक तिथे काय घडून गेलं असेल हे खात्रीपूर्वक तर सांगता येणार नाही.

बरं ठीक आहे. बघू आपण पोलिसांच्या चौकशीमध्ये त्यांच्या हाती काही लागत का? मी आता निघतो थोड फ्रेश होतो. तू येतेस का कॉफी घेऊ सोबत.

अरे नको. थँक्यू. बरं मी एकदा तिला बघू शकते का? काही बोलणार नाही मी. कारण तिला माहिती सुद्धा नाही. मी तिला इथे आणले ते. फक्त एकदा बघेन मी. ती कशी आहे ते.

काही हरकत नाही. तू बघ तिला. एक काम का नाही करत तू. सौम्याला शुद्ध येईपर्यंत तू तिच्या जवळ थांब. मी तुझ्यासाठी कॉफी पाठवून देतो. दुसऱ्या कोणाला तिच्याजवळ ठेवण्यापेक्षा तू असलीस तर टेन्शन नाही राहणार.

ठीक आहे. मी थांबते.

श्री सौम्या असलेल्या वॉर्डच्या दिशेने जाते. हळूच आवाज न करता दरवाजा उघडते. सौम्याला असे समोर पाहून तिच्या काळजात धस्स होत. सौम्याच्या हाताला सलाईन लावलेलं असत. एक नळी लावलेली असते त्यातून युरिन आणि ब्लड पास होऊन एका पिशवीत जमा होत असतं. हातावरच्या जखमा आता ठळक दिसत असतात. चेहरा काळा पडलेला असतो. डोळे क्षीण झालेले असतात. ओठ पूर्ण सुकेलेले असतात. पायांवर पट्ट्याने मारलेल्या खुणा दिसत असतात. तिच्या हाताच्या बोटांची नखे उपटून काढलेली असतात. तिचे केस ओबडधोबड कापलेले असतात. श्री एकटक ते सगळे पाहत असते. ही जेव्हा माझ्या गाडीसमोर येऊन पडली तेव्हा अंधारात मला हे सगळे दिसलच नाही. हॉस्पिटलमध्ये आणल्यावर सुद्धा ॲडमिट करण्याच्या टेन्शनमध्ये मी नीट लक्ष दिलं नाही. जे कोणी होते त्यांनी किती हैवानांसारख कृत्य केलं आहे हिच्या सोबत. ते लोक मला जरी सापडले तर मी सुद्धा त्यांना सोडणार नाही.

तेवढ्यात दरवाजा वाजवल्याचा आवाज होतो.


मॅडम कॉफी...

हा ठेवा इथे. थँक्यू...

श्री कॉफी घेत सगळ्या परिस्थितीचा विचार करत असते. सगळ्यामुळे तिचं डोकं खूप दुखत असत. कॉफी संपवून ती तिथेच डोकं टेकून, डोळे मिटून बसते.
श्री चा डोळा लागलेला असताना तिला कोणाचा तरी स्पर्श होतो. ती डोळे उघडुन बघते. सौम्याला शुद्ध आलेली असते. ती हळूच फक्त "पाणी "एवढं बोलते.
श्री सौम्याला पाणी पाजते आणि तिला आराम करायला सांगते.

तू आराम कर. मी नचिकेतला आय मीन डॉक्टरांना बोलावते.

सौम्या तशीच एकटक वर बघत डोळे उघडे ठेवून पडून राहते.

श्री बाहेर येऊन नचिकेतला फोन लावते व बोलावून घेते.

कधी आली शुद्धीवर?

आताच आली. माझ्याकडे पाणी मागितलं मी थोड पाणी पाजलं तिला आणि झोपवलं पुन्हा.

ठीक आहे. मी तपासून घेतो. आता तिला काही विचारू नकोस. तिने स्वतःहून काही सांगण्याचा प्रयत्न केला तर बघू आपण. चल आत जाऊ.

नचिकेत आत आल्यावर सौम्या समोर स्वतःची आणि श्रीची ओळख करून देतो.

हाय सौम्या. मी नचिकेत तुझा डॉक्टर आणि ही श्रीमुग्धा. हिनेच तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं.
मी तुला फक्त बघायला आलो आहे. तुला सध्या आरामाची खूप गरज आहे.तुला काहीही लागलं तर तू मला किंवा श्रीला सांग.
आता तू आराम कर. मी सकाळी येतो पुन्हा तुला बघायला. श्री तू पण आराम कर. काळजी घ्या दोघी.

