सॉक्रेटिस म्हणाला होता, \" मला काय समजले हेच समजले नाही!\" त्याच धर्तीवर मी म्हणालो, "मला काय समजायला हवे तेच समजत नाही...! "
सॉक्रेटिस ची बायको कजाग होती. तिच्या भांडकुदळ स्वभावामुळे सॉक्रेटिस चिंतनाकडे वळला असावा असा आमच्या टिपरे मास्तरचा दावा आहे. त्यावरूनच त्याने वरील विधान केले. त्याचं हे असं तत्वज्ञान आजकाल वैतागवाडीकरांना पटत नसलं तरी ऐकावं लागे. त्याचा हक्काचा श्रोता म्हणजे मी. पुलंच्या सोन्या बागलाणकरासारखा तो मला वेळी -अवेळी कुठेही गाठतो आणि अडचणीत आणणारी विधाने करतो. मग मला सारवासारव करावी लागते. आताही असंच झालं...
परवाची गोष्ट...
कशावरूनतरी गोष्टी निघाल्या. शाळेतील आठवणी आणि तेव्हा केलेल्या गंमतीजमती यांचे किस्से सुरू झाले. पारावरील मंडळी फारच संशयाने बघतात म्हणून आम्ही पोरे जरा पलीकडे ओढ्याच्या कडेला वडाच्या सावलीत बसत असू. दुपारच्या उन्हात तिथे एसीत बसल्याचा फील येई. शिवाय तिथे कुणी त्रास देण्याची शक्यता नसल्याने अनेक गुपितं उघड बोलली जात. गावाला ज्या गोष्टींचा त्रास होई ते विषय हक्काने चघळायची जागा म्हणजे हा खंदक! टिपरे मास्तर, बाल्या, मी आणि धन्या बसलो होतो. टिपरे मास्तरची काहीवेळ तंद्री लागली आणि अचानक नॉस्टॅल्जिक होत त्याला शाळा आठवली. राऊत गुरुजींनी भर उन्हात अंगठे पकडून ऊभं केल्याची आठवण झाली. वेळूचे फटके खाऊन सुजलेल्या मांड्या आठवून धन्या बसल्या जागी शहारला. मग बाल्याला सहावीचा वर्ग आठवला. त्याच वर्षी आमच्या शाळेत शहरातून आलेली भाग्यश्री आठवली. तिच्या घराभोवती मारलेल्या चकरा आणि गावातील सार्वजनिक आडावरून काढून दिलेल्या पाण्याच्या कळशा!
मला संगीता माझ्या वर्गात होती तेव्हापासून आवडायची. तिचा बा मात्र घारीसारखा नजर ठेवून असायचा. मी जेव्हा तिच्यासोबत बोलायचो तेव्हा कितीही लपवले तरी तिच्या बापाला बरोबर समजायचे. माझी खबर त्याला लागते कशी हेच एक कोडे होते. दररोज संध्याकाळी तो आमच्या घरी यायचा. माझा बाऽ आणि त्याचा दोस्ताना होता. हे दोघे दोस्त तंबाखू मळत गावातील राजकारणापासून ते केंद्र सरकारच्या धोरणांवर देखील अतिशय गंभीर चर्चा करीत. सरकार कसं निष्काळजी आहे.. भ्रष्टाचार कसा वाढलाय.. जिथे तिथे पैसे खाणारे, वशिलेबाज आणि घोटाळेबाज कसे आहेत... त्यांच्यामुळे नागरिकांना आपलं कर्तव्य पालन करण्यात रस उरत नाही आणि म्हणून नागरिकदेखील पैसा घेऊन मतदान करतात.... हे सर्व ते दोघेजण घरून बायकांनी \"जेवायला या\" असा निरोप देईपर्यंत बडबडत असत. त्या दोघांची मैत्री पाहून शाळेत माझ्या मित्रांनी संगीता आणि माझी जोडी जमवूनदेखील टाकली होती. " आरं तिचा बा ऽ तुझ्या बा ऽ चा जिगरी दोस्त हाय! तो तुला त्याची पोरगी हसत हसत देईल..!" या वर्गमित्रांच्या विश्वासाला जागून मला संगीवर प्रेम करावं वाटायला लागलं. वास्तविक पाहता याआधी कुणावर प्रेम करण्याचा अनुभव नसल्याने ते कसं करतात हेच मुळात ठाऊक