#ईरा जलद लेखन स्पर्धा- फेब्रुवारी:-२०२६
विषय:- क्षणिक सौंदर्य/ दुसरी बाजू
शीर्षक:- जाणीव प्रेमाची
भाग:- ३ (अंतिम)
"ती बुटकी, जाडी, चष्मिश होय. काय यार, तुम्ही दोघे किती मिस मॅच आहात. कसं तू तिला झेलतोस काय माहिती?" अमेयचा दुसरा मित्र सुरज हसत त्याला म्हणाला.
अमेयला खरं तर मनात राग उफाळून आला होता. तो त्याला काही म्हणणार तोच समोर त्याला प्रिन्सिपल दिसले. शेवटच्या वर्षात उगीच पंगा नको म्हणून तो त्याचा खांदा दाबत कडवट हसला आणि म्हणाला,"हो, बरोबर बोलतोस तू. मी तिला झेलतो. पण ती आहे म्हणून मला टेन्शन नाही. ती माझ्या यशाची शिडी आहे."
पण हे म्हणताना त्याला हे माहित नव्हते की शरण्या तिथेच उभी आहे. त्याचे बोलणे तिच्या मनाला खूप लागले. तिचे डोळे आसवांनी खळकन भरून आले. ती दोन पावलं मागे सरकली तेव्हा तिच्या हातातील वह्या पुस्तके आणि नोट्स खाली पडल्या. त्या आवाजाने सगळ्यांनी मागे वळून पाहिले. अमेय तर घाबरला. तिच्या डोळ्यांतलं पाणीच त्याला सगळं काही सांगून गेलं. त्याने मनातच कपाळावर हात मारून घेतला. हाताची मूठ जागीच आवळून घेतली.
तो तिला काही बोलणार तोच तिने पटापट खाली पडलेल्या वह्या, पुस्तके आणि नोट्स उचलून घेतले. नोट्स त्याच्या हातात दिल्या आणि काहीही न बोलता डोळ्यांतले पाणी उलट्या हाताने पुसून झपझप पावले टाकत तेथून निघून गेली.
त्याला सांगण्याची, त्याची बाजू मांडण्याची तिने संधीच दिली नाही. तेव्हापासून तिने त्याच्याशी अबोला धरला. तो दिसला की ती वाट बदलून जायची. तो घरी आला तरी ती त्याच्याशी बोलत नव्हती, त्याला टाळायची. त्यांच्या घरच्यांच्या ते लक्षात आलं होतं पण नेहमीप्रमाणे ते भांडले असतील असे वाटून त्यांनी लक्ष दिले नाही.
शरण्याचा अबोला, तिचे टाळणे आणि तिचे दूर राहणे अमेयला असाहाय्य करू लागले. तिच्या छोट्या छोट्या गोष्टी त्याला आठवू लागल्या. ज्यामुळे त्याला आणखी अस्वस्थ वाटू लागले. हळूहळू त्याला तिच्याविषयी प्रेम वाटू लागले. त्यांच्यात फक्त मैत्री नाही त्याही पेक्षा पुढे काही तरी आहे. ते म्हणजे प्रेम. प्रेमाची जाणीव झाल्यापासून तो तिला मनवण्याचा प्रयत्न करत होता. पण ती होती की त्याचं काहीच ऐकून घेत नव्हती.
आज मात्र तो मनात पक्का निश्चय करून आला होता की काहीही झालं तरी आज तिच्याशी बोलायचं. तिचे पाय धरावे लागले तरी तो मागे हटणार नव्हता.
आज त्याने तिची वाट अडवली आणि तिला मनातलं सगळं सांगितलं. त्याने जेव्हा तिच्यावरील प्रेमाची कबुली दिली तेव्हा तिला मनातून खूप आनंद झाला होता. पण पुन्हा तिला ते त्याचे बोलणे आठवले आणि ती नाराज झाली.
"ओ शरू, प्लीज बोलं ना काही तरी. साॅरी ना यार." तो तिच्या पायाशी झुकत म्हणाला.
ती दोन पावलं मागे सरकली आणि म्हणाली,"अरे, अमु उठ, काय करतोस तू? केलं तुला माफ; पण त्या दिवशी तू जे काही बोललास त्याच काय?"
"अगं, खरं तर सुरज जेव्हा तुझ्याबद्दल तसं बोलला तेव्हा मला खूप राग आला होता. ट्रस्ट मी! मी त्याला दोन ठेवून देणार होतो. पण समोर प्रिन्सिपल दिसले. उगीच लास्ट इयरला काही राडा नको होतं मला. माझ्यामुळे तुलाही विनाकारण त्रास झाला असता जे मला नको होतं म्हणून मी तसं बोललो. त्या दिवशी तुझ्या डोळ्यांत पाणी पाहून स्वतःला अपराधी वाटू लागलं. मी नंतर काॅलेजच्या बाहेर त्या सुरजला खूप बोललो. त्याच्याशी मैत्री तोडणार होतो पण त्याने माफी मागितली. पण यार तू तर माझी दुसरी बाजू ऐकूनच घेतली नाहीस. सरळ अबोला धरलास आणि आता दूर जाण्याची धमकी देतेस. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. मला माझं सगळं आयुष्य माझ्या या स्वीट आणि क्यूट पांडाबरोबर जगायचं आहे, प्लीज नाही म्हणू नकोस. आय रियली लव्ह यू, शरू." तो पुन्हा तिच्या गालावर हात ठेवत तिच्या डोळ्यांत खोलवर आपली प्रेमळ नजर रूतवत अगतिक होऊन म्हणाला.
"आय अल्सो लव्ह यू सो मच, अमू. पण तू खरंच सांगतोस ना. पुन्हा असं कधी तसं बोललास तर.." ती त्याच्या प्रेमळ नजरेला पाहत म्हणत होतीच तो तिच्या ओठांवर बोट ठेवून नकारार्थी मान डोलावत म्हणाला,"एकदा माती खाल्ली मी, पुन्हा नाही होणार."
"खरंच ना! " तिने नजरेनेच विचारले.
त्याने होकारार्थी मान डोलावत दोन्ही बाहू पसरले आणि ती धावतच जाऊन त्याला बिलगली. त्यानेही तिला घट्ट आवळून धरले. तीही त्याच्या बाहुपाशात विरघळून गेली.
समाप्त-
कधी कधी आपण दुसरी बाजू ऐकूनच घेत नाही. त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. वेळीच जर बोललो तर गैरसमज दूर होऊन नात्यात गोडवा निर्माण होऊन नातं परिपक्व होतं. सौंदर्य क्षणिक असतं पण मनाचं सौंदर्य चिरकाल टिकतं.
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा