जाणीव चुकांची भाग -१

चुकांची जाणीव करून देणारी रहस्यमयी कथा!
जाणीव चुकांची भाग -१

शाळेत सर्व मुले-मुली एक एक करून येत होते. विद्यार्थ्यांनी आणि शाळेतील शिक्षकांनी वर्गात उपस्थिती दर्शवली होती.

मेघा नावाच्या मॅडम वर्गात दाखल होताच सगळे जण चिडीचूप झाले. त्यांनी त्यांचा विषय शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर आधीचा दिलेला गृहपाठ त्या तास संपायच्या आधी सर्वांना तपासून द्यायचे असा त्यांचा नित्यक्रम असे. स्वभावाने कडक आणि शिक्षा कठोर करतात म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. त्यामुळे त्यांच्या विषयात कोणी नापास होण्याचा प्रश्नच नव्हता.

त्याविरुद्ध होत्या सर्वज्ञा नावाच्या मॅडम वर्गातच नव्हे तर पूर्ण शाळेत त्या त्यांच्या लाघवी स्वभावाने ओळखल्या जात होत्या.

एकदा सहलीचे निमित्त म्हणून सर्व पालकांची सभा भरवण्यात आली होती. खूप जणांनी त्यात सहभाग घ्यावा असे त्यांना आवाहन केले होते.

सहलीचे ठिकाण हे निसर्गरम्य होते. तर तिथे गावातील लोकं कशी राहतात ह्याचा अभ्यास तर झाला असताच पण गावाबद्दल तिथले जीवन आणि शेती संबंधी ह्या शहरातील मुलांना अधिक गोष्टी पाहून समजल्या असत्या.

तिथे तीन दिवसाचे नियोजन करण्यात आले. शंभर मुले आणि त्यांच्यासोबत दहा शिक्षक तिथे जाण्याचे ठरले होते.

सर्व विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात आली आणि काही तासांचा बसचा प्रवास करून सर्वजण तिथे पोहोचले.

मेघा मॅडम तर मुलांना थोडी जरी चूक झाली तरी सारख्या ओरडत होत्या. त्यामुळे त्यांच्यापासून लांबच राहणे विद्यार्थी पसंत करत होते.

तिथे एक मोठी मराठी शाळा होती जी आता बंद पडली होती. तिथे ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारी मुले राहणार होते.

त्यांना पोहोचण्यास संध्याकाळ झाल्याने ती मुले आजूबाजूचा परिसर न्याहाळत होती. शहरामध्ये गावासारखी शुद्ध हवा नव्हती. त्यात मध्येच पक्षांचा आणि सळसळ करणाऱ्या पानांचा आवाज येत होता.

गावरान पद्धतीचे जेवण सर्वांनी मेघा मॅडमचा ओरडा नको मिळायला म्हणून गुपचूप खात होते.

रात्री सर्व खोल्यांमध्ये झोपले. त्या खोल्या म्हणजे आधी काळच्या तिथे वर्ग भरत असल्यासारखे वाटतं होते आता ते गावकऱ्यांनी राहण्यासाठी जागा म्हणून वापरले होते.

मध्यरात्री अचानक खाटखुट ऐकायला आल्याने उल्हास नावाचा मुलगा उठला बाजूला पाहतो तर त्याचा मित्र झोपला होता. ते पाहून पुन्हा झोपला पण लगेच थोड्यावेळाने त्याला काहीतरी कुजबुज ऐकायला यायला लागली.

आता त्याला भीती वाटायला लागली आठवीत असणारा हा उल्हास हळूच उठला. तर तिथल्या अंधूक प्रकाशात त्याने बाहेर जाण्याचे ठरवले.

तो घाबरतच काय आहे पाहण्यासाठी गेला. तेवढ्यात त्याला सर्वज्ञा मॅडमने थांबवले.

"उल्हास, तू कुठे जातोय?" त्यांनी विचारले.

"मला .... मला बाथरूमला जायचे आहे." त्याने खोटे सांगितले.

"बरं, थांब जरा."

असे म्हणून त्यांच्यासोबत आलेल्या शिपायाला त्याच्यासोबत पाठवले.

तो पण झोपेत असल्याने त्याने एवढे लक्ष दिले नाही.

सकाळी सर्व पाहतात तर उल्हासला थोडा ताप आलेला. त्यामुळे त्याला तिथेच थांबायला सांगितले. बाकीचे सर्व शिक्षक आणि इतर विद्यार्थी शेती आणि त्याची कामे कसे करतात हे पाहायला गेले होते.

उल्हासला आराम करायला सांगितले होते. तिथेच एक डॉक्टर होते त्यांनी त्याला तपासून कदाचित इथल्या हवामानासोबत लगेच जुळवता आले नाही म्हणून असे झाले असेल असे सांगितले.

सगळे जण दुपारी जेवायला आले तेव्हा उल्हासला ठीक झालेले पाहून बरे वाटले.

रात्री गाणी आणि नाच करत सर्व खेळत होते तेवढ्यात मध्येच सर्व दिवे बंद झाले. मुले घाबरली परंतु खेड्यात असे नेहमीच होते असे तिथला एक स्थानिक माणूस म्हणाला.

©विद्या कुंभार.

सर्व दिवे खरच बंद झाले होते की त्यामागे काही कारण होते?

सदर कथेचे संपूर्ण कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all