नव्हतं. कुणाला विचारायला जावं तर ती सोय नव्हती. आमच्या गावात प्रेमप्रकरणं घडत असावीत पण ती आतासारखी उघड नसत. या बाबतीत मार्गदर्शन करू शकेल असा एक माणूस होता... आबा साखरे! साखरेसारखाच गोड.. भलताच अघळपघळ. तो पाटलाच्या शेतात कामाला होता. पाटलाच्या सोबत राहून त्यानेही अनेक प्रकरणे जवळून पाहीली होती. गावातील कुणाच्या तरी सापडलेल्या प्रेमप्रकरणात निवाडा करताना तो \"कसा \" करतात हे त्याने जवळून पाहीलेलं. त्यामुळे त्याचा सल्ला घ्यावा असं वाटू लागलं. मग मी, बबल्या आणि पश्या दुपारी शाळा बुडवून (?) पाटलाच्या मळ्यात गेलो. ऊसाच्या कडेकडेने जाताना पाटाचं पाणी वाहून चिखल झालेला होता. तो चिखल ओलांडून पलीकडे गेलो आणि बांधावर लिंबाखालीच बसलेला आबा पाहून जागीच थांबलो. आबासोबत पाटलाच्या मळ्यात काम करणारी कमळी हसत खिदळत गप्पा मारत बसलेली. आम्ही विद्यार्जन करायला गेलो आणि विद्यापीठच समोर यावं तशी गत झाली. विधात्याने हा मार्ग दाखवला आणि समोर झाडाखाली बसलेल्या त्या प्रेमसागरूला मनोमन त्रिवार वंदन करून आम्ही तो प्रेमसंवाद ऐकू लागलो. अपेक्षा इतकीच की ते चार शब्द कानांवर आले तर प्रेमाच्या परीक्षेत काही गुण मिळवता येतील!
"...ए कमळे, जरा जवळ ये की! " आबाचा साखरेत घोळवलेला आवाज.
"क्च्याकऽऽऽ...!" कमळीचं उत्तर
"आगं असं काय करतीस? माझं किती प्रेम हाय तुझ्यावर! "
"..उंहू ऽऽऽ माह्यताय किती प्रेम हाय! म्हणून तर त्या नकट्या झिपरीला घेऊन पिच्चरला गेला! " कमळीने सांगितलं ते ऐकून आम्ही तिघे तर दचकलोच पण आबाची वाचा गेली. कसाबसा सावरत तो बोलला,
"आगं, तिला पिच्चरला नव्हती नेली. तालूक्याला मेडिकलवर भेटली तवा एक औषीद घावना म्हणून ते घेऊन दिलं... "
" खोटं ऽ! तिनंच सांगितलंय मला... तू तिला घेऊन टॉकीजला गेलास आणि सैराट दाखवलास. कोपर्यात कॉर्नर सीटवर बसून पापकोन खाल्ला ते...?"
आबाला हा यॉर्कर अडवता आला नाही. तरीही धीर करून तो बोललाच," अगं ते खोटं खोटं! माझं पैलं आणि शेवटचं पिरेम तूच हायस...गळ्याशप्पत! "
"..हूं ऽ हेच तिलाबी सांगितलंस... त्या नकटीत काय बघितलंस एवढं? आता जा की तिच्याकडंच...! " कमळी चांगलीच चिडली होती.
"आगं पिलू, तसं नसतंय गं! आता खरंच सांगतोय, आय फक्त यू लव टू गं..!! " आबाला इंग्रजी शिकवणारा मास्तर तडफडून मेला असणार.
"अय्यो! खरंच का रं आब्या? आबड्या.. आब्बुराव! " कमळी त्याचं विंग्रजी ऐकून अचानकच बदलली. तिचं ते बदललेलं रूपडं पाहून आब्या लगेच फॉर्मात आला आणि त्याने न राहवून कमळीचा गालगुच्चा घेतला.
"...असाच गालगुच्चा घेतलास ना रं त्या झिपरीचा? "कमळीने निरागसपणे विचारलं.
"व्हय... पण तिचं गाल तुझ्याएवडं गोबरं नव्हतं! " आबा बोलून गेला आणि कमळीने त्याला एकदम झिडकारलं.
"...तुझं मढं बशीवलं...! झिपरीचाच गालगुच्चा घेत बस की भाड्याऽऽ...!"
कमळीने आबाची शिकार केली आणि आम्ही चड्डया सावरत आल्या पावली चिखलातून धावत पळत परतलो.
प्रेम करणं ही एक अतिशय नाजूक बाब आहे हे तेव्हा मनावर ठसलं. अतिशय सावधपणे वागावं लागतं हा धडा तेव्हा मिळाला. त्यानंतर संगीकडे काही दिवस पहायची देखील हिंमत होत नव्हती. मग काही दिवस \"दिल दीवाना...\"होऊन फिरलो आणि एकेदिवशी हिंमत आली. प्रेमाशिवाय जगण्यात मजा नाही हे जाणवलं. त्या दिवशी संगीने शाळेत येताना मक्याची कणसे आणली होती. त्यातील एक कणीस तिने मला गुपचूप दिलं आणि दुपारच्या सुट्टीत खा म्हणून सांगितलं. त्यावेळी मला काहीतरी खूप दूर दूर जातंय याची जाणीव झाली. आबाचं प्रकरण फसलं म्हणजे आपलं फसणारच असं काही नाही. खरंतर आबाने दोन दगडांवर पाय ठेवायला नको होता. तरीही त्याने ठेवला यात त्याचीच चड्डी फाटली आणि लाज गेली. आपण असं काही करत नाही आहोत. या विचाराने धीर आला आणि मी आणखी एक लिटमस टेस्ट घेतली. मधल्या सुट्टीत कुणी नसताना मी संगीला गृहपाठाची वही मागितली. ती तिने हसत हसत दिली. मी पटकन ती घेऊन माझ्या दप्तरात ठेवली. माझ्याकडे डोळे मोठे करीत ती हसत बाहेर गेली आणि माझं मन उडू उडू झाल्याचा फील आला. कथा-कादंबर्या वाचून प्रेम कसं व्यक्त करायचं हे समजलं होतं. धीर करत तिची वही मी उघडली. शेवटचं पान उघडून तिथे लिहीलं...
\"प्रेम हा मनाचा आरसा आहे....! \"
चटकन ती वही मिटून कुणी पाहीलं तर नाही ना याची खात्री केली. ती वही दप्तरात सर्वात शेवटी तळाशी लपवून मी त्या गावचाच नाही असा चेहरा केला. शाळा सुटल्यावर संगीने ती वही मागितली. वही परत देताना माझा हात अक्षरशः थरथरत होता. कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीही तिला ते समजलं असणारच. बेरकीपणाने हसत ती निघून गेली. थोडी पुढे गेली आणि परत मागे वळून पाहत तिने जीभ बाहेर काढून वेडावून दाखवले आणि घराकडे पळत सुटली. तिची ती अदा पाहून मी कारण नसताना विराट कोहलीने एखादा क्याच पकडल्यावर मैदानातच \"येस्स येस्स येस्स...\" करुन नाचावे तसा नाचलो. पोरांना कळेना, याला काय झालंय?
दुसर्या दिवशी सकाळी तिने मला शाळेत पाहून ओळख दाखवलीच नाही. मला राहवेना म्हणून मी बळेच तिच्या समोरून दोन तीनदा गेलो पण ती काहीच बोलली नाही. मग मी सहज \"काय गं काय करतेस?\" असंही विचारलं. यावर ती फक्त "क्च्याकऽऽ!" अशी उद्गारली. तिच्या मौनाचा खुलासा तासाभराने झाला. तिचा बाऽ शाळेत आला आणि त्याने परेड ग्राउंड वरच प्रार्थनेवेळी मास्तरांना विचारले... "साळंत पांडूरंग कोण हाय? "
हेडमास्तर माझ्याकडे पाहत होते. संगीचा बा ऽ पुन्हा गरजा, " आरं कोण हाय पांडूरंग? " आता सगळे माझ्याकडेच पाहत होते. गुर्जींनी माझ्याकडे पाहीलं म्हणून मला वाटलं की ते मलाच विचारत आहेत. मी लगेच म्हणालो, " या नावाचं कुणीच नाही! "
"आरं पांडू टिपरे कोण हाय? " संगीचा बाप जोरात ओरडला. मास्तरांनी एका हाताने माझा कान पिळला आणि, "अरे नालायका, पांडू टिपरे तूच आहेस ना? की बारसे केले बापाने? " असं विचारलं आणि मला क्षणभर चड्डी ओली होते की काय वाटलं पण मी धीर धरला. खाली मान घालून मी थरथर कापत उभा होतो. माझ्या पाठीवर जोरदार थाप मारीत संगीचा बा ऽ बोलला, " आक्षर झकास हाय तुजं! तुझा सुविचार वाचला, \"पिरेम हा मनाचा आसरा हाये! \"
"अण्णा, आसरा नव्हं आरसा! " धन्याने मधेच चूक सुधारली आणि संगीचा बाप डाफरला, "साळा सिकायला आला का पिरेम करायला रं? कितवीत हैस? "
यावर धन्या पुढील धोका ओळखून पटकन बोलला, "म्या चौथीला हाय! " संगीताचा बाऽ थोडावेळ थांबून हेडमास्तरांना बोलून चहा पिऊन गेला. जाताना माझ्या वर्गासमोर येऊन मला पाहत, \"आब्ब्यास कर चांगला, हुशारैस! \" म्हणून गेला. इकडे धन्या तासभर उन्हात अंगठे पकडून ऊभा होता. सहावीत असताना चौथीत आहे असं सांगितल्याची ती शिक्षा होती पण धन्याची \"अंदरकी बात\" आम्हाला माहीत होती. मी मात्र दिवसभर थरथरत होतो. संगीता अधूनमधून मला पाहून जीवघेणं हसायची.
