Login

जैसे ज्याचे कर्म  भाग २

-


जैसे ज्याचे कर्म  भाग २


चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५  ( संघ ४ - कामिनी )

©® आरती पाटील - घाडीगावकर


सरिताबाईंनी लगेच शामराव आणि राधाबाईंना चहापाणी, नाश्ता दिला. खरेतर आता त्यांना ते घेताना लाज वाटत होती; पण सध्या तरी यावर काही इलाज नव्हता!

शामराव काहीसे कचरतच म्हणाले, “राधा, आता पुढे काय करायचं ?”

राधाबाईंच्या डोळ्यांत पाणी होते. त्यांना या परिस्थितीत काहीच सुचत नव्हते. डोक्यावर छप्पर तर नव्हतेच आणि पोटाची खळगी आता या वयात कशी भरायची हे टेन्शनही वेगळेच.

रजत आपल्या आईला आत नेत विचारतो, “आई आता काय करायचं ? घर आता आपलं आहे. त्यांना समजावून परत पाठवू का ?”

आईने त्याला समजावत म्हटले, “थांब जरा. त्यांना असं सोडणं बरोबर वाटणार नाही. आपण त्यांच्यासाठी काहीतरी सोय बघुयात. संध्याकाळी तू आलास की बघू काय करायचं ते.”

रजत हॉलमध्ये येत म्हणतो, “काका-काकी तुम्ही आता तरी इथेच थांबा. मी ऑफिसला जातोय. संध्याकाळी आल्यावर आपण यावर काय करता येईल ते पाहुयात.”

रजत तयार होऊन ऑफिसला जातो आणि इकडे राधाबाईंचा अश्रूबांध फुटतो.
त्या सरिताबाईंना म्हणतात, “सरिता आम्हाला माफ कर. आमच्याच कर्माची फळं आज आम्ही भोगतोय. त्यावेळी आम्ही जे केलं, तेच आमच्या मुलाने आमच्यासोबत केलं.”

“जाऊ द्या ताई... तो विषय आता नको आणि हो, रजतला याबद्दल काही बोलूसुद्धा नका. आता तुम्ही आराम करा. मी दुपारच्या जेवणाचं बघते.” असे म्हणत सरिताबाई स्वयंपाकघरात गेल्या आणि त्यासोबतच त्यांचं मनसुद्धा भूतकाळात गेलं.

२९ वर्षांपूर्वी लक्ष्मणरावांचा म्हणजेच सरिताबाईंच्या यजमानाचा मृत्यू झाला होता. गावी सासरी मोठं घर होतं. घरी सासूबाई, मोठे दीर शामराव, जाऊबाई राधाबाई, त्यांचा ८ वर्षांचा मुलगा हेमंत, सरिताबाई आणि त्यांचा ४ वर्षांचा मुलगा रजत अशी बरीच माणसे होती.

लक्ष्मणरावांचा मृत्यू होताच राधबाईंनी शामरावांच्या मागे भुणभुण लावली होती.
“आता कायम या सर्वांचं करत राहायचं का आपण? आपलासुद्धा संसार आहे, मुलगा आहे. त्याचं बघायचं की या सर्वांचं?”

राधाबाईंच्या या सारख्या बोलण्यामुळे कुठेतरी शामरावांनादेखील त्यांचं म्हणणं पटू लागलं. वेगळं राहण्याचा विषय काढला तर आई वाटणी करेल आणि भाऊच नाही तर वाटणी का द्यायची म्हणून शामरावांनी गुपचूप घराची आणि शेतीची किंमत ठरवून ती विकलीदेखील आणि राधाबाईंना माहेरी सोडायच्या निमित्ताने मौल्यवान सामान, दागिने, साड्या घेऊन ते बाहेर पडले.