Login

जनजागृती पुरस्काराने उत्साह शिगेला ..!

समाजप्रबोधन करण्यास लेखणी प्रभावी माध्यम आहे.
वृत्तपत्र पत्रलेखक संघ इचलकरंजी यांचा जनजागृती पुरस्कार उत्साह वाढवणारा ..!

ईरामुळे मी घडलो
लेखणीतील शब्दांनी बहरलो
मनापासून जपले समाजभान
जनजागृतीने मिळाला सन्मान

आपल्या दैनंदिन व्यस्त जीवनातून वेळ काढून लेखनासारखा छंद जोपासण्यात आवड मनाला अवर्णनीय आनंद देते. २०१५ साली व्हाटस्अप आले त्यामुळे सोशल मिडियाचा नूरच पालटला. मनातील छोट्या गोष्टी, कोणत्याही प्रसंगाला अथवा लिखाणाला प्रतिक्रियेतून दिलेली दाद आणि वाचनातून मिळालेली प्रेरणा यामुळे आपण थोडं लिहू शकतो याचा आत्मविश्वास मला निर्माण झाला.फेसबुक सारख्या माध्यमाची ओळख झाली त्यामध्ये ईरा या व्यासपिठाला एका निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाल्यामुळे जोडलो गेलो आणि येथून लिखाणाला श्रीगणेशा झाला. या व्यासपिठावर चारोळी , लेख, कथा लिहण्यास सुरवात झाली. लेखक,लेखिका भगिनिंची ओळख झाली. अनेक छोटे-मोठे पुरस्कार मिळाले त्यामुळे लिखाणास बळ मिळाले. ईराच्या सर्वेसर्वा संजना इंगळे यांची ओळख झाली. एका स्रीने प्रचंड कष्टाने व जिद्दीने उभारलेल्या व्यासपिठाला मनापासून सहकार्य देण्याचे ठरवले. ईराची प्रसिद्धी आत्ता वाढली होती. प्रतिभावंत लेखकांच्या कथा ईरावर गाजत होत्या अशावेळी लेखकांना प्रोत्साहन मिळावे व ईरावर लेखक सक्रिय रहावा यासाठी मी लेखकांच्या वाढदिवसनिमित्त त्यांचे लेखनकार्याचा व स्वाभाविक गुणवैशिष्ट्यांचा लेख लिहण्याचा उपक्रम सुरु केला याला सर्वांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला यामुळे ईरावर लेखकांना लिहण्यास उर्जा मिळाली. आज ईरा प्रगतीपथावर आहे. विविध स्पर्धांचे येथे आयोजन होत असून लेखक भरभरून लिहीत आहेत याचा मनस्वी आनंद होत आहे.

ईरावर लेखन चालूच होते अशावेळी ' मॉम्सप्रेसो ' या महिलांच्या व्यासपिठावर लिहण्याची संधी मिळाली. सुविचार व शंभर शब्दांची गोष्ट व अनेक उपक्रमावर समाजप्रबोधनात्मक लेखन केले. येथेही लेखिका भगिनिंचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.यानंतर अनेक निबंध स्पर्धेत भाग घेतला व बक्षीसेही मिळवली. पुणे मराठी ग्रंथालय ,साहिल प्रकाशन गोवा व मुंबई समर्थ सेवा मंडळ यांनी आयोजित केलेल्या पुस्तक समीक्षण स्पर्धेत धवल यश मिळाले. ईराच्या आयोजित दरवर्षी संमेलनात साहित्यिक जागर व्हावा या उद्देशाने प्रबोधनात्मक फलकातून विविध विचारांचे प्रदर्शन संमेलनाला वेगळीच झळाळी देते. ईराच्या राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कर्णधार व चॕम्पियन स्पर्धेत ' ईरा रत्न ' पुरस्कार यामुळे लेखनाला गती मिळाली.ईरा व साहिल प्रकाशन गोवा यांच्या दिवाळी अंकात लेखन केले.दै. पुण्यनगरी या वृत्तपत्रात रक्षाबंधन स्पर्धेत कवितेथून समाजप्रबोधन केले आहे.