"शाळा सुटल्यावर मी तिचा खून करणार आहे! " मी बबल्याला सांगितलं.
"कायपण कर पण आधी ती वही घेऊन तिचं शेवटचं पान फाडून टाक, तुझा सुविचार असलेलं! " बबल्याने पोक्त सल्ला दिला. त्याबरहुकूम मी दुपारी संगीला धीर करून कालचीच वही परत मागितली. तिने सहज दिली. मी तिचं लक्ष नसताना ते शेवटचं पान चटकन फाडून घेतलं. मग वही तिला परत दिली. तिने ती न पाहता दप्तरात कोंबली. जाताना माझी अभ्यासाची वही तिने नेली होती. नंतर तिने ती मला आणून दिली तेव्हा तिचा बाऽ माझ्या घरी येऊन तीच वही बघून गेला( हे मला नंतर कळाले) त्यावर मागच्या पानावर संगीने \"दुपारी शाळेच्या मागे ओढ्यात जांभळे पाडून द्यायला ये\" असा निरोप दिला होता. तो निरोप वाचून मी हरखून गेलो.
बबल्या, पश्या आणि मी आम्ही तिघेही दुपारनंतर शाळा बुडवून शाळेमागेच ओढ्याच्या काठावर गप्पा मारत बसलो होतो.
"भावा, तुझी लाईन क्लियर झाली. स्वतः सासरा येऊन शाळेसमोर कौतुक करून गेला, अजून काय पायजे? " पश्या कौतुक करत होता की जळफळत होता ते समजले नाही. बबल्या मात्र मुंडी हलवत,
"भावड्या, जरा जपून बरंका? त्ये अण्णा लै तिरपागडं हाय! स्वतःच्या बापाला टांग मारतंय तवा तुझी डाळ कशी शिजू देईल सांग बरं? "
बबल्याचं म्हणणं बरोबर होतं. तरीही एक मन म्हणत होतं की संगीचंदेखील आपल्यावर प्रेम आहे. त्याशिवाय का तिने जांभळे पाडायला बोलावलं? त्या दिवशी मी लवकर घरी गेलो. हातपाय तोंड चांगलं खसाखसा चोळून धुतले. लाईफबॉय साबणाची अर्धी वडी संपवली. बहिणीच्या पावडरच्या डब्यातली पावडर लावून गोरा झालो. दररोजचं खवट वासाचं पॅराशूट नको म्हणून जावेदच्या दुकानातून खास सुगंधी वासाचं तेलाचा पाऊच आणला. त्या दिवशी नेमका तो जास्मीनचा एक रूपयेवाला पाऊच संपलेला आणि माझ्या खिशात दोनच रूपये होते. मग अखेर त्यातल्या त्यात बरं म्हणून नवरत्न तेल घेतलं. ते लावून \"तुझमें रब दिखता है \" म्हणणाऱ्या शाहरूखसारखा भांग पाडला आणि नवीन कपडे घालून ओढ्याकडे धावलो. संगीता येताना दिसली आणि मी ओढ्यात जमलेल्या पोरांना बाजूला व्हा म्हणून ओरडलो. मी आता जांभळं पाडणार आहे आणि कुणीही त्यांना हात लावायचा नाही अशी ताकीद दिली. संगीता जवळ येईपर्यंत जवळ येईपर्यंत मी झाडावर चढलो होतो आणि ती आल्यावर तिला... फक्त तिलाच जांभळे गोळा कर म्हणून सांगितलं. तिने घरून मोठी कॅरीबॅग आणली होती. मी फांदी हलवून जांभळे पाडली आणि ती गोळा करीत राहीली. किती वेळ गेला माहीत नाही. मी जेव्हा खाली उतरलो तेव्हा जांभळीभोवती कडे करून अख्खी शाळा आणि निम्मा गाव उभा होता. संगी तिथे कुठेच नव्हती! संगीचा बा ऽ तेवढा कुर्हाड घेऊन ऊभा होता...
आजूबाजूला जमलेली गर्दी, हातात कुर्हाड घेऊन समोर उभा असणारा संगीचा बाप आणि आमच्या दोघांत पसरलेला जांभळांचा सडा...जग किती छोटं आहे ना?
क्रमशः
फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या
Subscription Plan
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा