Login

जगावेगळ्या मायलेकी भाग -०१

This is the story of mother nd daughter. The duo who struggle lot just to fullfill their dreams. Sanvi, Chitra and Amey basically 3of them are the main characters of this story.

सान्वी एक अत्यंत गोड,लोभस, निरागस मुलगी आई-वडिलांची एकुलती एक,त्यामुळे अत्यंत लाडात वाढलेली सान्वी,जाईल तिथे जीव लावणारी,शाळेत सगळ्यांची लाडकी, शाळेत पोहोचवून देणाऱ्या ऑटो वाल्या काकांच्या लाडाची,तिच्या लोभस चेहऱ्यामुळे आणि निरागस वागणुकीमुळे जिथे जाईल ती माणसं, ती आपलीशी करून टाकायची.

तिचे आई-बाबा इतकंच काय ते तिचं जग. घरी आजी आबा होते. पण,वंशाला दिवा नाही म्हणून त्यांनी गोंडस सान्वी चे कधी लाडच केले नाही.सतत तिला डोळ्यात बघायचं बस इतकच काय ते त्यांना जमायचं. त्याचमुळे, सान्वीच्या आईचाही कधी त्यांनी स्वीकार केला नाही.सान्वी ची आई फार सोशिक बाई,वडील प्राईव्हेट नौकरीला होते.तर,आई सुद्धा एका साधारण नौकरीवर होती.दोघांच्या कमाईतून उभ्या राहणाऱ्या पैश्यातून त्यांचा छोटासा संसार दोघेही आपल्या लेकी सोबत फुलवत होते.

नोकरी सांभाळून एकही रजा न टाकता इमानदारीने काम करणारी सान्वी ची आई म्हणजे,सौ चित्रा अमेय रत्नपारखी.वाचवता येतील तितक्या सुट्ट्या ती वाचवायची जेणेकरून वर्षाकाठी त्या सुट्ट्यांचा वापर सान्वीला वेळ देण्या करता होईल. आणि मग वर्षातून छोटीशी ट्रिप काढून आई बाबा आणि आणि त्यांची लेक फिरायला जायचे. असं हे कष्टाळू आणि समाधानी कुटुंब होतं.पण,आपण कितीही समाधान शोधायचं म्हटलं तरी नियतीला ते मान्य असावं लागतं आणि चित्राच्या बाबतीतही नियतीला तिच्या छोट्याशा सुखी संसारातलं तिनं शोधलेलं समाधान मान्य नव्हतं.

सान्वीची आजी रोज जाणून बुजून एक प्रयत्न जरूर करायची,ज्याने चित्रा आणि अमेय मध्ये वाद होतील. आता तरी हे कणभर कमी होतं कारण, सान्वी चा जन्म. त्यामुळे अमेय ने अलीकडे चित्राला मारणं बंद केलं होतं. पण, अधेमधे आलीच त्याला लहर आणि त्यातच सविताताईंनी म्हणजे सान्वी च्या आजीने लेकाचे चे कान भरले तर मग विचारायलाच नको चित्राला बिचारीला मुकाट्याने त्याचा मार सहन करावा लागायचा आणि दुसऱ्या दिवशी त्या चेहऱ्यावर मेकअप थोपून पुन्हा सज्ज राहावं लागायच.