लेखन करत असताना पहिले प्राधान्य गावाला दिले. भावेश्वरी परिवारामार्फत विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्वांचा सत्कार करुन त्यांच्यावर प्रेरणादायक लेख सोशल मिडियावर प्रसिध्द करण्याचे काम आजअखेर चालू आहे.गावातील संस्कृती व विविध परंपरांना लेखनाच्या माध्यमांतून प्रसिद्ध दिली आहे.फेसबुकवरील अनेक समूहावर लेखनकार्य चालूच आहे. सकारात्मक विचार आणि दुसऱ्यांना प्रेरणा देण्याचा भावनेतून विपूल लेखन केले आहे. या सा-यांचे श्रेय शब्दांना दिशा देण्या-या ईराला द्यावे लागेल.

हा सारा प्रवास चालूच आहे. कुठेही प्रसिद्धीचा हव्यास नाही.अशातच दै. सकाळला वृत्तपत्र पत्रलेखक संघ इचलकरंजी यांनी सोशल मिडियावर प्रभावी कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्याची जाहिरात वाचली. मनाला वाटले प्रस्ताव पाठवून बघूया आपल्या कार्याची दखल घेतली तर घेतली. या अनुषंगाने प्रस्ताव सुबक अक्षरात पाठवला. माहिनाभरानंतर पोस्टाने आपली जनजागृती पुरस्कारासाठी निवड झाली असल्याचे पत्र घरी आले. आपण केलेल्या कार्याचा मिळालेला हा बहुमान मनाला खूप आनंद देऊन गेला.

इचलकरंजीत समावादी प्रबोधन मंडळ येथे २१ सष्टेंबरला पुरस्कार वितरणासाठी मी हजर झालो. वृत्तपत्र क्षेत्रात गेली २८ वर्ष बहुमोल कार्य करणारा वृत्तपत्र पत्रलेखक संघ समाजातील अनेक लोकांना प्रबोधनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करत असतो त्यादृष्टीने त्यांनी यावर्षी सोशल मिडियाव्दारे समाजामध्ये प्रबोधन करणाऱ्या व्यक्तिंचा गौरव करण्याचे नियोजन केले होते. कोल्हापूर जिल्ह्यातून चार व्यक्तिंची निवड केली गेली यामध्ये माझे नाव पहिल्या क्रमांकामध्ये होते. कार्यक्रमांत संघटनेच्या पदाधिकारी याबरोबर शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्तविक अध्यक्ष पांडूरंग पिसे तर पाहुण्यांची ओळख प्रसाद कुलकर्णी यांनी केली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे यांनी वृत्तपत्र पत्रलेखक हे समाजाचे दीपस्तंभ आहेत त्यांनी सत्याची कास धरुन समाजात प्रकाश पसरवण्याचे काम करावे असे आवाहन केले. एकमेकांतील संवाद हा फार गरजेचा असून चांगल्या कामासाठी वादविवादही असावा असे मत व्यक्त केले. अनेक पुस्तकावरील मौलिक विचार आणि सोशल मिडिया यावरील दृरदृष्टीय मत यावर भाष्य केले. यानंतर त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. पाच विद्यापीठांचा अधिभार सांभाळणारे आणि विविध पुरस्कारांने सन्मानित अशा थोर विचारवंताच्या हस्ते मला ' जनजागृती पुरस्कार ' मिळाला हा आयुष्यातील श्रेष्ठ क्षण आहे. वृत्तपत्र पत्रलेखक संंघाचा २८ व्या वर्धापनास मी लिखित स्वरुपात शुभेच्छा दिल्या. हा पुरस्कार पुन्हा सामाजिक कार्य करण्यास उत्साह देणारा आहे. यासाठी गावातील भावेश्वरी परिवार , मित्रमंडळी , ईरा लेखक व लेखिका , सर्व ग्रामस्थ तसेच माझे सहृयी कुटुंब या सर्वांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले.याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार ..! वृत्तपत्र पत्रलेखक संघ इचलकरंजी यांनी समाजातील समाजप्रबोधन करणाऱ्या व्यक्तिंचा गौरव करुन वेगळा आदर्श निर्माण केला आहे त्याबद्दल त्यांचेही मनस्वी आभार ..!!

हा पुरस्कार मिळालेबद्दल ज्या शाळेने मला सुसंस्काराने घडवले व आयुष्याला चांगली दिशा दिली त्या श्री. सरस्वती वि. म. सरोळी या शाळेतील शिक्षकांनी सन्मानजनक सत्कार केला हा जीवनातील अविस्मरणीय क्षण होता. सकारात्मक विचारांने मार्गक्रमण केले असता चांगले व्यक्तीमत्व निर्माण होते हे साहित्यक्षेत्रातील लेखनामुळे समजले.

पुनश्च सर्वांचे आभार ..! हा लेखनवसा असाच चालू राहिल ..!