" ए सुपे ! माझ्या कपाटाला का म्हणून हात लावतेस ग ? किती वेळा सांगितलं की, माझ्या वस्तूंना हात लावलेलं मला आवडंत नाही म्हणून तरीसुद्धा मला उचकवायची सवय जाणार नाही तुझी." सोहम आपल्या धाकट्या बहिणीला सुप्रियाला ओरडत होता.
" जा रे दादूटल्या. मोठा आहेस म्हणून खूप हुशाऱ्या करतोस ना ? आणि काय रे ? काय असतं इतकं सिक्रेट तुझ्या कपाटात ?"
" ते तुला काय करायचं आहे ? मी तुला का म्हणून सांगू ?"
" ए ! गप्प बसा रे. किती रोजच्या रोज भांडत असता एकमेकांचे वैरी असल्यासारखे. आणि आता लहान राहिला आहात का दोघेजण ? सोहम तू तर आता लग्नाला आलास तरी लहान मुलासारखा भांडतोस ?" सोहम आणि सुप्रियाची आई म्हणजेच सीमा आपल्या दोन्ही मुलांना ओरडली. आई ओरडल्यावर दोघांनी एकमेकांना जीभ काढून चिडवून दाखवलं. सीमाला दोन्ही मुलांकडे बघून हसूच आले.
सोहम आणि त्याचे पप्पा सुदीप त्यांच्या ऑफिसमध्ये जायला निघाले आणि सुप्रिया तिच्या विद्यालयात. सुप्रिया एका संगीत विद्यालयमध्ये मुलींना भरतनाट्यम नृत्य शिकवत असे. सीमाने सगळ्यांचे डब्बे व्यवस्थित भरले. रुक्मिणी मावशींनी डायनिंग टेबलवर सगळ्यांसाठी नाश्ता मांडला. सगळ्यांनी हसतखेळत नाश्ता संपवला. सगळे आपापल्या कामाला निघून गेल्यावर रुक्मिणी मावशींनी डायनिंग टेबल आवरले.
" ताई ! मुलं किती मोठी झाली बघा ना ? आपला दादा तर आता लग्नाला आला."
" हो मावशी ! दिवस कसे पटापट निघून जातात समजत देखील नाही."
" हो ताई, खरंच ! तुमच्या दोघांचे किती उपकार आहेत माझ्यावर. तुमच्यामुळे मी हे दिवस बघू शकले." डोळ्यांना पदर लावत रुक्मिणी मावशी स्वयंपाकघरात गेल्या.
रुक्मिणी मावशी बोलून स्वयंपाक घरात निघून गेल्या पण सीमाच्या डोळ्यांसमोर सगळा जीवनपट आला.
रुक्मिणीमावशी सुदीप लहान असल्यापासून त्यांच्या घरी घरकाम करत असत. रुक्मिणीमावशी अनाथ होत्या. त्यांच्या मामा -मामीने एक कर्तव्य म्हणून त्यांना वाढवले होते. रुक्मिणीमावशींना सुदीपच्या घरी मावशींच्या मामीने कामाला लावले होते. रुक्मिणीमावशी सुदीपच्या आईच्या हाताखाली सगळ्या घरकामात तरबेज झाल्या होत्या. रुक्मिणीमावशी लग्नाच्या वयाच्या झाल्यावर त्यांचं लग्न मामा - मामीने लावून दिले आणि आपली जबाबदारी झटकली.
रुक्मिणीमावशींचा नवरा गरीब असला तरी मेहनती होता. तो शेतमजुरीचे काम करीत असे. एके दिवशी असाच शेतावर काम करण्यास गेला असता सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला. रुक्मिणीमावशींना नुकतेच दिवस गेले होते आणि त्यांच्यापुढे हा प्रसंग येऊन उभा राहिला. सासरच्या लोकांनी पांढऱ्या पायाची म्हणून मावशींना घराबाहेर हाकलले आणि मामाकडे पुन्हा जाण्याची काही सोय नाही म्हणून रुक्मिणीमावशी खचून गेल्या होत्या. सुदीपच्या आईवडिलांनी त्यांना आधार दिला. मावशींनी त्यांची चाकरी बजावली ती आजतागायत. मावशींना सुदीपच्या वाड्यामागे असलेली एक खोली राहायला दिली गेली.
