वहिनी,आज भाजी खूप टेस्टी झाली आहे.मजा आली आज जेवायला. एक चपाती जास्त खाल्ली गेली आज."
राजेश वहिनीला म्हणाला व जेवणाचा छान आनंद घेऊ लागला.
"भाजी टेस्टी होणारच...तुमच्या बायकोने बनवली आहे भाजी. आणि एखादी चपाती जास्त खाल्ली म्हणून वजन काही वाढणार नाही तुमचे. घ्या अजून भाजी. तुमच्या बायकोलाच सांगते वाढायला."
जाऊबाईचे कौतुक करत,दिराची गंमत करत वहिनी राजेशला म्हणाल्या.
राजेशने मोठ्या कौतुकाने व आनंदाने बायकोकडे पाहिले.नवर्याचा आनंदी चेहरा पाहून व मोठ्या
जाऊबाईने भाजी वाढायचे सांगताच, राजेशच्या बायकोने त्याला तो नको म्हणत असतानाही भाजी वाढलीच.
'भाजीचे कौतुक जरा महागात पडले' जास्तीची भाजी खाताना राजेशला असे वाटले.
रोज अशा गंमतीजमती करत,गप्पागोष्टी करत रात्रीच्या जेवणाचा आनंद देसाई कुटुंब घेत होते.
आजही असेच सुरू होते.
तेवढ्यात,
"आई,बाबा,दादा,वहिनी तुमच्या सर्वांशी मला थोडे बोलायचे आहे.जेवण झाले की, सर्वांनी हाॅलमध्ये थोडावेळ थांबा."
प्रसादने सर्वांना सांगितले.
'हो,थांबतो.' असे सांगून प्रत्येकाने आपली प्रतिक्रिया दिली.
जेवण होतच आले होते.
जेवण झाल्यावर, आईबाबा व तिन्ही मुले हाॅलमध्ये बसली.थोड्या वेळात तिन्ही सुनाही काम आवरून हाॅलमध्ये येऊन बसल्या.
"आई,बाबा,दादा,वहिनी तुमच्या सर्वांशी एका महत्त्वाच्या विषयावर मला बोलायचे आहे.मी व सायलीने निर्णय घेतला आहे की, आमच्या ऑफिसजवळ सध्या रेंटने घर घेऊन राहायचे. इथून ऑफिस दूर पडते जायला व यायला. आणि हे घरही अपुरे पडते एवढ्या माणसांसाठी."
प्रसादने आपला निर्णय सर्वांना सांगितला.
"ठिक आहे, तुम्ही दोघांनी ठरवलेच आहे तर ...आमचे कोणाचे काही म्हणणे नाही."
बाबा शांतपणे म्हणाले.
प्रसादचा निर्णय व त्याला बाबांची संमती मिळाल्यावर, घरातील इतर कोणीही काहीही बोलले नाही.जणू काही झालेच नाही एवढी शांतता होती. ती शांतता चेहऱ्यावर ठेवत सर्वजण आपआपल्या बेडरूममध्ये चालले गेले.
प्रसाद व सायली सोडून,
प्रत्येकाच्या मनात खूप सारे प्रश्न होते ..जे प्रसादला व सायलीला विचारायचे होते;पण कोणीही काहीही बोलले नाही,काही विचारले नाही. आपले मत, आपले विचार सांगितले नाही.बाबाही काही जास्त बोलले नाही. प्रसाद व सायलीच्या निर्णयाला विरोध न करता, शांतपणे त्यांनी संमती दिली. व आईचीही काहीच प्रतिक्रिया दिसली नाही. त्यामुळेच की काय? गणेश,राजेश व दोघांच्या बायकाही काही बोलल्या नाही,रिॲक्ट झाल्या नाहीत.
लहान मुले तर केव्हाच झोपली होती; पण मोठ्यांची झोप उडाली होती. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार, चांगल्या वाईट भावना आणि भूत,भविष्य व वर्तमान या सर्व गोष्टींचा विचार सुरू झाला होता.
क्रमश:
नलिनी बहाळकर
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा