Login

जगूनी घे जरा : भाग ५ (अंतिम भाग)

आयुष्याचा नवा अर्थ सांगणारी गोष्ट!

अद्वैतचे बाबा आता अद्वैतकडे पाहंतात.
"अद्वैत तुला मी मगाशी का हसलो याचे उत्तर मिळाले आहे बहुतेक हो ना? म्हणून मी म्हटलं की मला तर काही तु आनंदी आहेस असं वाटतं नाही.
बरं बाकी जाऊदे मला एक सांग यापूर्वी तु असं गाड्यांवर आईसक्रीम केव्हा खाल्लं होतं आजसारखं?", अद्वैतचे बाबा त्याला आता प्रश्नांमध्ये
चांगलेच अडकवतात.

" माहित नाही म्हणजे आठवतं नाही. बाबा तुम्ही मगाशीपासून असे कोड्यात का बोलतायं? तुम्हाला नक्की कायं म्हणायचे आहे? ", अद्वैत थेटं बाबांना विचारतो.

" अद्वैत खरंतर एका वडिलांना हे बोलायची वेळ यावी हेचं माझं दुर्दैव. अरे आत्ता कुठे पस्तीस वर्ष वय आहे तुझं, हार्ट अटॅक थोडक्यात निभावला म्हणून नाहीतर कायं करायचं होतं आम्ही सगळयांनी?
तुला मी तीन महिन्यांपूर्वी आलो तेव्हाही म्हटलं होतं की स्वतःची काळजी घे.

अरे आयुष्य आहे हे ते जगण्यासाठी आहे पळण्यासाठी नाही. तुमच्या पिढीला एवढी कुठली घाई असते रे? सतत तुम्ही पळत असता नुसते. बघावं तेव्हा लॅपटॉप नाहीतर मोबाईल मध्ये डोके खुपसलेले. अरे घर म्हणजे फक्त हव्या त्या वस्तू ईएमायवर घेतल्या असे नसते. आयुष्यात जरा थांबायचं असतं हे ठाऊक नाही तुमच्या पिढीला. ", अद्वैतला बाबा आता चांगलेचं बोलतात.

" बाबा मान्य आहे आमची पिढी पळते ते पण आजच्या या जगांत स्वतःला टिकवून ठेवायचे असेल तर इथे रोज पळण्याशिवाम गत्यंतर नाही. सतत स्पर्धा असते चालू आणि वस्तूंचे म्हणतं असाल तर काही गोष्टी दाखवण्यासाठी ही कराव्या लागतात बाबा. आयुष्यात थांबून कसे चालेल? करियर, चिनूचे शिक्षण, वाढती महागाई, ऑफिस मधले प्रॉब्लेम बाबा खूप काही असतं. "

" अद्वैत स्पर्धा ही पिढ्यानपिढ्यांपासून चालतं आली आहे आणि ती सतत असतेचं चालू पण आपल्याला कोणाशी स्पर्धा करायची आहे हे आपण ठरवावं असं मला वाटतं आणि हे दिखावे कोणासाठी वस्तूंचे? महागाई वाढली, शिक्षणाचा खर्च मला मान्य आहे संसार सोपा नसतो पण जबाबदारी पार पाडताना ती आनंदाने पार पाडावी कारण जबाबदारी ही मनापासून स्वीकारायची असते त्याचं पाठीवर कुठेही ओझं घ्यायचं नसतं. आपण एक माणूस आहोत याचा ही विसर पडावा इतकं पळणं आयुष्यात कशाला हवं?

अरे तुला आईस्क्रीम इतकं आवडतं पण तुला तु आईस्क्रीम कधी खाल्लं आहेस हे ही आठवू नये. बाळा आम्ही कायं शहरात नाही राहिलो पण संसार आम्हीही केलाय.

आयुष्य एकदाचं मिळतं असतं ते भरभरून जगण्यासाठी असतं. तु मगाशी अगदी ज्या आत्मविश्वासाने म्हटला होता मला की तुझी बायको, तुझी मुलं खूप आनंदी आहेत म्हणून तो आत्मविश्वास मला आत्ता कुठे का दिसतं नाही आहे मगं? अरे आत्ता तर तु आयुष्याला सुरुवात केली आहे आणि या वयात हार्ट अ‍ॅटॅक यावा इतका ताण असणारं काम कशाला करायचं?

आयुष्यात मोठ्ठ घर असण्यापेक्षा घर आनंदी असायला हवं, घरातील आपली माणसं आनंदी असायला हवी. तुम्ही तिघेजण राहता पण तुला तुझ्या बायको आणि मुलांसाठी बोलायला वेळ ही मिळू नये मगं तुझ्या इतके पैसे कमवण्याचा कायं उपयोग?