मावशींना मुलगी झाली. मावशींच्या मुलीमध्ये आणि सुदीपमध्ये जेमतेम पाच वर्षांचे अंतर असल्याने सुदीपच्या आईने मावशींच्या मुलीवर रेखावर लेकीसारखे प्रेम केले. रेखा अभ्यासात हुशार होती. तिला सुदीपदादाची अभ्यासात मदत होत होती. सुदीप उत्तमरीत्या शिकला पुढे चांगल्या हुद्यावर नोकरीला लागला. तिथेच त्याची भेट सीमा बरोबर झाली. सुदीपमध्ये नाव ठेवायला जागा नसल्याने सुदीप आणि सीमाचे लग्न झाले. रेखाची अभ्यासात हुशारी पाहून सुदीपच्या वडिलांनी तिला पुढच्या शिक्षणासाठी कॉलेजमध्ये घातले. कॉलेजमध्ये एका बड्या बापाचा मुलगा रोहित याची तिला भुरळ पडली. रोहितमुळे ती गरोदर राहिली. तिने रोहितला ती गरोदर असल्याचे सांगितले तर रोहितने ' ते मूल माझे नाही, तू माझ्या पैशाच्या लोभाने मला जाळ्यात अडकवते आहेस ' असे सांगून तिला झटकले.
रेखाने रुक्मिणीमावशींना रडत रडत सगळे सांगितले. रुक्मिणीमावशींनी रेखाला बेदम मारले. सुदीपची आई मधे गेली असता मावशी रडत बोलू लागल्या, " बघा ना वहिनी ! मी माझं चारित्र्य जपलं. ऐन तरुणपणात नवरा गेला पण कुठंही मन भरकटून दिले नाही. माझी लेक माझ्या जगण्याचा आधार होता पण माझ्या लेकीने माझं तोंड काळं केलं. आता तिच्या पोटात हे बाळ वाढतंय तर कोण आता हिच्याशी लग्न करणार ? मेलीनं तुमची देखील जाणीव ठेवली नाही. तुम्ही दोघांनी तिला शिकण्यासाठी पाठवलेलं ना कॉलेजमध्ये ? तर हे धंदे करून बसली."
" जाऊदे रुक्मिणी, जे झालं ते झालं. तरुणवयात घसरलं तिचं पाऊल. आता पुढे काय करायचं ह्याचा विचार करू. कारण आजूबाजूच्या लोकांना कुठलीही कुणकुण लागायला नको." बऱ्याच वेळाने विचार करून शेवटी रेखाला सुदीपच्या आईच्या मावजबहिणीच्या घरी नाशिकला पाठवायचे ठरविले. सुदीपच्या मावशीचे यजमान लग्नानंतर दोन वर्षांतच निर्वतले होते. मावशीने दुसरे लग्न केले नव्हते का तिला मुलबाळ नव्हते. ती नाशिकमध्ये एकटीच राहत होती. तसंही मावशीला रेखाची आणि रेखाला मावशीची साथ लाभणार होती.
झालेल्या प्रकाराने, अपराधी भावनेने रेखा दिवसेंदिवस खंगत चालली होती. केवळ एक जीव पोटात वाढतो आहे म्हणून मावशींनी वाढलेले जबरदस्ती खातपित होती. रेखाला आपला काळ जवळ आला आहे हे समजून चुकले होते. देवाकडे ती मनोमन प्रार्थना करत असे की, " देवा माझ्या पोटातील जीव जग बघूदे मग तू मला घेऊन जा."
नववा महिना लागल्या लागल्याचं रेखाच्या पोटात दुखू लागले. बाळाला जन्म देऊन लगेचचं रेखाने आपले प्राण सोडले. रुक्मिणी मावशींना खूप मोठा धक्का बसला होता. छोट्या बाळाचं आता पुढे काय ? ही चिंता त्यांना भेडसावू लागली होती. बाळाचं गाठोडं घेऊन त्या सुदीपच्या घरी आल्या. बाळ खूपचं गोंडस होतं. सीमाला ते बाळ बघून मातृत्व जागं झालं. मावशींच्या संमतीने सुदीप आणि सीमाने ते बाळ दत्तक घेतले. बाळाचे नाव ' ' सोहम ' ठेवले. सुदीप आणि त्याच्या पूर्ण परिवाराने रुक्मिणी मावशींकडून सोहमला त्याची खरी ओळख कधीच सांगायची नाही असे वचन मात्र घेतले. रुक्मिणी मावशींनी अट मान्य केली कारण त्यांच्या नातवाला आईबाबांचे, आजीआजोबांचे प्रेम मिळणार होते आणि एक चांगलं घर त्याला लाभणार होतं. रुक्मिणी मावशींना देखील ह्या घराचा आश्रय लाभणार होताचं. त्यांना कोणीही अंतर देणार नव्हते. सुदीपने बाळ दत्तक घेतल्यावर राहता वाडा विकून शहराच्या एका टोकाला मोठा बंगला विकत घेतला आणि सगळेजण तिथे राहावयास गेले. सोहम दत्तक मुलगा आहे हे कोणालाही कळू द्यायचे नव्हते. उगीच सोहमच्या बालमनावर कुठलाही परिणाम व्हायला नको यासाठी सुदीपने हे पाऊल उचलले होते. सोहम तीन वर्षांचा झाल्यावर सुप्रियाचा जन्म झाला. सोहमला लहान बहीण मिळाली.
सोहम अभ्यासात अतिशय हुशार होता. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये त्याने कधीच आपला वरचा क्रमांक सोडला नाही. एम.बी.ए. करत असताना त्याची ओळख ' आशिमा ' शी झाली आणि दोघांचे प्रेम जमले होते. आशिमा ही पंजाबी कुटुंबातील मुलगी होती. आशिमाचं घराणं कर्मठ विचारांचं होतं पण एकुलत्या एक मुलीसाठी त्यांनी त्या दोघांच्या प्रेमविवाहाला संमती दिली होती. तसंही सोहमचं देखील प्रतिष्ठित घराणं असल्याने सोहम आणि त्याच्या घरच्यांना भेटून आशिमाच्या घरच्यांचे मतपरिवर्तन झाले होते.
सोहमने आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या बाबांच्या व्यवसायात लक्ष घातले. सोहम आणि आशिमाच्या लग्नाची बोलणी दोन्ही कुटुंब करणार होते.
सीमाचा फोन वाजला म्हणून सीमा भूतकाळातून बाहेर आली. आशिमाच्या मम्मीचा फोन होता. त्यांनी सोहमच्या घरच्या लोकांना लग्नाची बोलणी करायला रविवारी त्यांच्या घरी बोलावले. आशिमाच्या जवळच्या नातेवाईकांना सोहमच्या घरच्या लोकांशी ओळख करून द्यायची होती.
रविवारी ठीक संध्याकाळी चार वाजता सोहमच्या घरचे आशिमाच्या आलिशान बंगल्यात पोहचले. खास पंजाबी स्टाईलने त्यांचा आदरसत्कार केला गेला. आशिमाचे खूप मोठे कुटुंब तिथे उपस्थित होते. आशिमा एकत्र कुटुंबात वाढली होती. आशिमाचे मोठे चाचा चाची, त्यांची दोन मुले, मोठया भावाची बायको, आशिमा आणि तिचे आईवडील असा मोठा परिवार एकत्र राहत होते. बाकी गावाकडून काही मंडळी आली होती. सगळ्यांची ओळखपरेड आणि खानपान झाल्यावर लग्नाचा विषय निघाला. आशिमाच्या घरच्या लोकांना पूर्ण पंजाबी पद्धतीने लग्न करायचे होते. पाच दिवस लग्नाचे कार्यक्रम होणार होते. ह्या निर्णयामुळे सीमा थोडी खट्टू झाली. सीमाला महाराष्ट्रीयन पध्दतीने सोहमचे लग्न करायचे होते. नऊवारी, पैठणी असे पारंपरिक पोशाख आणि पारंपरिक दागिने घालून वरमाय म्हणून तिला सोहमच्या लग्नात मिरवायचे होते. आशिमाच्या घरून निघून आपल्या घरी येईपर्यंत सीमा गाडीमध्ये कोणाशी काहीच बोलली नाही.
