Login

जैसे ज्याचे कर्म  भाग ३ अंतिम

-


जैसे ज्याचे कर्म भाग ३ अंतिम


चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५  ( संघ ४ - कामिनी )

©® आरती पाटील - घाडीगावकर


आठ दिवसांनी ज्यांनी घर आणि जमीन घेतली ते लोक आले होते. ते सर्व पाहून आणि ऐकून तर सासूबाईंना आणि सरिताबाईंना धक्का बसला होता. त्यांना आपले स्वतःचे राहते घर सोडून निघावे लागले होते. त्यांच्याकडे फक्त पडीक २ एकर शेत होते, कारण ते सासूबाईंच्या नावावर होते.

सरिताबाईंनी त्या पडीक शेतातच एक झोपडी बांधली. त्या शेतात कोरडवाहू जमिनीत जमेल तेवढे पीक घेतले. बाकी वेळ त्या दुसऱ्याच्या शेतात रोजाने जात असत. रजत या परिस्थितीमुळे लहानपणापासून शहाणा झाला होता. त्याने अभ्यासात स्वतःला झोकून दिलेले. स्कॉलरशिप मिळवत पुढे जाऊ लागला. आईला मदतसुद्धा करू लागलेला.

सरिताबाई आणि रजतच्या मेहनतीला फळ मिळाले. रजत मोठ्या कंपनीत कामाला लागला. त्याने सर्वात आधी आपले जुने घर परत मिळवले आणि त्यात आई, आजीला घेऊन गेला. शहरात पी.जी म्हणून राहून उरलेले पैसे खात्यात टाकू लागला. त्यातून त्याने हे घर घेतले होते. त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या स्वरासोबत तो आईच्या आणि आजीच्या साक्षीने विवाहबद्ध झाला होता. आता सर्व सुखाने सुरू असताना सरितासमोर तिचा भूतकाळ उभा राहिलेला. कदाचित देवाला दाखवून द्यायचे होते की जो जसे कर्म करेल, त्याला तसेच फळ मिळेल.

बाहेर राधाबाई आणि शामराव आपण केलेले परत आपल्याला कसे मिळाले याचा लेखाजोखा पाहत होते.

संध्याकाळी रजत आला तो माहेरी गेलेल्या आपल्या पत्नीला आणि मुलाला घेऊनच! नातू आणि सून सरिताबाईंना पाहून खूप खूश झालेले.

सुनेने सरिताबाईंसाठी आणलेली साडी आणि सोन्याचे कानातले दाखवले.
“आई हे तुमचे कानातले थोडे छोटे आणि जुने आहेत म्हणून मी तुमच्यासाठी आणले आहेत.” असे म्हणत स्वराने सरिताबाईंना ते कानातले घालायला लावले.
ते पाहून राधाबाईंना अजून दुःख होऊ लागलेले.

रात्री जेवण झाल्यावर रजत म्हणाला, “ काका-काकी, मी माझ्या वकील मित्राला विचारलं तर तो म्हणाला की तुमचा मुलगा इथे असता तर काहीतरी करता आलं असतं; पण तो अमेरिकेत गेल्यामुळे आपण काही करू शकत नाही. त्यामुळे मी एका वृद्धाश्रमात चौकशी केली आहे. खरंतर हे घर लहान आहे, नाहीतर इथेच रहा म्हणालो असतो आणि गावच्या घरी रहा म्हणालो असतो; पण तिथे आरोग्यसेवा व्यवस्थित नाहीत. त्यामुळे तुमची योग्य काळजी घेतली जाईल अश्या वृद्धाश्रमात सोय केलीये मी. तेव्हा सकाळी आपण तिकडे जाऊयात.”

बोलणे झाल्यानंतर ते सर्वजण झोपायला गेले.

शामराव आणि राधाबाई मात्र सरिताबाईंकडे आशेने पाहू लागले.

सरिताबाई स्पष्ट शब्दात म्हणाल्या, “ रजतला माहीत नाही तुम्ही त्याचे खरे काका-काकी आहात. ते समजलं तर जी सोय होतेय तीसुद्धा होणार नाही. कारण त्याने त्याच्या आजीला आणि आईला होणारा त्रास जवळून पाहिला आहे.”

सरिताबाईचे बोलणे ऐकून शामराव आणि राधाबाईंची उरलेली आशासुद्धा मावळली होती आणि ते सकाळच्या किरणासोबतच वृद्धाश्रमात जाण्याची वाट पाहू लागले.