नचिकेत सौम्याची अवस्था पाहून मोजकेच बोलून तिथून निघून जातो. नचिकेत गेल्यावर श्री सौम्याच्या जवळ जाऊन बसते.

थँक्यू...सौम्या जड आवाजात बोलते.

थँक्यू...मला हॉस्पिटलमध्ये आणण्यासाठी आणि माझी इतकी मदत करण्यासाठी उगाच तुला माझ्यामुळे त्रास झाला.

अग सौम्या त्रास कसला आलाय ह्यात. मी माणुसकीच्या नात्याने तुझी मदत केली.

मी आज तुझ्यामुळे जिवंत आहे. मी जगण्याची इच्छा सोडून दिली होती. मला वाटलं नव्हत मी जिवंत राहीन. माझ्या अंगातली शक्ती संपली होती. मी पडताना फक्त तुझ्या गाडीचा हेड लाईट आणि अर्धनारिश्र्वर माझ्या डोळ्यासमोर होते. आज तुझ्यामुळे मला तिसरा जन्म मिळाला आहे. मी तुझे उपकार कधीही विसरणार नाही. आज तू इथे आणलं नसत तर मी तिथे अशीच मरून पडले असते. माझ्यावर झालेल्या अत्याचाराची साधी चौकशी सुद्धा झाली नसती.


असे का बोलतेस. चौकशी का होणार नाही. साध्या गुन्ह्याची चौकशी होते. तुझ्यावर तर..!( श्री बोलता बोलता थांबते )

का थांबलीस.माझ्यावर तर बलात्कार झाला आहे हेच ना. मलाही माहित आहे. सगळे होताना मी उघड्या डोळ्यांनी बघत होते आणि महत्वाचं म्हणजे मला माहित आहे हे कोणी केलं आहे ते.

श्री थोडी चकित होते.
सौम्या तुला जर माहित आहे. ते लोक कोण होते. तर आपल्याला अजून सोप जाईल त्यांना शोधणं. तसे ही पोलिस ऑफिसर नचिकेतची मैत्रीण आहे. ती नक्कीच काहीतरी करेल.

श्रीमुग्धा तुला वाटतं तेवढं सोपं नाहीय हे. त्यांना शिक्षा होण तर लांबची गोष्ट आहे. आपण साधी त्यांच्या नावाची तक्रार पण करू शकत नाही. तुम्ही ह्या सगळ्यापासून लांब रहा. नाहीतर ते तुमच्या सोबत सुद्धा असच सुडाच्या भावनेने वागतील. जे झालं ते जाऊदे. मी त्या सगळ्यातून जिवंत राहिले हेच खूप आहे. तुम्ही अजून काही नका करू माझ्यासाठी.

अग पण सौम्या असे केलं तर ते मोकाट सुटतील आणि अजून काहीतरी करतील. त्यांना त्यांच्या वाईट कर्मांची शिक्षा तर दिलीच पाहिजे.

श्रीमुग्धा त्यातील एक नामांकित निर्माता विवेक पाटील आहे. त्यांच्यामध्ये माझ्या मामाचा मुलगा सुद्धा आहे. कोणाला आणि काय शिक्षा देऊ मी. विवेकला माझ्यासोबत फक्त एकदा शारीरिक संबंध ठेवायचे होते त्यासाठी मी नकार दिला आणि माझा भाऊ संकेत त्याला माझे श्रेय, प्रसिध्दी बघवत नव्हती. त्याने अनेकदा लहान असताना माझा फायदा घेतला आहे. पण मला हे माहीत नव्हत की विवेक आणि माझा भाऊ मित्र आहेत. मला काल शूटवरून येताना उशीर झाला म्हणून मी बस स्टॉपवर थांबले होते. तर विवेकने मला विचारलं की घरी सोडू का, मी नाही म्हणून सांगितल. तो तिथून निघून गेला पुन्हा काही वेळाने त्याची गाडी तिथे आली त्यात संकेत आणि अजून दोन मुलं होती. त्यांनी गाडी थांबवली संकेत गाडीतून उतरला आणि माझ्याजवळ येऊन मला गाडीत बसण्यासाठी जबरदस्ती करत होता. मी रागात त्याच्या एक कानशिलात लगावली. तर त्याने माझा हात धरून मागे असलेल्या झाडीत न्यायचा प्रयत्न केला. त्याची ताकद कमी पडत होती म्हणून त्याने त्या तिघांना ही बाहेर यायला सांगितलं आणि मला तिथे....

( सगळा प्रसंग सांगताना सौम्या रडायला लागते. तिला पुढचं काही सांगणं शक्य होत नाही. श्री सुद्धा तिला काही विचारत नाही. तिचा हात हातात घेऊन तिला शांत करते. तिच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवते. श्रीच्या प्रेमळ स्पर्शाने सौम्या शांत होते. )


सौम्या तू आता थोड झोप. आपण नंतर ठरवू काय करायचं ते. आता सध्या तुला आरामाची खूप गरज आहे. तू डोकं आणि मन शांत ठेव. तुझ्या परवानगी शिवाय मी काहीच करणार नाही. तुला पुन्हा असे काही सहन करावं लागेल असे मी वागणार नाही. तू शांत झोप आता मी तुझ्याजवळ आहे.

आता सौम्याला ॲडमिट करून जवळ जवळ वीस दिवस झालेले असतात. तिच्या प्रकृतीत खूप सुधारणा झालेली असते. श्रीमुग्धा तिचा जास्तीत जास्त वेळ सौम्या सोबत घालवत असते. तिची काळजी घेत असते. नचिकेतच्या सांगण्यावरून त्याची मैत्रीण येऊन सौम्याची चौकशी करत असते. पण विवेक आणि संकेत देश सोडून कुठेतरी गेलेले असतात.

आज नेहमीप्रमाणे श्रीमुग्धा सौम्याला भेटायला येते. सोबत कॅडबरी, चॉकलेट्स आणि गुलाबाचे फूल आणते.

काय? श्री, आज काय आहे? तुझा वाढदिवस आहे का? हे काय आहे सगळे आणि कोणासाठी?

हे एका स्पेशल व्यक्तीसाठी आहे. म्हणजे माझ्या आवडत्या व्यक्तीसाठी जी माझ्या खूप जवळची आहे. ओळखा सौम्या मॅडम कोणासाठी असेल हे.

मला काय माहीत बाबा. तू कुठे मला काही सांगतेस.

बरं चल. लगेच लहान मुलांसारखे तोंड पाडू नकोस. हे तुझ्यासाठी आहे.

माझ्यासाठी? थँक्यू श्री.

आता मला डोळ्यात पाणी वैगरे नकोय.नाहीतर त्या नचिकेतला सांगेन. हिचा डिस्चार्ज कॅन्सल कर आणि हिला अजून महिनाभर इथे ठेव.

काय श्री. मला आज डिस्चार्ज मिळतोय. बरं झालं सुटले एकदाचे. आता घरी जाईन आणि तुला ही त्रास नाही इथे रोज यायचा जायचा.

सौम्या तू घरी जातेय पण तुझ्या नाही माझ्या.


अग पण का?

मी सांगितलं ना सौम्या आपण माझ्या घरी जातोय म्हणून मला तुझ्या बाबतीत कोणतीच रिस्क घ्यायची नाहीय. त्यामुळे शांत बस आणि माझ्या सोबत चल.

अग तुझ्या वडिलांना समजलं तर ते काय विचार करतील. अगोदरच ते तुझ्या सोबत बोलत नाहीत. तुझ्या समलैंगिक असण्याने त्यांना एवढा राग आला असेल तर एक ट्रान्सजेंडर तुझ्यासोबत राहते हे समजल्यावर ते किती रागावतील.

ऐक ना. माझे आई. तू हे सगळे ज्ञान मला घरी गेल्यावर दे ना. नाहीतर तुझ्या बेडवर मला झोपवायची वेळ येईल आता. किती बोलतेस यार तु. तोंड दुखत नाही का तुझे. चल ना माझे आई. घरी गेल्यावर मला मस्त चहा बनवून दे आणि मग बोल हवे तेवढं.

सौम्या शांतपणे श्रीमुग्धा सोबत निघते. श्रीने हॉस्पिटलची बिल वैगरे सगळी प्रोसिजर अगोदरच पूर्ण केलेली असते. नचिकेत त्यांना गाडी पर्यंत सोडतो.

चल बाय दोघींना. काळजी घे सौम्याची. सांगितल आहे तसे गोळ्या, औषध वेळेत दे आणि सगळ्यात महत्वाचं ड्रेसिंग नीट कर तिचं.

हो करते आणि थँक्यू पुन्हा एकदा. चल निघतो.