मगाशी चिन्मय सोबत आईस्क्रीम खाताना जो आनंद तुला मिळाला तो आनंद तुझा पैसा देऊ शकणारं आहे का तुला? अरे तुझ्या ऑफिसमध्ये लोकांनी फक्त फोन करून चौकशी केली पण प्रत्यक्ष कितीजण आले तुला बघायला हॉस्पिटलमध्ये?

अद्वैत उद्या तुला काही झालं असतं तरी तुझ्या ऑफिसच्या लोकांना त्याचा काहीएक फरक पडणार नव्हता कारण तुझ्यासारखे स्पर्धेत पळणारे अद्वैत या पुण्यात त्यांना खूप भेटतील पण नंदिनीला तिचा नवरा किंवा चिन्मयला त्याचे दुसरे वडील भेटले असते का?

अद्वैत अरे आम्ही गावाकडे राहतो, तु कायम म्हणतोस की आम्ही इथे का नाही येतं कारण आम्हाला सुरूवातीपासून चालायची सवय आहे इथलं पळणं आम्हाला कधीचं जमणार नाही. तुला शहरांत रहायचे आहे त्यामुळे तुला पळणं गरजेचं आहे, फक्त पळताना मागे हातातून आयुष्य निसटू देऊ नकोस बाळा.

काम, ताण हे घराच्या चौकटीत पाऊल टाकले की विसरून जायचे. आयुष्य खूप क्षणभंगुर असतं आपण भविष्याचे मनोरे रचण्यात इतके गुंग होऊन जातो की हातातून भविष्यकाळाचा पाया असलेला वर्तमान केव्हाचं पडला आहे हे लक्षात देखील येतं नाही आपल्या. शेवटी आपण सगळे काही करतो ते कुटुंबासाठी आणि पोटासाठी आणि त्यांच्यासाठीच वेळ नसेल तर या सगळ्याचा कायं उपयोग आहे बाळा.

आयुष्यात वेळ एकदा गेली की ती पुन्हा परत येतं नाही आणि हे क्षण देखील असेचं असतात बाळा यांना परतीची वाट ठाऊक नसते त्यामुळे आयुष्यातला प्रत्येक क्षण मनमुरादपणे जगून घे. आईसक्रीम खावं वाटलं तर आजारी पडेल का? काम थांबतील का हा विचार नको करू. ज्या ज्या क्षणी जे जे करावसं वाटेल ते करं कारण आयुष्याला वन्स मोअर नसतो.

हा हार्ट अ‍ॅटॅक येऊन गेला आणि त्यानंतर जे आयुष्य तुला मिळालं आहे ती दुसरी संधी आहे असे समज आणि नव्याने भरभरून जगायची सुरूवात करं. कायं पटतयं का माझं बोलणं? ", बाबा अद्वैतला विचारतात इतक्यात त्याचा फोन वाजतो.

अद्वैत फोन उचलतो तशी नंदिनी मनांतच म्हणते,
'बाबा तुम्ही एवढे बोलला त्याचा काहीही उपयोग नाही.'

नंदिनी किचनमध्ये जायला लागते तसा अद्वैत तिचा हात पकडतो.
" सर माझी तब्येत अजून ठीक नाही त्यामुळे मी काही दिवस ऑफिसला नाही येऊ शकतं.", अद्वैत फोन ठेवतो आणि नंदिनीकडे पाहतो.

"नंदिनी मला माफ करं. आत्तापर्यंत जे काही निसटून गेले त्याचा हिशोब तर मी पूर्ण नाही करू शकणार पण इथून पुढे आपण आपल्या आयुष्यात असलेला प्रत्येक क्षण भरभरून जगूया, एकत्र काम करूया, चिन्मयची स्वप्न ही पूर्ण करूया पण हे सगळे करताना आपण रोज भरभरून जगूया."

नंदिनी तर अद्वैतचे बोलणे ऐकून चक्रावून जाते. ती डोळ्यांनीच अद्वैतच्या बाबांचे आभार मानते. आई, बाबा आणि चिन्मय सगळेचं आज आनंदी होते खूप.

आज कधी नव्हे ते जेवणाच्या पंगतीबरोबर हास्याचा आणि गप्पांचा स्वर नांदत होता आणि त्या स्वरांत घरातल्या भिंतीही अगदी तृप्त न्हाऊन निघतं होत्या.

खरयं अगदी आयुष्य एकदाच मिळतं त्यामुळे आयुष्याचा प्रत्येक क्षण जगूनी घ्यावा भरभरून.

                    ****समाप्त ****