आपल्या घरी आल्यावर मात्र सीमाने सगळ्यांसमोर मौन सोडले, " मला एक त्या लोकांचं पटलं नाही ते म्हणजे त्या लोकांना त्यांच्या पद्धतीने लग्न लावून द्यायचे आहे. आपली पध्दत ठेवायची बाजूला. त्यांची जशी एकचं मुलगी आहे तसा आमचा पण एकचं मुलगा आहे ना ? किती स्वप्न पाहिली होती सोहमच्या लग्नाची. आता कुठली नऊवारी आणि कुठली पैठणी ?"
[ ] " अग ठीक आहे सीमा. तसंही पंजाबी लोकांची लग्न खूप छान असतात. त्यांना वाटणारचं ना की, त्यांची एकुलती एक लेक आहे तर तिचं लग्न त्यांच्या मर्जीने व्हावं. तुला जी हौसमौज करायची आहे ती सुप्रियाच्या लग्नात पुरी कर आणि तसंही कुठल्यातरी पध्दतीने छान लग्न होणार ना आपल्या सोहमचं मग झालं तर. आता कुठले विचार करत बसू नकोस आणि लग्नाची तयारी चालू कर. " सुदीपने सीमाला समजावले. सीमाची नाराजी सुदीपच्या समजवण्याने गेली होती.
" आई ! खरंच तू नाराज नाहीस ना ? हे बघ लग्न जरी त्यांच्या पध्दतीने झालं तरी सत्यनारायणाची पूजा, गोंधळ आपण करू शकतोचं ना ? ते तू कर ना सगळं हौसेने." सोहमचा पर्याय सीमाला आवडला.
" अरे ! हे तर माझ्या लक्षात देखील आले नव्हते. छान सुचवलेस. आता माझी हौस मला पुरी करता येईल. चला आता लौकरात लौकर लग्नाच्या खरेदीला सुरुवात करूया." सीमा उत्साहात म्हणाली.
सुप्रिया तर एकदम खुश होती. तिला तिच्या दादाच्या लग्नात वर्कवाल्या भारी भारी साड्या नेसायला मिळणार होत्या.
एकेदिवशी सुदीपची आई म्हणजेच सोहमची आजी, सीमा, रुक्मिणी मावशी आणि सुप्रिया चौघीजणी खरेदीसाठी बाहेर गेल्या होत्या. सोहमच्या अंगात जरा कणकणी येऊन डोके दुखत होते म्हणून तो लौकर घरी आला तर घरात एकटे आजोबा त्यांच्या खोलीत झोपले होते. सोहमला वाटले की, रुक्मिणी मावशी तरी घरी असतील म्हणून सोहमने त्यांच्या खोलीत डोकावले तर तिथे एका टेबलवर एक पत्र पडले होते. रुक्मिणी मावशींना कोणी पत्र लिहिले असेल अशी उत्सुकता सोहमला वाटली म्हणून त्याने ते पत्र वाचायला घेतले.
२८/३/९५
# श्री #
ति. आईस,
अभागी रेखाचा स. नमस्कार
अभागी रेखाचा स. नमस्कार
पत्र लिहिण्यास कारण की, आपल्या दोघींमधील अबोला किती दिवस राहणार माहीत नाही. मान्य आहे की मी खूप मोठी चूक केली आहे पण आई झालेल्या सगळ्या प्रकाराने मी खूप खंगले आहे ग. मला खूप अपराधी वाटते आहे. तुला आणि देवासारख्या काका - काकूंना मी फसवलं ग. तुझ्या किती मोठ्या अपेक्षा असतील ना माझ्यासाठी ? तुझ्या सगळ्या अपेक्षांवर मी पाणी पाडलं.