श्री गाडी चालू करते. सौम्या खिडकीतून बाहेर बघत असते.
श्री शांतपणे गाडी चालवत असते. काही वेळाने श्री तिच्या घराजवळ पोहचते. गाडी पार्क करून दोघी गाडीतून उतरतात. दोघी श्रीच्या घराबाहेर येऊन थांबतात.

श्री खिशातून चावी काढते आणि लॉक ओपन करून दरवाजा उघडते. समोरच दृश्य पाहून सौम्या आश्चर्यचकित होते. ती बाहेरच थांबते.

सौम्या वेलकम. अग, असे काय भूत बघितल्यासारखं करतेस. हे सगळे तुझ्यासाठीच आहे.

श्रीने सौम्याच्या स्वागतासाठी घर सजवलेलं असत. वेलकम बॅनर, गुलाबाच्या फुलांची रास, स्माईलीचे फुगे पूर्ण घर तिने सौम्याला स्पेशल वाटेल ह्या साठी सजवल होत.

सौम्या तूच बोलली होतीस ना, पहिल्या दिवशी मला की हा तुझा तिसरा जन्म आहे. मग तुझे स्वागत नको का करायला चल ये आत.

सौम्या शांतपणे आत जाते. श्री सुद्धा तिच्या मागोमाग सगळे सामान घेऊन आत जाते. सौम्या अजूनही शांत असते. श्री सौम्याच‌ सगळे सामान व्यवस्थित आत नेऊन ठेवते, व सौम्या आणि तिच्यासाठी चहा बनवून आणते.

अग सौम्या, तू अजून उभी आहेस. काय झालं? तुला आवडलं नाही का हे सगळे. तू बस अगोदर आणि हा घे चहा मस्त वाटेल. एकदम फ्रेश वाटेल तुला.

श्री चहा पिताना एकवार नजर सौम्याकडे बघते. ती अजूनही शांतच असते. श्रीला आता टेन्शन येतं. नेहमी बडबड करणारी ही मुलगी आज एकदम एवढी शांत कशी झाली? आपण काही चुकीचं तर केलं नाही ना? तिला तिच्या भूतकाळातील एखाद्या प्रसंगाची आठवण होईल असे काही केलंय का? " देवा ह्या मुलीच्या डोक्यात काय चालू आहे तुलाच माहीत रे बाबा." जर मी आता हिला विचारलं की काय झालं. तर शांत झोपलेल्या वाघिणीला उठवल्यासारख तर होणार नाही ना? म्हणजे परत जर हिच्या तोंडाचा पट्टा चालू झाला तर काय ही शांत होणार नाही.
काय करू? विचारू का? जाऊ दे. विचारतेच..!

सौ...म्या...अरे देवा माझ्या आवाजाला काय झालं. घशातून बाहेर का निघत नाहीय आवाज.भीतीने झालं असेल. आता नीट आवाज देते. मी पण वेड्यासारखी एकटीच मनातल्या मनात बडबडतेय.

ये सौम्या..श्री च्या हाकेने सौम्या भानावर येते.

श्रीकडे एकदा बघते आणि पुन्हा शांत बसते.

सौम्या अग काय झालं? काही बोलणार आहेस की असच घुम्यासारख बसणार आहेस. काय झालं ते तरी सांग ग.

काही नाही श्री. आयुष्यात पहिल्यांदा मला कोणीतरी एवढं स्पेशल फील करून दिलं आहे. हे सगळे बघून जरा भावनिक झाले म्हणून शांत झाले. खूप छान वाटत आहे सगळे बघून.

हे कारण आहे तर. मला वाटलं तुला काही आठवलं का म्हणून तू गेली सायलेंट मोडवर. देवा, अरे तू तरी स्त्रीला समजू शकलास का रे? काय तर एक एक नग बनवले आहेत....श्री मोठ्याने बोलते.

अच्छा. मी स्त्री आणि तू कोण टॉम बॉय....सौम्या एवढं बोलून मोठ्याने हसते.

ये सौम्या तू मला सारखं सारखं चिडवू नकोस हा. ते मला बनवताना देवाचा डोळा लागला. खर तर त्याला मुलगा बनवायचं होत मला. तू गप.

हा हा हा. चिडका बिबा. काय तर डोळा लागला म्हणे तस ही कोण तुला मुलगी म्हणत का? त्या दिवशी पण हॉस्पिलमध्ये त्या वॉर्ड बॉयने तुला सर म्हणून आवाज दिला.
बरं सर मला एक सांगा. तुम्हाला कधी कोणी आवडलं नाही का? म्हणजे आमच्या सरांना कोणी मॅडम आवडल्या नाही का कधी?.....सौम्या श्रीची मस्ती करत हसत असते.


हो आवडली ना....श्री सौम्याच्या प्रश्नावर उत्तर देते.


क्या बात है! कोण आवडलं? कुठे असते ती? माझी पण भेट करून दे एकदा.

तू तिला कधी भेटली आहेस. आता फक्त माझ्या मनात तिच्या बद्दल ज्या भावना आहेत. त्या व्यक्त करायचं बाकी आहे.

मी भेटले आहे. कोण? ती पोलिस ऑफिसर का? हॉस्पिटलमध्ये तर कोणी आवडली नाही ना? सांग ना पटकन कोण आहे ते.

ही काय माझ्या समोर बसली आहे ती बडबडी....श्री सौम्याच्या उत्तराची वाट बघत असते.

श्री मी खरचं विचारतेय. मस्ती नको करू. सांग ग नीट कोण आहे ती...सौम्या आता शांतपणे विचारते.


सौम्या मी खरं बोलतेय. मला तू आवडतेस. मी तुझ्यावर प्रेम करायला लागले आहे. मला आयुष्याची जोडीदार म्हणून तू हवी आहेस.

श्री मी तूला मुलगी आवडते का विचारलं. तुला एका हिजद्यावर प्रेम झालंय आणि हे कोणी ही मान्य करणार नाही. त्यामुळे हे खूळ डोक्यातून काढून टाक. मी हात जोडते तुझ्यासमोर....सौम्या श्री समोर हात जोडून विनवणीच्या स्वरात बोलते.

सौम्या तुला हिजडा ह्या शब्दाचा अर्थ तरी माहित आहे का? तू जर मुलगी नाहीस तर त्या दिवशी तुझ्या शरिरापेक्षा जास्त जखमा तुझ्या मनाला का झाल्या होत्या. तू मुलगी नाहीस तर तू स्त्री भूमिका एवढ्या सुंदरित्या कशी पार पाडते. तू स्त्री नाही तर तू ऑपरेशन का केलंस. तुझ्यावर झालेल्या प्रसंगाने तू का खचलीस. सौम्या मला तुझ्यात फक्त एक स्त्री दिसते. मला तुझ्यात माझी जवळची मैत्रीण दिसते. तुझ्यात ती गृहिणी दिसते. तुझ्यात ती घाबरलेली मुलगी दिसते. मला तुझ्या डोळ्यात ती स्त्री दिसते. जी समाजाला सतत हेच सांगायचा प्रयत्न करत असते की मला स्त्री म्हणून स्विकारा, मला तो मान द्या जो स्त्रियांना दिला जातो. मला ती इज्जत द्या जी एका स्त्रीला असते. माझ्याकडे वासनेच्या नजरेने बघू नका. एखादा पुरुष तुझ्याकडे वाईट नजरेने बघत असेल तर तू ओढणी नीट करतेस. खाली वाकताना तू छाती जवळ ओढणी धरून खाली वाकतेस. एखाद्या अनोळखी माणसाशी बोलताना तू अंतर राखून बोलतेस. रस्ता क्रॉस करताना तू माझा हात घट्ट पकडतेस. मला हॉस्पिटलमध्ये यायला उशीर झाला की सतत मला फोन करणे. अग का स्वतःची ओळख लपवून ठेवते.


श्री नाही समजून घेणार कोणी. तुला माझ्यामुळे आणखी त्रास होईल. मला जाणवत होत तुझे प्रेम. तुझ्या स्पर्शात, तुझ्या काळजीत पण मी स्वतःला थांबवलं होत. एखाद्या मुलाने आमच्याशी लग्न केलं तर ते स्वीकारलं जाऊ शकत. त्याने आमच्याशी शारीरिक संबंध ठेवले तर ते ही चालत. पण आपल्या नात्याला नाही कोणी स्वीकारणार. मला हे सुद्धा माहित आहे की मी जगात कुठेही जेवढी सुरक्षित नाही तेवढी तुझ्यासोबत आहे. तुझ्या भावनांना मी समजू शकते. तुझे ते पुरुषी वागणं, तसे राहणं, तो रांगडा स्वभाव, सगळ्यांची इज्जत करणे, कोणाच्याही मदतीला धावून जाण. मला माहित आहे मी तुझ्यासोबत आयुष्यभर सुखात राहीन पण माझ्या सुखासाठी मी तुझे आयुष्य खराब नाही करू शकत.

