Login

जैसे ज्याचे कर्म  भाग १

-


जैसे ज्याचे कर्म भाग १


चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५  ( संघ ४ - कामिनी )

©® आरती पाटील - घाडीगावकर


“कोण हवं आहे तुम्हाला ?”  रजत सकाळीच आपल्या दारावर उभ्या असलेल्या वृद्ध जोडप्याला विचारत होता.

“तुम्ही कोण ?” लगेच समोरून प्रतिप्रश्न आला.

रजत थोडा वैतागतच म्हणाला, “अहो तुम्ही माझ्या दाराची बेल वाजवली. मलाच काय नाव विचारताय ?”

“तुमचं घर ? अहो हे घर आमचं आहे ? तुम्ही तुमचं कसं म्हणू शकता ?” आता मात्र वृद्ध दांपत्य चिडले होते.

रजत, “हे बघा सकाळी सकाळी इथे त्रास देऊ नका आणि हो, परत एकदा सांगतोय, हे घर माझं आहे !”

शामराव आणि राधाबाई हे वृद्ध दांपत्य आता पुरते हादरले होते.

शामराव अगतिक होऊन म्हणाले, “अहो असं काय करताय ? आम्ही गेली २८ वर्षे इथे राहतोय. आम्ही महिनाभरासाठी तीर्थयात्रेला गेलो होतो, ते थेट आता आलोत आणि आता तुम्ही म्हणताय हे घर तुमचं आहे ?”

रजतदेखील बऱ्यापैकी शांत झाला होता. त्याने विचारले, “तुमचं आडनाव सरदेसाई आहे का ?”

शामराव, “ हो.. हो... मी शामराव सरदेसाई आणि ही माझी पत्नी राधा सरदेसाई.”

रजत, “काका आत या.” असे म्हणत त्याने त्या दोघांना आत घेतले आणि सोफ्यावर बसवले.

त्याने त्याच्या आईला आवाज दिला.
“आईऽऽ ए आईऽऽ”

त्याची आई हात पुसत स्वयंपाक घरातून बाहेर आली.

रजतची आई सरिता, “काय झालं रे ? डब्बा बनवत होते तुझा. ऑफिसला जायचं असेल ना ?”

शामराव आणि राधबाईंना पाहून सरिता थबकली. सरिताबाईंच्या समोर नको असलेला भूतकाळ उभा राहिलेला.

त्यातही त्या सावरून म्हणाल्या, “हे कोण ?”

रजत, “आई, अगं आपण ज्याच्याकडून हे घर घेतलं ना त्याचे आई-वडील आहेत बहुतेक. यांना माहीतच नाही, त्यांच्या मुलाने घर विकल्याचं.”

शामराव आणि राधाबाई सरिताबाईंना पाहून ओशाळले होते.

रजत शामराव आणि राधाबाई कडे पाहत म्हणतो, “हे पहा काका, तुमच्या मुलासोबत या घराबद्दल बोलणं गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होतं. त्यांना हे घर लवकरात लवकर विकायचं होतं कारण त्यांना अमेरिकेत नोकरीनिमित्त कायमसाठी जायचं होतं. त्यामुळे मी लोन वगैरे सर्व जरा लवकर करून घेतलं आहे. आता २० दिवसांपूर्वीच आम्ही इथे आलो आहोत.”

आता मात्र शामराव आणि राधबाईंचा चेहरा पडला आणि ते दोघे एकमेकांकडे पाहू लागले.