जाणीव चुकांची भाग -३ (अंतिम)

चुकांची जाणीव करून देणारी रहस्यमयी कथा!
जाणीव चुकांची भाग -३(अंतिम)

"पण ह्यात आमची काय चूक आहे?" मेघा मॅडमचे दुःख कळत होते पण तरीही त्यांना एका शिक्षकाने विचारले.

"हे सगळे तुमच्या शहरातील नको त्या मानल्या जाणाऱ्या उच्च विचारसरणीचे परिणाम आम्हाला भोगायला लागले म्हणून झाले आहे. इथे जे शिक्षक होते त्यांना पगार मिळत होता, पण ही शाळा बंद झाल्याने त्यांच्यावर बेरोजगारीचा डोंगर कोसळला. खूप जण नैराश्यात गेले. माझा सख्खा भाऊ ह्या लोकांनी वेडा ठरवून त्याला वेड्यांच्या इस्पितळात ठेवले आहे. त्याची अवस्था बघवतही नाही. माझे कुटुंब ह्यांनी उध्वस्त करून टाकले. म्हणून मी तुम्हाला बंदी बनवले आहे. तुम्हाला ना शिक्षणाची किंमत ना अन्नाची. काल जेव्हा सर्वांना इथले जेवण दिले त्यातले किती जणांनी पूर्ण खाल्ले? सगळे फेकून दिले. इथे 'कमवा आणि शिका' हे शिकवले जात होते परंतु तिथे शहरातील मुले शिक्षकांनी काही सांगितले तर दुर्लक्ष करतात. त्यामुळेच मला कठोरपणाने शिकवावे लागत होते. ह्याला कारणीभूत कोण? फक्त पैसे भरायचे मुलांना जास्तीचे क्लास लावायचे मग शाळेतले शिक्षक काय काहीच शिकवत नाही म्हणून काहीही पसरवायचे. पालकसभेतही मुलांच्या चुका विचारायच्या आधी ह्यांचे पालक माझा मुलगा/ मुलगी कसा पहिला आला नाही ह्यावरून भांडतात."

"मेघा मॅडम तुमचे दुःख समजू शकतो,पण असे आम्हाला बांधून काय मिळणार? " त्यांचा एक शिपाई हळू आवाजात म्हणाला.

"तुम्हीच फक्त हे ऐकत नाही आहात. पूर्ण देश ऐकत आहे. " असे म्हणून तिथला एक स्थानिक त्याच्या फोन मधून सर्व रेकॉर्ड करून सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण करत असताना दिसला.

पूर्ण देश हा सर्व थरार रात्री पाहत होता.

"माननीय प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री तुम्ही लवकरात लवकर मराठी शाळा चालू करण्याचे तसेच दोषींना शिक्षा देण्याचे आदेश द्या. नाहीतर हे सर्व प्राणाला मुकतील आणि हो कोणतेच आश्वासन नको आहे मला सरळ सरळ तो निर्णय द्यावा. ही धमकीच आहे. एका तासात जर निर्णय आला नाही तर त्याच्या पुढच्या तासात इथे फक्त रक्ताचा सडा पडलेला असेल." असे म्हणून तिने ते प्रक्षेपण बंद केलं.

हे सर्व ऐकून जीवाच्या भीतीने सर्व घाबरले होते.

एक एक मिनिट मृत्युकडे घेवून जातोय का असेच तिथल्या प्रत्येकाला वाटत होते.

एक तास व्हायला दहा मिनिटे शिल्लक राहिलेली असताना पोलीस आणि मुख्यमंत्र्यांची गाडी तिथे दाखल झाली.

ती त्यांच्यासमोर आली आणि तिला मराठी शाळा पुन्हा सुरू करण्याचे आदेश असणारे पत्र तसेच तिच्यावर अन्याय केलेल्या लोकांवर आरोपपत्र असे दोन्ही तिला दिले.

मेघा मॅडमने पुन्हा थेट प्रक्षेपण चालू करून सर्वांना ते सांगितले आणि त्या सर्वांना मुक्त केले. आश्चर्य म्हणजे साठ टक्के जनतेने तू बरोबर करते असे ऑनलाईन मतदानात सांगितले होते. त्यामुळे शासनालाही त्यांच्यापुढे झुकावे लागले.

जाताना सर्वज्ञा मॅडम त्यांना भेटल्या आणि म्हणाल्या
"मग कसा वाटला माझा अभिनय?"

"एकदम भारी." असे हाताची तीन बोटे दाखवून मेघा मॅडम म्हणाल्या.

पुन्हा मराठी शाळा सुरू झाल्या आणि तिथे ज्ञानाची घंटा वाजू लागली. तिच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आणि आपण आधी सर्वांना कसे घाबरवले हे आठवून ती मनोमन हसून तिच्या वर्गात शिकवायला गेली.

दुष्कर्म केलेल्या लोकांना त्यांच्या चुकांची जाणीव योग्यवेळी करून देणे गरजेचे असते.

समाप्त.

© विद्या कुंभार

सदर कथेचे संपूर्ण कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all