सौम्या तू जर जगाचा विचार करून राहिलीस तर अशीच झुरत राहशील. एकदा स्वतःला संधी तर देऊन बघ. माझ्यावर विश्वास ठेव. मी किती ही मोठी परिस्थितीत आली तरी तुझा हात नाही सोडणार. तुला असे जर कोणी पाहिलं तर कोणीही तुझ्या प्रेमात पडेल इतकी छान दिसतेस तू. कोण बोलणार आहे की तू एक ट्रान्सवुमन आहेस म्हणून एखाद्या स्त्रीला लाजवेल असे सौंदर्य आहे तुझं. नखरे आणि बडबड तर विचारायलाच नको.

श्री पण.....

सौम्या तरी अजून तुझं पण परंतु आहेच का? काय करू मी तुझं.....श्री बोलता बोलता सौम्याचे गाल ओढते.

पण तरी तू माझा टॉम बॉयच आहेस.....सौम्या एवढं बोलून श्रीला मिठी मारते.

श्री सुद्धा तिला आणखी जवळ घेते आणि घट्ट मिठीत घेते. ती हलकेच तिच्या कपाळाचे चुंबन घेते. काही वेळ दोघी एकमेकांच्या मिठीत शांत राहतात.

ऐक ना सौम्या. हे असच दिवसभर राहायचं आहे का? मला ना खूप भूक लागली आहे. आपण काही तरी खायला बनवूया का?

हो तू तयारी कर. मी जरा फ्रेश होऊन येते.

बरं ठीक आहे. जा लवकर ये.

सौम्या आणि श्री दोघी एकमेकांसोबत खूप छान दिवस घालवत असतात. नचिकेतने सांगितल्याप्रमाणे सर्वतोपरी श्री सौम्याची काळजी घेत असते. तिच्या जेवणाच्या वेळा, औषधाच्या वेळा, ड्रेसिंग सगळ ती वेळेत आणि चोख पार पाडत असते. तिला जराही त्रास होणार नाही ह्याची सतत काळजी घेत असते.

सौम्या सुद्धा श्रीची आवड निवड जाणून घ्यायचा प्रयत्न करत असते. तिच्या आवडीचे पदार्थ तिला बनवून देणं, तिचं अस्थाव्यस्थ पडलेलं कपाट साफ करणं, तिच्या कामाच्याबाबतीत तिचं काही बिनसलं असेल तर तिची समजूत घालून तिला शांत करण.

आज सौम्या आणि श्री दोघी निवांत बसलेल्या असतात. दोघींचं असच फोटोशूट चालू असत. खूप दिवसांनी त्यांना एकमेकांसाठी असा निवांत वेळ मिळालेला असतो.

आजचा दिवस...

श्रीच्या जवळच्या व्यक्तींमध्ये फार कोणी नसत. फक्त मोजकेच मित्रमैत्रिणी असतात. ज्यांना तिच्या समलैंगिक असण्याबद्दल कल्पना असते. त्यांनी तिचं हे अस्तित्व स्वीकारलेले असत. त्यांच्या पैकीच एक निनाद असतो. आज निनाद सोबत फोनवर बोलणं झाल्यानंतर श्रीला सुद्धा त्यांना सगळे भेटून सांगावं असे वाटत असते. पण त्या आधी एकदा सौम्याची परवानगी घ्यावी लागेल.

सौ कुठे आहेस. मला थोड बोलायचं होत इथे ये ना.

काय झालं श्री. किती ओरडतेस. बोल, काय बोलायचं आहे.

मला माझ्या मित्रमैत्रिणींना आपल्या नात्याबद्दल सांगायचं आहे. त्यांची आणि तुझी भेट करून द्यायची आहे. अर्थात तुला चालणार असेल तरचं..!

ठीक आहे पण ते स्विकार करतील आपल्या नात्याचा? मला नाही आवडणार हा तुला कोणी काही बोललेले.

नाही तसे काही होणार नाही तू काळजी नको करू. तू फक्त छान तयार रहा.

