Login

जाणीव प्रेमाची (भाग:-२)

दुसरी बाजू ऐकूनच न घेता तिने गैरसमज करून घेतला. त्यातून अबोला धरला. ज्यामुळे त्याला प्रेमाची जाणीव झाली. तो कसा तिचा गैरसमज दूर करून त्याचे प्रेम व्यक्त करेल हे सांगणारी कथा..

#ईरा जलद लेखन स्पर्धा- फेब्रुवारी:-२०२६

विषय:- क्षणिक सौंदर्य/ दुसरी बाजू

शीर्षक:- जाणीव प्रेमाची

भाग:-२

"खरं सांगतोस तू? की आजही नाटक करतोस तू, अजून कोणतं काम असेल तुझं तर सरळ सरळ सांग ना." ती डोळे पुसत म्हणाली. "आणि माफी का मागतोस तू? तुला प्रेमाची जाणीव झाली तेही आता. हं..पण खूप उशीर झालाय त्यासाठी."

"उशीर तर झालाय गं, मीच मूर्ख होतो, जे की तुझ्याबद्दलच्या भावना मला लवकर कळल्या नाहीत. मी आता ना की प्रेमाचं नाटक करतोय ना की माझं कोणतं काम आहे तुझ्याकडे. मनापासून तुझ्यावर प्रेम करू लागलोय मी. देवा शप्पथ खरं सांगतोय. आय रियली लव्ह यू." अमेय गळा चिमटीत पकडून डोळ्यांत पाणी आणत कळवळून म्हणाला.

ती शांतपणे त्याच्या चेहऱ्याच निरीक्षण करत होती. त्याचे डोळे वाचण्याचा प्रयत्न करत होती. तो खरं बोलतोय हे तिला समजत होतं, पण तरीही त्याला माफ करायला तिचं मन तयार होत नव्हतं.

अमेय आणि शरण्या लहानपणापासूनचे चांगले मित्र-मैत्रीण होते. त्यांची घरेही जवळजवळच होती. अगदी एका हाकेच्या अंतरावर होतं. दोघेही एकाच शाळेत शिकले आणि आता एकाच काॅलेजमध्ये शिकत होते.

अमेय दिसायला एकदम देखणा, रूबाबदार होता तर शरण्या दिसायला सुंदर होती पण उंची कमी, शरीराने स्थूल आणि डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा होता.

अमेय अभ्यासात बरा होता तर शरण्या एकदम हुशार. त्याचा प्रत्येक गृहपाठ, उपक्रम, प्रकल्प करण्यात ती त्याची मदत करत होती. अगदी नोट्सही ती त्याला द्यायची. त्यामुळे तो अगदी बिनधास्त होता. काही झालं तरी ती आहेच असे तो तिला नेहमीच गृहीत धरायचा. ती सगळं अगदी निःस्वार्थ भावनेने करत होती.

जसजसे ते मोठे होत गेले तसतसे त्यांची मैत्री अजूनच गहिरी झाली. त्यांच्यांत भांडणे होत होती पण लगेच त्यांच्यात समेटही घडून यायचा.

तारूण्यात पदार्पण झालं आणि शरण्याच्या मनात त्याच्याबद्दल प्रेमांकुर फुटू लागले. हळूहळू ती प्रेमाची पालवी दाट होत गेली. तिने कधी त्याला सांगितले नाही. पण तिला त्याच्या वागण्या बोलण्यातून तोही तिच्या प्रेमात आहे असं वाटत होतं. त्यामुळे तिने स्वतःच्या मनातलं त्याला सांगितलेच नाही. तो आपल्याला खूप चांगले ओळखतो, कदाचित आपलं मनही त्याला कळेल असे तिला वाटले. त्यामुळे तिने कधी तिच्या मनातलं त्याच्यासमोर व्यक्तच केलं नाही.

काॅलेजचे शेवटचं वर्ष होतं. एक प्रकल्प करायचा होता. त्यामुळे सगळे त्यातच व्यस्त होते. पण अमेय मात्र शरण्यामुळे बिनधास्त होता. त्याला माहिती होतं नेहमीप्रमाणे त्या दोघांची जोडी बनली होती तर ती एकदम बेस्ट करेल. म्हणून तो निर्धास्त होता.

त्यादिवशी ती नेहमीप्रमाणे त्यांचा प्रकल्प पूर्ण झालाय हे सांगायला आणि त्याचे नोट्स त्याला देण्यासाठी त्याला शोधत होती. तो मित्रांच्या गराड्यात काॅलेज कट्ट्यावर बसून गप्पा मारण्यात गुंग होता.

"काय रे अमेय, झाला का तुझा प्रोजेक्ट?" त्याचा मित्र समीरने त्याला विचारले.

"मला काही टेंशन नाही, माझी पांडा आहे ना." अमेय हसत म्हणाला.

तोच गणेश काहीतरी म्हणाला. जे शरण्याने ऐकले. त्यामुळे अमेयही हसला. ज्याचे तिला वाईट वाटले.

क्रमशः

असे काय ऐकले शरण्याने ज्यामुळे तिला वाईट वाटले?