Login

जैन वडा पाव

चविष्ट, खमंग पौष्टिक आणि झटपट तयार होणारा जैन वडा पाव अवश्य बनवून बघा


जैन वडा पाव

साहित्य : चार पाच कच्ची केळी, पाच सहा हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी हिरवे/ भिजविलेल वाटाणे, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, हळद.

कव्हरचे साहित्य : बेसन एक वाटी, दोन छोटे चमचे कणिक, मीठ, सोडा दोन चिमूट आणि तळण्यासाठी तेल दोन वाटी.

कृती : कच्ची केळी कुकर मधे वाफवून घ्यावी. ताजे हिरवे वाटणे उपलब्ध नसल्यास भिजविलेले वाटणे देखील कुकरमधे वाफवून घ्यावेत. थंड झाल्यावर केळीची साली काढून घ्यावीत. हिरवी मिरची मिक्सर मधून वाटून घ्यावी. कढईत थोडेसे तेल घालून त्यात हिरव्या मिरचीचे वाटण घालावे. हलकेसे परतून घेऊन त्यात थोडेसे लाल तिखट, हळद, हिरवे वाटाणे/ उकडलेले वाटणे घालून परतून घ्यावे. उकडलेल्या केळी कुस्करून या मिश्रणात घालाव्या. चवीनुसार मीठ घालून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी आणि या खमंग भाजीला एक वाफ येऊ द्यावी.

कव्हर साठी बेसन पीठ, थोडीशी कणिक, घालून थोडे थोडे पाणी घालत फेटत जावे. मीठ आणि हळद घालून फेटावे. भज्याच्या पिठापेक्षा जरा घट्ट सर भिजवावे. छान फेटून झाले की त्या पिठात दोन चिमूट खाण्याचा सोडा घालावा आणि मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यावे.

भाजी गार झाली की मध्यम आकाराचे गोळे बनवून बेसनात सोडावे. तेल छान तापले की दोन तीन वडे सोडून मंद आचेवर तळून घ्यावेत. असे वडे कढी आणि तळलेल्या मिरची सोबत गरमागरम सर्व्ह करावे. ज्यांना पाव चालतो त्यांनी बटर लावलेला पाव तव्यावर भाजून घेवून त्यात हा जैन वडा घालून खावा. रुचकर, खमंग आणि पौष्टिक असा हा वडा चवीला आलू वड्याएवढाच स्वादिष्ट लागतो.