श्री सगळ्यांना फोन करून घरी येण्यास सांगते. सगळे फोन झाल्यावर ती सुद्धा तयारीला लागते. दोघी मिळून घर छान सजवतात. सगळ्यांसाठी जेवायला बनवतात. दोघी सगळे आवरून, स्वतःची तयारी करून सगळ्यांची वाट बघत बसलेल्या असतात. तेवढ्या दरवाज्याची बेल वाजते.

श्री दरवाजा उघडते. समोर नचिकेत, अर्णव, आराध्या, क्षितिजा हातात गिफ्ट, फुलांचा गुच्छ घेऊन उभे असतात.

काय हिरो. मला धोका देऊन दुसरीच पकडली ना आता मी अशीच राहणार एकटी.....आराध्या श्रीची खिल्ली उडवत म्हणते.

ये सुरू झाली तुझी नौटंकी चल आत अगोदर....अर्णव तिला ओरडतो.

सगळे आत येतात. श्री सौम्या सोबत सगळ्यांची ओळख करून देते. तेवढ्यात पुन्हा दरवाज्याची बेल वाजते.

मी आलेच. हा निनाद नेहमीच उशिरा येतो...श्री सगळ्यांसमोर बोलून दरवाजा उघडायला जाते.

श्री दरवाजा उघडते. दरवाजाच्या बाहेर निनाद सोबत अजून एक व्यक्ती असते. त्या व्यक्तीला पाहून श्रीला धक्का बसतो.
निनाद तू ह्यांना इथे का घेऊन आलास? तुला माहित आहे ना ते नाही समजून घेणार. मला अजून त्रास नाही होऊ द्यायचा कोणाला.

ती व्यक्ती आत येते...

बाळा मला निनादने नाही सौम्याने बोलवलं आहे. मला सगळे समजलं आहे. मी आता कुठे जाऊन तुझ्या भावना समजलो आहे. मला सुरवातीला तुझ्या समलैंगिक असण्याने खूप त्रास झाला होता. मी स्वतःला दोष देत होतो की माझ्याच सोबत असे का? पण नंतर नचिकेतने मला सगळे सांगितलं. मला त्याने समजावलं. समलैंगिक असणं हे नॉर्मल आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट सौम्याने जेव्हा मला तुझ्या आणि तिच्या नात्याबद्दल सांगितलं. तिची सगळे मला समजावलं, तुम्हाला कसे सगळ्या गोष्टींना एकट्याने सामोरं जावं लागलं ते मला माहित आहे. मला आता तुझ्या समलैंगिक असण्याचा किंवा तुझ्या आणि सौम्याच्या नात्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीय. तुला जसे राहायचं तस रहा. माझा तुमच्या नात्याला पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही सगळे नेहमी तुमच्यासोबत आहोत.

आपल्या वडिलांनी इतक्या वर्षांनी आपल्याला स्वीकारलं आहे हे ऐकून श्रीमुग्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. श्रीचे वडील तिचे डोळे पुसून तिला जवळ घेतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणतात..

" माझे एकुलत एक बाळ आहेस तू. तूच माझी मुलगी आहेस आणि तूच माझा मुलगा. तुझ्या लग्नासाठी खूप स्वप्न पहिली आहेत मी. मला वाटतं की तुझं आणि सौम्याच आपण वैदिक पद्धतीने लग्न लावू. तुम्हाला मान्य असेल तर...."

श्री सौम्याकडे बघते ती मानेनेच होकार देते. आम्हाला दोघांना मान्य आहे बाबा. तुम्ही म्हणाल तसं आम्ही तयार आहोत लग्नाला.

पण माझी एक अट आहे.....सौम्याच्या त्या वाक्यावर सगळे वळून तिच्याकडे बघत असतात.

माझी अट अशी आहे की आमच्या लग्नानंतर बाबा तुम्ही आमच्यासोबत राहायचं.

ठीक आहे बाळा. मला मान्य आहे तुझी अट.

चला मग आम्ही सगळे लग्नाच्या तयारीला लागतो....निनाद, नचिकेत, अर्णव, क्षितिजा आणि आराध्या एकत्र बोलतात.

श्री व सौ....लग्नाला नक्की यायचे. आपल्या आपल्या सौं सोबत.


कठिणच असतं तसं
निसर्गानं दिलेलं दान
मुकाट्यानं पदरी घेणं!
त्याने बनवलेल्या दोनच जाती
संभ्रमित का करते नियती?
अर्ध नारीश्वराचे वारस आम्ही,
स्वीकारून हे असामान्यत्व
जपतोय आमची नाती...!