जलदलेखन
विषय-जाणीव
शीर्षक -जाणीव 'स्व'त्वाची
भाग-३
विषय-जाणीव
शीर्षक -जाणीव 'स्व'त्वाची
भाग-३
मंगला, आता तू सेवानिवृत्त झाली आहेस. आता तू स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ठेव. मनाला काही प्रश्न विचार. काय झालं? सध्या आपण इतक्या कशा रडूबाई झालो? कुठे गेला तो हसरा, उत्साहाचा खळखळता झरा? जरा आपल्या आतला आवाज ओळखायला शिक.
आता तुझ्याजवळ भरपूर वेळ आहे. मुलांची कशाला काळजी करतेस? ते सुखात असतात तिकडे.आपापल्या करिअर मधे खुश असतात.आता आपण स्वतःची काळजी घ्यायची. आपल्या आत दडलेल्या प्रेमाला परत बाहेर काढायचं. पण आता ते प्रेम स्वतःवर उधळून घ्यायचं. स्वतःसाठी करायच्या राहून गेलेल्या गोष्टीसाठी पुरेसा वेळ द्यायचा.
उगाच स्वतःला दमवून न घेता येणारे क्षण भरभरून जगायचे. आपल्या आनंदासाठी आणि शक्य असेल तर इतरांसाठी जरूर करायचं. पण परतीच्या आहेराची वाट न बघता. स्वतःसाठीचा ओलावा स्वतःच निर्माण करायचा.
किती छान बोलतेस गं सुषमा तू.कुठे शिकलीस गं हे सर्व.किती सुंदर शब्दांत मला समजावून सांगते आहेस. मी तर अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले आहे तुझ्या बोलण्याने.
अगं मंगला आयुष्याच्या कठोर परिक्षेत जगण्याच्या शाळेत मिळालेलं हे ज्ञान आहे बरं कां. आता त्याचा उपयोग करून पास होऊनच दाखवायचे. आनंदाची छोटी छोटी बेटं स्वतःसाठी तयार करायची. कॅनव्हास वर मस्त रंगात बुडून जायचं.
निसर्गात रमून जायचं. मनापासून गायचं. मनाला आवडणाऱ्या सुरांवर मनसोक्त हळूहळू कां होईना पण नाचायचं सुद्धा. कधी कधी स्वतःच्याचं पाठीवर कौतुकाची थाप मारून घ्यायची. स्वतःचं स्वतःच कौतुक करायचं. छान छान आवडीचे पदार्थ करून स्वतःच आनंद घेत खायचे.
स्वतःच्या शरीरावर प्रेम करायचं आणि हो, विशेषतः आपल्याला दुःख देणाऱ्या व्यक्तींना लांब अंतरावर ठेवायचं. मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तींमध्ये रमून जायचं. जे मिळालं नाही त्याची खंत करणे सोडून जे जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञतेचा भाव ठेवायचा. म्हणजे दीर्घकाळ आनंदात जगता येतं.
शिस्त, शांतता, कुटुंब आणि मैत्रिणी सोबत चांगले संबंध, भावनिक स्थिरता आणि भरपूर सकारात्मकता या सर्व गोष्टींमुळे आपण जोपर्यंत या जगात आहोत तोपर्यंत आनंदाने जगू शकतो.
अगं मंगला ज्या काळात, ज्या वयात ज्येष्ठ लोकांना, वृद्धांना मदतीची खरी गरज आहे. नेमक्या त्याचवेळी त्यांच्याजवळ कोणी नाही. ही वस्तुस्थिती आहे.
हो नां. खरं आहे तुझं म्हणणं. मंगला म्हणाली.
अगं मंगला ही फक्त तुझी आणि माझीच समस्या नाही तर आज ही जागतिक समस्या बनू पाहत आहे. अनेकांची मुलं परदेशात शिकायला गेली नंतर तिकडेच स्थायिक झाली.मग तिकडेच लग्न.
पुढे काय हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग अवश्य वाचा