ईरा चॅम्पियन ट्रॉफी:-२०२५
लघुकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- जाणीव
"आई, अगं ही घरात नाहीये." अनिल घाबराघुबरा होतं त्याची आई मंगलला म्हणाला.
"अरे, असेल घरातच कुठे जाईल? आता यावेळी कुठे जाणार ती?" मंगल त्याला धीर देत म्हणाली.
त्याने होकारार्थी मान डोलावली.
मनातून तीही घाबरली होती.
रात्रीचे दिड-दोन वाजले होते. अनिलची बायको वैशाली घरात त्याला कुठेच दिसली नाही म्हणून तो हवालदिल झाला होता. तेच मंगलला सांगण्यासाठी तो तिच्या रूममध्ये आला होता.
त्याने घरात सगळीकडे शोधले पण ती कुठेच त्याला दिसली नाही. मुले दुसऱ्या बेडरूममध्ये झोपली होती.
"नाही गं, पाहिले मी सगळीकडे. मेन दरवाजा पुढे केलेले आहे म्हणजे ती नक्की बाहेर गेली. बाहेर पण पाहून आलो पण ती नाही दिसली. कुठे गेली असेल ती? मला तर खूप भीती वाटते गं." अनिल रडकुंडीला येत म्हणाला.
"हे बघ अनिल, शांत हो, घाबरू नकोस. तू तिला फोन लावून पाहिलेस का ?" मंगलने त्याला विचारले.
"हो, केला होता पण तिने फोन नेलाच नाही. फोन घरातच ठेवून गेली ती." त्याचा धीर सुटत चालला होता. तो हुंदका देत म्हणाला.
मंगलने डोक्याला हात लावला.
"तरी मी तुम्हाला म्हणत होतो, तिला माहेरी सोडून या म्हणून. तुम्ही अजिबात माझे ऐकले नाही. बघा आता काय झाले?" अनिलचे वडील भीमराव चिडत त्या दोघांना म्हणाले.
"आता मला का स्वप्न पडले होते काय ती असे काही करेल म्हणून? तुम्ही शांत रहा जरा. अनिल, हे बघ ती जाऊन जास्त वेळ झाला नाही, म्हणजे ती गावातच असेल. एक तर ती तिच्या बहिणीकडे गेली असेल नाहीतर तिच्या आईकडे जाण्यासाठी बस स्टॉपवर गेली असेल. जा पटकन. माझं मन सांगतय ती सापडेल. जा लवकर. " मंगल त्याला दिलासा देत तिला शोधण्यासाठी पाठवले.
त्यांच्या बोलण्याच्या आवाजाने अनिलची दोन्ही मुले उठली. जेव्हा त्यांना कळलं की त्यांची मम्मी घर सोडून गेली तेव्हा काबरी बावरी होऊन तोंड पाडून ती एकमेकांना बिलगून बसली.
अनिल आणि वैशाली मुलांसोबत एकत्र कुटुंबात राहत होते. त्याच्यांत नेहमीच छोट्या मोठ्या कुरबुरी होत होत्या. त्या दिवशीही तिचं आणि मंगलचं जेवणावर वाद झाला होता. ती खूप हायपर झाली होती. अगास्ताळपणा करू लागली. अनिल मध्ये पडला तर त्याच्याशीही तिने वाद घातला. मोठ्या मुश्किलीने त्याने तिची समजूत घातली होती. त्याला वाटले सकाळपर्यंत सगळे काही ठीक होईल. दोन दिवस घरात अबोला राहिल. नंतर नेहमीप्रमाणे वातावरण निवळून जाईल. कारण या आधीही अशा कुरबुरी झाल्या होत्या. त्यामुळे त्याने एवढे काही मनावर घेतले नव्हते. पण यावेळी मात्र तिने उचललेल्या ह्या पावलाने त्याच्या मनात भीतीने घर केले.
तो तिला शोधायला बाईक घेऊन घराबाहेर पडला. तो मनातून मात्र खूप घाबरला होता. प्रत्येक वळणावर ती दिसते का ते पाहत निघाला.
"देवा! ती सुखरूप असू दे, ती लवकर सापडू दे मला." देवाला न मानणारा अनिल आज मात्र प्रत्येक देवाला आठवून साकड घालत प्रार्थना करत होता.
"तिने काही जीवाचे बरेवाईट तर करून घेतले नसेल ना. नो ..नो ..अनिल, असे भलतेसलते विचार मनात आणू नकोस. ती सुखरूप असेल. हो, ती सुखरूप असेल." स्वतःच्या मनात माजवणाऱ्या खळबळजनक विचारांना त्याने दटावत स्वतःलाच समजावले.
संपूर्ण बस स्टॉप त्याने पिंजून काढला. मंदिरेही पालथी घातली. पण ती काही सापडली नाही. तेव्हा त्याचा धीर खचत चालला.
इकडे मंगलने वैशालीच्या बहिणीला व मैत्रिणींना फोन करून तिच्याबद्दल विचारपूस केली पण तिथेही त्यांची निराशा झाली.
उलट त्यांनीच काय झाले म्हणून विचारले. घरात थोडी कुरबुर झाली बाकी काही नाही. असे तिने सांगितले.
तेवढ्यात अनिलने रडतच तिला फोन केला,"आई, ती कुठेच नाही. मला फार भीती वाटतेय. तिला काही झाले तर नसेल ना गं?"
"अरे, वाईट साईट विचार मनात आणू नकोस. काही होणार नाही तिला, देवावर विश्वास ठेव. परत एकदा बस स्टॉपवर जाऊन बघ. कदाचित आता असेल ती. रडू नकोस, शांत राहा. आणि तिथे नाही सापडली तर पोलिसांमध्ये तक्रार करू आपण. पण मला नाही वाटतं की ती वेळ येईल. जा तू." मंगलने त्याला समजावत दिलासा दिला.
मंगलच्या बोलल्याने त्याच्या खचलेल्या धीराला पुन्हा उभारी मिळाली. तो डोळे पुसत बाईकला किक मारून पुन्हा तिला शोधायला सज्ज झाला.
एका वळणावर त्याला गस्त घालणारा पोलीस दिसला. त्याला त्याने वैशालीचे वर्णन सांगून मोबाईलमधला फोटो दाखवत ती दिसली का ते विचारले. त्याने नाही म्हणून सांगितले. ती दिसली किंवा तिच्याबद्दल काही कळले तर संपर्कासाठी म्हणून त्याचा फोन नंबर त्याला दिला.
तो पुढे तिला शोधत निघाला. दहा पंधरा मिनिटांनी त्या पोलीसाने त्याला फोन केला,"हॅलो सर, तुम्ही वर्णन केलेली बाई बस स्टॉपवर दिसली असे माझ्या सहकाऱ्यांनी सांगितले. तुम्ही जाऊन बघा. तीच आहे का?"
त्याचे आभार मानून त्याने बाईक जोरात बस स्टॉपच्या दिशेने पळवली. मनात विचारांचे थैमान माजले.
"तीच असेल ना की अजून दुसरे कोणी? ती जिवंत असेल की तिचे प्रेत..ओह गाॅड ! कसले विचार करतोय मी? " मनात तो बडबडला.
त्या बडबडीत त्याने बस स्टॉप गाठले. सभोवताली त्याची नजर भिरभिरत होती. एका ठिकाणी त्याला एक पाठमोरी स्त्रीची आकृती दिसली. झपझप पावले टाकत त्या स्त्रीजवळ गेला. आवंढा गिळत तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आपल्या दिशेने वळवले. ती वैशालीच आहे हे पाहून त्याच्या जीवात जीव आला. तिला पाहून इतक्या उशीर रोखून ठेवलेला त्याचा आसवांचा बांध फुटला. तो तिला घट्ट मिठी मारून रडू लागला.
तिला सुखरूप पाहून त्याच्या मनाची व्याकुळता, तगमग आता कुठे शांत झाली.
तिचाही राग एव्हाना शांत झाला होता.
त्याने ती सापडल्याचा मंगलला फोन केल्यावर तिलाही हायसे वाटले.
तो तिला घरी घेऊन आला. त्या दिवशी कोणी काही बोलले नाही. पण मंगलने मनात काहीतरी ठरवले.
नंतर दुसऱ्या दिवशी मुले शाळेत गेल्यावर मंगलने सर्वांना एकत्र बोलावून घेतले. सर्वजण हाॅलमध्ये जमले.
