Login

जाणीव आपलेपणाची अंतिम भाग

About awareness

घरात सर्वांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. एकमेकांबद्दल आपलेपणाची जाणीव होती; पण त्याबरोबर घरात काही बाबतीत शिस्त,नियम व संस्कार होते. आणि यामुळेच देसाई कुटुंब सुखी होते.कुटुंबातील प्रत्येकाला एकमेकांबद्दल आदर व प्रेमाची भावना होती. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद होता; पण हा आनंद सायलीला कधी जाणवला नाही.

सायलीचे स्वतःचे विचार होते की तिच्या माहेरचे संस्कार? तिला हे छान, सुखी कुटुंब आवडत नव्हते.मुळात तिला एकत्र कुटुंब आवडत नव्हते. लग्न झाल्यापासून, वेगळे राहण्यासाठी ती प्रसादच्या मागे लागली होती.

एकीकडे सायलीचे प्रेम व दुसरीकडे आपल्या कुटुंबाचे प्रेम, आपलेपणाची जाणीव...या दोन्हीत तो अडकला होता.आपल्या कुटुंबातील प्रेमाने,आपलेपणाच्या भावनेने सायलीचे मतपरिवर्तन
होईल,ती पण दोन्ही वहिनींसारखी आपल्या कुटुंबाला आनंद देईल.अशी भोळी आशा प्रसादला होती;पण मुळात सायलीला घरातल्यांबद्दल आपलेपणाची जाणीव,प्रेमाची भावना नव्हतीच; त्यामुळे तिचे प्रसादशिवाय कुणाशीही भावनिक नाते जुळले नाही.ती सर्वांमध्ये राहूनही,त्यांच्याशी अलिप्त भावनेने वागू लागली.तिच्या वागण्याबोलण्यातून घरातल्या सर्वांना तिचा स्वभाव,संस्कार समजू लागले होते;पण ते सर्व तिकडे दुर्लक्ष करू लागले. उगाच घरात वाद नको आणि हळूहळू ती सुधारेल. असेच सर्वांना वाटत होते.कधीतरी तिला नात्यांची,आपलेपणाची जाणीव होईल.अशी त्यांना खात्री होती.

आज प्रसादने वेगळे राहण्याचा निर्णय सांगितल्यावर, सर्वांनाच वाईट वाटले. आपले प्रेम कमी पडले. असे वाटू लागले. सायली या घरात खूश नाही व तिच्यामुळे प्रसादही खूश दिसत नाही. वेगळे राहून खूश राहणार असतील तर चांगलेच आहे. त्यामुळे कोणीही प्रसादला काही प्रतिक्रिया दिली नाही. आपल्या निर्णयाने घरात सर्व दुखावले आहे. हे प्रसादला जाणवत होते;पण सायलीच्या प्रेमासाठी तो वेगळा राहू लागला.

प्रसाद वेगळा राहत असला तरी त्याचे आपल्या कुटुंबावरील प्रेम कमी झाले नव्हते.फोनवर बोलणे,प्रत्यक्ष येऊन भेटणे सुरू होते.

सायली तर आपल्या राजाराणीच्या संसाराचा आनंद घेत होती.मी जे ठरवते तसेच सर्व घडते किंवा मी घडवून आणते. या धुंदीत ती राहत होती.

पण लवकरच तिची धुंदी उतरली.


आपल्याच धुंदीत गाडी चालवत असताना, सायलीच्या गाडीला अपघात झाला आणि तिला गंभीर दुखापत झाली.नेमके अपघाताच्या ठिकाणी प्रकाशरावांच्या ओळखीचे होते. ते सायलीला ओळखत होते. त्यांनी पटकन व वेळेत तिला हाॅस्पिटलमध्ये आणले त्यामुळे ती वाचली. सायलीच्या अपघाताविषयी कळताच संपूर्ण देसाई कुटुंब हाॅस्पिटलमध्ये धावत आले. सायली लवकर बरी व्हावी म्हणून देवाला प्रार्थना करू लागले. डाॅक्टरांचे प्रयत्न व देवाचे कृपा यामुळे सायलीचे प्राण वाचले.

आपल्याला हाॅस्पिटलमध्ये घेऊन आपले प्राण वाचवणारे, बाबांच्या ओळखीतील होते आणि आपल्याबद्दल घरातल्यांना वाटलेली चिंता, त्यांनी घेतलेली काळजी आणि आपल्याबद्दल असलेले नि:स्वार्थ प्रेम,आपलेपणाची जाणीव हे सर्व सायलीला जाणवत होते. घरातल्यांचे प्रेम तर अगोदर पासून होते; पण सायलीने कधी त्यांना आपले समजले नाही त्यामुळे तिला ते कळाले नाही किंवा तिने कळू दिले नाही.

या मोठ्या अपघातातून तिचा जीव तर वाचलाच होता; पण तिला नवा दृष्टीकोन ही मिळाला होता.नात्यात प्रेमाची,आपलेपणाची जाणीव असेल तर नाते टिकते,बहरते आणि कुटुंबात सुखसमाधान राहून जीवन आनंदी होते.या नव्या दृष्टिकोनामुळे सायली देसाई कुटुंबाला आपले समजू लागली व कुटुंबाच्या आनंदाचा भाग झाली.

समाप्त
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all