Login

जाणीव 'स्व'त्वाची भाग-१

जाणीव 'स्व'त्वाची भाग-१
जलदलेखन
विषय- जाणीव
शीर्षक - जाणीव 'स्व'त्वाची
भाग १


"हॅलो कोण बोलतंय?"

"अगं मी मंगला बोलते."

अरे व्वा! बऱ्याच दिवसांनी फोन केलास.

अगं सुषमा कशी आहेस? खूप आठवण आली गं तुझी. ये नां माझ्याकडे चार-पाच दिवस राहायला. बरं वाटेल तेवढंच. खूप उदास वाटतं गं हल्ली मला.


"कां गं तब्येत बरी नाही कां?"

"तब्येत बरी आहे गं पण"....

अहो सुषमाताई काही झालं नाही हिला. मध्येच मंदाररावांनी फोन घेतला. सारखा मुलाचा,सुनेचा, नातवंडांचा विचार करत असते. तिथे ते सर्व मजेत असताना हिने कां बरं काळजी करावी? पण नाही. नोकरीच्या काळात सारखी कामात गुंतून असायची. आता निवृत्ती नंतर सारखी तोच तो विचार करत असते. तुम्ही इकडे आलात तर बरे होईल. सांगा कधी येणार आमच्या गावाला? चार गोष्टी समजावून सांगा तुमच्या मैत्रिणीला.


"बरं बरं येते मी." सुषमा म्हणाली आणि तिने फोन ठेवला.


काय हो, काय गरज होती सुषमाला फोनवर हे सर्व सांगण्याची. नोकरीतून निवृत्त झाल्यापासून तुम्ही तुमचं छान मित्र मंडळ तयार केलं. मजेत वेळ जातो तुमचा. आणि घरी असतांना सारखे मोबाईलमध्ये तोंड खुपसून असता. मग मी काय करावं?मंगला म्हणाली.


"तुला कोणी मनाई केली. मी माझा मार्ग निवडला.तू ही तुझा मार्ग निवड."मंदारराव समजुतीच्या स्वरात म्हणाले.


दुसऱ्या दिवशी सुषमा मंगलाच्या गावी आली. दोघींना एकमेकांना भेटून खूप आनंद झाला.


सुषमा व मंगला दोघी जिवाभावाच्या मैत्रिणी. मंगलाला एकच मुलगा.त्याचे नाव राजेश. मंगला व मंदारराव दोघेही नोकरीवर त्यामुळे मुलांची आबाळ होऊ नये म्हणून त्यांनी दुसरे मूल होऊ दिले नाही.


राजेशला कंपनीतर्फे परदेशात चांगल्यापैकी ऑफर आल्यामुळे तो तिकडेच सेटल झाला होता. तो आणि त्याचे कुटुंब तिकडेच राहायचे.मंगला व मंदार राव नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. नोकरीच्या काळात मंगलाताईंचा वेळ कामात निघून जायचा. परंतु निवृत्त झाल्यापासून त्या सारखी मुलाची आठवण करायच्या. सदैव बेचैन असायच्या.


सुषमा व सुशांतराव दोघेही सेवानिवृत्त. त्यांना दोन मुले. सुजय व अजय. दोन्ही मुले व सुना दुसऱ्या शहरात नोकरीवर असल्यामुळे सुषमा व सुशांतराव दोघे गावी राहायचे.


"अगं ये मंगला काय करत आहेस?" ये नां इकडे. बस जरा. नंतर आपण दोघी मिळून आवरू सर्व.

"अगं सुषमा, आज मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीच्या अळूवड्या करते आहे." मला माहित आहे, तुला अळूवड्या खूप आवडतात.मंगला अळूच्या पानांना बेसनपीठ लावता लावता बोलत होती.मग थांब मीच येते तिकडे म्हणत सुषमा किचनमधे गेली.


खरं सांगू का मंगला,रिटायर्ड झाल्यापासून मी स्वतःला सतत गुंतवून ठेवलं आहे. तुला तर माहीतच आहे, मला वेगवेगळे पदार्थ करण्याची खूप आवड आहे आणि आमच्या ह्यांना खाण्याची.मग हा एक छंद म्हणून मी वेगवेगळे पदार्थ करत असते.वेळही जातो आणि आवडीचे पदार्थ करून खाण्याची मजा काही औरच असते.सुषमा म्हणाली.


हो सुषमा, बरोबर आहे तुझे.
मलाही पूर्वी वेगवेगळे पदार्थ करण्याची खूप हौस होती. पण वेळ कमी होता. आता भरपूर वेळ आहे तर आता मनचं लागत नाही कशात.

पुढे काय हे जाणून घेण्यासाठी यापुढील भाग अवश्य वाचा.