"वैशू, कालचे तुझे वागणे मला पटले नाही. मान्य आहे तुला राग आला पण त्यामुळे तुझे असे अपरात्री घरातून निघून जाणे योग्य आहे का? घर म्हंटले की भांड्याला भांडं लागणारच. म्हणून असे वागायचे का? आम्हाला किती काळजी वाटत होती तुझी, किती घाबरलो होतो याची जरा तरी कल्पना आहे का तुला? रात्र आहे याचीही जाणीव नाही का झाली? अगं, रात्री कसल्या कसल्या विचित्र घडतात. अशा कितीतरी घटना ऐकायला मिळतात. हे तुला वेगळं सांगायला नको. तुझ्या सोबत काही उलट सुलट झाले असते तर काय केले असते आम्ही? नशीब चांगले म्हणून तू सुखरूप आलीस. काय अवस्था झाली होती आमच्या सर्वांची? अनिल तर वेड्यासारखा तुला शोधत फिरत होता. तू सापडत नव्हतीस तेव्हा तो रडकुंडीला आला होता." मंगल तिला तिच्या चुकांची जाणीव करून देत समजावत म्हणाली.
"हा, मग काय करायला हवं होतं मी? नेहमीचे बोलणे, टोमणे सहन होत नव्हते मला. म्हणून रागाच्या भरात मी ते पाऊल उचलले. मलाही तेव्हा काही कळलं नाही. झाली एक चूक माझ्याकडून. त्यावरून किती बोलणार अजून तुम्ही?" वैशाली हुंदके देत म्हणाली.
"अगं, तुला बोलत नाही गं. समजावून सांगतेय. मुले मोठी झाली आता तुझ्या अशा वागण्याचा त्यांच्यावर काय परिणाम होईल याचा विचार कर. चूक तर आमची पण आहे. चल आम्ही ही माफी मागतो तुझी. पण इथून पुढे असा वेडेपणा करू नकोस." मंगल तिला जवळ घेत डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
तिच्या मायेच्या स्पर्शाने तिला खूप भरून आले आणि ती तिला बिलगून स्फुंदून स्फुंदून रडू लागली.
"हो, वैशू चूका आपल्या सर्वांकडूनच झाल्या. आपण एकमेकांना समजावून घ्यायला कमी पडलो. पण तू सापडत नव्हती तर माझा जीव जायचा बाकी होता इतका मी घाबरलो होतो. इथून पुढे असं काही करू नकोस, बाई." अनिलही तिला समजावत म्हणाला.
"वैशू, कालचे भांडण माझ्यामुळे झाले. भाजीत मीठ कमी जास्त पडत. हे मी समजून घ्यायला हवं होतं. मीही खूप बोललो. तुझा बाबा समजून माफ कर. रागाने बोलून गेलो मी." भीमरावही तिची माफी मागत म्हणाले.
"अहो मामा, माफी नका मागू. तसं तर मी चुकलेच ना, थोडं समजून घ्यायला हवं होतं मीही. रागात मीही उलटं बोलले तुम्हाला. तुम्हीही मला माफ करा." ती त्यांच्या पाया पडत म्हणाली.
"चला, झालं गेलं गंगेला मिळाले. मागचं सर्व विसरून आता एकमेकांना समजून घेऊन आनंदाने राहू." मंगल तिच्या खांद्याला धरून जवळ घेत हसत म्हणाली.
वैशालीने हसत होकारार्थी मान डोलावत तिला बिलगली.
"मला ना या सिच्युएशनला एक गाणं आठवलं." अनिल मिश्कीलपणे हसत म्हणाला.
सगळ्यांनी एक सुरात विचारले,"कोणते?"
"भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर.. या वळणावर.." अनिल भसाड्या आवाजात हसत म्हणाला.
सगळे एकमेकांकडे पाहत एकमेकांचा हात धरून हसत गोल फिरू लागले.
समाप्त -
रागात कोणतेही चुकीचे पाऊल उचलणे धोक्याचे असते. वेळीच एकमेकांना समजून घेऊन चुकीची जाणीव करून घेतली तर सगळे प्रश्न मिटतील. घराचे नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही.
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही असे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा