जाणीव चुकांची भाग -२
पुन्हा थोड्यावेळाने वीज आल्याने सगळे झोपायला गेले. त्यात उल्हासचा मित्र श्याम ह्याने सांगितले की उल्हास कुठेच दिसत नाही. सगळीकडे गडबड सुरू झाली आणि त्याची शोधाशोध सुरू झाली तर तो पटांगणाच्या एका बाजूला बेशुध्द अवस्थेत सापडला. तो तिथे कसा गेला हा प्रश्न सर्वांना पडला आणि चेहऱ्यावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणण्यात आले. त्याला त्याच्यासोबत काय झाले हे कळलेच नव्हते. तो आणि बाकीचे मुले घाबरु नये म्हणून त्यांना लवकर झोपायला सांगितले.
सर्व काही विचित्र घडत आहे असेच आता शिक्षकांना वाटत असताना दुसऱ्या दिवशीच इथून निघण्याचे त्यांनी ठरवले.
रात्री झोपेत असताना जोरात आवाज आला आणि सगळे घाबरुन उठले. बघतात तर त्यांना सर्वांना बांधून ठेवले होते.
रात्री जेवणातून त्यांना गुंगीचे औषध देण्यात आले होते त्यामुळे त्यांना कधी बांधले हे समजलेच नाही.
रात्री जेवणातून त्यांना गुंगीचे औषध देण्यात आले होते त्यामुळे त्यांना कधी बांधले हे समजलेच नाही.
सर्वांना बांधलेले असताना एक अशी व्यक्ती होती जिला बांधलेच नव्हते ती व्यक्ती म्हणजे मेघा मॅडम.
"मेघा मॅडम, बरे झाले तुम्हाला बांधले नाही. आम्हाला तुम्ही हे बांधलेले सोडवण्यात मदत करा." सर्वज्ञा मॅडम त्यांच्याकडे बघून म्हणाल्या.
त्यांना सांगून खूप वेळ झाला होता. तरी त्या जागच्या हलल्या नाहीत हे पाहून सर्वज्ञा आणि बाकी शिक्षकांनी त्यांच्याकडे संशयी नजरेने पाहिले.
"मी तुमची कोणतीच मदत करू शकत नाही." असे म्हणून त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
"पण का?" त्यातले एक शिक्षक चिडून म्हणाले.
"आवाज खाली करायचा. तुम्ही सगळे इथे बंदी म्हणून आहात." त्या जोरात ओरडल्या.
आता सगळे चकित तर झालेच होते पण आपण इथे अडकलो म्हणून त्यांना आता भीती वाटायला लागली.
"पण तुम्ही असे का करत आहात?" सर्वज्ञा मॅडमने हाताला बांधलेली दोरी सोडवण्याचा प्रयत्न करत त्यांना रागाने विचारले.
"कारण ह्याला जबाबदार तुम्ही आहात." त्या त्वेषाने म्हणाल्या.
"आम्ही काय केले?" सगळेच एकसाथ विचारू लागले.
"तुम्ही जिथे आहात ना. ती एक कधी काळी नावाजलेली शाळा होती. खूप मोठी, पण इंग्रजी शाळेचे शहरातील फॅड इथे आले आणि ही मोठी शाळा जी विद्येचे दैवत समजली जायची ती फक्त राहण्याचे ठिकाण बनली."
आता एक एक गोष्टींचा तिथल्या लोकांना उलगडा झाला. कारण इथे सहलीला येण्याचे ठिकाण सुचवणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून ह्या मेघा मॅडम होत्या.
"ही शाळा माझी होती. मी इथे लहानपणापासून शिकले. जशी वडिलोपार्जित संपत्ती आणि जमीन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करतात तसेच आमच्या घराण्यात ही शाळा दिली जायची. किती गरीब मुले ह्या शाळेत शिकले. ना नफा ना तोटा म्हणजेच शिक्षण दिल्याने तोटा होत नाही. ह्याच मूल्यांवर ही शाळा चालत होती परंतु शहरातले लोक इथे आले आणि त्यांनी भरघोस पैसे आकारून मुलांना शिक्षण देण्याच जणू बाजारच मांडला. पैसे भरू शकत नाही म्हणून आमच्या शाळेत मुले शिकत होते ते त्यांना पाहावले नाही आणि शाळेत मुलेच नाहीत अशी खोटी तक्रार करून ती बंद पाडण्यात आली. त्या धसक्याने माझे वडील आजारी पडले आणि ते न्यायालयात दाद मागण्यासाठी जाणार म्हणून त्यांचा अपघात करून अपघाती मृत्यू दाखवला गेला."
काय होईल पुढे ?
© विद्या कुंभार
सदर कथेचे संपूर्ण कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.