सान्वी च्या जन्मा अगोदर पर्यंत तर तिने कैक वेळा गरम तव्याचे चटकेही सहन केले होते. बेल्ट चा मार तर रोजचाच होता. हे काय कमी होतं,त्यात येणाऱ्या जाणाऱ्यांची कायम घरात चंगळ असायची.घर कामाला कुठलीही बाई नाही, सगळ्यांचा सगळं खाणं-पिण करून निघत पर्यंत चित्राच बघणार आणि ऑफिसमधून घरी आल्यावरही पुन्हा तेच.मानसिक त्रास, शारीरिक त्रास,इतकाच काय ते तिच्या आयुष्याचं रुटीन होतं.या सगळ्यात तिच्या आयुष्यातली सकारात्मक बाजू म्हणजे सान्वी चा जन्म होता,परिस्थिती सगळी तीच राहणार असली तरी,आता लेकीसाठी जगायचं ही एक फार मोठी उमेद तिला रोज नव्याने सहनशक्तीचा वरदान देत होती. लेकी सोबत रमून जाण्यात अमेय चा बराचसा वेळ जायचा.त्यामुळे चित्रावर हात उगारणे जरी कमी झालं असलं तरी त्याचा विक्षिप्तपणा काही कमी झालेला नव्हता. घरात कटकट झाली,सारखं सासा सुनांचा भांडण सुरू राहिलं की हा मध्यस्थी न करता अजून चित्राचा सूड घेण्यात हातभार लावायचा.अन्नाची ताटच्या ताट फेकायचा, गुंडभर पाणी हॉलमध्ये अक्षरशा सांडवून बाहेर निघून जायचा, रात्र-रात्र परतायचा नाही,आणि चित्रा बिचारी इवल्याशा सान्वीला पोटाशी धरून त्याला शोधत सुटायची कारण त्याचा फोन बंद असायचा. इतर चार ठिकाणी फोन केला तर याचा पत्ता कुणालाच नसायचा.शेवटी कधी तो सापडायचा,नाही तर घरी परतून रात्र-रात्र त्याची वाट बघत बसणे इतकच काय ते चित्राच्या हातात असायचं.

या सगळ्यांचा परिणाम लहानग्या सान्वीवर व्हायचा. आईला कूस बदलून रडताना ती कैकदा पाहायची,आईने मार खाल्लेला चेहरा त्या इवल्याश्या जीवाच्या नजरेतून लपायचा नाही.बघता बघता सान्वीचं बालपण सरत होतं.सानवी आता पहिलीत गेली होती. आणि पुढे तिचा एक एक वर्ग वाढत जात असला तरी तिच्या आईचा दिवस मात्र बदललेला नव्हता.सान्वी वर वडिलांचा कितीही जीव असला तरी चित्रा बाबतीत मात्र अमेय बऱ्यापैकी आईच्याच बुद्धीने चालायचा.

सान्वीला एकच आत्या होती. समिधा..ती लग्न करून आपल्या परिवारासोबत अगदी सुखात होती. पण, तीही आपल्या आईला कधी समजूतदारपणाचे दोन शब्द सांगायला समोर धजायची नाही.उलट तिची मुलं लहान असल्याने आणि नवऱ्याची शिफ्ट ची नौकरी असल्यामुळे माहेरपणासाठी आली की,ती दोन दोन महिने इकडेच राहायची. समिधाला माहेरी आल्यावर जेवणाच्या ताटावर अगदी गरम गरम पोळ्या लागायच्या,एखाद्या वेळेस गार पोळी पडली ताटावर तर सान्वीची आजी चित्राचा चांगलाच पान उतारा काढायची. चित्राच्या नोकरी पासून ते तिच्या माहेरपर्यंत मग सगळ्यांचा उद्धार व्हायचा.

एक दिवस तर चक्क कहरच झाला रत्नपारखींच्या वागण्याचा.घरच्याच सुनेवर मुलीचे दागिने चोरल्याचा आळ सानवीच्या आजीनं घेतला. आणि वर नको नको ते बोलायला लागल्या.चित्राचं कपाट, तिची रूम, तिच्या बॅग्स,सगळ चेक केल्या गेलं.अगदी शिवीगाळही चित्रानं ऐकून घेतली पण आता चित्राला ते सारं असह्य झालं होतं. तिच्या सहनशक्तीने आता सीमा पार केली होती. दुखात बुडालेली चित्रा आता भानावर नव्हती.चोरीचा आळही येऊ शकतो आपल्यावर, तेही आपल्याच घरात,आणि आपण ज्यांना आपलं म्हणतो त्यांच्याकडूनच.हे तिला जास्त असह्य होत होतं.या विचार चक्रानी ती अंगणातल्या विहिरीच्या कठड्यावर पोहोचली. चित्रा उडी मारणार तोच सान्वी शाळेतून परत आली. ऑटोतून सान्वी आई म्हणून इतक्या मोठ्याने ओरडली आणि धावत जाऊन चित्राला बीलगली त्यासोबतच चित्रा भानावर आली आणि सानवी ला जवळ घेऊन आभाळ फाटल्यागत रडू लागली.

🎭 Series Post

View all