जेव्हा रोहितने माझ्या पोटात वाढणारं मूल त्याचं नाही म्हणून मला झिडकारले ना तेव्हाच मी खरंतर मरायला हवे होते. आई ! मी रोहितवर खरंखुरं प्रेम केलं होतं ग. मला वाटलेलं तो माझ्याशी लग्न करेल पण त्याने माझा स्वीकार तर केला नाहीच उलट माझ्यावर वाटेल तसे घाणेरडे आरोप लावले.
आई ! नकोसं वाटतं आहे हे जगणं मला. तुझ्या आणि काका, काकूंच्या समोर देखील यायला माझी मला लाज वाटते आहे. केवळ ह्या पोटातल्या बाळासाठी जगते आहे नाहीतर माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. मी जास्त दिवस जगू शकेन असे मला वाटत नाही. देवाकडे एकचं मागणे मागते आहे की, ह्या बाळाला जग बघूदे आणि नंतरचं माझे डोळे मिटूदे. आई जर मी जग सोडून गेले तर माझ्या बाळाचा सांभाळ कर. मी तुम्हा सर्वांची जाणीव ठेवली नाही पण माझ्या बाळाला काका - काकूंच्या उपकारांची जाणीव करून दे. तू हे पत्र वाचशील तर कदाचित मी ह्या जगात नसेन पण आई तेव्हातरी या अभागी मुलीला माफ करशील ना ?
कळावे
तुझी लेक रेखा
पत्र वाचल्यावर सोहमने पत्रावरील तारीख बघितली. त्याच्या जन्माच्या दोन महिन्यांआधीची ती तारीख होती. हे पत्र माझ्याशी संबंधित असेल का ? म्हणजे मी माझ्या आईबाबांचा मुलगा नाही ? मी रुक्मिणी मावशींचा नातू आहे ? माझ्यापासून ह्या गोष्टी का लपविल्या ? विचार करून करून सोहमचे डोके अजून दुखायला लागले. संध्याकाळी आईबाबांशी ह्याबाबतीत बोलू असे ठरवून तो बिछान्यावर पडला. विचारांनी झोप तर येत नव्हतीचं.
संध्याकाळी सगळे घरात जमल्यावर सोहमने मावशींच्या पत्राचा विषय काढला आणि मोठ्या माणसांना जाब विचारला.
" हे पत्रात जे मी वाचलं ते सत्य आहे ? मी तुमचा मुलगा नाही ? ह्या गोष्टी माझ्यापासून का लपविल्या गेल्या ?"
" हे पत्रात जे मी वाचलं ते सत्य आहे ? मी तुमचा मुलगा नाही ? ह्या गोष्टी माझ्यापासून का लपविल्या गेल्या ?"
रुक्मिणी मावशींनी तोंड उघडलं, " तू वाचलं आहेस ते सत्य आहे. तुला चांगलं घर मिळावं, तुझ्यावर चांगले संस्कार घडावे म्हणून दादा आणि सीमाताईंनी तुला दत्तक घेतले. तू दत्तक मुलगा आहेस हे जाणूनबुजून कुठेही कळू दिले नाही कारण तुझ्या बालमनावर परिणाम झाला असता. मी सुद्धा माझी ओळख तुला कधीच सांगितली नाही कारण तुला तुझ्या जन्माविषयीचं सत्य समजू द्यायचे नव्हते. तुला जर तुझ्या आईविषयी समजले असते तर कदाचित तुझ्या बालसुलभ मनात आईविषयी वेगळं चित्र तयार होऊ शकले असते. हे सारं तुझ्या भवितव्यासाठी आम्ही सगळ्यांनी पाऊल उचलले."
रुक्मिणी मावशींनी सोहमच्या शंकांचे निरसन केले. सोहम ओक्साबोक्शी रडू लागला. सोहम रडू लागल्यावर आईबाबा, आजीआजोबा आणि सुप्रिया सगळेच सोहमला मिठी मारून रडू लागले. रुक्मिणी मावशी लांबून फक्त भरल्या डोळ्यांनी पहात होती.
" आजी ! माझ्याजवळ ये." सोहमने रुक्मिणी मावशींसमोर हात पसरले असता गेले अठ्ठावीस वर्षांपासून ' आजी ' ह्या हाकेची वाट पहात बसलेल्या रुक्मिणी मावशींचा बांध फुटला आणि तिचे अश्रू अनावर झाले.
बराच वेळ घरात शांतता होती. शेवटी सुदीपने सोहमला आपल्या जवळ बसवले आणि म्हणाला, " सोहम, कुठल्याही प्रकारचे शल्य मनात बाळगू नकोस. तू आमचा मुलगा आहेस हेच लक्षात ठेव. मी बाकी तुला काही सांगणार नाही." सुदीपने सोहमला थोपटले.
" हो बाबा ! थोडं ह्या मानसिक धक्क्यातून मला बाहेर पडायला थोडा वेळ द्या पण आईबाबा आशिमाच्या घरी ही गोष्ट सांगायला हवी ना ? केव्हातरी त्यांना ही गोष्ट समजली तर त्यांना असं वाटायला नको की, आपण त्यांच्यापासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या. मी आशिमा आणि तिच्या घरच्यांना भेटून सारे काही सांगेन." सोहम म्हणाला.
" अरे पण, आशिमाच्या घरच्या लोकांनी हे सत्य स्वीकारलं नाही तर ?" सीमाने शंका उपस्थित केली.
" हे बघ आई, आशिमासोबत लग्न नाही झालं तरी चालेल पण त्यांना सारं सत्य समजू दे."
" सीमा ! सोहम म्हणतो आहे ते बरोबर आहे. आपण आशिमाच्या घरी सांगायला हवे." आजोबा म्हणाले.
सोहम त्याच्या बेडरूममध्ये गेल्यावर रुक्मिणी मावशी सुदीप आणि सीमाशी बोलायला आल्या, " दादा, ताई ! माझ्या खोलीत कोणीचं येत नाही म्हणून मी रेखाचे पत्र असे टेबलवर ठेवले होते. मला रेखाची आठवण आली की मी तिचे पत्र वाचते. माझी चूक झाली मी पत्र वाचून पुन्हा माझ्या पेटीत ठेवले नाही. मला माफ करा. ज्या गोष्टी आपण गुपित ठेवल्या होत्या त्या गोष्टी सोहमला समजल्या." रुक्मिणी मावशी अपराधीपणाने बोलत होत्या.
" मावशी स्वतःला दोषी समजू नका. ह्या सगळ्या गोष्टी विधिलिखित होत्या. त्यात तुमचा दोष नाही." सुदीपने मावशींना समजावले.
दुसऱ्याच दिवशी सोहम आशिमाच्या घरी गेला. त्याने न लपवता सारे सत्य आशिमाच्या घरच्यांसमोर मांडले. आशिमाच्या घरचे विचारांनी थोडे कर्मठ असल्याने त्यांनी आता दोघांच्या लग्नाला विरोध दर्शवला. आशिमा आपल्या घरच्यांच्या विरोधात काही बोलू शकली नाही. ती दाराच्या कोपऱ्यात एका बाजूला आसवे गाळत उभी राहिली होती.
सुन्न मनाने सोहम आशिमाच्या घरून परतला आणि आशिमाच्या घरच्यांनी लग्न मोडले असे त्याने आपल्या घरी सांगितले. प्रत्येकाच्या मनाला ह्या निर्णयाने चटका बसला. सोहमचे आशिमावर किती उत्कट प्रेम आहे हे सगळेच जाणून होते.
दोन महिने असेच गेले. नाही आशिमाने सोहमला संपर्क केला नाही सोहमने आशिमाला. सोहम आता एकदमच शांत राहू लागला होता. घरात कोणाशीचं बोलत नव्हता. सुप्रिया बरोबर देखील मस्करी वगैरे आता तो करेनाशी झाला. सुप्रिया त्याच्या मनाची अवस्था जाणत होती. दादाने आपल्याकडे तरी त्याचे मन मोकळे करावे ह्या हेतूने ती सोहमच्या खोलीत गेली. " दादा ! तू जर तुझ्या मनातलं काही कोणाला सांगितले नाहीस तर तुझंच मन घुसमटेल. माझ्याशी तरी बोलून तुझं मन मोकळं कर. तू घरात कोणाशी काहीच बोलत नाहीस तर घर बघ कसं शोककळा आल्यासारखं झालं आहे.
" काय बोलू सांग ना सुप्रिया ? एकावर एक मानसिक धक्केच बसत आहेत. तुम्ही सगळेच खूप चांगले आहात. आपल्या परिवाराने एका दत्तक मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. माझा भूतकाळ समजल्यावर माझ्या मनाच्या कोपऱ्यात खूप परकेपणा जाणवतो आहे ग. तरी मी प्रयत्न करेन आईबाबांना, आजीआजोबांना खुश ठेवण्याचा. बरं झालं तू माझ्याशी बोलायला आलीस. मला माझ्या कर्तव्यांची जाणीव झाली. आता मी माझं दुःख उगाळत नाही बसणार. मी आईला सांगतो तिच्या पसंतीची मुलगी बघायला. आईला माझ्या लग्नात हौसमौज करायची आहे ना ? मग तिचं स्वप्न आता मला पुरे करायचे आहे. थँक्स सुप्रिया, मला जाणीव करून दिलीस."
" दादा ! आशिमावर तुझं किती प्रेम आहे. तू दुसऱ्या मुलीबरोबर सुखी राहू शकशील ?"
" सुप्रिया ! माझ्यामुळे सगळे आनंदी होणार असतील तर मी नक्कीच सुखी होईन."
एक महिना उलटून गेला असेल. रविवार असल्याने सोहम आपल्या बेडरूममध्ये बसून मोबाईलमध्ये मेसेज बघत होता. नकळत आशिमाच्या प्रोफाईलवर जाऊन आशिमाचा फोटो एकटक तो न्याहाळत राहिला. तिचा फोटो बघून त्याच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. तितक्यात मागून कोणीतरी त्याचे डोळे झाकले.
" ए सुपे ! माझ्या डोळ्यांवरचा हात काढ नाहीतर मी मार देईन हा तुला."
" हा ! मार ना."
अरे ! हा आवाज तर सुपूचा नाही तर आशिमाचा आहे. सोहमने झटदिशी डोळ्यांवरचा हात बाजूला काढला तर समोर आशिमा उभी.
" आशिमा तू ?" सोहमने आश्चर्याने विचारले.
" हां मी. मेरे मम्मी पप्पा, चाचा चाची, मेरे दो भैया और भाभी भी आए है. आपको नीचे बुलाया है."
सोहमला काहीच समजत नव्हते. तो अक्षरशः एका यंत्राप्रमाणे आशिमाच्या मागे जिने उतरून हॉलमध्ये आला. हॉलमध्ये सगळी मोठी माणसे छान गप्पा मारत बसली होती. सोहमला बघून आशिमाचे वडील म्हणाले, " आजा पुत्तर, हम लोग तुम दोनोंका रिश्ता तय करने के लिये आये है. अगले महिनेका मुहूरत बडा ही शुभ है. आप लोगोंको कोई ऐतराज नहीं ना ?" सोहम सगळ्यांकडे आश्चर्याने पाहत राहिला.
" हां ! मेरे दादा को कोई ऐतराज नहीं है. हां ना दादा ?"
" सोहमजी ! आपकी बहनने हम सबकी आँखे खोल दी है. उसने हमें कितनी अच्छी तरहसे समझाया के मनुष्य कहा भी पैदा हो लेकीन उसके परिवारके संस्कार जीवनमें ज्यादा महत्वपूर्ण होते है. सोहमजी आप हिरा हो. हमनेही आपको नहीं पहचाना. अगर हो सके तो हमें माफ किजीए. और एक बात, शादी पुरी आपके रितिरिवाजोंके साथ होगी. हमें भी मराठी शादी का आनंद लेना है." आशिमाचे वडील हात जोडून सोहमसमोर उभे होते. सोहमने हात जोडून आशिमाच्या वडिलांना अलगद आलिंगन दिले.
" अगर ऐसी बात है कपूरजी तो दोनों रिवाजोंसे हमारे बच्चोंकी शादी होगी. हमें भी तो पंजाबी शादी का आनंद लेना है और आशिमा तो आपकी अकेली संतान है." सुदीप म्हणाला. सुदीप आणि जगजीत यांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले.
सोहम सुप्रियाजवळ गेला आणि तिला मिठीत घेऊन म्हणाला," सुपू ! मी तुझे आभार कसे मानू ग ? एक लहान बहीण असून देखील तू मोठ्या बहिणीसारखं कर्तव्य बजावले आहेस. तू माझं प्रेम मला मिळवून दिलंस. मी तुझ्यासाठी काय करू ग ?"
" दादटल्या ! आता लौकर वहिनीला घरी आण." सुप्रिया म्हणाली.
मधेच आशिमाचे मोठे काका वीरेंद्रजी म्हणाले, " अगर आप लोगोंकी इजाजत हो तो मुझे एक बात कहनी है."
" हां जी कहिए." सुदीप म्हणाला.
" आपका परिवार हमें बहुत अच्छा लगा. आपके खयालातोंसे हम प्रभावित हुए. सुदीपजी अगर आपको कोई ऐतराज न हो तो मै आपकी लडकी सुप्रियाका हाथ मेरे छोटे लडके रणबीरके लिए मांगता हूं. सुप्रिया दुसरोंके मनकी परवाह करनेवाली है. ऐसीही छोटी बहू हमें हमारे परिवारमें चाहीए. जो हमारे परिवारको मिलजुलके संभल सके. सुप्रिया तुम्हें हमारा रणबीर पसंद है ना ?"
सुप्रियाने लाजून दोन्ही हाताने आपला चेहरा झाकून घेतला. तसाही सुप्रियाला रणबीर मनात भरला होता. उंचापुरा, राजबिंडया रणबीरला सुप्रियाने जेव्हा दादाच्या लग्नाची बोलणी करायला सगळे गेले होते तेव्हा पहिल्यांदा पाहिले होते तेव्हांच ती त्याच्या प्रेमात पडली होती आणि दुसऱ्यांदा तिच्या दादाचे लग्न मोडण्यापासून वाचवण्यासाठी ती त्यांच्या घरी गेली होती तेव्हा पाहिले होते. सुप्रिया त्यांच्या घरी आपले विचार मांडून आपल्या घरी जाण्यास निघाली तेव्हा तिच्या स्कूटीजवळ येऊन रणबीर तिला म्हणाला होता की, " आपके खयालात बहुत अच्छे है और आप भी." तेव्हा तिने फक्त एक स्माईल रणबीरला दिली होती. आणि आता तर तिच्या स्वप्नातला राजकुमार तिचा जीवनसाथी होणार होता.
" अरे ये तो बहुत बडी बात हुई. हमारी बेटी आपके घर और आपकी बेटी हमारे घर आयेगी." आशिमाचे पप्पा खुश होऊन म्हणाले.
खूप थाटामाटात सोहम - आशिमा तसंच सुप्रिया - रणबीरचे लग्न पार पडले. पाच दिवस लग्नसोहळा चालला होता. संगीत, मेहंदी, हळद अशा रोजच्या कार्यक्रमाच्या रेलचेलीने लग्नाचा उत्साह वाढत होता. महाराष्ट्रीयन लग्नाच्या पद्धतीत तर आशिमाच्या घरच्या लोकांनी देखील पूर्ण महाराष्ट्रीयन पेहराव केला होता आणि पंजाबी लग्नाच्या पद्धतीत सोहमच्या घरच्यांनी पंजाबी पेहराव केला होता. दोन संस्कृतीचा सुंदर मिलाफ त्यांच्या लग्नात पाहायला मिळाला.
लग्नात रुक्मिणी मावशींना सगळ्यांच्या बरोबरीने मान दिला गेला होता. रुक्मिणी मावशी आपल्या नातवाच्या लग्नाचा नेत्रदीपक सोहळा अगदी डोळेभरून पाहत होत्या. त्यांच्या जीवनाचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले होते.
( समाप्त )